Saturday, July 27, 2024
Homeलेखपद्मश्री : वडिवेल गोपाल आणि मासी सदैयान

पद्मश्री : वडिवेल गोपाल आणि मासी सदैयान

दोन वर्षांपूर्वी अजगर पकडण्यासाठी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे पायथन चॅलेंज सुरू करण्यात आले होते. जगभरातून ८०० हून अधिक सर्प पकडणारे सहभागी झाले होते. या पायथन चॅलेंजमध्ये भारतातून वडिवेल गोपाल आणि मासी सदैयान यांची टीमही सहभागी झाली होती. या दोघांनी फ्लोरिडामध्ये १० दिवसांत १४ धोकादायक बर्मी अजगर पकडले आणि या चॅलेंजमध्ये भारतीय संघाने सर्वाधिक अजगर पकडले असे जाहीर केले गेले. एव्हढेच नव्हे तर फ्लोरिडा स्टेट डिपार्टमेंट ऑफ वाइल्डलाइफचे अधिकारी त्यांच्या कलेने प्रभावित झाले आणि त्यांना साप कसे पकडायचे हे शिकवण्यासाठी नियुक्त केले. यानंतरही दोघांना थायलंड आणि इतर देशांतून साप पकडण्यासाठी आमंत्रणे मिळाली. आता ही जोडी अनेक देशांमध्ये साप पकडण्याचे प्रशिक्षण देत आहे.

आपल्याला लहानपणापासून साप पकडणाऱ्यांबद्दल एक भितीमिश्रित कुतूहल असते. आईचा किंवा बाबांचा हात घट्ट पकडून, त्यांच्या मागे लपून नागपंचमीला प्रत्येकाने गारुडी कसा नाग टोपलीतून काढतो आणि त्याच्या पुंगीवर नाग कसा डोलतो हे डोळे विस्फारून पहिले असेलच. खेडेगावांत असाल तर सापाचे अप्रूप नसेल पण शहरवासीयांना त्याची थोडी दहशतच वाटते आणि मग कुठे फिरायला गेल्यावर सर्व सेफ्टी पाहून प्राणिसंग्रहालयात त्याच्या पाठीवरून हात फिरवून आपली ऍडव्हेंचरची हौस भागवून घेतो पण साप पकडण्यात इतकं प्राविण्य की अमेरिकेला त्यांची भुरळ पडते अशा व्यक्तींबद्दल तुम्ही ऐकलं आहे कां ? ही दोन नररत्ने आहेत तामिळनाडूतील चेंगलपट्टू येथे राहणारे इरुला समुदायाचे, रोज मृत्यूशी खेळणारे, वडिवेल गोपाल आणि मासी सदैयान ! ते अत्यंत धोकादायक आणि विषारी सापही एका क्षणांत पकडू शकतात.

दोन्ही मित्र साप पकडण्यात निपुण आहेत आणि त्यांना जागतिक सर्पतज्ञ म्हटले जाते. साप पकडण्यात माहीर असलेल्या गोपाल आणि सदैयान यांनी याबाबत कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही मात्र ते केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या विविध भागात साप पकडण्यासाठी जातात आणि साप पकडण्यासोबतच ते जगभरातील लोकांना त्याबद्दल जागरूकही करतात, शिवाय ज्यांची इच्छा असेल अशांना साप पकडण्याचे प्रशिक्षणही देतात.

इरूला, दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतात राहणारी एक आदिवासी जमात. ह्यांना तिरकमठाधारी असेही म्हणतात. त्यांची भाषा हे तमिळचेच अपभ्रष्ट रूप आहे. ते लहानलहान राहुट्यांत व झोपड्यांत रहातात, त्यांना चाळी म्हणतात व त्याही एकमेकांपासून दूर बांधलेल्या असतात. क्वचित एखाद्या ठिकाणी चारपाच झोपड्याही दिसतात. इरूला वांशिक दृष्ट्या प्रोटो ऑस्ट्रेलॉइड असून बुटके व अत्यंत काळे आहेत. चपटे नाक, अरूंद छाती व कुरळे केस ही त्यांची वैशिष्ट्ये. खेड्यातून राहणार्‍या इरूलांचे शेती व मोलमजुरी हे प्रमुख धंदे आहेत, तर जंगलात राहणारे इरूला मध, मेण, शिकेकाई वगैरे पदार्थ गोळा करतात तसेच पत्रावळी करून त्या विकतात. जंगलातील इरूलांना औषधी वनस्पतींची चांगली माहिती असते. त्यामुळे काही वैदू बनून औषधे देतात. हेही ज्ञान त्यांनी देशाला देऊन देशाच्या आरोग्यसेवा परिसंस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सरकारही त्यांचे योगदान मानते. तर अशा साध्याभोळ्या,मदतीस सदैव तत्पर अशा इरूला जमातीतील दोन मुले, गोपाल आणि सदैयान. जंगलात लहानपणापासून जाऊन साप पकडण्याचा साहसी खेळ खेळू लागले आणि त्यात अधिकाधिक गम्मत घेत चक्क माहीर झाले. हळूहळू त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली आणि अनेक ठिकाणी त्यांची मदत घेतली जाऊ लागली. कोणीही त्यांना बोलाविले की कोणत्याही अपेक्षेशिवाय ते तेथे धाव घेऊ लागले. औपचारिक शिक्षण नसतानाही हे दोघे साप हाताळण्यास तसेच साप पकडणाऱ्यांना शिकवण्यासाठी जगभर प्रवास करतात. सरपटणारे प्राणी पकडण्यासाठी ते त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेल्या जुन्या आणि देशी तंत्रांचा वापर करतात.

वाडीवेल गोपाल आणि मासी सदैयान यांची अद्वितीय कला, अलौकिक साहस, निडरपणा, त्याद्वारे देशोदेशी फिरून भारताच्या नांवलौकिकात भर घातल्याबद्दल भारत सरकारने त्यांना २०२३ मध्ये पद्मश्री हा देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार, सामाजिक कार्य (प्राणी कल्याण) क्षेत्रात देऊन सन्मानित केले.
वाडीवेल गोपाल आणि मासी सदैयान यांचे अतिशय कौतुक वाटते. त्याचवेळी आपल्या देशांत अत्यंत अंतर्गत, दुर्गम ठिकाणी लपलेली रत्ने शोधून त्यांना उचित कोंदण देऊन देशवासियांसमोर आणणाऱ्या सरकारचे ही खूप कौतुक वाटते.
नवीन वर्षही अशीच हिरे माणके घेऊन येईन, स्वागत व्हावे.

उंबऱ्यावर थबकलेले नवीन वर्ष प्रत्येकाच्या घरी सुखसमाधानाचा वर्षाव करो, नैराश्य, संकटांचे आणि मोबाईलरुपी अजगरांशी सामना करून त्यांना जेरबंद करण्याची स्फूर्ती आपणां सर्वांस वडिवेल गोपाल आणि मासी सदैयान या जोडगोळीकडून प्राप्त होवो ही सदिच्छा.

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप छान माहिती दिलीत नीलाताई. या दोघांचे ही कार्य भारतीयांसाठी कौतुकास्पद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८