Wednesday, September 11, 2024
Homeलेखनेमकं काय बिघडलंय ?

नेमकं काय बिघडलंय ?

“आम्ही गावाला चाललोय…”

नेहमीप्रमाणे संध्याकाळी कट्ट्यावर गेल्यावर सीमाने तिच्या सख्यांना सांगितले.

“कां ग ? काही विशेष ? की सहजच फिरायला चाललात ?”

“सहजच…पण फिरायला म्हणून नाही तर तिथे राहणाऱ्या नातेवाईकांना भेटायला…अगदी सदिच्छा भेट म्हणा ना !”

“काय म्हणालीस ?”

“तुम्ही ऐकलंत तेच…तिथे आमचे काही माझ्या पुढच्या पिढीतील सख्खे, चुलत, असे नातेवाईक राहतात. माझ्याशिवाय घरातील बाकीच्यांना ते फक्त ऐकूनच माहिती आहेत. म्हणूनच एकमेकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन ओळख व्हावी आणि ती वाढवावी…फक्त आणि फक्त हाच या चार दिवसांच्या सहलीचा हेतू…आमच्या १४ वर्षांच्या एकुलत्या एक नातवाला सुध्दा अशीही काही नाती असतात हेही कळेल या निमित्ताने…”

तिच्या ह्या स्पष्टीकरणावर ‘काहीतरीच बाई हिचं एकेक’ असा भाव त्या सर्वांच्या तोंडावर दिसला…

त्यांचंही बरोबरच होतं ना! लॉंग वीकेंड आला की कुठलं तरी पर्यटन स्थळ निवडायचं, लांबच लांब ट्रॅफिक जाम मध्ये अडकायचं आणि साईट सीइंगचे सोपस्कार आटोपुन आणि वारेमाप खर्च करून पुन्हा तस्साच परतीचा प्रवास करत दमून भागून घरी यायचं. आणि पुन्हा पुढच्या सुट्टीचे तस्सेच बेत ठरवायचे ही आपली सध्याची सुट्टी घालवायची किंवा सण साजरा करण्याची रूढ झालेली पध्दत…

त्यामुळे तिचा हा चाकोरीबाहेरचा बेत ऐकून त्यांना वाटलेलं नवल आणि तो अंमलात आणल्यावर गाववासियांना बसलेला आनंदाश्चर्याचा धक्का आणि अर्थातच सगळ्यांचा भारावून गेलेला प्रतिसादही…तसा अपेक्षितच…

फार काळ नाही लोटलेला…लग्न, मुंजी, बारशासारख्या ३-४ दिवसांच्या कार्यक्रमांच्या सहपरिवार आमंत्रणांची कुंकूमशिंपित शुभ पत्रं अगत्यानं रवाना व्हायची. त्या सहपरिवारात आजी-आजोबांसह सख्खी, चुलत अशी सगळी मंडळी असायची. कार्याची शोभा वाढवायला ती सर्वच निवांत यावीत अशी हृदयस्थ अपेक्षाही असायची. आणि एखादा अपवाद वगळता बव्हंशी ती पूर्णही व्हायची.

पण आता मात्र…काळाच्या मुठीतुन वेळ नावाची वाळू झरझर निसटून चालली आहे. इव्हेंटच्या आणि मिनी कुटूंबाच्या जमान्यात एखाद्या कार्याला फुरसतीने जाण्यासाठी वेळ नसला तरीही बैल गेल्यावर झोपा करण्यापेक्षा थोडीफार नाती-सांगाती सांभाळु ही जाणीव होऊ लागली आहे. कदाचित म्हणुनच चुकत चाललेल्या ताळमेळाला जागेवर आणण्यासाठी सगोत्र, आडनाव बंधुभगिनींचे आणि शाळा-कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचे खास मेळावे भरवावे लागताहेत आणि त्यावेळेस शक्य तितके सर्वजण आवर्जून येतातही, हेही नसे थोडके…

घरात गृहलक्ष्मी येते, नवीन घराशी, नवीन माणसांशी ताळमेळ जमवण्याचा कधी ती प्रयत्न करते, तर कधी आपण हात पुढे करतो मायेच्या ओलाव्याने…कधी यश मिळतं, कधी अपयश…मालकी हक्काचे पारडे झुकत राहतं, कधी इकडे, कधी तिकडे, आपुलकीचा ओलावा होतो कधी स्निग्ध, कधी रुक्ष… आयुष्य तसंच वाहत राहतं, कधी संथ गतीने, कधी खळखळ करत…मनाच्या अथांग डोहात भल्या बुऱ्या आठवणींचा साठत राहतो गाळ…साठतच राहतो…आणि मग…बदलतात भूमिका…आणि चांगल्या-वाईट अर्थाने कधी कधी इतिहासाची पुनरावृत्ती होत रहाते… ‘आम्ही खूप केलं आतापर्यंत, आता तुमचं तुम्ही बघा’ या चुकलेल्या तालाला ‘सारंच तुम्ही करा, मी माझ्यापुरतंही बघणार नाही’ या गृहीतकाचा विसंवादी कणस्वर लागतो
आणि बिघडुन जाते संसार-संगीताची लय…

गीताच्या मुलाचं लग्न झालं. नोकरीमुळे दोघंही परगावी राहत होते. पण तुमच्या नवीन संसारात लुडबुड नको, नवऱ्याची नोकरी इ. कारणं देऊन गीता तिकडे फारशी गेली नाही. नंतर बाळ झाल्यावरही फक्त कामापुरती जाऊन परत आपल्या गावी परतली. कर्तव्यतत्पर मुलाने आणि लाघवी सुनेने खूप आर्जवं केली, मदतीला पूर्ण वेळ बाई ठेवण्याची तयारी दाखवली, लोभस नातवाच्या वतीने बोबड्या बोलीत आग्रह केला, पण व्यर्थ! करमत नाही हा एकच ठेका !
काही वर्षांनी मात्र गीताच्या नवऱ्याला गंभीर आजार झाला आणि उपचारासाठी कायमचेच मुलाकडे यावे लागले. आता त्यांनी कर्तव्यापोटी सगळे उपचार केले तरीही मनातली अढी मात्र गेली असेल का !

अशावेळी ‘तुमच्या संसारात नेहमीच पुढे, आमचा मदतीचा हात’…
‘आणि तुम्हाला गृहीतच धरून, आम्ही राहणार नाही आरामात’

हे परस्परावलंबी सुत्र न स्वीकारता…

वर्षानुवर्ष जोडलेल्या परक्या माणसांचे ऋणानुबंध सैल न करता केवळ ‘करमत नाही’ म्हणून आपल्या माणसांशी जोडून राहिलो नाही तर…
वयोमानानुसार शरीरात दीर्घकाळ मुक्कामाला येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करण्यासाठी कोण बरं धावून येईल! हाही मुद्दा कटु आणि अप्रिय वाटला तरी विचारात घ्यावाच लागतो ना ? अशावेळी फक्त पैसाच कसा बरं कामाला येईल ? ते त्यांची ती वेळ तर कशीही निभावून नेतील, पण कधी आपण सुपात असतो तर कधी ते जात्यात असतात आणि सुपातल्यांनाही कधीतरी जात्यात जावेच लागते हे लक्षात ठेवावेच लागते. हे कधी कधी उलट अर्थानेही लागु पडतं. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो.
समस्या येतच राहणार, प्रश्न निर्माण होणार…पण नंतरच्या उपचारांपेक्षा शक्य असले तर कारणं शोधून त्याच्या मुळांवरच उपचार करणे केव्हाही श्रेयस्करच…नाही का !

ही झाली फक्त आपल्या घरातील सदस्यांची कहाणी. पण आत्या, काका, मामा, मावशी ही नाती कदाचित आताच्या आणि त्याच्या नंतरच्या पिढीला तर समजणारही नाहीत. सख्खं म्हणजे काय हे तरी कसं समजावून देणार त्यांना! शास्त्रीय परिभाषा समजली तरीही निर्माण होणाऱ्या मानसिक पोकळीचं काय! त्यासाठीच आत्ताच जी काही जवळची, दूरची नाती शिल्लक आहेत त्यांची त्यांना ओळख करून देऊ या. मेळाव्यामधील २-४ तासाच्या चुटपुटत्या भेटीनंतरही शक्य झाले तर परस्परांच्या घरी गेलो तर भिन्न भिन्न परिस्थितीत राहणाऱ्यांची आणि घरातील सदस्यांचीही सगळ्यांना ओळख होईल.

परप्रांतात राहणाऱ्या सुनीलच्या वडिलांचं थोड्याशा आजारपणामुळे निधन झालं. सोसायटीत त्याच्या कंपनीतील काहीजण राहत होते. पुढच्या क्रियाकर्मासाठी त्यांनी त्यावेळेस बरीच मदत केली. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्याला मात्र ही बातमी अजिबात समजली नाही. दोन दिवसांनी त्याने सुनीललाच कशासाठी गर्दी जमली होती असं विचारलं. अर्थात इथे भाषेचा प्राॅब्लेम होता असं गृहीत धरलं तरीही समाजात राहताना शेजारी-पाजारी, इतर आवश्यक गरजा पुरवणाऱ्या परंतु दुर्लक्षित असणाऱ्या व्यक्ती, मित्रमंडळी इत्यादी समाज घटकांशीही आपला व्यवस्थित ताळमेळ आहे का हेही एकदा तपासून बघायला हवं. ‘मला कोणाचीच गरज नाही’ अशा मग्रूर समजूतीत राहिलं तर काय होतं हे आपण कोरोना काळात बघितलंच आहे. नाहीतर ‘लाखो मैलांवरच्या न देखलेल्या, न पाहिलेल्या व्यक्तीशी घट्ट मैत्र आभासी, आणि जुळत नाही सूत्र अनभिज्ञ शेजाऱ्याशी’ अशी गत! ॲम्बुलन्स दारात आल्याशिवाय शेजारची व्यक्ती गंभीर आजारी आहे किंवा मृत पावली आहे हेही जेव्हा कळत नाही तेव्हा आपल्या आयुष्याची गती भोवंड येईल एवढी वाढली आहे असं समजायला हरकत नाही. हे ऐकायला जरी अतिरंजित वाटलं तरीही वास्तव परिस्थिती अशीच आहे असं खेदाने म्हणावं लागतं.

करोना काळात जेव्हा भल्या भल्या व्यापाऱ्यांनी, माॅल्सनी आपली असमर्थता प्रगट केली होती तेव्हा छोट्या दुकानदारांनी आपल्याला यथाशक्ती मदत केली होती. शेतकऱ्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं होतं. पण गरज संपल्यावर मात्र आपली
पावलं खरेदीसाठी पुन्हा फिक्स रेट असलेल्या चकचकीत माॅलकडेच वळत आहेत. शेतकऱ्यांच्या अपरिमित कष्टाला योग्य न्याय मिळत नाही, त्यांचा माल घासाघीस केल्याशिवाय आपण खरेदी करत नाही. चंगळवादी जीवनशैलीत कष्टकऱ्यांच्या घामाचे मोल आपण जाणत नाही. आणि याची आपल्याला अजिबात खंत वाटत नाही. ह्या जगाच्या पोशिंद्याच्या उत्पादनाचा आणि खर्चाचा ताळमेळ बिघडला तर आपल्या घरगुती बजेटचा सूर बिघडायला वेळ लागणार नाही. आपली दैनंदिन आणि प्रासंगिक कामं करायला माणसं मिळताहेत तोवर आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. उद्या जास्त पैसे देऊनही त्यासाठी कोणी तयार झाले नाहीत तर…दात आहेत तर चणे नाहीत अशी गत!

माणसांशीच काय, पण आता प्राणी मात्रांशी, पर्यावरणाशी, निसर्गाच्या तालाशीही आपला सूर जुळवून लय साधण्याची वेळ आली आहे, नव्हे निघुन चालली आहे. हा प्रश्न आता एवढा ऐरणीवर आला आहे की एखाद्या प्रलयाची वाट न पाहता त्याची आधीच जाणीव ठेवून स्वतः कृती केली पाहिजे आणि इतरांनाही भाग पाडलं पाहिजे. त्यासाठी आपल्या जीवनशैलीची घसरलेली गाडी परत रूळावर आणावीच लागेल. तर करूया सुरूवात…आजपासून नव्हे आत्तापासूनच !

भारती महाजन-रायबागकर

— लेखन : भारती महाजन-रायबागकर. चेन्नई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments