ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ, रुग्णसेवा केंद्राचा सातवा वर्धापन दिन सोहळा नुकताच ज्येष्ठ नागरिक भवनात श्री दि.ना.चापके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून डॉ श्री ओंकार माटे यांच्या मार्गदर्शनाखाली मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन श्री अरविंद वाळवेकर, नेरूळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यांनी केले.
वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर श्री अरविंद वाळवेकर यांनी प्रास्ताविक भाषण केले व संस्थेचा लेखाजोखा मांडला. रुग्ण सेवा केंद्राचे अध्यक्ष श्री रणजीत दीक्षित यांनी देखील आपले याप्रसंगी मनोगत व्यक्त केले आणि संस्था तळमळीने करीत असलेल्या सेवाभावी उपक्रमाबद्दल माहिती दिली.
यानंतर आश्रय दात्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अवयव दान केलेल्या व्यक्तींचा देखील सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीमती छाया ढेरे व त्यांच्या परिवारातील परिजणांचा सत्कार श्री शैलेंद्र देशपांडे, अवयव दान चळवळीचे कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी सभागृहातील वातावरण अत्यंत भावपूर्ण असे झाले याचे कारण असे की श्रीमती छाया ढेरे यांचा वीस वर्षाचा मुलगा याचे अपघाती निधन झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचे अवयव दान केले आणि त्यामुळे सात जणांना जीवदान मिळाले. आपल्या तरुण मुलाच्या निधनानंतर सामाजिक बांधिलकी समजून अत्यंत खंबीर मनाने इतका धैर्यशाली निर्णय घेतल्याबद्दल या मातोश्रीला खरंच सलाम केला पाहिजे. श्रीमती छाया ढेरे यांच्या सत्काराच्या वेळी संपूर्ण सभागृहांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे होते. श्री पुरुषोत्तम पवार , संस्थापक अध्यक्ष, बॉडी अँड ऑर्गन डोनेशन यांनी देखील त्यांचा सत्कार करून त्यांचे यथोचित सांत्वन देखील केल. या भावपूर्ण हळव्या वातावरणाने सभागृहातील सर्वांचे डोळे पाणावले.
या कार्यक्रमास डॉ ओंकार माटे, डॉ अशोक पाटील, डॉ अनिल देशपांडे व डॉ अण्णासाहेब टेकाळे यांनी संबोधित केले. रुग्णसेवेचे अध्यक्ष यांच्यावतीने श्री सुनील आचरेकर यांनी सभागृहास एक निवेदन वाचून दाखवले त्यामध्ये रुग्ण सेवा केंद्राच्या कामाची व्याप्ती वाढत आहे याची जाणीव सभागृहास करून दिली.
यानंतर अवयव दान या चळवळीचे श्री शैलेश देशपांडे यांनी अवयव दाना विषयी सभागृहास अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत आपण सहा प्रकारचे अवयव दान करू शकतो याची माहिती सभागृहातील तसेच अवयव दान कशाप्रकारे करता येते व काय काळजी घ्यावी याची देखील श्रोत्यांस माहिती सांगितली.
यानंतर प्रमुख वक्ते श्री पुरुषोत्तम पवार यांनी अवयदानाची किती आवश्यकता आहे व आपण उदासीन मानसिकतेमुळे अवयवादानाचे किती अनमोल धन नकळतपणे जाळून मातीत मिसळून नष्ट करीत आहोत याची जाणीव श्रोत्यांना करून दिली. भारतासारखा खंडप्राय देश व 140 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाकाय देशाला श्रीलंकेसारखा छोटा देश अडीच कोटी लोकसंख्या असलेला आपणास 90% डोळे पुरवितो ही बाब आपणास निश्चितच भूषणावह नाही हे त्यांनी सांगितले. लोकांच्या मध्ये जनजागृती करणे किती आवश्यक आहे यावर त्यांनी आपल्या खूमारसदार शैलीत लोकांना पटवून दिले.
यानंतर त्यांच्या भाषणाने प्रभावीत झालेल्या समुदायातून श्री दीपक दिघे, सचिव, ज्येष्ठ नागरिक संघ यांनी व्यासपीठावरून येऊन मी मृत्यू पश्चात देहदान करेन असे जाहीर केले. खरे तर या कार्यक्रमाची हीच महत्त्वपूर्ण फलश्रुती ठरली.
श्री दी.ना. चापके, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात रुग्णसेवा करीत असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच कौतुक देखील केले.
या कार्यक्रमास डॉ अशोक पाटील, डॉ अनिल देशपांडे, डॉ अण्णासाहेब टेकाळे, श्री अरविंद वाळवेकर, श्री प्रभाकर गुमास्ते, श्री दीपक दिघे, श्री अजय माढेकर , श्री रणजीत दीक्षित, श्री रमेश गायकवाड, श्री दत्ताराम आंब्रे, श्री विजय सावंत,
श्री हिंदुराव, श्री सुनील आचरेकर, श्री किरण देशपांडे, श्री गिरीश बर्वे, श्री हांडे देशमुख, श्रीमती स्वाती फडके, श्रीमती सीमा आगवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
श्री विकास साठे यांनी या अत्यंत सुसूत्रपणे व अतिशय नियोजन पद्धतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस श्रीयुत नंदलाल बॅनर्जी यांनी सर्व उपस्थित श्रोत्यांचे व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. रमेश गायकवाड व सहकाऱ्यांनी गायलेल्या राष्ट्रगीताने या संस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली.
— लेखन : विकास साठे. नवी मुंबई.
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800