महाविद्यालयीन जीवनात सांस्कृतिक प्रगतीला अतिशय महत्वाचे स्थान आहे. ठाणे – मुंबईतील अनेक महाविद्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवांना विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.
विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला असाच एक महोत्सव म्हणजे ठाणे येथील जोशी – बेडेकर महाविद्यालयातील नवरंग महोत्सव होय ! असे म्हणतात की, ‘यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे’ पण शिक्षण हे केवळ academic studies पुरतेच मर्यादीत नाही हे ज्यांना कळले त्यांनी यशाची शिखरे सर केली आहेत. म्हणूनच अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना देखील वाव मिळावा याकरिता आज शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडवले जात आहेत.
विद्या प्रसारक मंडळाचे के. ग. जोशी कला व ना.गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) ठाणे, गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व घडावे यासाठी कार्यरत आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.विजय बेडेकर, मंडळाचे सदस्य डॉ.महेश बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांचे खंबीर आणि कणखर नेतृत्व लाभल्यामुळे जोशी – बेडेकर कला – वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात यशाची शिखरे सर करीत आहेत. विद्यार्थ्यामधील क्षमतांचा शोध घेऊन त्यांना विविध संधी उपलब्ध करून देणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक मॅडम यांच्यामुळे जोशी – बेडेकर कॉलेजचे नाव आदराने घेतले जाते. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवे – नवे बदल घडत आहेत. विद्यार्थीकेंद्री शिक्षण हा गाभा अधिक मजबूत होत आहे. विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी नवरंग सारखे महोत्सव महत्वाची भूमिका बजावतात.
गेली तीस वर्षे जोशी- बेडेकर कला – वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थ्यांकरिता नवरंग महोत्सवाचे आयोजन करीत आहे. नावाप्रमाणेच हा महोत्सव विद्यार्थ्यांची प्रतिभा नवरंगांनी सजवण्याचे कार्य अविरतपणे करत आहे. नवरंग महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा तसेच त्यांच्या कला कौशल्यांचे सादरीकरण करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला जातो त्यामुळे, वर्षभर अभ्यासात अडकलेले विद्यार्थी काही क्षण स्वतःच्या कला कौशल्यांवर लक्ष केंद्रित करू शकतात.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक या कायमच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देत असतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नवरंग महोत्सव आकार घेत असतो.
“नवरंग 2023” अर्थात यावर्षीचा नवरंग महोत्सव देखील प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ‘संस्कृती से समृद्धी तक’ या संकल्पनेवर आधारित होता.
नवरंग महोत्सव विद्यार्थ्यांनी मोठ्या जल्लोषात आणि शिस्तबद्ध रीत्या साजरा केला.
नवरंग महोत्सवाचा शुभारंभ प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप प्राचार्या व या वर्षीच्या नवरंग प्रमुख प्रा. छाया कोरे, यांच्या हस्ते आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेश पाटील, डॉ. प्रियंवदा टोकेकर, प्रा. सुभाष शिंदे ,प्रा.नारायण बारसे, प्रा.नितीन पागी, डॉ.मृण्मयी थत्ते, डॉ.नीलम शेख यांच्या उपस्तिथित करण्यात आला.
महोत्सवाचा कार्यभार एकूण 16 समित्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन नवरंग यशस्वी केला. या सोळा समित्यांमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी तसेच प्राध्यापक यांचा समावेश होता. वरील सोळा समित्या अंतर्गत विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे देखील आयोजन केले गेले. या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्य व संगीत, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी स्पर्धा, शेप अप आणि हुला हूप, क्रीडा मेळावा, व्यक्तिमत्त्व चाचणी अशा विविध स्पर्धांचा समावेश होतो.
विविध कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकरिता खादी डे, बॉलीवूड डे, ग्रुप अलाईक डे, साडी डे आणि ट्रॅडिशनल डे अशा विविध डेज चे आयोजन करण्यात आले होते. या डेज ला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात स्पर्धांचा अमूल्य वाटा
नवरंग महोत्सवात विविध स्पर्धांचा अंतर्भाव करण्यात आला होता.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकूण तीन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. क्रीडा मेळावा, रांगोळी स्पर्धा व प्रश्नमंजुषा या तीन स्पर्धांमध्ये एकूण 250 विद्यार्थी सहभागी झाले. सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना सर्वांसमोर मांडल्या. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी DLLE उपक्रमांतर्गत चाट स्टॉल, मेंदी स्टॉल अशा विविध स्टॉल देखील आयोजित केले होते. ह्या स्टॉलचा कार्यालयीन स्टाफ तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांनी सुद्धा आस्वाद घेतला त्यामुळे, चाट स्टॉल मुळे कार्यक्रम अधिकच खमंग झाला आणि त्या कार्यक्रमात रंग मेंदीच्या स्टॉल ने भरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दुसऱ्या दिवशी महोत्सवात अधिकच उत्साह तयार झाला, कारण एरवी वर्गांमध्ये चौकटीबद्ध दिसणारे प्राध्यापक हे संगीत खुर्चीच्या खेळात रंगले होते. प्राध्यापकांचा हा मनोरंजक खेळ पाहण्यासाठी व खेळात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. नव्या जुन्या गाण्यांची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या हर्षनादात वातावरण अगदी प्रफुल्ल झाले होते. त्यानंतर उर्वरित स्पर्धा देखील घेण्यात आल्या ज्यात हुला हुप, शेप अप, personality compitition या स्पर्धांचा समावेश होतो.
वरील स्पर्धांना देखील विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला.
पर्सनालिटी कॉम्पिटिशन मध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्यांना नवरंग किंग, नवरंग क्वीन, नवरंग प्रिन्स आणि नवरंग प्रिन्सेस या नावाने गौरवण्यात आले. याच दिवशी महाविद्यालयात साडी डे व टाय डे चे देखील आयोजन करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्वत्र उत्साहाची लाट पाहायला मिळाली. सर्वच विद्यार्थी आपापल्या फोन मध्ये ह्या नवरंग च्या आठवणी फोटोज् आणि सेल्फीच्या माध्यमातुन साठवत होते.
नवरंगच्या तिसऱ्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा, बातमी वाचन स्पर्धा आणि कविता व लघुकथा वाचन स्पर्धा पार पडल्या सोबतच ट्रॅडिशनल डे निमित्ताने विद्यार्थ्यांनी संस्कृती से समृद्धी तक ह्या संकल्पनेला अनुसरून विविध पारंपारिक पेहराव्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
नवरंग महोत्सवाचा अखेरचा दिवस हा नृत्य व संगीत स्पर्धांमुळे अधिकच आनंददायी व अविस्मरणीय ठरला. यानिमित्ताने कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी आपली नृत्य व संगीत कौशल्य सर्वांसमोर प्रस्तुत केली. उपस्थित विद्यार्थी प्रेक्षकांनी या कलांचा आस्वाद घेतला दरम्यान संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांच्यात द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली ज्यात एकीकडे विद्यार्थी वर्तमान कार्यक्रमांचा आस्वाद घेत होते आणि दुसरीकडे नवरंग महोत्सवाचा समारोप म्हणून वाईट देखील वाटत होते. अखेर मनात नसताना ही कार्यक्रमाचा समारोप झाला.
नवरंग महोत्सवाच्या सर्वच समित्यांनी अथक परिश्रम घेऊन हा नवरंग महोत्सव यशस्वी केला ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.
अगदी कनिष्ठ महाविद्यालया पासून मी नवरंग अनुभवत आहे आणि दिवसेंदिवस नवरंग महोत्सव अधिकाधिक वृध्दींगत आणि आनंददायी होत आहे. प्रत्येक वर्षी नवे रंग, नव्या कल्पना आणि प्रतिभांनी नवरंग अधिक बहरतो, सजतो.
ह्या वर्षी चा नवरंग तर पार पडला पण मनात मात्र पुन्हा ओढ वाटू लागली ती पुढच्या नवरंग समारंभाची… पुन्हा त्याच आनंदाची… पुन्हा त्याच जल्लोषाची … नवरंग २०२४ ची…!
— लेखन : कु.ऐश्वर्या मोरे. द्वितीय वर्ष -कला शाखा
— संपादन:देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800