परिस म्हणजे लोखंडाचे सोने करणारा दगड अशी कल्पना. लहानपणी आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या असतात, अमका तमका परिसाच्या शोधात निघाला. वणवण फिरला वगैरे.
त्या गोष्टी वाचताना बालवयात एक कुतूहल नक्कीच निर्माण व्हायचे, आपणही मोठे झालो की सोन्यात रूपांतर करणारा तो दगड शोधायचाच. कदाचित् तो आपल्यासाठीच थांबला असेल असं हमखास वाटायचं. तो परिस कसा दिसत असेल ? लोखंडाला लावला की झालं सोनं ! वा ! भारीच मग आपणही खूप श्रीमंत होऊ असे इमले बांधण्यात खूप मजा येत असे. खरेच असा दगड असतो की नाही हे अज्ञात आहे तरीही अजुनही अशा गोष्टी चर्चा चालतात याचाच अर्थ हे कदाचित् रूपक असावं.
परिस म्हणजे एखाद्या पदार्थात अमुलाग्र बदल करणारी प्रचंड शक्ती, प्रचंड उर्जा असावी. कदाचित् लोखंडाचा ॲटॅामिक नंबर २६ वरून ७९ वर नेणारी चमत्कारीक शक्ती. म्हणजे हे स्वतःचे उच्चीकरण असावे का ? म्हणजे कोणत्याही माणसाचे, जागेचे, एखाद्यामधील कलेचे ?
परिस म्हणजे हवा ते परिणाम घडवून आणणारा फक्त कॅटॅलिस्ट सारखा घटक असावा का ? जो दुसऱ्यामधे होणाऱ्या बदलांना कारणीभूत होतो, ते पाहून संतृप्त होतो. एखाद्याला उंचीवर न्यावयास उद्यूक्त करणारा असा घटक.
अमुलाग्र बदल घडविणारी संकल्पना सुद्धा.

कधी कधी माणसाला कळत नसतं पण त्याला साक्षीभावाने पाहणाऱ्याला लक्षात येते की इथे बदल होणे आवश्यक आहे. अशावेळी तो फक्त एक विचारसरणी देतो आणि ती आत्मसात करून त्या व्यक्तीमधे अमुलाग्र बदल घडतो आणि मग आपण म्हणतो त्याला ज्ञानाचा परिसस्पर्श झाला.
माणूस कायमच स्वतःला सिद्ध करायला, परिपूर्ण करायला तयार असतो पण हे कधी कधी त्याच्या स्वतःच्याच ते लक्षात येत नाही. तो आपला लोखंड बनून गंजून घ्यायला तयार असतो. त्याचं सोयर सुतक त्याला नसतं पण जेव्हा त्याचा भाग्योदय जवळ येतो तेव्हा त्याला अशी शक्ती गुरू, संवेदना, संकल्पना, पुस्तक, सामान्य माणूस, प्राणी, पक्षी, निसर्ग यामधे कुठेही लाभू शकते आणि त्यात समुळ बदल होतो.
योग्यांना होणारा आत्मसाक्षात्कार असाच परिसस्पर्श असावा. तो घडविणारा कदाचित् त्याच्या भाग्याने लाभलेला गुरू असावा. ज्ञान सुद्धा परिसस्पर्शच नाही का ? मलिनता घालवणारा अमुल्य स्पर्शच.
अशा लोखंड आणि परिस याच्या जोड्याही ठरलेल्या असाव्या काय ? विवेकानंदाना रामकृष्ण भेटणं, मार्गारेट ला विवेकानंद भेटून तिचं भगिनी निवेदिता होणं ? परिसस्पर्श होण्सासाठी ते लोखंडही नकळे तापायला हवं, ती वेळ यायला हवी तरच तो परिसस्पर्श लाभणार आणि त्याची किमया साधणार. की ही अनादी काळाची प्रक्रिया असणार ? या परिसस्पर्शासाठीचं विविध जन्म होत असावे.
कधी असंही वाटतं जो परिस आपण शोधतो तो आपल्यातच आहे. अलकेमिस्ट मधल्या खजिन्यासारखा वा कस्तुरी मृगाच्या पोटातील कस्तुरीसारखा. मुळात सोनं म्हणजे काय इथपासून मतमतांतरे असू शकतात. वरवर पाहता ती चकाकी, श्रीमंती असू शकते पण खरतर ती उच्च अवस्था आहे. अमुलाग्र बदलाची परमोच्च अवस्था.
सामान्य पातळीवर याकडे असेही पाहता येईल की माती सर्वांसाठी समान पण करमरकरांसारख्या कलाकाराचा परिसस्पर्श त्याला झाला की अजोड कलाकृती निर्माण होते आणि मातीचं सोनं होतं. सूर सर्वांसाठी सारखेच पण लताबाईंचा स्पर्श त्याला झाला की सुवर्णाची झळाळी प्राप्त होते.
परिसस्पर्श व्हायला एखादं पुस्तकही कारणीभूत होऊ शकतं किंवा एखादी व्यक्ती, एखादा विचार, एखादं स्थळ महात्म्यांच्या स्पर्शानी पुनीत झालेल्या अनेक तपोभुमी आहेत. त्या म्हणजे परिसस्पर्शाचं जीवंत उदाहरणच नव्हे काय ?
एकूण काय आपल्यातल्या लोखंडावर संस्कार करत राहणं, साक्षात्काराची वाट पहात परिसाचा शोध घेत विहित कर्म करत राहणं हेच आपल्या हाती.

— लेखन : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Absolutely well worded!! तुझी मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे नि लेखणी पण तितकीच! खूप नेमका व्यक्त केला आहेस …alchemist चा संदर्भ अचूक !! 😊😊😊
माझं फार आवडतं पुस्तक आहे ते! लिहीत राहा .