प्रेमा धनराज, एका सुसंकृत घराण्यातील गडद बदामी डोळ्यांची सुंदर, गोड मुलगी. वडील (सी.एस. धनराज) सी.ए.आणि आई (स्टेला रोझी) फार्मासिस्ट. घरी संगीताची आवड. त्यामुळे गायिका बनण्याचे स्वप्न बघणारी ! अभ्यासात हुशार, पियानो, गिटारच्या कलासला जाणारी, ३० जून १९५० रोजी जन्मलेली, तीन भावंडांची मोठी बहीण !
प्रेमा एक दिवस शाळेतून घरी आल्यावर कॉफी घेऊ या म्हणून स्टोव्ह पेटवायला लागली. वय जरी केवळ आठ वर्षे होते तरी आई -वडील नोकरीनिमित्त बाहेर असल्याने तिला सवय होती स्टोव्ह पेटवून थोडेफार रांधायची. पण त्या दिवशी दुर्दैवाने स्टोव्हचा स्फोट झाला आणि चिमुरड्या प्रेमाच्या ड्रेस, नायलॉन रिबिनी यांनी पेट घेतला.तशा अवस्थेत ती बाहेर आली. वरतून शेजाऱ्याने अनर्थ पाहिल्यावर उडी मारून धावत येऊन आग विझविली पण तोपर्यंत कोवळी पोर ५०% भाजली गेली होती. चेहरा, केस पूर्ण जळून दुर्दशा झाली होती. ताबडतोब दाखल केलेल्या बंगलोर येथील हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार होत नाहीयेत हे पाहिल्यावर आई-बाबांनी तिला वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रचंड भाजलेली ती वाचण्याची शक्यता नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले. हळव्या मनाच्या वडिलांनी धीर सोडला परंतु कणखर मनाच्या आईने, तुम्ही उपचार सुरु करा अशी विनवणी करून स्वतः चॅपेलमध्ये देवाची करुणा भाकण्यास गेली. प्रार्थना करतांना या हवालदिल आईने…. रोझी स्टेला धनराजने देवाला प्रॉमिस केले की, प्रेमाला जीवनदान मिळाल्यावर तिला लोकांच्या सेवेसाठी समर्पित करीन आणि तिला डॉक्टर बनवून याच रुग्णालयात ती काम करेल. देवाने तिचे जणु ऐकले आणि प्रेमा वाचली.
प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. जोसेफ यांनी प्रेमाच्या चेहऱ्याच्या प्रत्येक इंचाची परिश्रमपूर्वक पुनर्रचना केली. पण हे सारे अतिशय वेदनामय होते. “मी नेहमी डॉक्टरांवर रागावत असे”, असे सांगतांनाही तिला डॉक्टरांचा आणि हॉस्पिटलच्या स्वच्छ पांढऱ्या भिंतींचा वाटत असलेला तिरस्कार आठवला. तिचे लांब केस गेल्याने ती ओकसाबोक्शी रडली. डॉक्टर जोसेफ यांनी त्याच्या तांडव करणाऱ्या रुग्णाशी सौदा केला.. “तू जर मला उपचार करण्याची परवानगी दिली तर मी तुला माझे केस देईन”. प्रेमाने ते मानले. वेदनांना सामोरी गेली. सांगतांना प्रेमा हसून म्हणाल्या, “त्यावेळी मला माहीत नव्हते की त्यांना टक्कल आहे”.
एका अपघाताने घरातील साऱ्यांचे जीवन बदलून गेले. तीन वर्षे तिच्यावर उपचार चालले होते. सतत ऑपरेशन्स झाली. एकूण पूर्ण आयुष्यात २८ शस्त्रक्रिया झाल्या असे त्या सहजपणे सांगतात. घरातील सर्व आरसे आईने लपवून ठेवले होते. एकदा आईच्या खोलीतील एक आरसा मोलकरणीच्या हातून उघडा राहिला आणि प्रेमाने आपले प्रतिबिंब पाहिले. जबरदस्त धक्का बसून तिचा शोक अनावर झाला. आईने तिला भरपूर रडू दिले आणि त्यानंतर जवळ घेऊन तिला समजाविले, “हीच तू आहेस आता. आम्ही स्विकारले, तुलाही दुसरा पर्याय नाही. दुःख अधिकच गडद झाले. तीन वर्षांनी आई- वडिलांनी तिला पुन्हां शाळेत जायचे असल्याचे सांगितले. तिने ठाम नकार दिला, रडून गोंधळ घातला. आईने अनेक गोष्टी सांगत बरेच दिवस समजाविले, अखेर, “मलाच का हे सारे ?”, या तिच्या प्रश्नावर “देवाने प्रत्येकाची नेमणूक काहीतरी विशिष्ट कामासाठी केली असते. म्हणूनच दोन व्यक्ती कधीच सारख्या नसतात. घराबाहेर पडशील तेव्हा कधी दुसऱ्याशी तुलना करू नको. तू तूच आहेस एकमेव असे समज. एक दिवस अशा उजाडेल की तुला स्वतःचा अभिमान वाटेल. सूर्य आणि चंद्र दोघेही हवेत आपल्याला, पण सारखे आहेत का ते ? आणि शिकली नाहीस तर कायम दुसऱ्यांच्या मदतीवर जगायला लागेल, शिकलीस तर तू दुसऱ्यांना मदत करू शकशील. आता पर्याय तूच निवड.” (आजही हे शब्द त्याच्या मनावर जसेच्या तसे कोरले गेले आहेत.)
प्रेमाने अर्थातच नाईलाजाने दुसरा पर्याय निवडला खरा पण पहिल्याच दिवशी शाळेत जातांना, लोक आपल्याकडे बघून मान फिरवितात, दयेने बघतात हे बघून रडवेली झाली तेव्हा आईने तिच्याबरोबर कायम रहायचे असे सांगितलेला भाऊ तिचा हात घट्ट धरी. तिच्यापेक्षा एक वर्षाने छोटा असलेला भाऊ खऱ्या अर्थाने तिचा पाठीराखा झाला. त्याच्याही डोळ्यांत पाणी येतंय हेही तिच्या लक्षांत यायचे. शाळेत तर तिला कधीच कोणी स्वीकारले नाही. एकतर तिला बघून घाबरून पळत किंवा भूतनी वा तत्सम बोलून चिडवत. पुन्हां आईकडे रडल्यावर, “पाहिजे तर बुरखा घाल पण तोंड लपविण्यासारखे तू काहीच केले नाहीस. अभ्यास करून असे यश मिळव, लोकांच्या उपयोगी पड की तुलाच समाधान प्राप्त होईल आणि दिसणे हे महत्वाचे नाही ते तुला आणि जगाला कळेलच”. अर्थात तिने अवहेलना झेलली पण बुरखा नाही घातला. तीन वर्षांची गॅप भरून काढण्यासाठी एका वर्षात काही परीक्षा बाहेरून दिल्या. दहावीला फारसे गुण मिळाले नाहीत पण पहिल्या फटक्यात उत्तीर्ण झाल्याचा आनंद झाला आणि प्रचंड आत्मविश्वास मिळाला.
१९६५ ते १९७१ या कालावधीत प्रेमावर १४ पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केल्या गेल्या. त्याचवेळी अभ्यास करीत १९७४ मध्ये तिने बंगलोरच्या कला आणि विज्ञान महाविद्यालयातून B.Sc. पदवी संपादन केली. उत्तम गुण मिळवून कर्नाटक युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवून १९८० मध्ये MBBS पदवी संपादन केली. आत्तापर्यंत एखाद्या चित्रपटातील कथेसारखे घडले गेले असतांना पुढील शिक्षणासाठी मुलाखतीस गेली असतांना डॉ. जोसेफ यांची भेट मुलाखतकार म्हणून नाट्यमयरित्या झाली. ते आता त्या हॉस्पिटलचे डीन झाले होते. तिने त्यांना ओळखलेच पण त्यांनी तिला नावानिशी ओळखले आणि त्याचे कारण सांगितले की प्लास्टिक सर्जन झाल्यानंतर त्यांच्याकडे आलेली पहिली केस तिची होती, तीही अतिशय आव्हानामक. त्यांच्या मार्गदर्शनाने १९८६ मध्ये मद्रास विद्यापीठातून शस्त्रक्रियेमध्ये मास्टर आणि १९८८ मध्ये पंजाब विद्यापीठातून Master in Chirurgery Plastic Surgery या पदव्या संपादन केल्या आणि आईने देवाला प्रॉमिस केलेल्या त्याच हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जन म्हणून रुजू झाली. PDFBR, CTBS, FACS, FRCS-ग्लासगो, FIMSA आणि DD च्या इतर फेलोशिप पदव्या नंतरच्या तारखांना बहाल करण्यात आल्या. त्यांनी CMC वेल्लोर येथे १९८०-२०१० पर्यंत विविध पदांवर काम केले, तसेच १९९८ मध्ये त्या प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख झाल्या.
डॉ. प्रेमा यांना वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात यशस्वी प्लास्टिक सर्जन म्हणून ओळखले जाते, त्यांच्या यशाचा दर ९९ टक्के आहे. अनेक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या डॉ. प्रेमा श्राइनर्स चिल्ड्रन हॉस्पिटल, गॅल्व्हेस्टन, यूएसए येथील त्यांचा कार्यकाळ सर्वात संस्मरणीय मानतात. “मुलांनी मला पाहिल्यावर आणि माझी कथा ऐकल्यावर त्यांना प्रोत्साहन आणि आत्मविश्वास वाटतो,” त्या मनापासून सांगतात. मात्र तरुण पिढी तथाकथित सौंदर्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करतात याची त्यांना अतिशय खंत वाटते. देवाने प्रत्येकाला सुंदर शरीर दिले आहे, खास रूप दिले आहे, ते जपा, त्याचा अभिमान बाळगा.उगाचच खोट्या कल्पनेच्या आहारी जाऊन चरबी, स्नायू कापणे यामुळे काहीतरी कमतरता निर्माण होते व शरीर कृत्रिम भासते, ते करू नका, असे त्यांचे कळकळीचे सांगणे आहे.
२००५ मध्ये डॉ. प्रेमा यांनी इथिओपियामध्ये पहिले बर्न्स युनिट स्थापित करण्यासाठी मदत केली, जिथं जगात सर्वाधिक बर्न्स पीडित आहेत. प्रेमाला इथिओपिया आणि नॉर्वेजियन अधिकाऱ्यांनी इथिओपियातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले होते आणि त्यांनी इथिओपियाच्या पहिल्या प्लास्टिक सर्जनला प्रशिक्षण दिले.
तसेच प्रेमा यांनी केनियामधील विद्यार्थ्यांसाठी एमसीएच, प्लास्टिक सर्जरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. त्यांनी सीएमसी वेल्लोर येथे एक बर्न युनिट डिझाइन केले आणि बांधले आणि परदेशी विद्यार्थ्यांसाठी हॉकलँड गेस्ट हाऊस बांधण्यातही सहभाग घेतला.त्यांनी USA च्या सहकार्याने एका कार्यक्रमाची सुरुवात केली आहे – ‘स्माइल ट्रेन’ प्रकल्प – जेथे फाटलेल्या ओठ आणि टाळूच्या फाटलेल्या सर्व रूग्णांवर CMCH, वेल्लोर येथे मोफत उपचार केले जातात. त्यांनी केनिया आणि टांझानियामधील डॉक्टरांनाही प्रशिक्षण दिले.
डॉ. प्रेमा यांनी भारतात दीड लाखहून अधिक छोट्या/मोठ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.शिवाय यूएस, नॉर्वे, इथिओपिया, यूके, केनिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये अनेक परदेशी असाइनमेंट दरम्यान, त्यांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या. वेल्लोर आणि बेंगळुरूमध्ये भाजलेल्या जखमा टाळण्यासाठी जागरूकता शिक्षणाचा प्रसार करण्याबरोबरच त्या बाबतीत काळजी घेण्याच्या उच्च दर्जाच्या संशोधनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.
डॉ प्रेमा या अध्यापनाच्या व्यतिरिक्त, सतत ४५ विविध विषयांवर संशोधन अभ्यासात गुंतलेल्या आहेत. त्यांनी वैज्ञानिक परिषदांमध्ये ८० शोधनिबंध सादर केले आहेत आणि १२० लेख विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यांची ५ पुस्तके प्रकाशित आहेत आणि पाठ्यपुस्तकांमध्येही त्यांनी ८ अध्यायांचे योगदान दिले आहे.
आजही त्यांचे रुग्ण त्यांना पाहून चकित होतात. मात्र त्यांचा चेहरा प्रोत्साहन आणि आत्मविश्वासाचा स्रोत बनतो. त्यांना असे वाटते की जर त्या हे करू शकतात तर आपणही करू शकतो.
आईमुळे आपण घडलो हे सांगतांना त्या म्हणतात, “माझ्या आईने मला माझ्या नकारात्मक भावनांना सकारात्मक पद्धतीने कसे बदलायचे ते शिकवले. रोज रात्री सर्वांनी एकत्र बसून जेवायचे आणि काय घडले ते सांगायचे या आई- वडिलांच्या शिस्तीमुळे सारे मनाने कायम जवळ होते. कोणत्याही प्रकारची लपवाछपवी नव्हती. केवळ मुलेच नाहीत तर आई-बाबाही त्यांच्या बाबतीतील गोष्टी सांगत”. कुठेही राहिलात तरी चौघांचे प्रेम कायम असले पाहिजे, या आईच्या सांगण्यानुसार आज जरी दूर रहात असले तरी पूर्वीइतकेच प्रेम आहे, रोजचा संपर्क आहे साऱ्यांचा, भाऊ तर पाठीराखाच आहे तिघींचा, असे त्या आवर्जून सांगतात.
डॉ. प्रेमा ! काय म्हणावे त्यांना ? इतके सारे सोसूनही त्या इतक्या सकारात्मक आहेत की, “माझा अपघात नसता तर मी आयुष्यात इतकं काही मिळवलं नसतं. मी जितक्या वेदना, उपहास सोसला त्यापेक्षा जास्त मला मिळालं आहे. माझ्या चेहऱ्याने मी आयुष्यात खूप पुढे जाऊ शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण देवाने सगळं बदलून टाकलं,” असे त्या विनम्रतेने म्हणतात. फक्त एकच खंत आहे की त्यांची आई त्यांच्या आयुष्यातल्या यशाची साक्ष देण्यासाठी हयात नाही. तिला आनंद आणि अभिमान वाटला असता, मात्र तिने देवाला दिलेले प्रॉमिस आपण पूर्ण केले आणि त्या दिशेने आपला प्रवास आहे याची तिला कल्पना होती, याचे समाधान आहे.

जळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉ. प्रेमा यांनी १९९९ मध्ये बंगलोरमध्ये तिच्या पालकांच्या स्मरणार्थ अग्नि रक्षा या संस्थेची स्थापना केली. तिची सुरुवात कशी झाली या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी सांगितले, अमेरिकेत त्यांना बोलावून त्यांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार केला गेला त्यावेळी त्यांना रोख पारितोषिकही देण्यात आले. इतक्या पैशांचे काय करायचे कारण जीवनावश्यक गरजाच कमी म्हणून समाजोपयोगी संस्था सुरु करायची ठरविली. (एकदा निवडून आल्यावर लोक आपल्यासाठीच टॅक्स भरतात असे वागणारे पुढारी असलेल्या देशात असे काही वाचले की मन भरून येते. हेच साधुसंत!) अग्निरक्षेच्या कार्यासंबंधी एक स्वतंत्र लेख होऊ शकेल. थोडक्यात, आपल्याकडे घरगुती अत्याचारांमुळे ९०% जळीत प्रकरणे होतात व त्या बऱ्या झाल्या तरी त्यांना स्विकारत नाहीत. हे केंद्र अशांना आपल्या पायावर उभे करणे, आत्मविश्वास देणे, पुरुषांना व्यसनातून सोडवून त्यांनाच इतरांच्या व्यसनमुक्तीसाठी समुपदेशक बनविणे, कौशल्य प्रशिक्षण, नोकरीची नियुक्ती, स्वयं-मदत गट, ड्रेसिंगसाठी घरबसल्या काळजी, फिजिओथेरपी आणि समुपदेशन यासारख्या सेवा प्रदान करते. भाजलेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणणे आणि १५ % पेक्षा कमी भाजलेल्या मुलांसाठी ड्रॉप-इन सेंटर इ.कार्य चालते. आतापर्यंत २५००० रुग्णांना अशाप्रकारे आधार मिळाला आहे.

डॉ. प्रेमा यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. त्यांना परदेशातील अनेक विद्यापीठांनी मानद पदवी बहाल केली आहे.उल्लेखनीय म्हणजे भारत सरकारकडून २०१३ मध्ये मिळालेला स्वस्थ भारत सन्मान. २००१ मध्ये, साउथ एशियन चेंबर ऑफ कॉमर्स, यूएसएने तिला तिच्या अनुकरणीय सेवेसाठी समुदाय सेवा पुरस्काराने सन्मानित केले. १९९८ मध्ये प्लास्टिक सर्जरी एज्युकेशन फाउंडेशनकडून पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. २००८ मध्ये, त्यांना इंडिया मॉडर्न मेडिकेअर एक्सलन्स अवॉर्ड आणि २०१८ मध्ये आयर्न लेडी अवल अवॉर्ड (चेन्नई) आणि अचिव्हर्स अवॉर्डही देण्यात आला.
डॉ. प्रेमा यांच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन भारत सरकारने, २०२४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. सहनशीलता, आई -बाबांवरील श्रद्धा, कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता,नम्रता आणि सेवाभाव या सर्वांचे मिळून चालते बोलते उदाहरण म्हणजे डॉ. प्रेमा धनराज !

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
My Dear Didiji, VERY MUCH NICE ARTICALS. IHAVE READ SIN CERELY ,& TOOMUCH LIKED IT LOVELY THANKS SIRS O.K.