“सासरची लेक”
“नाती” या लेखमालेत आपण मामा विषयी सौ सीता राजपूत यांनी लिहिलेला पहिला भाग वाचला. आज “सासरची लेक”
हा दुसरा भाग लिहिला आहे, मूळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील पण विवाहानंतर पुणेकर झालेल्या, सौ भारती धनंजय सातपुते यांनी. लहानपणी त्यांना पत्र लेखनाची खूप आवड होती. लेखनाची ही आवड आता जोपासायची, असे त्यांनी ठरविले आहे. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक
“सासरची लेक”….
लेक हा शब्दच जादुई रंग आहे… तिच्या येण्याने विविध प्रकारचे रंग आयुष्यात भरले जातात…
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, या गीताच्या बोलाप्रमाणे सासर – माहेर दोन्ही घरात लेक तिचा रंग भरता भरता स्वतः त्यात सामावून जाते…
प्रत्येक रंगात मिसळून गेल्यानंतर देखील तिचा रंग वेगळा भासतो…
तनु माझी लेक, तिचे लग्न होऊन जवळ जवळ तीन महिने होत आले, या तीन महिन्यात लेकीचे तीन वेळा पुण्याला माहेरी येणे झाले होते… नव्याने संसाराला लागलेली लेक दोन दिवस आली की घर भरून जात होते..
मम्मा मम्मा च्या आवाजाने, ते दोन दिवस छान वाटत असायचे… लेक म्हणजे भरलेले घर याची पदोपदी जाणीव होते असे… गप्पांचा विषयातून, आपल्या कडे, आमच्याकडे, या शब्दांचे फरक जाणवू लागले..
लेक म्हणजे काय असतं ?
हे शब्दांत सांगणे तसे कठीण.. सासरी गेल्यानंतर लेक सासरच्या लोकांमध्ये मिसळून एकरूप होऊन जाते.. त्यांच्यात सामावून जाते.. त्याचे प्रत्यय ‘आमच्याकडे असं असतं’ या शब्दातून मला जाणवायला लागले…
पण लेक अशी जादू असते की ती माहेरातून सुद्धा बाहेर कधीच पडत नाही… तिच्या बोलण्यात तुमच्याकडे हा शब्द माहेरसाठी कधीच निघत नाही… तिने सासर आपलेसे केलेले असते म्हणून आमच्याकडे आणि मनात कायम असलेल्या माहेरासाठी आपल्याकडे या दोन शब्दांची नव्याने मला जाणीव तिच्या बोलण्यातून कळू लागली.. कसे जादूई बोल असतात ना सासरी गेलेल्या लेकीचे ?..
कधी कधी लेक सासरी गेली असा विचार आला की मन उदास होतं आणि तिच्या गप्पांमधून, आमच्याकडे…
आपल्याकडे.. यातील बदल बघुन तिच्या विचारांचा अभिमान वाटतो.. आणि ही आपली अजूनही छोटीशी वाटणारी लेक तिच्यात झालेल्या बदलाची ओळख करून देत असते… माहेरच्या छोटया छोटया गोष्टी तिला आठवत असतात. हे ऐकून आनंदाचे एक हास्य नकळत उमटत असे… दोन दिवस राहून पाखरू आपल्या घरट्याकडे परतीची वाट धरत असे… ती खूप सुखी आहे… आनंदी आहे.. हेच महत्त्वाचं…
या काही दिवसांमध्ये आता हळूहळू सवय होऊ लागली तिलाही सासरी रमायची. .. आई वडील म्हणून लेकीशिवाय रिकाम्या, शांत घरात राहण्याची आम्हालाही आता सवय होऊ लागली… तिच्या खोलीतील, कपाटातील वस्तू क्षणोक्षणी तिची आठवण करून देत असतात.. घरातील आवाज, लगबग कमी होऊ लागली होती… आदित्य आणि तनुचा हा होळीचा पहिला सण होता… माझ्या सुरू असलेल्या रेडिएशनच्या ट्रीटमेंट मुळे बंधनं आल्यासारखी वाटत होते मला… पहिले पहिले सण साजरा करुयात असं खुप वाटत होते… मनात इच्छा पाहिजे, मार्ग आपोआप निघतात.. गुरुवारी सकाळी रेडिएशन झाल्यानंतर तीन दिवस रेडिएशनला सुट्टी आहे असं कळलं.. मग एकदमच हुरूप आला. लेकीच्या सासरी जाण्याचा… तिला भेटण्याच्या ओढीने, होळी सणाची उत्सुकता वाढली …
धनंजय ने ऑफिस आणि मिटिंग मधून वेळ काढून जेवढं शक्य झाले तेवढं होळीच्या सणासाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारी केली…
एका दिवसात सगळी तयारी करून आम्ही धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी विरारला निघालो…यापुर्वी विरारला भाचीचे घर म्हणून जाणे होत असे… विरार तसे काही नवीन नव्हते… पण लग्नानंतर सासरी नव्याने संसारात रमलेल्या लेकीकडे जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता… होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण, आपुलकीचा ओलावा, या उत्साहाच्या रंगाने मनात नव चैतन्य भरले …
लेकीकडे धुलीवंदनाच्या दिवशी आमचे जाणे झाले …
वसंत ऋतूची चाहूल घेऊन होळी सण आला..
राधा कृष्णाच्या शाश्वत प्रेमाचा रंगोत्सव साजरा करण्यासाठी लहान मोठे सगळे उत्साहाने तयार झाले होते..
आम्ही पोहचताच खाली सगळे भेटले… घरात पोहचले आणि लेकीने घट्ट मिठी मारली.. त्या क्षणीं मी स्वतःला विसरून गेले…
तिचा आणि माझा आनंद त्या घट्ट मिठीत सामावुन गेला होता.. तो क्षण जणु काही मी पहिल्या वेळेस अनुभवत आहे असं मला जाणवलं…
मी जराशी बाजूला होत नाही की पप्पा च्या मिठीत गेलेली लेक मी बघत होते… ती घट्ट मिठी जणु काही तिला सोडवत नव्हती…जो अनुभव मला आला तोच अनुभव पप्पांनी घेतला… मी सगळा आनंद डोळ्यात साठवत होते… संसारात रमलेल्या लेकीच्या त्या घट्ट मिठीमुळे त्याक्षणी माझ्या वेदना सगळं काही विसरून तिच्या प्रेमाच्या रंगात मी रंगुन गेले होते… पप्पांच्या तोंडातून आलेले वाक्य, “मी आज खुप खुश आहे, माझ्या लेकीने मला मारलेली घट्ट मिठी कधीच नाही विसरणार …. ” शब्दांत न मांडता येणारे सुख आम्ही आज अनुभवले होते…
धुलीवंदनाच्या दिवशी सगळीकडे रंगांचा वर्षाव होत होता… आमच्यासाठी साठी ही प्रेमळ रंगांची धुळवड अविस्मरणीय ठरली होती… उधळणाऱ्या रंगात आसमंत न्हाऊन निघाला होता …
या सगळ्या प्रेमाच्या रंगात आम्ही मोठे सुख अनुभवत होतो.. आमची सासरची लेक आणि तिची घट्ट मिठी सदैव आयुष्यात रंग भरेल..

— लेखन : सौ. भारती सातपुते. पुणे
— समन्वय : प्रियंवदा गंभीर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय सुंदर लेख.