उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील नंदी फिरोजपूर गावातील सहा भावांचे कुटुंब, ४० एकर जमिनीमध्ये पारंपारिक शेती! ९ मे १९६० रोजी जन्म झालेले सेठ पाल सिंह हे या भावांपैकी एक! पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी प्रामुख्याने ऊस, गहू आणि भात पिके घेण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहेत. आजही, बहुतेक शेतकऱ्यांचे प्राधान्य ऊस, गहू आणि भात पिके घेण्याला आहे.
आजच्या काळात, बहुतेक तरुण, शिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि पदवी मिळवल्यानंतर मोठ्या शहरांमध्ये काम करण्यासाठी जातात. परंतु सेठ पाल सिंह यांना हे मान्य नव्हते. १९८७ मध्ये कृषि विषयात पदवी घेतल्यानंतर, त्यांनी त्यांच्या नंदीफिरोजपूर गांवातील जमिनीवर इतर शेतकऱ्यांप्रमाणे ऊस, गहू आणि भाताची लागवड सुरु केली. परंतु १९९५ मध्ये, ओळखीच्यांपैकी एक, शेतकरी नेते इंद्रपाल सिंग तोमर यांनी त्यांना पारंपारिक पिके सोडून कृषि विविधीकरण अंतर्गत तांत्रिक शेती करण्याचा सल्ला दिला. सेठ पाल सिंह म्हणाले की, “त्यानंतर आम्ही आमच्या शेतात पहिल्यांदाच फरासबीन (फरसबी) लावले आणि त्याची काळजी घेण्याकडे लक्ष दिले. पण जेव्हां फरासबिनवर कीटक आणि तणांचा परिणाम झाला तेव्हा कृषि विभाग आणि प्रामुख्याने कृषि विज्ञान केंद्राने आम्हांला मदत केली. परिणामी, आम्हांला चांगले पीक उत्पादन मिळाले.
त्यांनतर सेठ पाल यांनी शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार केला आणि ते सहारनपूर येथील कृषिविज्ञान केंद्रात (केव्हीके) जाऊ लागले, जिथे त्यांनी कृषिशास्त्रज्ञांकडून विविध नवीन शेती पद्धतींबद्दल जाणून घेतले. त्यांच्याविषयी बोलतांना त्यांचे बंधू विनोद कुमार म्हणाले, “सेठ पालबद्दल चांगली गोष्ट म्हणजे ते शेतीमध्ये कोणताही नवीन प्रयोग करून पाहण्यास घाबरत नाहीत कारण त्यांचा असा विश्वास आहे की शेतकरी काहीतरी नवीन करत नाहीत तोपर्यंत ते प्रगती करू शकत नाहीत.”

सुरुवातीला, सेठ पाल यांनी पारंपारिक पिकांसह फुले, फळे आणि भाज्या यांसारखी पिके घेण्यास सुरुवात केली. केव्हीके येथे प्रशिक्षण आणि कार्यशाळेनंतर त्यांची आवड आणखी वाढली. त्यांनी शेती विविधीकरण स्वीकारले. त्याबद्दल बोलतांना ते सांगतात, “कृषि विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांशी संपर्क आल्यानंतर त्यांनी आम्हाला शेतीच्या अनेक पद्धतींची जाणीव करून दिली. तसेच, आम्हांला शेतकरी मेळावे, शेतकरी चर्चासत्रे, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांना आमंत्रित करून, शेतीशी संबंधित सरकारी योजनांची जाणीव करून दिली”. उत्तर प्रदेश सरकारने किसान मित्र योजनेअंतर्गत त्यांना किसान मित्र म्हणून नियुक्त करून प्रशिक्षण दिले. शेतकरी मित्र असतांना, कृषिविभागाने आयोजित केलेल्या शेतकरी मेळावे, प्रदर्शन भेटी, विद्यापीठे, आयसीआर, एमडीआरआय इत्यादी कार्यक्रमांमधून त्यांना तांत्रिक शेतीची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, “चांगली माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमची संपूर्ण शेती कृषि विविधीकरणाअंतर्गत करण्यास सुरुवात केली”.
आतापर्यंत केवळ तलावातच शिंगाड्याचे (वॉटर चेस्टनट) उत्पादन घेतले जाई पण सेठ पाल यांनी त्यांच्या शेतात (केवळ एक फूट खोल पाण्यात) शिंगाडे वाढविले आणि चांगला नफाही मिळविला. याशिवाय, त्यांनी मिश्र पीक क्षेत्रातही बरेच काम केले आहे. ते उसाच्या पिकासह मिश्र पीक म्हणून कांदा, बडीशेप, बटाटा, मोहरी, मसूर आणि हळद यांची उत्कृष्ट लागवड गेली कित्येक करीत आहेत. अशाप्रकारे वर्षानुवर्षे बहु-पीक घेत असतांना ते रिले क्रॉपिंग (यामध्ये, कापणीपूर्वी नवीन पीक पेरले जाते) ही करतात. उदा.भाजीपाला पिकांमध्ये ते कारले आणि त्यानंतर दुधी आणि नंतर पालक असे एका वर्षात, एकामागून एक भाज्या पिकवितात आणि प्रति एकर सुमारे चार लाख रुपये नफा कमवितात. तसेच उसासोबतच ते फ्रेंच बीन्स, उडीद, मूग, कांदा, बडीशेप, बटाटा, मोहरी, मसूर आणि हळद सह-पिके म्हणून पिकवितात.
सहारनपूरमधील त्यांच्या विशेष प्रयोगाद्वारे त्यांनी गहू आणि उसाचे एकाच वेळी उत्पादन कसे होते हे दाखवून दिले. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक क्रांतिकारी बदल घडून आले. या सर्व पद्धती इतर शेतकऱ्यांना शिकवून त्यांनाही या शेती पद्धतींचे फायदे घेण्यास उद्युक्त केले आणि भरपूर नफा मिळविल्याने पंचक्रोशीतील शेतकरी त्यांचे अनुकरण करू लागले, त्यांचे सल्ले घेऊ लागले.

सेंद्रिय शेतीत देखील त्यांचे योगदान मोठे आहे.ते गायींवर आधारित नैसर्गिक शेती करतात आणि त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनाही तसेच करण्यास प्रेरित करतात. मातीची काळजी घ्या, तीच सर्वस्व आहे तिच्यावर रसायने ओतून कसे चालेल असे त्यांचे ठाम सांगणे आहे. ते कधीही गवत जाळत नाहीत आणि त्यांच्या मातीत पोषकतत्वांची कधीही कमतरता नसते. त्यांनी त्यांच्या शेतात गांडूळखत आणि NADEP कंपोस्टिंग (महाराष्ट्रातील नारायण देवताव पंढरीपांडे यांच्या नावावर असलेली सेंद्रिय कंपोस्टिंगची पद्धत) चे युनिट्स बसविले आहे. त्यांनी केवळ पिकांचे अवशेष जाळण्याची पद्धत थांबवण्याचे काम केले नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेताची सुपीकता वाढवण्यासाठी पिकांचे अवशेष कसे उपयुक्त ठरतात हे समजावून सांगण्याचे कामही केले. त्यांनी अनेकांना रोजगार देऊन उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले.
पशुपालनाबरोबरच ते मत्स्यपालनही करतात तेही केवळ साडेचार फूट खोल पाण्यात ! त्याबरोबरच ते कमळफुले फुलवितात आणि मशरूम देखील पिकवतात.

सेठ पाल सिंह यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यामध्ये २०१२ मध्ये आयसीएआर कडून जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार आणि २०१४ आणि २०२० मध्ये प्रतिष्ठित संस्थांकडून त्यांना पुरस्कार देण्यात आले. शेतीतील नवीन तंत्रज्ञानासह त्यांच्या विविध यशस्वी प्रयोगांना, केवळ प्रगत शेती न करता इतर शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी कृषि क्षेत्रात विविधतेचे योगदान आणि प्रात्यक्षिक दाखवल्याबद्दल सेठ पाल सिंह यांना भारत सरकारने २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच सारा गांवच अत्यानंदीत झाला.
पद्मश्री सेठ पाल सिंह यांच्याकडून स्फूर्ती घेऊन सर्व शेतकरी धनवान होतीलच परंतु रसायनविरहीत शेतीमुळे सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहील यांत शंका नाही.

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर (स्रोत:आंतरजाल)
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
पद्मश्री शेटपाल सिंग या शेतकऱ्याची पाठवलेली कथा ही खरोखरच स्फूर्तीदायक आणि काहीतरी शिकण्यासारखी आहे यात काही शंकाच नाही तसेच ही कथा ज्या नीला बर्वेनी मला पाठवली तिचं याबद्दल धन्यवाद