Saturday, January 18, 2025
Homeसाहित्यनवं वर्ष : काही कविता…

नवं वर्ष : काही कविता…

१. चोवीस गेले पंच्वीस आले.

म्हणते कोणी कुणीतरी आले
म्हणते कोणी कुणीतरी गेले
मला न कळले काय जाहले

कोणी म्हणते चोवीस गेले,
कोणी म्हणते पंच्वीस आले.
तसाच होता दिवस उगवला,
तशीच आली संध्याकाळ,
रात्रही सरली तशीच आणि
तशी उगवली एक सकाळ.
कुठे कुणी नच आले गेले ?
मला न कळले काय जाहले

दारू पिऊनी कितीक पडले,
आणि पिऊनी कुणी लडबडले,
हसले रडले टेबल भिजले,
अचकट विचकट चाळे केले,
रस्त्यावरती थरार झाले,
कोट्यावधी दंडाचे भरले.
चोवीस कुठले पंच्वीस कुठले ?
मला न कळले काय जाहले.

सकाळ झाली भैरू उठला.
पहिली मध्ये हेच वाचले.
सत्तर वर्षानंतर पुन्हा,
भैरू उठला औत जोडले,
वाचून शुभेच्छा मोबाइलवर,
अश्रू दाटले मनात आले,
चोवीस कुठले पंच्वीस कुठले ?
तया न कळले काय जाहले.

पडद्याआडून अश्रूंच्या मग,
अवकाळीचे ढग पाहियले.
आठवणीतील सत्तर वर्षे,
काय बदलले काही न कळले.
मुले पळाली शहरांमध्ये,
तरी वृद्धपणी औत जोडले.
चोवीस कुठले पंच्वीस कुठले ?
तया न कळले… मला न कळले

— रचना : सुनील देशपांडे.

२. स्वागत नवसंकल्पांचे

एकविसावे शतक वयात आले
पंचविशीची स्वप्ने डोळ्यांवर आली
नव्या कल्पनांचा बहर आला
वास्तवफुले वेचू चला

तारुण्याची रंगबिरंगी दुनिया
स्वप्नाळू नजरा भुलवू चला
नवे प्रयोग, नव्या आकांक्षा
काही करण्याच्या नव्या दिशा

पडू, धडपडू, पुन्हा उठू
पंचविशीचा जोम टिकवू
एकविसाव्या शतकाच्या
तारुण्याची रग अनुभवू

नवसंकल्पांना वास्तवाची जोड देऊ
माध्यम कोणतेही असो पण
एकमेकांशी संवाद साधू
नववर्षावर ठसा उमटवू

— रचना : प्रसाद मोकाशी. मुंबई

३. स्वागत नूतन वर्षाचे

कधी आले अन सरून गेले
मुळीच कळले नाही
तुम्हा सर्वांच्या सहवासाने
उणीव भासली नाही

चौविसाचे पंचवीस झाले नित्याचे हे सरणे
ठेविले अनंते तैसेच रहावे
वाट चालत रहाणे

समय येतो काळ सरतो
बीज नवीन रूजते
त्याचे काम करतच असतो
आपले आपण सोडू नये

वसंत येता फुलतो ऋतु
दरवळ वहात असतो
नित्य नेमाने सालो साल
काळ असाच दरवळतो

गेले जरी वर्ष मागे
नवे येईल उमेदाचे
चला धावुया स्वप्नांमागे
ते असेल स्वप्नपुर्तीचे

नूतन वर्षाच्या शुभेच्छा
सफल होवोत साऱ्या इच्छा

— रचना: सुनील चिटणीस. पनवेल

४. नव्या वर्षात..!

या नव्या वर्षात
तो सुर्योदय व्हावा
भरल्या नभात
सुखाचा इंद्रधनुष्य व्हावा

काळी रात्र अमावस्याची
चांदण्यात खुलावी
प्रत्येक फुलाची
गुलकंद भरावी

प्रेम फुलावे
माणसा-माणसात येथे
वैर मिटावे
नसा-नसात येथे

सूर्य पहाट अशी
नव वर्षात यावी
जीवन -मरणाशी
उणीव घ्यावी..!

  • — रचना : बबनराव वि.आराख. जि. बुलढाणा.

५. कविचे नववर्षाचे स्वप्न

नको भेदाभेद
अवघी एक व्हावी,
अशी जाग यावी…
तुझ्या माणसांना !

नसो तुझे माझे
आपुलेच सर्व,
विरघळवा गर्व…
तुझ्या माणसांचा !

प्रेम द्यावे-घ्यावे
एकरूप व्हावे,
आनंदी रहावे…
तुझ्या माणसांनी !

नको धर्म, जाती
पंथ संप्रदाये,
मिटूनच जावे…
तुझ्या माणसांचे !

नसो खंड, देश
विश्वबंधूपण,
मिटावे मीपण…
तुझ्या माणसांचे !

येशू, अल्ला, राम
देव एक व्हावे,
शहाणपण यावे…
तुझ्या माणसांना !

  • — रचना : साहेबराव ठाणगे. नवी मुंबई.
    — निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on एक घास त्यांच्यासाठी..
Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय