Saturday, April 20, 2024
Homeलेखनवनिर्मिती

नवनिर्मिती

नवनिर्मितीची ओढ असायलाच हवी. काय करायची ही नवनिर्मिती ? पण आज नवनिर्मिती झाली नसती तर आपल्याला आरामदायी जीवन मिळाले नसते. यामध्ये नवनिर्मितीचा अगदी सिंहाचा वाटा आहे. या नवनिर्मितीच्या बळावर जीवन व्यतीत करणे हा एक मोठा परमानंद आहे. निष्क्रिय राहून आरामदायी जीवनाचे स्वप्न रंगवू शकत नाही. यासाठी नवनिर्मितीचा ध्यास ही काळाची गरज ठरते.

नियमबद्ध जीवन आपल्याला नकोसे वाटते. सतत कामात राहणे कंटाळवाणे होते. कधी कधी थकवा येतो. पण नवनिर्मिती अशा वेळी एक विलक्षण आनंद देते. लहान बालकाला जर आपण पाहिलं तर ते सतत काहीतरी नवीन उपद्वाप करण्याचा प्रयत्न करत असते. त्या उपद्व्यापातूनच अगदी अचानक एखादी सुंदरशी प्रतिकृती तयार होते. त्याला गुंतवून ठेवण्यास तुम्ही जर माती दिली तर, त्या मातीपासून छोट्या छोट्या मूर्ती तयार करते. मातीच्या वस्तू बनवते. म्हणजे शेवटी नवनिर्मिती हा मनोरंजनाचा, ज्ञानाचा आणि त्याचबरोबर समाजाला उपयोगी ठरणारा घटक आहे. पण त्यासाठी योग्य त्या मार्गाचा अवलंब केला गेला पाहिजे.

काहीजण या नवनिर्मितीच्या गुणाला वेड म्हणतात. काही व्यक्तींमध्ये हे वेड जन्मजात असते. ते सतत काही ना काही नवीन करण्याची धडपड करत असतात. रिकामे बसणे त्यांना आवडत नाही. त्यांना कंटाळा येत नाही. सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास त्यांना झोप लागू देत नाही. पण, इतरांच्या तुलनेत ते मात्र रिकामटेकडे धंदे करत असतात. अशा काही अपवादात्मक व्यक्तींना आपल्या नजरेतून वगळून अशाप्रकारे नवनिर्मिती करणे महत्त्वाचे आहे. नवनिर्मितीसाठी प्रेरणेची गरज आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला प्रेरणा मिळेलच असे नाही. तुम्ही करत असलेल्या योग्य सार्थ नवनिर्मितीचा प्रयोग समाजासाठी खूप बदल घडवून आणतो.

पूर्वीच्या काळी दूरध्वनी नव्हते. ज्यावेळी दूरच्या व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचवायचा होता तेव्हा एखाद्या आपल्या आप्त जवळच्या व्यक्तीला दुसऱ्या गावी पाठवावे लागे. त्यानंतर त्यासाठी पशु पक्षांचा वापर केला जाऊ लागला. त्याही पुढे जाऊन लेखनाची कला विकसित झाल्यावर पत्राने आपल्या संदेश पोहोचत असे. त्यातही अगदी जलद गतीने म्हणजे तार झाली. मग दूरध्वनीचा शोध लागला आणि आता त्याचे अगदी विकसित रूप म्हणजे भ्रमणध्वनी. प्रत्येकाच्या हातात आहे. क्षणात आपण आपल्या मनातील संदेश समोरच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा नवनिर्मितीचा ध्यासच आहे की त्याने जगाला जवळ आणले.

रिकामे बसून राहिल्यानंतर मनात अनंत विचार येतात. बरेचदा या विचारांची साखळी मनाला भंडावून सोडते. कुठेतरी शांती हवी असा मनात विचार निर्माण होतो आणि मन शांत होण्यासाठी मार्ग शोधू लागते. मार्ग मिळणे फार कठीण आहे. तरीसुद्धा तुम्ही स्वतःला गुंतवून घेतले तर सततच्या नकारात्मक विचारातून काही काळ बाहेर येते. आपला नवनिर्मितीचा ध्यास आपल्याला एक आनंद देतो. आनंदामुळे आपल्या मनातील तणाव दूर होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण काहीतरी समाज उपयोगी, जीवन उपयोगी, स्वतःच्या उपयोगी एखादी वस्तू तयार करतोय, एखादी कृती करतोय याचा आनंद हा ब्रम्हानंद ठरतो.

नवनिर्मितीतून तुम्ही तुमचा फायदा, आर्थिक फायदा शोधत राहिला तर नवनिर्मिती घडणार नाही. तुम्ही केलेल्या नवनिर्मितीतून बोध घेऊन इतरांना प्रेरणा मिळू शकते. बरेच शोध लागले. त्या शोधांचा अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी आहेत. लाखो विद्यार्थी त्या बळावर स्वतः काही पुस्तकांचे वाचन करून, संदर्भ साहित्यांचे वाचन करून नवीन प्रकारची कृती प्रतिकृती किंवा एखादी महत्त्वपूर्ण वस्तू बनवत आहेत. समाजालाही नवनिर्मिती महत्त्वाची आहे जर नवनिर्मिती कोणी केलीच नाही किंवा तसा ध्यास ठेवलाच नाही तर आजची आपली जीवनशैली जी आपल्याला खूप आरामदायक हवी ती मिळणे अशक्य.

ज्या प्रवासासाठी आपल्याला अनेक दिवस लागत होते. तो प्रवास सुद्धा हवाई मार्गाने केल्यास कमी वेळात पूर्ण होतो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. चांद्रयान – २ च्या अपयशाने खचून न जाता नवनिर्मितीच्या निरंतर पाठपुराव्याने चांद्रयान- ३ अभियान यशस्वी ठरले. त्यासाठी भारताची अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे प्रयत्न आपण विसरु शकत नाही.

नवनिर्मिती करत असताना आपला वेळ जरी गेला तरी तो निरर्थक गेलेला नाही. त्यात आपण बरेच काही शिकतो. हवे असलेले साध्य करू शकलो नाही म्हणून आपण त्याचा पाठलाग सोडून चालणार नाही. तुम्हाला सतत पाठपुरावा करून त्यात परिवर्तन करावे लागेल. तुमच्या प्रयत्नात कुठेतरी कमी आहे हे तुम्हाला समजल्यानंतर त्या नवनिर्मितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपला खूपसा वेळ गेला याचा विचार करण्यापेक्षा आपण एका चांगल्या कार्यासाठी वेळ घालवला ही त्यातली महत्त्वाची बाब आहे.

नवनिर्मिती ही समाज उपयोगी असून त्यात निरंतर प्रयत्न, सराव, अभ्यास करण्याची तळमळ हवी.नक्कीच त्यातून असाध्य साध्य करण्याची सकारात्मकता आहे.

— लेखन : डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर. मीरा रोड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Vilas Baburao Sarode,Chh.sambhajinagar, Aurangabad on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ
विजय पवार, नासिक on प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ