Saturday, April 13, 2024
Homeलेखपतंग

पतंग

पतंगाची एक जुनी आठवण आठवली.
माझा मुलगा अमेरिकेत, सियाटल येथे रहातो. मी दरवर्षी तिथे जाते.

एकवर्ष तिथे एका गार्डन मध्ये चायनीज फेस्टिव्हल होतं. अनेक गोष्टी होत्या. त्यात एक फ्री वर्कशॅाप होतं . तिथली माणसं ते अटेंड करायचा आग्रह करत होते . आम्हाला कसलं तेही आत जाईपर्यंत माहित नव्हतं. लहान ३ वर्षाची नात बरोबर होती . त्यामुळेही आम्ही आत जायला उत्सुक नव्हतो. पण मग नाईलाजानी ५ मिनीटासाठी जाऊन पाहू ,म्हणून आम्ही आत गेलो.

ते कसले वर्कशॅाप होते, माहित आहे ?
पतंग बनवायचे !
वय वर्षे ५ पासून ८० वर्षांपर्यंत जवळ जवळ ५० जणं आत बसली होती. दारावरच प्रत्येकाला १ किट दिलं होतं. त्यात पतंग बनवण्यासाठी छापिल पेपर, रंग, कणी, मांजा(प्लॅस्टीकचा), कात्री, वगैरे सामान होतं. नात त्यामुळे रमली. आम्ही पण तासभर तिथे होतो. स्लाईड शो, पतंग कसा बनवायचा वगैरे इतकं सर्व इंटरेस्टींग होतं !

आत्तापर्यंत मी कधीही पतंग उडवला नव्हता. पण आम्ही प्रत्येकांनी एक पतंग बनवला. आणि आयुष्यात प्रथमच, तिथेच थोडा उडवून पाहिला.
हे आम्ही बनवलेले पतंग. आम्हाला खूपच आवडले ते वर्कशॅाप !

सियाटलला एक टेकडी सारखी जागा आहे. आम्ही लगेच तिथे गेलो. सर्व मोकळं व उंच होतं, त्यामुळे इतका मस्त पतंग वर गेला, कि खरंच वाटेना मला कि, मी पतंग उडवतेय ! नंतरही आम्ही खूप वेळा तिथे गेलो पतंग उडवायला. तिथे अनेक जण, वेगवेगळ्या आकाराचे, मोठे पतंग घेऊन उडवायला यायचे. प्लस्टिकचे पतंग, मांजाही प्लॅस्टिकचा.. सेफ्टीसाठी… आणि काय पो चे (I have cut) वगैरे नाही.. पतंग कापणे प्रकार नाही..
तुम्हाला जितकं उंच जाता येईल तितकं तुम्ही उंच जा.. मला जाता येईल तितकं मी जाईन.. ही तिथल्या लोकांची वृत्ती मला तिथे अनेक ठिकाणी जाणवली, तशी ती पतंग उडवतांनाही दिसली.

नंतर आम्ही मुलीच्या गावी गेलो होतो. तिथे त्या गावात कशाला तरी १२५ वर्ष झाली म्हणून सेलिब्रेशन आहे आणि दुसऱ्या दिवशी पतंग उडवण्यासाठी स्पेशल प्रोग्रॅम आहे, असे माझ्या वाचनात आले.
मग आम्ही तिथे गेलो, तिथे येणाऱ्या प्रत्येकाला एक पतंग, फिरकीसकट फ्रि आणि शिवाय स्नॅक्स दिले होते. गार्डन आणि समोर खाडी होती. त्यामुळे ४ तास आम्ही तिथे मनसोक्त पतंग उडवला. इथे भारतात आधी आणि नंतर सुध्दा कधी पतंग उडवला नाही. पण पतंग नेहमीच जवळचा वाटायला लागला तेव्हापासून.

एक वर्ष कोलाज कॅलेंडर मध्ये पतंगही कोलाज करून केले.

पतंग उडवण्यात आनंद असतो हे कळले. पण दरवर्षी झाडावर अडकलेले पतंग, पतंगांच्या मागे धावणारी मुलं, मांजांमुळे झालेले अपघात, त्यात अडकलेले पक्षी पाहून मन अस्वस्थ होतं. मग अशी कविता पण केली.

पतंग..
हायवेवरील ..
त्या झाडावर अडकलेल्या पतंगांनी
मला खूप काही सांगितले…
एका बाजूला.. खुराड्यासारख्या झोपड्या
दुसऱ्या बाजूला ..भन्नाट वेगातल्या गाड्या
वर अफाट आभाळाच्या निळ्या गोधड्या
पण खाली टिचभर सुध्दा जागा नाही…घालायला पायघड्या….

“इथे जागा नाही”….
हे मला
त्या झाडावर अडकलेल्या पतंगांनी सांगितले..

त्या उंच इमारतींवर
दोन डोकी, एक पतंग…
समोरच्या बंगल्यात
साथीचा परिवार कौतुकात दंग..
इथे मात्र नेहमीच पिल्लावळीमुळे
भांडणाचा रंग..
पतंगाच्या उड्डाणासाठीसुध्दा
मिळत नाही,
वाऱ्याचा संग…

“इथे हवी ती साथ नाही”… हे मला
त्या झाडावर अडकलेल्या पतंगांनी सांगितले..

तिथे ..
आशा आकांक्षाचे
ऊंच हिंदोळे
स्वप्न सुखांचे,
सुंदर सोहोळे
झुलण्या डुलण्या आभाळ मोकळे…
इथे…
हे सोहोळे
नशिबी न मिळे..
कारण झाडांचे अडथळे..

“ह्यांच्या जिवनी
फक्त अडथळे..”
हे मला हायवेवरील
त्या झाडांवर अडकलेल्या पतंगांनी सांगितले.

— लेखन : चित्रा मेहेंदळे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments