“मामा”
नाते संबंध यावर आपले अनुभव लिहून पाठवा,या आवाहनाला अनुसरून आज “मामा” हा पहिला लेख प्रसिद्ध
करीत आहे. सौ सीता राजपूत यांच्या काही कविता या आधी आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध झाल्या आहेत. या पहिल्याच लेखाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
— संपादक
मामा म्हणजे काय ?
मॉं से बढकर याने मॉं से डबल प्यार करनेवाला. होय आई पेक्षा जास्त लाड करणारा मामा असतो. आईच्या माहेरपणाची आणि आई वडीलांनंतर वडिलांची जागा घेणारा मामाच असतो.
प्रत्येक स्त्रीला जीवात जीव असे पर्यंत माहेरच प्रिय असते. आणि का असू नये? लहानाची मोठी ती याच घरात झालेली असते. जगरहाटीनूसार ती लग्न करून सासरी येते व दुसऱ्या अनोळखी घरात आयुष्यभर राहते. ती दोन्ही घरची लक्ष्मी असते हे अंतीम सत्य आहे.
एक सुंदर छोटसं गाव. चारी बाजूंनी (माळ) डोंगराने वेढलेले. अतिशय गर्द हिरवी झाडे आणि मामाचे खूप खूप मोठे घर. अचानक शंभर माणसे आली तरी सहज बसून जेवण करतील एवढे मोठे आंगण आणि अंगणात नारळाचे झाड आणि घरावर कौलारू छप्पर जणू आपण कोकणाच आलो असे वाटायचे. कारण मला कोकण फार आवडायचे. लहानपणी मराठी च्या पुस्तकातील “स्नेही”पाठ, कधी कोकणातील वर्णन करणाऱ्या कविता बालकवींची, ‘आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे’, किती सुंदर वर्णन, बापरे !. कोकण म्हणजे जणू पृथ्वी वर अवतरलेला स्वर्गच जणू…..
कौलारू छप्पराचे घर, अंगणात नारळाचे झाड मोठा वाडा, अतिशय लाड करणारे मामा व चंदा मामी सुध्दा. मामीचे खरच नाव चंदा आहे.मला खूप आवडते. विशेष म्हणजे गोरीपान सुंदर माझी नानी सुध्दा होती. नाना पण खूप सुंदर रुबाबदार राजबिंडे होते .पण मामा सहा महिन्यांचे असतानाच ते देवाला प्रिय झाले.
मामाची मोठी मुलगी देवकन्या दूसरी मुलगी दुर्गा , लहान भाऊ बालाजी, गोविंद असे आम्ही खूप खूप मजा करायचो. नानी, मावशी खूप लाड करायच्या. मामा आणि माझी मोठी गोदावरी मावशी, मैना मावशी, जानका मावशी सर्वात लहान रतनबाई माझी आई होती. सगळ्यात लाडका भाऊ लाडाने ‘बाबू’ म्हणायच्या. सर्व बहिणी, एकुलता एक मामा. मामाला बाबू सिंग, गोकूळसिंग या नावाने ओळखले जायचे. बरेच मित्र लाला आहेत का ? सावकार आहेत का? असेही म्हणायचे. मामाकडे बागायती शेती , मळा आहे. त्या शेतात मला जायला खूप खूप आवडायचे व आताही आवडते. चारही बाजूंनी डोंगर मळ्यात विहीर, दोन बोर मस्त झाडाला टांगलेली बगळी, झोका. मज्जाच मजा. शेतात ऊस, कापूस, गव्ह डोलत असे.आंब्याचे झाड, किती आनंद वाटायचा. विशेष म्हणजे शेताच्या बाजूला एक सुंदर झुळझुळ वाहणारी नदी , किती मजा यायची नदी ओलांडून जाताना. कधी कधी तिथेच बराच वेळ जायचा. आणि विहिरीचे पाणी मोटरने सोडल्यावर खेकडे दिसायचे. पाण्यात खूप खेळायचो. गायी, म्हशी मोठा गोठा साक्षात लक्ष्मीदेवीच नांदत आहे असे वाटते. जवळच नांदेड असल्याने नांदेड ची गंगा, तेथील गुरुद्वारा वगैरेचे किस्से ऐकायला मिळायचे.
आजही कलंबरला अगडम बाबा या ग्राम दैवताची भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरते.विशेष म्हणजे पहाटे तीन वाजल्यापासून अग्नी (आग्गी) ची तयारी करतात. म्हणजे खूप सारी लाकडे जमा करून पेटवतात व आग, विस्तव तूप टाकून तयार करतात. गावातील जी कोणी ठरलेले भक्तगण आहेत ते त्या आग्गीतून पालखी घेऊन तीन चार वेळा चालतात. हे पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी दूरवरच्या गावातून होते. खरच ती गर्दी, आनंद काही औरच असतो. शब्दात सांगणे अगदी अशक्यच आहे.
असाच एक किस्सा ऐकायला खूप खूप मजा येत असे. आणि तो ही खऱ्या वाघाचा. म्हणूजे पूर्वी घडलेली एक गोष्ट आहे. आई खूप लहान असेल. त्या काळात लोक चिमणी, कंदील वापरायचे. असा तो काळ होता. रात्रीची वेळ होती. जवळपास बारा वाजून गेले असतील. त्या शांत रात्री च्या वातावरणात तो गडद पसरलेला अंधार होता. लोकांचे करमणुकीचे साधन म्हणजे भजन, किर्तन, असेच होते. म्हणून लोक मारूतीच्या पारावर पोथी लावत असत. रामायण कथा संपून लोकं रात्री घराकडे हातात काठ्या, कंदील घेऊन निघाली. कारण त्या काळात चोरापेक्षा जास्त जंगली जनावराची भिती होतीच.त्या रात्री लोक नेहमी प्रमाणे घराकडे येत होते आणि समोर वाघ दिसला. पण काठ्या, कंदील असल्याने तो वाघ मामांच्या घरातच शिरला. दार उघडे होते. लोकांनी आरडाओरडा केला. नेमके त्याच दिवशी गायीने वासरू दिले होते. शेजारच्या सावकारांच्या वाड्यातील गड्याने ते सुखरूप पार पाडले होते.
पण नियती काही औरच होती. वाघ घरात शिरल्यामुळे आरडाओरडा ऐकून सारे जागेच होते. मोठी मावशी बाळांत झाल्यामुळे घरात जाग लवकरच आली. लोकांनी, सावकाराच्या महाडीवरून मामांच्या घरात प्रवेश केला. सावकाराचा धीट गडी , बिचारा ओसरीवर जाळ करून बसला. त्यामुळे वाघ वर येऊ शकत नव्हता. पण त्याला ऐतीच शिकार भेटली होती. त्याने गाईचे नवजात वासरू खाऊन टाकले. पहाटे पहाटे तो वाघ निघून गेला. आम्ही सर्व लेकरे खेळताना किंवा अंगणात शेकोटी करून बसत असू तेव्हा हा किस्सा सांगायलाच लावायचो. गोष्टी, गप्पा किती मजा असायची. त्यांचे अंगणात मोठा तकत (पलंग), बाज टाकून कधी कधी रात्रीच्या चंद्र🌙 टपोर्या चांदण्यांची मजा घ्यायची. ते नारळाचे माझे आवडते 🌴 असायचे. खरेच बालपणीचा काळ सुखाचा होता.
मामाच्या गावाचे वर्णन करावे तेवढे कमीच आहे. त्यात साखर कारखाना त्या गावाची शान वाढवायला होताच. मा. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले असे म्हणतात.
मामाच्या गावाला त्यांच्या शेजारी कोमटी समाजातील सावकार होते. त्यांची मुलगी माझी व देवकाची प्रिय मैत्रीण नीता होती. अतिशय मनमिळाऊ व समजूतदार आणि प्रेमळ होती. त्यांच्या महाडीची चर्चा अवघ्या नांदेड जिल्ह्यातील गावात होती. कारण तिचे आजोबा, का पणजोबा यांना नांदेड ची गंगा घरातून झोपून पाहायची होती. म्हणून ती महाडी व नीताचे घर प्रसिद्ध होते.
आम्ही विचारले एकदा ,काय झाले झाले का बांधून? समजले सात मजले पूर्ण केले. उभे राहून गंगा नदी दिसतच होती. पण लोकांनी ते बांधकाम थांबवले म्हणे. भिती वाटत होती.आता वाटते त्या काळातील लोक काही कमी शौकीन नव्हते. बरेच काही मनात विचार येतात. आमच्या सोमेश्वर मंदीराच्या दाराऐवढे त्यांच्या घरांचे दरवाजे आजही आहेत. पूर्वीचे कसे असतील माहिती नाही.
अशा या सुंदर गावात मी दरवर्षी दिवाळी,उन्हाळ्यातील पूर्ण सुट्टी घालवायची. किती आनंद होता तो. एखाद्या पुस्तकात लेखकाने काल्पनिक वर्णन करावे, किंवा परी कथेतील सुंदर दिवस लिहावे असे अविस्मरणीय जीवन मी मामाच्या गावाला जगले होते.
मामाच्या घरी खरेच कशाचीच कमी नव्हती.मामा माझा तालेवार जणू हे वर्णन त्यांच्या साठीच आहे असेच वाटते. मामा दिसायला एकदम राजबिंडा. नेहमी शुभ्र पांढरे कपडे व पांढरा रूमाल गळ्यात असायचा.
मी एकटीच लाडाची भाची म्हणून मामी पण खूप लाड करायच्या. खायला कशाचीच कमी नव्हती.मी घरी निघताना मामाने कधीही मला ,आईला नवीन साडी, बांगडया फ्रॉक शिवाय येवू दिले नाही. कधीच नाही.
मला आताशा रक्षा बंधनला मामाची खूप खूप आठवण येते. कारण मामांनी कधीही रक्षा बंधन चूकू दिले नव्हते. मला समजते तसे व पूर्वी पासूनच एकदा ही रक्षा बंधन व भाऊबीज चूकवलेली आठवत नाही. मामांना कितीही काम असले, वेळ नसला तरी राखी कधीही चूकू दिली नाही.आईला पण किती तरी आठवण येत असेल ? कारण दोन वर्षापूर्वी मामा देवाला प्रिय झाले. त्या दोघांचेही हे बंधन सर्वांना माहिती होते. कारण मामा ईकडे येवून राखी बांधायचे. त्या काळात फोन नव्हते, नंतर आले. पण आई वाट पाहायची. दादा पण खूप आवर्जून मामाला भेटायला उत्सुक असायचे. मामा नेहमी पत्र पाठवायचे. ते मामाचे पत्र कधीही विसरू शकणार नाही. कारण दादा माझ्या कडून मामाला पत्र पाठवायचे. त्या पत्राची मजा कशातच नाही.
मी लहान असताना गोकूळसिंगचा बाळा सिंगला नमस्कार असेच लिहित असायची. खरे तर बाळासिंगचा गोकूळसिंगला नमस्कार लिहायचे होते.मी चूकायचीच पण दादा कधीही रागवत नसत. मला लगेच दूसरे पत्र काढायचे. कधी कधी तर तिसरे पण. ते पत्र, आंतरदेशी कार्ड कुठे हारवले व बहीण भावाचे प्रेम पण हारवले का? असेच वाटते. आई मस्त जेवण बनवून ठेवायची. बाबू येणार आहे म्हणून शेजारणीला सांगायची. मला पण मैत्रिणी विचारायच्या, काय मामा आले का?
मला तर सणापेक्षा मामा आले म्हणूनच किती मजा वाटायची. खायला फरसाण,पेढे, केळी, भुई मुगाच्या ओल्या शेंगा , अशा किती तरी गोष्टी घेऊन यायचे. रात्रीला आम्ही टाॅकीजला पिक्चर पहायला जायचो.
आई आणि मामांच्या रक्षा बंधन ची आठवण आली कि, मन एकदम कावरे बावरे होते. किती दिलदार मनाचा भाऊ व ती नशीबवान बहीण आज आठवणीतच, आठवणीची राखी बांधताना दिसतात. तिचा पाठीराखा कुठे दिसत नाही.
जग खरेच खूप बदलले आहे .आज बहीण भाऊ एवढा वेळ काढून शकत नाहीत. हेच खूप वाईट वाटते. आणि लहान मूलही मामाकडे एवढे दिवस राहताना दिसत नाहीत. भले काही असो पण राखीसण कधीही या बहीण भावाने चुकवला नाही. तसे पाहता हा राजपूत लोकांचा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण कधीही चूकवला नाही.याच गोष्टींचा हेवा वाटतो. तसे मोठा बालाजी देवकाकडे व दुर्गा कडे जातो. व लहान भाऊ गोविंद माझ्या कडे येत असतो. राखी ची परंपरा मात्र चालू आहे. मी वाट पाहतेय……..
मामा परत कधी येईल, त्याची !
— लेखन : सौ. सीता राजपूत. घाटनांदूर, जि. बीड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800