१. नववर्षाभिनंदन
नववर्षाच्या शुभ दिनी, स्वप्न सर्वांची साकार व्हावी.
आई वडील समाजाची, सेवा हातून घडावी.
प्रेम ममतेच्या वर्षावात, उंची शिखराची गाठावी.
सुखाची करून उधळण, स्वप्न सर्वांची पूर्ण व्हावी.
चांगल्या विचाराने, आजची तरुण पिढी घडावी.
वाईट विचारांची होळी करावी.
अंधा-या काळोखात, प्रकाशमय वाट मिळावी
आधाराचा देऊन हात,आपुलकीची नाती जपावी.
हीच आहे आमची इच्छा
नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
💐💐💐💐💐💐
— रचना भारती वाघमारे. मंचर, पुणे
२. स्वागत करू या जोरदार…
जाणाऱ्या वर्षा देतो
तुला हा निरोप,
काही तुला प्रेमाने,
तर काही दुःखाने
देतील तुला निरोप !!१!!
काही लोक तुला
उगाच ठरवतात वाईट
पण तु तुझ्या कामात
असतोच एकदम राइट !!२!!
महिना आठवडा दिवस तास
कधीच तु त्याच्यात
नाही केलं कमी जास्त,
तुला लोकांनी छान म्हणावे
म्हणून, चार सुट्ट्या नाही तू
दिल्या वाढवुनी !!३!!
प्रत्येक वर्ष असतं
काही तरी खास,
हे वर्ष तर आमच्यासाठी
सुवर्ण वर्षच,
प्रभु श्रीरामचंद्र झाले विराजमान
अयोध्या नगरीत थाटात !!४!!
झोपलेला हिंदूस्थान
झाला जागा
राजकीय गणितांचीहि
झाली उलथापालथ,
त्यात EVM मशिन बिचारी
उगा झाली बदनाम !!५!!
निरोप हा निरोपच असतो,
१० वी नंतर शाळेचा निरोप
लग्नानंतर माहेरचा निरोप
नोकरीसाठी गावाचा निरोप
तर, परदेशी जाताना आपल्या
मातृ भुमीचा निरोप !!६!!
निरोप घेताना
मन तर भरूनच येतं,
काही निरोप दुःखद आश्रूंनी
तर काही निरोप आनंदाश्रूंनी !!७!!
वर्ष कुठलेही असो
त्यांचे स्वागत हि जोरदार
त्यांचा निरोप हि जोरदार
हिच तर नव वर्षा,
तुझ्या येण्या जाण्याची
गंमतीदार मज्जा !!८!!
कडु गोड अनुभवाची
शिदोरी सोडुनी देऊ पाठी
मनाची पाटी ठेऊनी कोरी
स्वागत करु पुढील वर्षाचे !!९!!
खुप काही दिले तु
खुप काही नेले ही तुच
दिव्य रेकी, हिंलीग शक्तीची,
ओळख हि मला ह्याच वर्षी झाली !!१०!!
छान झाले ते तुझ्या येण्याने
वाईट झाले असेल ते,
आमच्या कर्म फळाने
आनंदाने देतो तुला निरोप
आणि स्वागतही करतो
नववर्षाचे आनंदाने !!११!!
— रचना : सौ. मंदा विजय शेटे. चेंबूर, मुंबई
३. नव वर्ष पहाट
असंख्य फुलांनी बहरावी,
स्वप्नांनी हरखून जावी,
नववर्षाची वाट अनोखी,
प्रत्येकाला हो लाभावी,
उत्तम आरोग्यही व्हावे,
मन मोकळे, ते हसावे,
प्रेमाची ती रीत अनोखी,
मृदू हृदयातून मोहरावी,
मनासारखे सारे व्हावे,
जग अवघे मुठीत यावे,
पर्यटन समूहाने करुनी,
अयोध्या, रामाची पहावी,
मथुरेला त्या जरूर जावे,
वृंदावनी कृष्णाला ध्यावे,
राम धून ती मनात म्हणता,
जीवनी, गीता आचरावी,
सारे जीवन मंगल व्हावे,
सुख शांती धन लाभावे,
स्वप्नपूर्ती ती होता होता,
चित्ती, ध्यान नम्रता यावी…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
४. निरोप 🩷
निरोप तुझा घेताना
पाय थबकले
मन गोंधळले
विचारांचे विचार
थांबले
पुन्हा पुन्हा मागे
वळून बघू लागले.
सुख दुःखाची
बेरीज वजाबाकी
करू लागले
आठवणीचे कोलाज
झाले
कडू गोड प्रसंगांच्या
उजळणीला धुमारे
फुटले
बंधांचे बंध सुदृढ झाले
सगे सोयरे समीप आले
आनंदाचे वारे वाहिले
कालवा कालव
ताटातुटीची
खंत पुन्हा न
भेटण्याची
पाणावलेल्या
डोळ्यांनी अलविदा
करण्याची
रमणीय ते दिवस
मनोहर
शोभून दिसते
काजळ किनार,
गाभाऱ्यात मनाच्या
जपून ठेवूया
क्षण आठवांचे
अनुभवूया
अमोल ठेव असे
ही आयुष्याची
मनांची मने
जपणाऱ्यांची
घेऊया आशीर्वाद
करू या स्वागत
तुझ्याच पुनर्जन्माचे
देखण्या नव्या रूपाचे
— रचना : मीरा जोशी. नवी मुंबई
५. आठवणी सरत्या वर्षाच्या
तुम्हा सर्वांच्या सोबतीने
अविस्मरणीय झालं 2024
कधी आनंदाचा गुलाल
तर कधी दुःखाने मन कासाविस
क्षण आनंदाचे असोत
वा दुःख संकटांचे
ते पार करायला हवेत
सगेसोयरे अन् मित्र जिवाभावाचे
वर्ष संपलं तरी प्रत्येक क्षणाने
मारलीय मिठी काळजाला
कारण एकच तुमचा सोनेरी सहवास
होता प्रत्येक क्षणाला
कधी प्रत्यक्ष भेटून
कधी फोनवरून
टाकलात तुम्ही सर्वांनी
जीव ओवाळून माझ्यावरून
दुःख संकटातून सावरलो
केवळ आणि केवळ तुमच्यामुळे
तुम्हीच दिलीत मला
हर्ष उल्हासाची सोन फुले
आजचा थर्टी फर्स्ट सांगतोय
आपुलकीची नाळ जपून ठेवा
ज्यांच्यामुळे तरलो आपण
त्यांना उद्या मदतीचा हात द्यावा
प्रत्येकाच्या मनात उद्यापासून
नव चैतन्याचा सूर्योदय व्हावा
हर्ष उल्हासाच्या वेलीवर
नव्या स्फूर्तीचा गुलाब फुलावा
कितीही येवोत दुःख संकटे
कणा आपला कधी न वाकावा
दीन दुःखितांच्या सेवेसाठी
दीप सहकार्याचा तेवत रहावा
सर्वांच्या सोबतीने करू
स्वागत 2025 चं
सुखसमृद्धी लाभो नव वर्षात
प्रभूकृपेने फुलो उपवन आनंदाचं
— रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800