डॉक्टर परशुराम कोमाजी खुणे म्हणजे आदिवासी भागात जन्मलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अफाट कार्याबद्दल त्यांना २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा यथोचित गौरव केला. त्यांच्या कार्याची आज ओळख करून घेऊया.
महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण आदिवासी भागात आणि विस्तीर्ण वनक्षेत्रात वसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गुरनोली या छोट्याशा गावात २२ फेब्रुवारी १९५२ रोजी परशुराम कोमाजी खुणे यांचा जन्म झाला.गुरनोली येथील जिल्हा प्रशालेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथून माध्यमिक आणि उच्च शिक्षण पूर्ण केले. तेथील शिक्षकांच्या उत्तेजनामुळे पोवाडा, एकपात्री अभिनय, नाटक, लोककला यामध्ये सहभाग घेऊ लागले. या सर्व अभिनयामध्ये शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केले जे त्यांना आयुष्यभर उपयोगी पडले असे ते सांगतात. त्यांनी नागपूर येथून होमिओपॅथिक मेडिसिन आणि सर्जरीमध्ये पदविका (डी.एच.एम.एस.) पूर्ण केली. त्यानंतर मात्र शहरामध्ये प्रॅक्टिस सुरू न करता आपल्या छोट्याशा गावात आपल्या बांधवांसाठी परत आले.
डॉक्टर परशुराम कोमाजी खुणे यांनी एकीकडे वैद्यकीय सेवा देताना झाडीपट्टी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. तर, झाडीपट्टी म्हणजे काय ? ही एक नाट्यकला आहे ज्याचे स्थानिक नामकरण झाडी या भाताच्या नावावरून झाले आहे. ती गोंड, कोरकू आणि पारधी सारख्या जमातींनी वसलेल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागात, म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी सादर केली जाते. साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये भाताची कापणी पूर्ण होते, शेतकरी खुशीत असतात आणि मनोरंजनाचे साधन म्हणून संगीत आणि नृत्याच्या मिलाफ असलेली नाटके पाहण्यास येतात. दरवर्षी १६ जानेवारीला याचे प्रयोग सुरु होतात. शहरासारखे थिएटर वगैरे प्रकार नसतो. आपापल्या घरून सतरंज्या घेऊन स्टेजच्या भोवती प्रेक्षक बसतात. हीच ती झाडीपट्टी रंगभूमी होय.

डॉ.परशुराम कोमाजी खुणे यांनी गेल्या ५० वर्षात ५००० लोककला आणि नाटकांमध्ये सुमारे ८०० विविध भूमिका साकारल्या आहेत. ते ‘विदर्भाचे दादा कोंडके’ म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्यामुळे रंगभूमीवरील अनेक मोठे मोठे कलाकारही आपली नाटके सादर करण्यासाठी झाडी पट्टी येथे आले. त्यांच्याबरोबर खुणे यांनीही काम केले. त्यांच्या काही लोकप्रिय भूमिकांमध्ये ‘संगीत एकच प्याला’ मधील तळीराम, ‘सिंहाचा छावा’ मधील शंखनाद, ‘संगीत लग्नाची बेदी’ मधील अवधूत, ‘लावणी भुलाली अभंगला’ मधील गणपा यांचा समावेश आहे.

वैद्यकीय सेवा देतांना आणि गुरनोलीचे सरपंच म्हणून काम करतांना त्यांच्या लक्षात आले की अंधश्रद्धा जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. बहुतेक आदिवासी पारधी… येथील साऱ्या समाजावरच अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा असून मांत्रिक-तांत्रिक यांच्यावरच आजारी पडल्यावर जास्त विश्वास ठेवला जातो आणि त्यामुळे देवदेवस्कीचाच आधार घेण्याचा प्रयत्न करीत औषधे न घेतल्यामुळे मृत्यू होतात. त्यासाठी त्यांनी मग जादू शिकून घेतली आणि जादूच्या प्रयोगांनी त्यांनी हे मांत्रिक कशी हातचलाखी करतात हे सप्रमाण दाखवून दिले आणि लोकांना अंधश्रद्धेविरुद्ध जागृत करण्यास सुरुवात केली. दिवसा शेती करणे आणि रात्री नाटके ही दिनचर्या त्यांनी स्वीकारली. पथनाट्य, लोकनाट्य ठिकठिकाणी सादर करून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच दारू व्यसनमुक्ती, स्वच्छता याबद्दल तरुणांना समजाविले. शेतीक्षेत्रातही त्यांनी विविध प्रयोग करून तरुणांना शेती, लोककला यामध्ये मोलाचे मार्गदर्शन करून उपजीविकेसाठी मार्ग उपलब्ध करून दिले.
डॉ. खुणे यांनी गुरनोली ग्रामपंचायत येथे १० वर्षे सक्रिय सरपंच म्हणून काम केले. त्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या भूमिकेचा प्रभाव अद्वितीय आहे. ते प्रामुख्याने हास्य अभिनेता म्हणूनच ओळखले जातात. हसत हसत सामाजिक अनिष्ट प्रथा, चालीरीतींवर टिप्पणी करत अशिक्षित समाजाचे डोळे उघडले. नाटकांच्या रूपात त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येकजण त्यांच्या कौशल्याने प्रभावित झाला. अनेक तरुणांनी त्यांच्या कामातून प्रेरणा घेतली आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकले. ते पूर्व विदर्भ आणि आदिवासींचे आदर्श बनले. ते जुन्या कलाकारांसाठी त्यांच्या पेन्शनसाठी देखील काम करतात.
आपल्याला एक दिवस जरी नक्षलग्रस्त भागामध्ये जायला लागले तर प्रचंड भीती वाटते तर येथील लोक कसे जीवन जगत असतील ? सतत पन्नास वर्षे डॉ. खुणे आपल्या या नक्षलवादी विभागातील आदिवासी बांधवांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. डॉ. खुणे यांनी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी कलेच्या शक्तीचा वापर करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यामुळे आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत झाली आहेच, परंतु त्यांच्यात सामाजिक जागरूकता निर्माण झाली आहे.
उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्तीची समाज सरकार दखल घेतेच. डॉक्टर परशुराम खुणे यांनाही विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले. शेती क्षेत्रातील विविध शोधांसाठी त्यांना १९९१ मध्ये महाराष्ट्र सरकारने शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान केला. १९९२ मध्ये त्यांना जादूच्या कार्यक्रमांसाठी सुनील भावसर पुरस्कार प्रदान केला. १९९३ मध्ये त्यांना कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९९४ मध्ये त्यांना जिल्हा प्रशासनाने मद्रास येथील अखिल भारतीय नेहरू युवा केंद्रात सहभागी झाल्याबद्दल सन्मानित केले. १९९६ मध्ये त्यांना नागपूर येथील मानव मंदिरासाठी स्मिता पाटील स्मृती पुरस्काराने तर २०१२ मध्ये, नाट्यकलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने त्यांना कलादान पुरस्काराने गौरविले.
नक्षलग्रस्त भागातील तरुणांच्या पुनर्वसनासाठी आणि व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा आणि स्वच्छता यासारख्या सामाजिक कारणांसाठी लोकनाट्याचा वापर करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉक्टर खुणे यांना २०२३ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सरकारने सन्मानित केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव तर झालंच पण झाडीपट्टी रंगभूमी साऱ्या देशाला माहीत झाली. कृतज्ञ डॉक्टर पुणे यांनीहा पुरस्कार झाडीपट्टी नाट्य क्षेत्रातील रसिकांना समर्पित केला आणि त्यांच्या सामाजिक प्रयत्नांमध्ये त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आणि शाळेमध्ये त्यांना अभिनयाचे धडे देणाऱ्या सर्वच शिक्षकांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

२०२४ मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर भेटीत डॉ. खुणे यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी ट्विट केले की, “काल चंद्रपूरमध्ये, गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ. परशुराम कोमाजी खुणे यांना भेटून आनंद झाला. आदिवासी समुदायांना उन्नत करण्यासाठी नाटक आणि लोककलांचा वापर करून त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना व्यापक आदर मिळाला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे संस्कृतीला चालना मिळाली आहे आणि सामाजिक जागरूकता वाढण्यास मदत झाली आहे.”

डॉ. खुणे यांच्या सामाजिक उन्नतीसाठीच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे, ज्यामध्ये नाटक आणि लोककला यांचा समावेश आहे, त्यांना केवळ ते ज्या समुदायांमध्ये सेवा करतात त्यांच्याकडूनच नव्हे तर व्यापक जनतेकडूनही आदर आणि प्रशंसा मिळाली आहे. त्यांची कहाणी कलेच्या परिवर्तनकारी शक्तीचा आणि सामाजिक बदल घडवून आणण्याच्या तिच्या क्षमतेचा पुरावा आहे. नक्षलवादाच्या आहारी गेल्यानंतर तरुणांना सामाजिक मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची उदाहरणे आहेत. तरुणांनी त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेचा एक भाग म्हणून लोककलांमध्ये सहभाग घेतला.. त्यांच्या प्रयत्नांमुळे वामपंथी अतिरेकीवादाच्या आमिषाने भरलेले तरुण लोककलेत गुंतले आणि त्यांचे पुनर्वसन झाले.
पंतप्रधानांचे ट्विट समाजात बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करते. सामाजिक बदल आणि सामुदायिक विकासाला चालना देण्यासाठी कला आणि संस्कृतीच्या भूमिकेवरही ते भर देते आणि असे अद्वितीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना नावाजतांना समाजातील तरुण पिढीला त्यांच्याकडून स्फूर्ती घेण्यास उद्युत करते. मला अष्टपैलू असे डॉ. परशुराम कोमाजी खुणे, सांस्कृतिक संवर्धन आणि सामाजिक जाणीवेचे दिपस्तंभ भासतात.

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर (स्रोत:आंतरजाल)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800