प्रजासत्ताकदिन २०२३ रोजी आसाम मधील जनता विशेषतः नागा समाज अत्यानंदित झाला. कारण त्यांचा आवडता नायक, आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील रहिवासी असलेले ७५ वर्षीय रामकुईवांगबे जेन्ने यांना २०२३ साठी पद्मश्री पुरस्काराने [सामाजिक सांस्कृतिक कार्य] सन्मानित करण्यात आले.
दिमा हासाओ जिह्यातील पद्मश्री पुरस्कार मिळालेली ही पहिलीच व्यक्ति !
रामकुईवांगबे जेमे न्यूमे उर्फ रामकुईजी यांचा जन्म २५ मे १९४७ रोजी, आसाम राज्यातील हाफलांगपासून २८ किमी अंतरावर असलेल्या दिमा हासाओ जिल्ह्यातील सर्वात जुन्या जेमे गावांपैकी एक गांव बोरो हेनाम येथे झाला. आठ मुलांपैकी ते चौथा आणि सर्वात मोठा मुलगा आहेत. त्यांचे वडील इंचेकंबे न्यूमे हे अतिशय बुद्धिवान राजकीय नेते होते आणि सक्षम आणि सरळ स्वभावासाठी ओळखले जात होते.
रामकुईजी लहानपणापासूनच अतिशय सौम्य आणि दयाळू आहेत. लहान वयापासून, त्यांच्यावर त्यांच्या वडिलांचा खूप प्रभाव होता.सामाजिक दृष्टिकोनाची दृष्टी त्यांच्याकडूनच मिळाली असे रामकुईजी आवर्जून सांगतात. त्यांनी शालेय शिक्षण आणि हायस्कूल गव्हर्नमेंट बॉईज हायस्कूल, हाफलांग येथून केले आणि १९७५ मध्ये शिलाँग सरकारी महाविद्यालयातून कला शाखेची पदवी प्राप्त केली. १९८० मध्ये त्यांची उत्तर कचार हिल्स जिल्हा परिषदेच्या शाळांचे उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
सुरुवातीच्या काळांत रामकुईवांगबे यांनी मुक्तिसेनानी रानी माँ गैडिनलियू यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. त्यामुळे ते रानी माँचा जवळचा सहकारी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या मैत्रीपूर्ण वागणुकीमुळे, ते केवळ त्यांच्या समुदायातच नाही तर दिमा हासाओमध्ये राहणाऱ्या सर्व समुदायांमध्येही खूप लोकप्रिय आहेत.
शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान त्यांनी दिले. त्यांनी एकूण दहा शाळा स्थापन केल्या आणि मुली, महिला यांनी शिक्षण घ्यावे यासाठी आग्रह धरला. शिक्षणाचे महत्व समजावून मुलींना आधी शिक्षण द्या नंतरच लग्न करा यासाठी गांवोगांवी प्रचार केला, तसेच बळीप्रथेविरुद्ध जनजागृती केली.
भारतात राहूनही अनेकांनी हेरका संस्कृतीबद्दल ऐकलेही नाही. मी रानी गैडिनलियू (गिडालू) यांच्यावर एक लेख लिहिल्याचे आपल्या स्मरणांत असेलच. त्या वयाच्या १३ व्या वर्षीच हेरका या धार्मिक चळवळीत सामील झाल्या होत्या. त्यांच्या बरोबर काम करतांना रामकुईवांगबे यांनीही या चळवळीसाठी स्वतःला समर्पित केले. आपली संस्कृती संवर्धन करणे ही ही एक मोठी गरज आहे.
रामकुईवांगबे यांनी श्रद्धाळू हेरका लोकांच्या पारंपारिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यास सुरुवात केली. १९७४ मध्ये, त्यांनी ईशान्य भारतात झेलियनग्रॉन्ग हेरका असोसिएशनची स्थापना करून सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) म्हणून धर्मत्यागाचा निषेध केला आणि ईशान्य प्रदेशात जबरदस्तीने धार्मिक धर्मांतराच्या विरोधात बंड केले आणि स्वदेशी संस्कृती आणि विश्वासाचा प्रचार केला. धार्मिक स्वातंत्र्याच्या लढाईत, रामकुईजींना अतिरेक्यांच्या अनेक अडथळ्यांना आणि धमक्यांचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही, उलट विनम्र भावना ठेवली आणि लोकांच्या कल्याणासाठी ते बोलत राहिले. त्यांची निर्भीड हिंमत आणि आत्मविश्वास यामुळे लोक पुढे जाण्यास आणि त्यांच्या हक्कांसाठी परत लढण्यास प्रोत्साहित झाले. ते गेल्या पाच दशकांपासून हेराका धर्माचा प्रचार आणि संवर्धन करत आहेत, ज्याचे नागालँड, आसाम आणि मणिपूरमध्ये काही हजार अनुयायी आहेत. हेराका धार्मिक ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “टिंगवांग हिंगडे” च्या लिप्यंतरणात त्यांचा मोठा सहभाग आहे. या सर्व कार्यामुळे लोक त्यांना ‘हेरकाचा नायक’ (Hero of Heraka ) असे ओळखतात. त्यांनी रानी माँ गैडिनलियू यांचे चरित्र पुस्तकही लिहिले.
याव्यतिरिक्त, त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन म्हणून बोरो हाफलांग येथे हेरका सेवा ट्रस्ट अंतर्गत रानी गैडिनलियू मेमोरियल ज्युनियर कॉलेजची स्थापना करण्यास पुढाकार घेतला. पत्नीच्या सहकार्याने त्यांनी स्वतःच्या घरी “विश्व हिंदू परिषद मुलींचे वसतिगृह” सुरु केले आणि पहिल्याच वेळी २२ बोर्डर्सचे शिक्षण सुरु झाले.
श्री न्यूमे हे २०११ मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून सेवेतून निवृत्त झाले. आजही ते पूर्वीच्याच उत्साहाने संस्थेच्या बरोबरीने चालतात आणि समाजाच्या हितासाठी काम करतात.
श्री न्यूमे हे विविध हिंदू संघटनांशी देखील संबंधित आहेत आणि त्यांनी उल्लेखनीय काम करून संघटनांमध्ये प्रमुख पदे भूषवली आहेत. आसामच्या दिब्रुगड विद्यापीठाचे न्यायालय सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तसेच सध्या ते लोदी हायस्कूल समितीचे आणि रानी गैडिनलियू मेमोरियल कनिष्ठ महाविद्यालय समिती, हाफलांगचे अध्यक्ष आहेत. वयाच्या ३६व्या वर्षी त्यांचा विवाह नरीसॉंगले नगमे ( Nrisongle Ngame ) यांच्या बरोबर झाला. लौकिकदृष्ट्या त्यांना मूल झाले नाही परंतु धाकटा भाऊ इदंबे याच्या अपमृत्यूनंतर त्याची ३ मुले त्यांनी दत्तक घेतली. आजही अनेक वंचित आणि गरीब विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी राहतात आणि ते त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करतात.
श्री. न्यूमे यांनी स्वतःसाठी काटकसर करून आपले तन, मन, धन आपल्या लोकांसाठी आणि समाजासाठी अर्पित केले. त्यांना, त्यांच्या तत्वांना बरोबरीने साथ देणारी त्यांची पत्नी नरीसॉंगले ही सुद्धा तितकीच वंदनीय आहे. विचार करा, घरी ३ मुले आहेतच शिवाय, विविध वयोगटातील २२ ते २५ मुलींचे बोर्डिंग त्यांच्या शिक्षणासाठी. याशिवाय गरजू, वंचित मुलांना आश्रय ! किती काम करत असेल ही माऊली! पतिच्या बरोबरीने तिचीही प्रचंड निस्वार्थ सेवा उल्लेखनीय आहे.
मुलींच्या शिक्षण जागृतीसाठीच्या रामकुईजींच्या अथक प्रयत्नांमुळे या प्रदेशात प्रचलित असलेल्या मुलींच्या शिक्षणाबद्दलची उपेक्षा संपून त्यांना घरून शिक्षणासाठी अनुमती मिळाली इतकेच नव्हे तर आजमितीला त्यांना त्यासाठी प्रोत्साहितही केले जाते.श्री न्यूमे यांच्या तपश्चर्येचे हे फार मोठे यश आहे.
श्री. न्यूमे हे अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी आहेत. त्यांना स्वदेशी हेरका श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन आणि ईशान्य प्रदेशात सामाजिक उन्नतीसाठी पुणे, मुंबईच्या जनकल्याण समितीने झेलियनग्रॉन्ग हेरका असोसिएशनच्या नांवाने “श्री गुरुजी समाज प्रबोधन पुरस्कार” (१९९७ ) बहाल केला आहे. या अर्थाने त्यांच्या कार्याची दखल सर्वप्रथम पुणे-मुंबईकरांनी घेतली असे म्हणायला हरकत नाही. तसेच हेराका प्रथा आणि धर्माच्या रक्षणासाठी त्यांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल, “भाऊराव देवराज स्मृती सेवा सन्मान” (२०१०), गुवाहाटी अनेक समुदायांना त्यांच्या पूर्वजांच्या श्रद्धेशी पुन्हा जोडण्यासाठी आणि आंतर-समुदाय आणि आंतर-प्रादेशिक बंध जोपासण्यासाठी, त्यांच्या राष्ट्रीय दृष्टीकोनातून अथक प्रयत्नांसाठी, “विवेकानंद केंद्र इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर सन्मान” (२०१५ ), नारी शिक्षण सशक्तीकरण आणि ईशान्येकडील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदानासाठी, एनआयटीटीई युनिव्हर्सिटी (२०१८ ), मंगळुरू यांच्यातर्फे “डॉक्टर ऑफ सायन्स” (honoris causa) त्यांना प्रदान करून त्यांचा सन्मान केला गेला.
यांच्या अशा अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
आपल्या अत्यंत लाडक्या, आदरणीय नेत्याच्या कार्याची देशस्तरावर दखल घेऊन त्यांस सन्मानित केलेले पाहून सुरवातीला म्हटल्याप्रमाणे आसाममधील जनता, आनंदली, प्रफुल्लित झाली!
जयहिंद !!
— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800