Saturday, October 5, 2024
Homeलेखनाट्य छटा : सुख

नाट्य छटा : सुख

आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी..
दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही…माझ्याच नाटकातला हा सर्वात सुविख्यात संवाद.. त्यावेळी माझ्या प्रत्येक प्रशंसकाच्या तोंडी हा संवाद असायचाच..

ऐन तारुण्यात ठरवले तसे सगळे घडत गेले. भूतकाळाच्या फाटक्या पडद्यातून बाहेर पडत झगमगाटाच्या दुनियेत उजळून दिसायचे.. हेच स्वप्नं होते.. स्वप्न पूर्ण करायला उमेद होती. मुठीत बळ होते.. जिद्द होती.. योगायोगाने नशिबाची साथही मिळाली .

यासाठी स्वतःत जमीन अस्मानाचा बदल घडलेला..घडलेला?? नाही नाही..घडवलेला होता.. मी तो नव्हेच.. असे म्हणण्या इतका बदल. जणू प्रयत्नांती परमेश्वर ही म्हण माझ्यासाठीच वाटायची. पण कधी परमेश्वराच्या नादाला लागायचा नाद मात्र लागला नाही.

सुरुवात जरी छोट्याशा भूमिकेतून झालेली तरी पुढे माझ्याशिवाय कलामंदिर म्हणजे रिकामा देव्हाराचं.
ही गुर्मी नसानसात कधी सळसळू लागली कळालेच नाही.
काय नव्हतं माझ्याकडे ? प्रत्येक ती गोष्ट होती जी इतरांकडे होती पण मला कधी मिळेल अशी आशाही नव्हती..पैशाने खरेदी करू शकतो ते सगळं काही होतं… पैसा म्हणजे सर्वस्व!! पैशामुळेच वर्चस्व !! पैसा म्हणजे फक्त नि फक्त शब्दातीत सुख !!

हेच माझ्या सुखाचे रहस्य होते. जे कुणाकडे नाही ते सगळे माझ्याकडे होते. मी कधी कुठे हरू शकत नव्हतो कारण मला सर्वांच्या पुढे जायचे होते.. कदाचित नियतीच्याही पुढे.. विदीर्ण भूतकाळाला जीवनातूनचं बाहेर काढायच्या नादात पैसा, मान, मरताब यांच्या नशेची पण नशा चढलेली होती. याच नशेतून वाढलेला उन्मतपणा कधी परिघाबाहेर गेला तेच समजलेही नाही.

मनात आलेली कसलीही इच्छा पूर्ण ती व्हायचीच.दयाळू कृपाळू बनून दानधर्म केलेल्या तसबीरी जेव्हा वर्तमानपत्रात पाहायचो तेव्हा उर अभिमानाने जरा जास्तच फुलायचा.. पण डोळ्यांवरुन नीतिमत्तेची पट्टी हटली होती. पैशाच्या मस्तीत नादावून गेलो होतो.. त्याच नादात तोल ढासळला हे लक्षात यायला बराच वेळ गेला.. आजूबाजूला अमिषाने बसायची ती चौकडी एकट्याला सोडून गेली तेव्हा जाग आल्यासारखी झाली पण परिस्थिती स्वीकारायला मन धजत नव्हते.. मी, मला, माझे म्हणजे एक फक्त बिंदू आहे जो वर्तुळ बनवून गोल गोल फिरवतोय हे समजेपर्यंत एक पोकळपणा निर्माण झाला होता.. जो कधीचं भरू शकणारा नव्हता.. इतरांचे सुख पाहून केलेला हेवा मला हसत होता.

भूतकाळातल्या सावटाशी स्पर्धा सुरु केलेली. भविष्याला सुखद बनवण्यासाठी.. जी आजच्या वर्तमानाला हरवून जिंकली होती.

मनिषा पाटील

— लेखन : सौ.मनिषा पाटील. पालकाड, केरळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

वैशाली कोंडाजी on “माध्यम पन्नाशी” : ९
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” : ९