आपल्या पोर्टलवर आज कवी संभाजी रणसिंग यांच्या काही कविता सादर करीत आहे. मूळ माण, सातारा येथील असलेले संभाजी रणसिंग हे सध्या पिंपरीगाव, पुणे येथे असतात. त्यांनी १९९० पासुन लिखाणाला सुरुवात केली आहे. ते मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून काव्य लेखन करीत असतात. अखिल भारतीय काव्य संमेलनात त्यांनी काव्य वाचन केले असून विविध काव्य संमेलनामध्ये ते सहभागी झाले आहेत. दिवाळी अंकातही त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. कवी संभाजी रणसिंग यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
१.
अंधार दाटलेला
वाटे भयांतरी
का माणसाळते ना
धर्मांधली दरी
क्षितिजात इंद्रधनुचे
आयाम थाटलेले
नजरेत सांगता का
रंगात बाटले ते
तर्कात लावता का
नसत्याच वाघरी
मुक्काम तो कितीसा
काढायला खुशीने
का बाटता विचारा
नसत्याच चौकशीने
तो स्पंदनी का आगळा
वदण्यास अंतरी
वैरात स्वैर आहे
हिरवा आणिक भगवा
उरलेत तेही करती.
नसताच गवगवा
सांगाल का गड्यानो
यातील जंतरी
हाडवैर माणसाचे
तर्रका सतर्क पाहे
माणूस की राक्षस
याहून कोण आहे
संभाजी पाहतो तो
दिसतो दिगंतरी
२.
तुला जर पाहवेना तर
करू का आत्महत्या मी
तोंडं लपवयाचे कोठे
वदे सत्त्या असत्या मी
कली युगातल्या देवा
कशी ही मानसिकता रे
बघे मलूलं चांदोबा
आणि आगतिकले तारे
कळांचा खेळ खंडोबा
कधी शमणार भव भूक
दिशा ही सापडेना अन
जिथे वाटाही अंधुक
कशाला वाटमारी ही
करू बघतो पांडुरंगा
किती बघणार आणखी तू
आधीचा होय लफंगा
नको वांझोटले जिणे
श्वास थांबव पुरे आता
विनवे संभाजी पायासी
बघे तू एकदा नाथा
३.
सावळ कांती सावल्यातली
बाहेरी ती कुठे आतली
हालते झुलते वाऱ्यावर ती
विविधांगाला सांगत नवती
असा केवढा भेद असे तो
नजरेवर बघताच हासे तो
कोरत अक्षर हृदयावर ती
वदे कटाक्षाने वावर ती
मोद मोदळे पोवंळ्यातले
हरवून जाती क्षण सुपातले
संसाराचे पिठाक्षर हे
अर्थ वदे संभा नश्वर हे

— रचना : संभाजी रणसिंग
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800