Saturday, July 27, 2024
Homeलेखनिसर्ग मित्र संमेलनाची गरज

निसर्ग मित्र संमेलनाची गरज

आज २२ मार्च, जागतिक जलदिन आहे. त्यानिमित्ताने जल संवर्धनासाठी निसर्ग मित्र संमेलनाची गरज सांगणारा हा विशेष लेख..
– संपादक

मध्यंतरी जलशास्त्रज्ञांची जागतिक पातळीवर परिषद झाली त्यात जगातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या देशांची यादी बनवली गेली. त्यात भारताने योग्य खबरदारी घेतली नाही तर भारतात लवकरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवेल असा इशारा दिला गेला.

जगात उपलब्ध असलेल्या वापरायोग्य पाण्याच्या साठ्यापैकी अवघा चार टक्के साठा भारतात आहे़. औद्योगीकरणामुळे नद्यांचे पाणी मोठ्याप्रमाणात प्रदूषित होत आहे़. जमिनीवरील व जमिनीखालील पाण्याचे प्रमाण घटत आहे़. भारतातील ७० टक्के पाणी समुद्रात वाहून जात असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे़.

भारतात दरवर्षी पाऊस आणि बर्फवृष्टीद्वारे सरासरी १८६९ अब्ज घनमीटर पाणी जमिनीवर पडते. परंतु त्यातील फक्त ६९० अब्ज घनमीटर पाण्याचा वापर केला जातो. याशिवाय जमिनीखाली ४३२ अब्ज घनमीटर पाणी जलसाठय़ातून उपलब्ध होते.

देशात चेरापुंजी येथे सर्वात जास्त पाऊस पडतो तरीदेखील त्या ठिकाणी टँकरने पाणी देण्याची वेळ येते. दरवर्षी पावसाळ्यात एकशेवीस दिवसात सव्वालाख कोटी टन पाऊस पडतो. तो अडवला गेला तर तीन वर्षे पाऊस पडला नाही तरी पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल. यावरून पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबवणे गरजेचे आहे़.

खरं म्हणजे अगदी प्राचीन काळापासून आपल्या ऋषीमुनींना जलसंवर्धनाचं महत्व माहीत होतं. मत्स्यपुराण, महाभारत, भीष्मपर्व, वनपर्व या साऱ्या प्राचीन ग्रंथात जलसंधारणाचे उल्लेख सापडतात. पाणलोट क्षेत्रातील पाणी अडविण्यास पाच हजार वर्षांपासून सुरुवात झाली आहे़. आपले ऋषीमुनी केवळ आध्यात्मिक तज्ञ नव्हते अथवा फक्त सिध्दयोगी नव्हते तर पर्यावरणतज्ञ होते. अरण्यविद्या वाचस्पती होते.हवामान व वनस्पती तज्ञ होते. भूगोल व खगोल तज्ञ होते.

सम्राट चंद्रगुप्त यांनी गिरनार पर्वताच्या पायथ्याशी पलशिनी नदीवर धरण बांधण्यास सुरुवात केली ते काम त्याचा नातू सम्राट अशोक याने पूर्ण केलं. हे धरण सातशे वर्षांहून जास्त काळ टिकून राहिले.

सातशे वर्षांपूर्वी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा अविनाशी अलौकिक ग्रंथ लिहिला. त्यांना वनसंवर्धनाचं महत्व समजलं होतं. म्हणून त्यांनी १४ व्या अध्यायात…

नगरीची रचावी l जलाशाये निर्मावी ll

महावने लावावी नानाविधे” ll

हा संदेश आपणांस दिला आहे़.

दुष्काळावर मात करण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लीचं महत्व पटवून दिले आहे़.

संत एकनाथ महाराजांनीसुध्दा आपल्या गाथेत झाडांचे महत्व सांगितले आहे़.

सध्या महाराष्ट्रांत काही ठिकाणी ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यासाठी आठवडाभर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात थोडा बदल करून आठ दिवसांपैकी एक दिवस श्रमदानातून ग्रामस्वच्छता, विहिरी साफ करणे, तळी साफ करणे, नदी परिसर साफ करणे, पाणी अडवा पाणी जिरवा, इत्यादी उपक्रम राबवून ‘ज्ञानेश्वरितील एक तरी ओवी अनुभवावी.’

सध्या मराठी भाषा टिकवण्यासाठी अनेक ठिकाणी साहित्य संमेलन आयोजित केली जात आहेत त्याच प्रमाणे पावसाळ्यात पर्यावरण संवर्धनासाठी “निसर्ग मित्र संमेलन” आयोजित करून जनशक्ती व धनशक्तीचा उपयोग करून वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम इत्यादी उपक्रम राबवले तरच पुढील पिढीला पाण्याची टंचाई भासणार नाही.

दिलीप गडकरी

— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. छान माहिती मिळाली. निसर्ग मित्रमंडळाने‌ पुढे येऊन जनजागृती करणे , काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८