पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे हे सर्वज्ञात आहे आणि महत्त्वाचे म्हणजे लोकांचाही कल त्यादृष्टीने वाढत आहे. संस्कृती प्रधान भारतात श्रावणाच्या आगमना बरोबरच उत्सवाचा मौसम सुरू होतो. नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन,कृष्ण जन्माष्टमी, बैलपोळा आणि सगळ्यात उत्साहाचा राजा म्हणजे गणेशोत्सव. उत्सव प्रेमी जनमानसात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य निर्माण करणारा हा सण.
मागील काही वर्षापासून सण साजरे करण्यासाठी पर्यावरणवादी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. पीओपी मूर्तीवरील येऊ घातलेले निर्बंध, ध्वनी पातळीची मर्यादा, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती, गणपतीची आरास व सजावटीसाठी वापरण्यात येणारे पर्यावरण पूरक साहित्य यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते.
हे चित्र नक्कीच चांगलं आहे असे असले तरी काही उत्सव प्रेमी अद्यापही हा बदल स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांच्यामते चार दिवसाच्या सणावळीमुळे पर्यावरणाची अशी कितीशी हानी होणार आहे ? डीजेचा कर्कश आवाज, लेसर लाईट चा वापर यामुळे काही जणांना आलेले बहिरेपण तसेच काहींची गेलेली दृष्टी हे सर्व पाहता उत्साहाचं कर्कश स्वरूप बदलणे गरजेचे वाटते.
अंधेरी येथील स्वप्नाक्षय मंडळाचे सल्लागार श्री. प्रशांत काशिद यांच्या कल्पक संकल्पनेतून देव देवतांचे फोटो असलेल्या लग्न पत्रिका वर्षभर मंडळ जमा करते व त्याच्या लगद्यापासून गणेश मूर्ती साकारली जाते. मागील काही वर्ष स्वप्नाक्षय मंडळ पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती करून एक चांगला संदेश देत आहेत.
पीओपी मूर्तीवरील सरसकट बंदी करायची झाल्यास मूर्तिकारांना सरकारी पातळीवर अर्थसहाय्य मिळणे गरजेचे आहे. कृत्रिम तलावामध्येच मूर्तींचे विसर्जन करावे जेणेकरून त्या मातीचा पुनर्वापर करून जल प्रदूषण रोखता येईल, कर्कश्य आवाजाची रेलचेल बंद करून त्याची जागा मधुर संगीताने घेतल्यास ध्वनी प्रदूषणास आळा बसेल. विषारी वायू सोडणाऱ्या फटाक्यांच्या जागी थोड्या प्रमाणात हरित फटाके वाजवून आनंद साजरा करावा जेणेकरून वायू प्रदूषणाला आळा बसेल. नैसर्गिक साधनांचा वापर करून सजावट तसेच निर्माल्य ठरलेल्या जागी ठेवलेल्या कलशामध्ये ठेवल्यास त्यापासून खत निर्मिती होऊ शकते, पर्यायाने पर्यावरण आणि टाळली जाऊन पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होईल.
उत्सव व परंपरा साजरी करताना पर्यावरणाचे रक्षण महत्त्वाचं आहे. खरं म्हणाल तर तो एक सकारात्मक ऊर्जेचाच भाग आहे आणि सणांची भव्यता आणि दिव्यता पर्यावरण पूरक उत्सवातच आहे हे सरसकट समाजाने अधोरेखित करणे सद्य परिस्थितीत गरजेचे आहे.
— लेखन : सुधीर थोरवे. पर्यावरण तज्ञ., नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800