आजच्या काळात सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रिया काम करू लागल्या आहेत. आत्मविश्वास आणि निपुणता या गुणांनी त्या विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत. एकेकाळी पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या कामांमध्येही आज महिलांचा सहभाग केवळ दिसून येत नाही तर त्याचे कौतुकही केले जात आहे.
आज मी एका स्त्री शक्तीबद्दल सांगत आहे जिने रूढीवादी कल्पनांना तोडून स्वतः:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही कहाणी आहे देशातील पहिली महिला माहूत पारबती बरुआ ची !
आसाममधील गौरीपूरच्या राजघराण्यातील शासक प्राकृतिश यांची मुलगी पारबती. गौरीपूर हे भारताच्या एका कोपऱ्यात वसलेले, जिल्हा मुख्यालय धुब्रीच्या पश्चिमेचे एक लहानसे शहर आहे. गदाधर नदी त्याच्या पूर्वेकडील मुख्य शहराजवळून संथपणे वहाते. वायव्येस लाओखोवा बील नावाचा एक तलाव आहे. ईशान्येस नदीकाठी मोतियाबाग नावाची एक छोटी टेकडी आहे ज्यावर प्राकृतिश राजाचा हवाखाना राजवाडा आहे. येथूनच पारबतीचे जीवन सुरू झाले. गौरीपूरच्या राजघराण्यातील दिवंगत प्राकृतिश चंद्र बरुआ यांच्या पोटी जन्मलेल्या नऊ मुलांपैकी ती एक. प्राकृतिश हे गौरीपूरच्या राजांपैकी शेवटचे शासक !
“माझे नाव पारबती…… हत्तीच्या डोक्याचा देव गणेश याची आई. असे म्हणत पारबती जुन्या आठवणी सांगू लागतात. त्या जेव्हा १० वर्षाच्या होत्या, तेव्हा आईने सांगितलेली एक गोष्ट त्या सांगतात की त्या एक महिना आणि १७ दिवसांची असताना, म्हणजे अगदी बाळच…. त्यांच्या वडिलांनी त्यांना हत्तीच्या पाठीवर बसवले होते. बाळाला हत्ती फारच आवडून ते खिदळू लागले. हेच बाळ मोठे होऊन गेल्या वर्षी, जेव्हा सरकारने त्यास भारतातील पहिली महिला माहूत म्हणून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले, तेव्हा आसाममधील गौरीपूरच्या राजघराण्यातील पारबती बरुआला त्यांच्या आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटले. “माझ्या कामाला अखेर अधिकृत मान्यता मिळाली आहे,” त्या हसत हसत म्हणतात, “ही माहूतांनी केलेल्या प्रचंड कामाची ओळख आहे. २४/७ असलेले काम हे “.

अगदी तान्हेपणी हत्तीवर बसविले ही तर फक्त सुरुवात होती. मिडीयाला दिलेल्या मुलाखतीत त्या सांगतात, “आमच्या बालपणाच्या संपूर्ण काळात, वडील आम्हाला वर्षातून सात ते आठ महिने हत्तींच्या छावण्यांमध्ये राहण्यासाठी घेऊन जायचे. माझ्या वडिलांना चार बायका होत्या, आमच्यासोबत स्वयंपाकी, एक डॉक्टर, एक न्हावी आणि एक शिंपी आणि ७० नोकर असायचे. आमच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून एक शिक्षक ही आमच्यासोबत असायचे. आम्ही या सौम्य पण अवाढव्य प्राणी आणि त्यांच्या मालकांसोबत एका प्रकारच्या स्वर्गात राहत होतो. आम्ही पहाटे उठून हत्तींसाठी चारा तयार करण्यासाठी मदत करायचो. छावणीतील सर्व हालचाली बारकाईने बघत असू. प्रशिक्षित हत्तींना कुंकी म्हणत. एकदा त्यांनी जंगली, त्रासदायक हत्तींना हाकलून लावले आणि यामुळे गावकऱ्यांचे प्राण वाचले.
पारबतीच्या वडिलांचे त्यांच्या जिवापेक्षा जास्त प्रेम हत्तींवर होते आणि ते त्यांच्या आरोग्याच्या प्रत्येक पैलूकडे बारकाईने लक्ष देत असत, ज्यात मालिश, नदीत आंघोळ, आजारांवर उपचार आणि त्यांचा आहार यांचा समावेश होता. त्यांना हरभरा, पाचक मिश्रण, हर्बल औषधी, मीठ, गूळ, केळी आणि गवत दिले जात असे. मुले पाहत असत की हत्तींना प्रशिक्षण देण्यासाठी जेवण दिल्यानंतर हत्तींना दुखापत होणार नाही ना ? हे पाहण्यासाठी पायाची साखळी, बेदी किंवा कॉलर आणि गळ्यातील साखळीची तपासणी केली जात असे. संध्याकाळी, सारी मुले, त्यांचे वडील आणि माहूतांसह बसायची. छावणीशी संबंधित बाबींवर दीर्घ चर्चा व्हायच्या. मुलांनी त्या लक्षपूर्वक ऐकून टिप्स घेण्याची वडिलांची अपेक्षा असायची. हत्तींबद्दल अनेक अद्भुत कथा देखील सांगितल्या जात होत्या. अशा प्रकारे निसर्ग या मुलांचे विद्यापीठ बनले आणि पारबती, त्याची सर्वात उत्साही विद्यार्थी.
म्हणूनच, वयाच्या १४व्या वर्षी तिने तिचा पहिला जंगली हत्ती पकडला हे आश्चर्यकारक नव्हते. एका लहान मुलीने हे कसे साध्य केले ? हत्ती पकडणे ही क्रूर शक्तीची बाब नाही, ते कौशल्य आहे, असे बाळकडू मिळालेल्या तिने कोकराझार जिल्ह्यातील कचुगाव जंगलात हा हत्ती पकडला. तिच्या धाडसी पराक्रमानंतर तिच्या वडिलांनी आनंदाने उच्चारलेले “शाब्बाश बेटी !” हे शब्द त्यांनी आजही जपून ठेवले आहेत.
ही तर फक्त सुरुवात होती.

त्यानंतर पारबतीने तिच्या लाडक्या हत्ती कुटुंबात राहून काम करण्याचा निर्णय घेतला. हत्तींना वश करण्यासाठी खूप संयम, चिकाटी आणि समर्पण लागते. जंगली हत्तीला पकडणे हे अत्यंत धोकादायक काम आहे. त्यांच्या डोक्याभोवती लासो टाकून त्यांना पकडले जाते. प्रशिक्षणाची प्रक्रिया खूप मंद असते. त्या प्राण्याला जिंकण्यासाठी सुमारे सहा महिने सौम्य प्रलोभने लागतात. हे क्षेत्र खरंतर पुरुषांचे. या परंपरागत रूढींच्या विरुद्ध जाऊन तिच्या दैनंदिन दिनचर्येत तिच्या हत्तींना आंघोळ घालणे, जंगलात त्यांच्यावर स्वार होणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे यासाठी तिने पूर्णवेळ स्वतःला वाहून घेतले. आणि ती १९७२ मध्ये जगातील पहिली महिला माहूत बनली, हत्तींना वाचविणे हेच तिचे आयुष्य बनले. ती तिच्या प्रिय हत्तींसाठी हदिया (तांदळावर आधारित पदार्थ) बनविते. त्यांच्या सर्व भावना तिला समजतात त्यामुळे तेही तिच्यावर प्रेम करतात.
जंगली हत्तींना काबूत ठेवण्यासाठी लागणारे कौशल्य पारबतीने मिळविले. संयम आणि समजूतदारपणाच्या जोरावर, तिने रानटी हत्तींना विश्वासू साथीदार बनविले आणि केवळ आसामच नाही तर शेजारील राज्यांपर्यंत तिचा लौकिक पोहोचला. या भव्य प्राण्यांना समजून घेण्यात आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यातील तिच्या प्रवीणतेमुळे आणि जखमी/आजारी असलेल्यांची काळजी घेण्यासाठी तिला चहाच्या मळ्यांपासून ते पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममधील जंगले आणि ग्रामीण भागांपर्यंत विविध ठिकाणी या कामासाठी बोलावले गेले आहे.
बरुआच्या उल्लेखनीय जीवनप्रवासाने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध लेखक मार्क रोलँड शँड यांनी त्यांच्या “क्वीन ऑफ द एलिफंट्स” या पुस्तकात तिची कहाणी अमर केली, ज्यात तिच्या असाधारण कामगिरीवर प्रकाश टाकला. लोक तिला “हत्तींची राणी” म्हणून संबोधू लागले. त्यानंतर याच नावाने बीबीसीने माहितीपट तयार करून तिची कहाणी जागतिक व्यासपीठासमोर आणली आणि तिच्या करुणा आणि संवर्धनाच्या संदेशाने असंख्य लोकांना प्रेरित केले.

लक्ष्मीमाला, अलोका आणि कांचनमाला या तीन हत्तिणी आपल्या मुलीच असल्याचे पारबती आवर्जून सांगतात.ह्या तिघी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची टीम एक असामान्य आणि साहसी जीवन जगतात. हत्ती व्यवस्थापन धोरणे, वन्य कळपांना पकडणे, नियंत्रित करणे, शहरी भागातून वन्य कळपांना हाकलून लावणे आणि माहूतांना प्रशिक्षण देणे याबद्दल पारबतीची मदत आणि मार्गदर्शन घेतले जाते.
जेव्हा त्या कामावर नसतात तेव्हा त्यांना मेखेला सादोर (आसामी महिलांचा पोशाख) नेसायला आवडते. पण मोहिमेवर जायचे म्हणजे जीन्स, चमकदार पितळी बटणे असलेले कॉम्बॅट जॅकेट, सोलर टोपी आणि डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेस घातले जातात. त्यांच्या कमरेला एक खुकरी असते. लाडक्या पॅचीडर्म्सना नटविणे त्यांना आवडते. त्यांचा भालप्रदेश त्या खडूने सजवितात. राजेशाही घराण्यात जन्माला आलेली पारबती, छानछौकीचे जीवन जगू शकली असती, पण हत्तींसाठी जगण्याचे व्रत स्विकारले आणि मग कडक ऊन असो, कडाक्याची थंडी असो, दाट धुके वा मुसळधार पाऊस, जंगलात घुसून अविरत कष्ट करीत हत्तींना काबूत आणून त्याच्यासाठी जगणाऱ्या, रूढीवादी कल्पना मोडून प्रामुख्याने पुरुषांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या ‘वन्यजीव प्रेमी’ची प्रतिमा असलेल्या, “हत्तींची राणी” किंवा ‘हस्ती कन्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लोकविलक्षण पारबतीविषयी प्रचंड आदर वाटतो.

वय वर्षे ६७ ! आजही जंगलात जाऊन हत्तींना पाळीव करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या, चटईवर तंबूत झोपणाऱ्या, जगातील एकमेव महिला माहूत पारबती ! “माझ्या कामात, कोणतेही रिटेक नाहीत, प्रत्येक वेळी मी जंगलात जाते तेव्हा मला ती माझी शेवटची सहल वाटते. पण एक माहूत म्हणून, मी कधीही निवृत्त होऊ शकत नाही”, कामाप्रती निष्ठावान पारबती शांतपणे बोलत, हत्ती खूप स्थिर, निष्ठावंत, प्रेमळ आणि शिस्तप्रिय असतात, म्हणून आपल्याला अतिप्रिय आहेत असे सांगतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या एशियन एलिफंट स्पेशलिस्ट ग्रुप (IUCN) च्या गौरवान्वित सदस्य म्हणून, त्या या भव्य प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सतत पाठराखण करीत आहेत, ज्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित होत आहे. त्यांना कोलकाता आंतरराष्ट्रीय वन्यजीव आणि पर्यावरण चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रेरणादायी आणि तितकीच हृदयस्पर्शी जीवनगाथा असलेल्या या असामान्य नारीला सामाजिक कार्यासाठी २०२४ च्या प्रजासत्ताकदिनी प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पारबती बरुआ यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार ही केवळ त्यांची वैयक्तिक कामगिरी नाही तर त्यांच्या कुटुंबाच्या उत्कृष्टतेच्या वारशाचे प्रतिबिंब देखील आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपटांचे अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सुप्रसिद्ध प्रमथेश चंद्र बरुआ हे त्यांचे काका तर आसामी लोकसंगीत गायिका प्रतिमा पांडे बरुआ ज्यांना २०२३ मध्ये गोलपारिया या लोकप्रिय लोकसंगीतातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या पारबती यांची थोरली बहीण होय.
हत्तीप्रेम मात्र प्रत्येकाच्या नसानसात आहे. पारबतीच्या कार्याबद्दल तुम्हाला आता माहित झालेच आहे. प्रमथेश चंद्र बरुआ यांचाही लाडका हत्ती होता ज्याच्या शौर्याच्या काही गोष्टी प्रसिद्ध आहेत, त्याला प्रथमेशनी पडद्यावरही चमकवले आहे आणि प्रतिमा यांना त्यांच्या कुटुंबात हत्ती पकडण्याच्या जुन्या कौटुंबिक परंपरेतून प्रेरणा मिळाली. हत्ती पकडणारे माहूत एक प्रकार गाण्यासाठी वापरतात. ज्या गाण्याला त्यांनी गोलपरिया लोकगीताचे स्वरूप देण्यासाठी परिशोधित आणि पॉलिश केले.
(हे त्यांच्या “ओ मोर माहूत बंधु रे” या गाण्यात आढळते.) ज्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि आता जगातील एकमेव महिला माहूत म्हणून गाजत आहेत पद्मश्री पारबती, वर्तुळ पुरे !

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
पद्मश्री पारबती बरुआ, वन्यजीव प्रेमी, हत्ती कन्या, खुप छान लिहिलंय सर, अभिनंदन