कधी कळेल माणसाला
मोल पाण्याचं, झाडा वेलींचं
निघून जातं समुद्रात
पाणी सारं पावसाचं
पाणी अडवा, पाणी जिरवा
जपून वापरा पाणी
घोषणांचा तेवढा पाऊस पडतो
पण मनावर घेतो का कोणी
थेंब थेंब पाणी सुद्धा
आहे फार मोलाचं
नका रे घालवू वाया
कळवळून सांगणं आहे पृथ्वी मातेचं
काळ्या आईला पडल्यात भेगा
कधी होशील माणसा तू जागा
दात घासताना, आंघोळ करताना
का घालवतोस वाया, पाणी उगा
गावाकडे हंडाभर पाण्यासाठी
करावी लागते बायकांना पायपीट
उध्वस्त करते शेतीला
अवकाळी अन् गारपीट
नद्या गेल्या सुकून
झरे तलाव विहिरी गेल्या आटून
तडफडतायत उन्हात
गुरे ढोरे पाण्यावाचून
पाणी पाणी करत
पाखरं टाकतायत मान
ग्लोबल वाॅर्मिंगच्या वाढत्या तापाने
उडवून टाकली दाणादाण
पाणी आहे प्राण
निसर्गाची शान
फुलेल कसं माणसा
पाण्याशिवाय रान
झाडांवरची निर्दयी कु-हाड
करते आहे मानवाचाच घात
वृक्षतोड थांबली नाही
तर मरण अटळ आहे दुष्काळात
चला होऊ जल साक्षर
येईल वसुंधरेला बहर
पीक पाणी उदंड होईल
जर झाडे लावली रानभर
— रचना : राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुपच छान…
पाणी हे अमुल्य म्हणून जीवन अनमोल…
माणसा, तुला कधी रे समजेल त्याचं मोल?