Saturday, July 27, 2024
Homeलेखनवे वर्ष, नवी आव्हाने !

नवे वर्ष, नवी आव्हाने !

नवे वर्ष नेहमीच काही तरी नवे घेऊन येते. हा निसर्ग नियम आहे. भविष्य हे वर्तमानापेक्षा वेगळे असते. वर्तमानात आपण अनुभवीत असलेले बदल खरेच आश्चर्यकारक असेच आहेत.

आपल्या देशापुरते बोलायचे झाल्यास सामाजिक, राजकीय वातावरण पार गढुळले आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे अधिक काळ लोटल्यानंतरही या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला कळली नाही असे खेदाने म्हणावे लागते. उत्तम संविधान, सकस लोकशाही, सुदृढ न्याय व्यवस्था सारे काही उत्तम असूनही, आपण स्वतःला प्रगत म्हणवून घेत असलो तरी, देश आनंदी नाही. आनंदी देशाच्या क्रमवारीत आपण रसातळाला आहोत ! गरीब श्रीमंत ही दरी कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे. उत्तम शिक्षण व्यवस्था फक्त कागदावर.मुळात शिक्षणाचा दर्जा घसरतोच आहे. आपली तरुण पिढी देशाबाहेर जाऊन श्रीमंत होतात, नाव कमावतात हे खरे. पण त्या अल्प संख्येच्या तुलनेत मागे इथेच राहिलेल्या तरुण पिढीचे काय ? किती जण शाळेच्या पुढे उच्च शिक्षण घेतात ? किती देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे सक्रिय, सृजनात्मक योगदान देतात ? हे भरीव योगदान कुठेच लक्षणीय स्वरूपात डोळ्यात भरत नाही.
उलट रस्त्यावर निरर्थक मोर्चात निरुद्देशिय गर्दीत हीच पिढी लाखोत दिसते ! हातात दर्जेदार पदवी घेऊन मिरवणारे फार कमी. पण हातात कोणाचा तरी झेंडा, गळ्यात कुठल्या तरी पक्षाचे उपरणे घालून निरुद्देश फिरणारे मात्र जास्त, अशी दारुण अवस्था आहे समाजाची. हाताला काम असते, माणसे आपापल्या कार्यात गुंतली असती, व्यस्त असती तर हे चित्र दिसले नसते.

हे निष्क्रिय चित्र बदलणे आपल्यापुढे फार मोठे आव्हान आहे. गढूळलेल्या राजकारणाबद्दल,धर्म – जातीत दुभंगलेल्या समाजाबद्दल काय बोलायचे ? जी नेते मंडळी हा गोंधळ घालताहेत त्यांना आपणच निवडून दिले आहे. सरकार बदलणे जनतेच्या हातात आहे असे आपण म्हणतो खरे. पण ते कागदावरचे प्रमेय आहे ! कारण आपण त्याच त्या प्रकारच्या, जातीच्या माणसांना पुन्हा पुन्हा निवडून देतो हे कटू सत्य आहे ! फार कमी विचारी, हुशार, प्रामाणिक, सतच्छिल माणसे आपण सत्तेत बघतो. हे चित्र आपण इच्छा असूनही बदलू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.

उत्तम दर्जेदार नैतिक शिक्षण, उत्तम हेल्थ केअर, शुध्द पाणी, शुध्द वातावरण, राहायला प्रत्येकाला घर..या मूलभूत गरजा आहेत कुठल्याही समाजाच्या. पण दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरातच मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत लोक ! मुंबई, पुणे सारख्या शहरात फक्त दोन महिने पुरेल एवढेच पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. अनेक शाळेत शिक्षक नाहीत. विद्यापीठातील, उच्च शिक्षण संस्थांतील हजारो पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत ! अनेक गावात नावालाच दवाखाना आहे. तज्ञ डॉक्टर नाहीत. इमर्जन्सी केसेस हाताळणारी व्यवस्थाच नाही. आधुनिक तंत्रज्ञान खेडे गावातील शेतात पोहोचलेले नाही. प्रत्येकाच्या हातात महागडे मोबाईल मात्र आहेत. पण त्याने शेती होत नाही. असाध्य रोग बरे होत नाहीत. शुध्द पाणी, हवा मिळत नाही. तंत्रज्ञानाने आपल्याला सुखी आनंदी केले नाही. आळशी मात्र केले ! आपल्याला तंत्रज्ञान कसे, कशासाठी, किती वापरायचे हेच कळले नाही. ती समज प्रत्येकात येणे हे खरे आपल्या पुढील आव्हान आहे.

आपल्यात धमक आहे, प्रतिभा, ऊर्जा देखील आहे. पण जाण नाही, इच्छा शक्ती नाही. आळस आता रक्तात इतका मुरला आहे की सगळे फुकटात हवे. सगळ्या सवलती हव्यात. कष्ट न करता श्रीमंत व्हायचे आहे प्रत्येकाला. हे लोकशाही चालविणाऱ्या राजकारणी पुढाऱ्यांना पक्के कळले आहे. दर पाच वर्षांनी ही मंडळी त्यांच्या तालावर आपल्याला नाचवतात. गारुड्या समोरील बंदरासारखे बहुसंख्य लोक नाचतात त्यांच्या पुढे. या नाचण्यासाठी आश्वासने मिळतात. गाजरं मिळतात. आपण सारे तेव्हढ्या पुरते खूष ! आपली सारखी फसवणूक होतेय हेही आपल्याला कळत नाही. खरे तर कळते पण वळत नाही!हे नाटकाचे नेपथ्य बदलणे आपल्या पुढील फार मोठे आव्हान आहे.
आपल्याला आपण सोडून बाकी सारे बदलावेत म्हणजे परिस्थिती बदलेल असे वाटते. पण प्रत्येकाने हाच विचार केला तर काहीच बदलणार नाही. सुरुवात आपण आपल्या पासून करायला हवी. आपले संकुचित, स्वार्थी विचार आपण प्रत्येकाने बदलले पाहिजेत. आपले विचार बदलले की आपले आयुष्य बदलेल. आपली प्रगती, आपले सुख, आपला आनंद हे आपण निवडून दिलेल्या लोकशाही नेत्याच्या हातात नाही. सगळे आपल्याच हातात आहे. म्हणूनच सुरुवात स्वतः पासून करायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने पाहिले पाऊल पुढे टाकणे हे खरे आव्हान आहे.

आपण फक्त आपल्या पिढीचा विचार करून उपयोगाचे नाही.आपण गेल्यावर आपण आपल्या नातवा साठी मागे काय, कोणते जग सोडून जाणार आहोत ? जे खाच खळगे आपण भोगले, जे दूषित वातावरण आपण सहन केले, ज्या चिखलात आपण रुतलो, ते तसेच त्यांच्या नशिबात यायला नको असे आपल्यापैकी प्रत्येकाला निश्चित वाटत असणार.मग त्यासाठी आपण वेळीच शहाणे व्हायला हवे .प्रत्येक मागे जाणारा क्षण लाख मोलाचा असतो, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे.

या शुभकार्यासाठी गुढी पाडव्या सारखा दुसरा मुहूर्त नाही. हे आव्हान पूर्ण करण्याची ताकद कुणाकडे आहे ? अर्थातच प्रशासनाकडे! प्रशासन म्हणजे सरकार नव्हे.सरकार निर्णय घेते. पण त्याची अम्मलबजावणी प्रशासन करते. प्रशासनात दुसरे तिसरे कुणी नाही तर तुम्ही आम्ही, आपल्या पैकीच कुणी तरी असते. ही प्रशासनातील आपल्यापैकी असलेली मंडळी प्रामाणिक, स्वच्छ, कामसू, असली तर वर निर्देशित अर्ध्या अधिक समस्या सहज सुटतील. आपण सगळे समस्येचे धनी आहोत. आपल्याला सोल्यूशनचा भाग व्हायचे नाही. कारण आपण आळशी आहोत. आपणच समस्या सोडविण्याच्या प्रक्रियेचा भाग झालोत तर समस्या आपोआप, सहज सुटतील. त्यासाठी सुध्धा गुढी पाडव्या सारखा दुसरा मुहूर्त नाही !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे
माजी कुलगुरू. हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८