पायरी पायरीने पायऱ्या चढणे, टप्पे गाठणे हेच नेहमी सोयिस्कर अन योग्य असते. एकाच वेळेस एकदम तीन – चार पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करणे हे कधी कधी पायरीवरून घसरण्यासारखे होऊ शकते अन मग आपले जे हसे होते त्याला पारावार उरत नाही, मग ती पायरी जिन्याची असो वा आपल्या प्रगतीची !
पाया मजबूत करून दमादमानं एकेक पायरी वर चढत जाणं हे इतरांसाठी पावलांवर पाऊले टाकून चालण्यासाठी आदर्शवत सुंदर पायंडा पाडण्यासारखे वा पक्का पाया रचण्यासारखे असते अन हे थोडे पारंगत झाल्याशिवाय जमणे कठीण. पारख करण्याची दृष्टी अंगी बाळगली की पालथं पडायची वेळ येत नाही, पाय रुतून रहाण्याचा दुर्धर प्रसंग वा पायावर धोंडा पाडून घेण्याची पाळी येत नाही, हे अगदी खरं.
“आपली पायरी ओळखून वागावं” असा अनाहूत सल्ला काही जण देत असतातच की ! तसं आचरण ठेवलं की पायऊतार होण्याची वेळ येत नाही. “Being the first to cross the finish line makes you winner in only one phase of life, it’s what you do after you cross the line that really counts” यशाची पहिली यशस्वी पायरी गाठली की यशाच्या शिखराकडे पाय रोवून पुढच्या पायऱ्या गाठण्यासाठी धेय्यशील असलंच पाहिजे हे ही तितकंच खरं. It’s not the shoes you wear, but the steps you take that matter ….. जसं जिन्याच्या शेवटच्या पायरीवर पहाण्यापेक्षा आपल्या पुढ्यात असलेल्या पायरीवर लक्ष ठेऊन पुढे पुढे चालत राहिलं पाहिजे.
इथे मला एक आठवण मुद्दाम नमूद करावीशी वाटते, सोळाव्या शतकातला रायगड किल्ला हिरोजी इंदूलकर यांनी बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, काय बक्षिशी देऊ हिरोजी तुला ? असं विचारताच मला गडाच्या पायरीवर स्थान द्या महाराज बाकी काही नको, असं हिरोजीनी सांगितलं.
त्या काळात गडावरच्या पायरीवर कोरलेलं हिरोजी इंदूलकर या मावळ्याचं नांव आजही सात आठशे वर्षानंतर दिमाखात पायरीवर विसावलेलं आहे.
अनेक क्षेत्रात यश पदरात पडून, माझ्या आयुष्यात मी यशस्वी कारखानदार झालो, रोटरी क्लबचा चार्टर प्रेसिडेन्ट झालो, इंडस्ट्रीज असोसिएशनचा सेक्रेटरी झालो, नामांकित शिक्षण संस्थेचा लोकल गव्हर्निंग बॉडी मेंबर झालो, अशा प्रगतीच्या अनेक पायऱ्या चढल्यावर अकस्मात पत्निवियोगाची दुःखद घटना घडली अन पाऊले तिथेच थबकली.
आनंद शोधण्याचा, वेळ व्यस्त करण्याचा काही मार्गच शिल्लक राहिला नाही, स्वत्व – आत्मबळ जणूं हरवलेला मी अशी अवघड परिस्थिती झाली….. परंतु स्वामीकृपेने मला हृदयस्थ सदगुरू भेटले त्यांनी लिखाण करण्याचा आशिर्वाद दिला अन मी कवी – लेखक झालो. त्यांच्या आशिर्वादाने व स्वामीकृपेने सहा पुस्तके प्रकाशित झाली. “मै हू ना” हे अगदी वास्तवात आलं. त्या काळात मला ठप्प झालेल्या पायरीवरून पुढे मार्गक्रमणा करण्यासाठी त्यांनी मला पुढच्या पायरीवर आणून ठेवलं…. मग माझ्या जीवनात पुन्हा राम दिसू लागला, जगण्यासाठी मार्ग सापडला.
असा कुणीतरी मनुष्यरूपी भगवंत ज्याला सापडला तो मग कधी पायरी चुकत नाही, ही प्रचिती मला लाभली. आयुष्यात संकटकाळी मला संकटातून बाहेर काढणारे मित्र लाभले तसेच मी ही माझ्यापरीने काही मित्रांना गंभीर प्रसंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. “आपण चांगले तर जग चांगले” या उक्ती प्रमाणे जगलो तर चांगलेच लोक पायऱ्या पायऱ्यांवर भेटत जातात अन आनंदमय जीवन पुढे पुढे सरकत जाते. इतरांचे चांगले चिंतले की आपलेही चांगलेच होत असते अन त्या प्रभूची कृपादृष्टि आपल्यावर पडते, चांगलं वागावं हीच आयुष्यातील पहिली योग्य पायरी असते, असं मला वाटतं.
— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती अलका भुजबळ. ☎️ 9869484800