Saturday, September 14, 2024
Homeलेख‘पंचम’ करणार गावांना सक्षम

‘पंचम’ करणार गावांना सक्षम

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था दरवर्षी महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांना निधी देउन मदत करते.
त्याचबरोबर समाज कार्यकर्त्याना व समाजाला आपल्या लिखाणातून नवी दिशा देणाऱ्या लेखकांना पुरस्कार देत असते हे सर्वश्रुत आहेच. पण त्याही पुढे जाऊन महाराष्ट्रातील मागास गावांचे सक्षमीकरण आणि एकात्मिक विकास साधण्या साठी पंचम नावाचा उपक्रम महाराष्ट्र फाउंडेशने सुरू केला आहे असे संस्थेचे अध्यक्ष श्री. राजीव भालेराव यांनी नुकतेच सांगितले.

या नव्या उपक्रमांत गावांच्या विकासासाठी केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा गावांचे सक्षमीकरण करणे त्यांना महत्त्वाचे वाटते. पंचम उपक्रमा साठी साताऱ्याजवळील कुसुम्बी आणि गडचिरोलीजवळील मुतनूर या खेड्यांची महाराष्ट्र फाउंडेशनने निवड केली आहे. या खेड्यांची निवड करताना नवी मुंबईतील आर. एस. सी. डी. (Resource and Support Centre for Development) या संस्थेची त्यांनी मदत घेतली. नवी मुंबई येथील आर. एस. सी. डी. ही संस्था ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या महिला उमेदवारांना ग्रामपंचायतीचे काम कसे चालवायचे याचे प्रशिक्षण देत असते. महिला सक्षमीकरणासाठी ही संस्था बर्याच वर्षापासून कार्यरत आहे.

पंचम ची उद्दिष्टे साधण्यासाठी निवडक स्थानिक सेवाभावी संस्थांचा समावेश केला जाणार आहे. कुसुंबीत साताऱ्यातील ॲवार्ड ह्या संस्थेचा सहभाग असणार आहे तर मुतनुर मधे गडचिरोली च्या रुद्य ह्या संस्थेचा सहभाग असणार आहे.

या गावांचा विकास साधण्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशनने पाच सुत्रांचा अवलंब करायचे ठरवले आहे. त्यानुसार दारिद्र्य निर्मूलन, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या पाच सुत्रांकडे लक्ष देऊन शाश्वत विकास साधण्याचे त्यांचे ध्येय आहे.

प्रत्येक गावा बरोबर महाराष्ट्र फाउंडेशन ३ वर्षा साठी प्रतीबध्द राहील. पहिल्या वर्षी निवडलेल्या खेड्यासाठी एक ग्रामविकास समिती स्थापन करून त्या गावातील समस्यांचा शोध घेतला जाईल. या समितीत गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावाच्या विकासासाठी योगदान देण्याची इच्छा असलेले नागरिक असतील. गावातील परिस्थितीची कल्पना असलेले हे सदस्य गावातील गरजा निश्चित करतील व त्या गरजा पूर्ण करण्याचा मार्ग महाराष्ट्र फाउंडेशन आखेल.

दुसऱ्या वर्षी निरनिराळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून या गरजा पूर्ण केल्या जातील.

तर तिसऱ्या वर्षी, पूर्ण झालेली कामे गावाच्या ग्रामविकास समितीच्या हाती सुपूर्त केली जातील. तेथून पुढे या समितीने हे काम पुढे न्यावे अशी अपेक्षा असेल. ह्या प्रकल्पां मधे शक्य तेथे सरकारी योजनांची उपयोग करून घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनच्या संचालक मंडळाच्या मनीषा केळकर, रेश्मा सांबारे, विवेक पाटणकर आणि अध्यक्ष राजीव भालेराव यांनी या दोन गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व त्यानुसार प्रकल्पांचे स्वरूप ठरवले.

कुसुम्बी गावात पहिल्या वर्षी ग्रामविकास समितीची स्थापना झाली आहे. या गावाची शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून तिथे पाण्याची तीन एटीएम यंत्रे बसविण्यात आली आहेत तसेच गावातल्या प्रत्येक शाळेला water filters पुरवण्यात आले आहेत. गावातील शाळेसाठी न्यूट्रिशन गार्डन तयार केले. अशा प्रकारे आरोग्याचा प्रश्न हाताळला गेला.
गावाच्या आर्थिक उत्पन्न आणि रोजगार वाढीच्या संधी साठी पंचम अंतर्गत ‘Agromillets Women Farmer Producer Company’ नावाची शेतमाल उत्पादक संघटना स्थापन केली आहे.ह्या संघटने मुळे गावाच्या नाचणी उत्पादनात वाढ होणार आहे, ह्या नाचणी ला चांगला बाजार भाव मिळणार आहे. तसेच बेकरी त मोठ्या प्रमाणात नाचणीचे पदार्थ बनवून बाजारात विकण्या ची सोय होणार आहे. ह्या प्रकल्पात कुसुंबीकर उत्साहाने सहभाग होत आहेत.

ह्याच गावात climate reality project ह्या संस्थेच्या सहकार्याने दोन शाळांचे क्षेत्र हरित क्षेत्र बनविण्याचे काम सुरु झाले आहे.ह्या प्रकल्पामुळे शाळा सौर ऊर्जा वापरत आहे, पावसाच्या पाण्याची साठवण करत आहे कचरऱ्याच उचित व्यवस्थापन करत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गावातील महिलांना निर्धूर चुली तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे या महिलांच्या घरात निर्धूर चुली तर आल्याच शिवाय या महिला त्या तयार करून त्यांची विक्री देखील करू लागल्या. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली. शिवाय प्रदूषण निवारणाची एक छोटी साखळीच तयार होत गेली. वर्षभरात शंभर चुली निर्माण करून विकण्याचे उद्दिष्ट गावातील महिलांनी ठेवलेले आहे.

विकासासाठी निवडलेले दुसरे गाव मुतनूर हे गडचिरोलीजवळ आहे. मुतनूर हे आदिवासीबहुल गाव आहे. गावकरऱ्यांबरोबरच्या चर्चेत गावा ला तलावामुळे बराच लाभ होऊ शकतो असे कळले. पंचम अंतर्गत तलावासाठी खोलीकरण, बंधारे, पाण्याचे पाट असे बांधकाम करण्यात आले. गावकऱ्यांनी पण ह्या कामात श्रमदान केले.तलावामुळे पावसाळा संपल्यावरही गावकरी दुसरे पिके घेऊ शकतील आणि मत्स्यपालन करून मत्स्य व्यवसाय करू शकतील. ह्या मुळे गावकऱ्यांची मिळकत वाढेल.

मुतनुर च्या प्रार्थमिक शालेय शिक्षणाचा गुणवत्ता वाढवण्या साठी Doorstep Schools ह्या संस्थेच्या सहकार्याने गावातल्या ४ व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले. ह्याचा परिणाम म्हणुन मुलांचा उत्साह आणि शाळेतली उपस्थिती वाढली.

महाराष्ट्र फाउंडेशनच्या आगामी योजनेनुसार पुढच्या वर्षी पंचम उपक्रमांत तीन अधिक गावांचा समावेश केला जाणार आहे.
सर्वांसाठी सामाजिक व आर्थिक न्याय ह्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या ध्येयाच्या वाटचालीत पंचम उपक्रमामुळे नवी ऊर्जा मिळणार आहे. अर्थात ह्या उपक्रमाच्या मागे आहे अमेरिकेत स्थित असलेल्या अनेक दान शूर व्यक्तींची सामाजिक जाणीव आणि सेवाभावी संस्थांचे कष्ट. या सर्वांना विनम्र अभिवादन.

मेघना साने

— लेखन : मेघना साने
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments