देशाच्या राजधानीत, दिल्लीत, राष्ट्रपती भवनाच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये पद्मपुरस्कार विजेत्यांना पुरस्कार वितरित केले जात होते. विजेत्यांमध्ये एक नाव होतं कर्नाटकात राहणाऱ्या ट्रांसजेडर, लोक कलाकार मंजम्मा जोगती यांचं. त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता.
मंजम्मा यांचा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर येण्याचा अंदाज एकदम हटके होता. पुरस्कार घेण्याआधी त्यांनी राष्ट्रपतींची ज्या पारंपरिक पद्धतीने दृष्ट काढली तो प्रकार पाहून हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

क्षणात त्या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांना न ओळखणारे लोकही त्यांना ओळखायला लागले. हा व्हिडिओ आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
https://images.app.goo.gl/sLQM1d3yueM8wwtx6
तर अशा या मंजम्मा जोगती कोण आहेत ? जाणून घेऊ या त्यांची जीवन कहाणी…..
कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यातील कल्लुकंब या गावी पन्नासच्या दशकात मंजूनाथ शेट्टी याचा जन्म झाला. मंजूनाथ शाळेत जाऊ लागला. पण हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागले की त्याचे हावभाव आणि राहणी मुलींसारखी आहे. त्याला मुलींसोबत रहायला,खेळायला आणि नाच करायला आवडायचं.
मंजूनाथचे असे मुलीसारखे वागणे पाहून घरच्यांना काळजी वाटायला लागली. त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरी त्याच्यात सुधारणा होत नाही म्हणून शेवटी ते त्याला घेऊन डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्याला तपासून निश्चित झाले की त्यात ट्रांसजेडरचे गुण आहेत.
डॉक्टरांचे निदान ऐकून घरात अवकळा पसरली. आईचे रडून रडून हाल झाले होते. पण नियतीला तर तेच मान्य होते. नियतीपुढे आई वडीलांनी हात टेकले. १९७५ साली मंजूनाथचे आई वडील, त्याला घेऊन होस्पत जवळच्या हुलिगेयम्मा मंदिरात गेले. तिथेच त्याला जोगती बनण्याची दीक्षा दिली गेली. तिथल्या पुजार्याने सांगितले, “हिच्यावर देवीची कृपा आहे.”
तेव्हापासून मंजुनाथ चे जीवनच बदलून गेले. मंजुनाथ ची मंजम्मा जोगती झाली.
पुढे द हिंदू बिझनेस लाईन ला दिलेल्या मुलाखतीत मंजम्मांनी सांगितले, “माझ्या वडिलांनी म्हटलं की मी त्यांच्यासाठी मेले आहे. नंतर मला दीक्षा देण्यात आली. माझा उडारा (पारंपरिक पद्धतीने तरुण मुलांच्या कमरेच्या खाली बांधलेला धागा) कापला गेला. मला स्कर्ट, ब्लाऊज आणि बांगड्या घालायला दिल्या. त्यावेळेस आईचे करुण रुदन मला ऐकू येत होते. येलम्मा देवीचे भक्त ट्रांसजेडर असतात आणि ते स्वतःला देवीचे विवाहित मानतात.
आई वडीलांनी आपला मुलगा गमावला होता. त्यानंतर मंजम्माच्या आई वडीलांनी त्यांना कधीच घरात घेतलं नाही. ही मंज्जमासाठी न पचवता येणारी गोष्ट होती पण तरीही सत्य होती.
घरच्या लोकांनी मंजम्माचा स्वीकार न केल्यामुळे त्या फारच निराश झाल्या होत्या. सडकेवर भीक मागून दिवस ढकलू लागल्या. पण तिथे ही काही लोकांनी त्यांचे यौनशोषण करण्याचा प्रयत्न केला. पैसे ही हिसकावून घेतले. हे क्षण अत्यंत निराशाजनक होते. एवढ्या मोठ्या जगात आपलं म्हणण्यासारखं त्यांना कोणीच उरलं नव्हतं. त्यावेळेस त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण जीवनाची दोर मजबूत असल्याने त्या बचावल्या.
एकदा एका बसस्टँडवर त्यांनी एक पोस्टर बघितलं ज्यात वडील आणि मुलगा होते. वडील गाणं म्हणताना दाखवले होते आणि मुलगा डोक्यावर एक भांडं ठेऊन नृत्य करत होता. ते नृत्य, जोगती नृत्य होतं. ज्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.
मंजम्माने त्या पितापुत्रांनी माहिती काढली आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. बसप्पा नावाच्या त्या पित्याला विनंती करून त्या नृत्य शिकू लागल्या. चोम्बू (एक पात्र) डोक्यावर ठेवून तोल राखून नृत्य करणं फारच रोमांचित करणारं होतं. कधी कधी देवांची प्रतिमा डोक्यावर घेऊन ही नृत्य करायच्या. ही कला आत्मसात करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केला जबरदस्त मेहनत घेतली. याच कलेची त्यांच्या जीवनात खूप प्रेरणादायी भूमिका ठरली.

पुढे मंजम्मा यांच्या एका सहकलाकाराने हागरी बोमनतल्लीच्या एक लोक कलाकार “कलावाशी” त्यांची भेट घालून दिली. तिथे त्यांना ऑडिशन देण्यास सांगितले गेले. त्यांनी न घाबरता एक लोकगीत आणि नृत्य केलं. ते अत्यंत प्रभावशाली ठरलं . त्यानंतर त्यांना नाटकात लहानसहान भूमिका मिळू लागल्या आणि याच लहान भूमिका त्यांच्या पुढे मिळणाऱ्या मोठ्या भूमिकासाठी सहायक ठरल्या. आता मंजम्मा एक मोठ्या कलाकार म्हणून नावा रूपास आल्या होत्या. जोगती नृत्यास नावारूपाला आणण्याचं आणि त्याला लोकप्रिय करण्याचं श्रेय मंजम्माला जातं. त्यांची मेहनत, जीवन या कलेसाठी सार्थ ठरलं होतं. मंजम्माला २०१० मध्ये कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

मंजम्माची ही जीवन गाथा कावेरी जिल्ह्यातील कर्नाटक लोक विश्वविद्यालयाच्या कला स्नातक पाठ्यक्रमाचा भाग आहे. शाळेतील पाठ्यक्रमात ही त्यांची संघर्षकथा सामिल केली गेली आहे.
कर्नाटक जनपद अकादमीच्या मंजम्मा पहिल्या ट्रांसजेडर अध्यक्ष आहेत. त्या नेहमी म्हणतात, “कला देवाचं रूप आहे. त्यानेच माझ्या भरण पोषणाची व्यवस्था केली. या कलेने माझा आत्मा भारून गेला आहे. या दैवीय कलेने मला त्यावेळेस साथ दिला जेव्हा माझ्या सोबत कोणीच नव्हतं.”
हार न मानून स्वतःची एक स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या मंजम्माला सादर नमन.

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800