Tuesday, July 23, 2024
Homeलेखनव मतदारांचे कर्तव्य

नव मतदारांचे कर्तव्य

भारतमातेच्या सकल आशा ज्यांच्यात समाहित झालेल्या आहेत अशा वयाच्या अठराव्या वर्षाची वेस नुकतीच ओलांडलेल्या सकल भारतीय युवराज आणि युवराज्ञी यांना मनःपूर्वक मानाचा मुजरा !

अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, “लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही”.

याचीच एक महत्वाची पायरी म्हणजे निवडणुका. देशात १८व्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. १६ मार्च २०२४ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम (१९ एप्रिल ते २ जून २०२४) जाहीर केला आहे. १० फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात एकूण ९६. ८८ करोड मतदात्यांपैकी १. ८५ करोड (१.९० %) ‘नवमतदार’ आहेत. या विराट प्रक्रियेत ५ लाख मतदान केंद्रे आणि १.५ कोटी निवडणूक कर्मचारी कार्यान्वित आहेत असे कळते.

या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ४ ‘एम आव्हाने’ विशद केली आहेत. नवमतदारांनी ती लक्षात घ्यायला हवीत. Muscle (बाहुबल), Money (पैसा), Misinformation (चुकीची माहिती) आणि MCC (Moral Code of Conduct) violation (नैतिक आचारसंहितेचा भंग). यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असेल.

नवमतदारांवर पहिल्यांदाच जेव्हां मतदानाची जबाबदारी पडते, तेव्हां त्यांनी तिचे दडपण न घेता स्वतःला भाग्यवान समजून अभिमानाने यात आपली भूमिका डोळसपणे वठवावी. मतदान केल्याचा पुरावा म्हणून बोटावर उमटलेला शाईचा थेंब हा गर्वाने मिरवण्याचा एक अलंकारच समजावा! प्रत्येक मत हे अमूल्य आहे, नव्हे तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे समजून घेणे त्यांच्याकरता गरजेचे आहे. कदाचित त्याचे हे एक मत निर्णायक असू शकते. कर्तव्य पार पाडण्याचा हा पहिलावहिला आनंद प्रथम मतदान करणाऱ्याने उपभोगल्याशिवाय त्याच्यातला ‘चार्म’ कळायचा नाही !

आंधळेपणाने, कुणाच्या सांगण्यावरून (घरची मंडळी, मित्र मैत्रिणी, शेजारी पाजारी, तद्दन मंचीय भाषणवीर वक्ते अथवा सेलेब्रिटी स्टार्सच्या प्रभावाखाली येऊन) अथवा एखाद्या आमिषाला बळी पडत, किंवा कुठलीही शहानिशा न करता मत द्यायचे म्हणून दिले असा चुकीचा ऍटिट्यूड इथे दर्शवू नये.

माझ्या युवा मैत्रांनो, आजकाल प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते, माझे मत विचारात न घेता हे कां केले ? हे प्रश्न आपल्या वडीलधाऱ्यांना विचारणारे तुम्ही ‘नेक्स्ट जनरेशन’ चे प्रतिनिधी आहात ना ? मग मतदान करतांना आपली हीच ऊर्जा सोबत असू द्या. तुमच्या आवडत्या ऑनलाईन ज्ञानगंगेचा अन अर्थातच तुमच्या सुपर कॉम्पुटरसारख्या तीक्ष्ण बुद्धीचा वापर करा. निवडणुकीच्या वेबसाईटचा कोपरा न कोपरा पिंजून काढा. तुमचे नाव मतदार यादीत प्रविष्ट होण्यासाठी सर्व कांही करा. आपले नाव मतदार यादीत झळकतेय का हे तपासून बघा. नजरचुकीने तसे झाले नसेल, तर काय करायचे हे ‘शोधा म्हणजे सापडेल’.

यात थोडीशी भर माझी ! तुम्ही १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट न बघताही मतदार यादीत आपले नाव कसे नोंदवू शकता हे बघा. ऑगस्ट २०२२ चे सुधारित नियम तुम्हाला फार अनुकूल आहेत. १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै अन १ ऑक्टोबर या तारखांना तुम्ही १८ वे वर्ष पूर्ण करतांना त्या त्या वेळी तुमचे नाव मतदार यादीत येऊ शकते. (आधी १ जानेवारी ही एकच तारीख ग्राह्य धरलेली असायची) या सोबतच मतदार ओळखपत्र हा तुमचा विश्वासार्ह भारतीयत्वाचा तसेच निवासी पुरावा म्हणून जनमाणसात आणि सरकारदरबारी मान्य असेल, हे लक्षात असू द्या.

आता सरकार आणि समाज तुमच्या या हक्काबद्दल अधिकच जागरूक झाले आहेत. जास्तीत जास्त नवमतदार या निवडणुकीत कसे सहभागी होतील याचे व्यवस्थापन विविध स्तरांवर केले जात आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयात या विषयावर जागृती अभियान राबवून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच मुलांच्या परीक्षा मतदानाच्या दिवशी येणार नाहीत याची संपूर्ण काळजी घेतल्या जाईल. या बाबतीत युवा संघटना आणि युवा नेते यांनी पुढाकार घेऊन आपल्या समवयस्क मैत्रांचे ‘बौद्धिक’ घेण्याचे मनावर घ्यावे. कदाचित पुढील निवडणुकीत तुमच्यापैकी कोणी युवा नेता निवडणुकीच्या रिंगणात उभा असेल !

प्रिय नवमतदारांनो, तुम्ही जिथे मतदान करणार आहात, तिथे जे उमेदवार उभे आहेत, त्यांची A TO Z माहिती निवडणुकीच्या वेबसाईट वर नक्कीच उपलब्ध असेल. नव्हे ते बंधनकारक आहेच. तुम्ही त्याचे प्रोफाइल बघा. तुमच्याकरता तो काय करू शकेल याचा विचार करा, उदाहरण- तुम्हाला पुढील आयुष्यातील शिक्षण, रोजगाराच्या संधी, युवकांसाठी त्याची काम करण्याची ओढ आणि क्षमता, युवा पिढीसाठी त्याच्या योजना इत्यादी इत्यादी ! विभागाच्या समस्या सोडवण्याची हातोटी, या आधी तुमच्या विभागासाठी केलेली लक्षणीय सामाजिक कार्ये, ही व्यक्ती लोकसभेत गेली तर तुमच्या पुढील आयुष्यात तिचे योगदान कितपत असेल ? या आणि तुम्ही ठरवलेल्या निष्पक्ष निकषांवर कुठला उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो याची शहानिशा आधीच करून ठेवा, तुम्ही मतदान यंत्रासमोर उभे असताना नव्हे. मतपत्रिकेचा वर्चुअल नमुना तुम्हाला बघायला मिळतो, म्हणजेच Open Question Paper. अभ्यासपूर्ण विचार करायला भरपूर वेळ ! किती सुंदर परीक्षा ! निवडणुकीच्या दिवशी ऐटीत जायचे अन (आधीच ठरवून ठेवलेल्या) योजलेल्या ठिकाणी मत पडेल असा EVM (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) वापर करून ही परीक्षा संपल्याचे दणक्यात सेलेब्रेशन करायचे !

मात्र हे मतदान गुप्त असते, त्यामुळं कुणाला मत दिलंय, हे रहस्य स्वतःपाशीच असू द्या मंडळी ! तुम्ही ज्याला मतदान केलंय तो उमेदवार निवडून आला तर आनंद आहेच, पण समजा तो हरला तरी वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही तुमचे कर्तव्य जागरूकपणे पार पाडले आहे, याचा आनंद असू द्या !
NOTA-(नोटा-“None Of The Above”) काय आहे हे माहिती करून घ्या. २००९ पासून मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे बऱ्याच मुली (किंवा मुलगे) बघितल्यावर देखील एकही पसंत पडेना ! अशा वेळेस मला कुणालाही मत द्यायचं नाही. मग कशाला जाऊ मतदान केंद्रावर ? कृपया असा विचार करू नका. मला एकही उमेदवार पसंत नाही अशा अर्थाचा ‘NOTA’ हा पर्याय निवडा. ‘नकार’ देखील या प्रक्रियेत कसा महत्वाचा आहे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या. मी या मुद्यावर यासाठी भर देत आहे की, येन केन प्रकारे तुम्ही मतदानाचा आपला हक्क सोडू नका !

माझ्या मते याविषयी कांही गोष्टी महत्वाच्या आहेत. आईवडिलांनी मुलांच्या मत स्वातंत्र्यावर गदा न आणता त्यांना मतदारयादीत सामावून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यासाठी घरच्या तमाम मंडळींनी मतदानाची सुट्टी आहे, तेव्हा जाऊ या पिकनिकला, असे हानिकारक विचार अजिबात करू नये. तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदान करीत आपल्या मुलांसमोर आपला आदर्श निर्माण करा. मुले आपोआपच तुमचे अनुकरण करतील याचा मला गाढ विश्वास आहे.

माझ्या युवा मैत्रांनो, देशातील सकारात्मक ऊर्जेचे तुम्ही प्रतिनिधी आहात. सद्य परिस्थिती, निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी किंवा उमेदवारांबद्दल आकस यात तुम्ही ती नाहक वाया घालवू नका. तुम्ही मतदान केले नाही तर कदाचित चुकीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. याला जबाबदार मतदान न करणारे आहेत. तो निवडून आल्यानंतर त्याच्या नावाने खडे फोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मतदान न करून तो तुम्ही केव्हाच गमावलाय. ‘माझे सरकार मीच निवडणार’ इतका सोपा formula आपण कां बरे अंगीकारत नाही ?

आपण ज्या श्रद्धेने मंदिरात जातो, तीर्थयात्रेला जातो, तीच श्रद्धा आपल्या भारत मातेवर असायला हवी ना. अभिव्यक्ति स्वातंत्र्य जपण्याची आपली पराकाष्ठा घरून सुरु होते, त्यात ‘मला हवे ते मी करीन, बोलेन किंवा लिहीन हे आपल्यासाठी अत्यावश्यक! मात्र १ किलोमीटरचे इवलेसे अंतर पार करून विशेष प्रयास न करता EVM मशीनचे बटन दाबायला कांहींना इतका त्रास कसा होतो ? इलेक्शनची सुट्टी मजेत घालवायची दुर्बुद्धी कशी होते ? अत्यंत दुःखद बाब ही की, मतदान न करणाऱ्यांत शिकले सवरलेले शहरी लोक आघाडीवर आहेत. मतदान करणाऱ्यांची टक्केवारी हेच सांगते. कधीकधी तर मतदान करणाऱ्यांची टक्केवारी ४०% किंवा त्याहूनही कमी असते, ही आपल्या लोकशाहीकरता चिंतेची तसेच अपमानजनक बाब आहे.

नवमतदारांनो! आता तुम्हीच यावर जालीम उपाय शोधा अन स्वतःच्या नवपरिणीत ऊर्जाशक्तीचा संपूर्ण वापर करीत आपल्या घरच्यांना मतदान केंद्रापर्यंत (गरज वाटेल तर जबरदस्तीने) घेऊन जा. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा दर्या बनतो. कारण युवक युवतींनो, तुम्ही आपल्या लोकशाहीला नवसंजीवनी प्रदान करणारे भारतमातेचे बलस्थान आहात !

मैत्रांनो, अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट की, अचंभित करणाऱ्या आपल्या विशाल निवडणूक प्रक्रियेचा अखिल जगात बोलबाला आहे. तिचा अभ्यास करायला विविध देशातील, अगदी अमेरिकेतील तज्ज्ञ मंडळी येऊन आपले तोंडभरून कौतुक करून गेली आहेत. मग मैत्रांनो, वाट कसली बघताय ? १८ वे वरीस धोक्याचे नाही तर, खरे खुरे ‘वयात आल्याचे’ लक्षण आहे बरं ! आता मोठे झालात आपण! मतदानाचा दिवस हा सार्वजनिक सुट्टीसोबत सार्वजनिक कर्तव्यपूर्तीचा दिवस आहे. ‘मतदान हा माझा हक्क असून लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणारच’ अशी स्वतःशी प्रतिज्ञा करा. मतदान करण्याच्या प्रथम वेळीच या कर्तव्याला सर्वोच्च प्राथमिकता द्या !

मंडळी, मतदानासंबंधी ही दोन स्फूर्तिदायक गाणी यू ट्यूबवर नक्की पहा. लिंक लागत नसेल तर शब्द टाका अन बघा.
https://youtu.be/-sueZvqKhQA?si=-ITCwZYSSsRZGeb_
Election awareness song composed by the HP Police band, ‘Harmony of the Pines’
https://youtu.be/to324JIljf8?si=3IFX2eNNBkH1RIWr
Main Bharat Hoon- Hum Bharat Ke Matdata Hain | ECI Song | NVD 2023 | Multilingual Version

माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हा लेख (गाण्यांसकट) जास्तीत जास्त शेअर करून मतदानजागृती अभियानात सामील व्हा. आपण मतदान कराच, पण या राष्ट्रीय कर्तव्यपूर्तीत इतरांना देखील सामील करून घ्या. येत्या निवडणुकीच्या दिवशी लोकशाहीच्या या उत्तुंग प्रक्रियेत प्रत्यक्ष प्रथम सहभागी होऊन स्वतःचे कौतुक करीत बोटावरील शाईसकट विजयी मुद्रेने आकर्षक सेल्फी काढा अन लगोलग समाजमाध्यमांवर पोस्ट करा बरं !
जयहिंद! जय महाराष्ट्र !

डॉ मीना श्रीवास्तव

— लेखन : डॉ मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. डॉ मीना श्रीवास्तव यांचा नवमतदारांना मार्गदर्शन करणारा लेख छान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः