Tuesday, July 23, 2024
Homeलेखपालकत्व : एक कला १३

पालकत्व : एक कला १३

आत्महत्या आणि बालकं

काल पासून माझी लेक खूप शांत होती. मी तिला जवळ घेऊन विचारलं, काही प्रोब्लेम आहे का बेटा ? तर ती माझ्या कुशीत शिरून रडायला लागली. मी तिला मोकळं रडू दिलं. नंतर ती म्हणाली, “मम्मा अनुष्काने सुसाईड केलं. आम्हाला आज कळलं पण आठ दिवस झालेत”. मला एक क्षण कळेचना काय बोलावं ! मी माझ्या लेकीला हृदयाशी घट्ट धरून तशीच थांबले काही वेळ.

अनुष्का म्हणजे माझ्या लेकीच्या वर्गात शिकणारी डॉक्टर आई वडिलांची लाडकी लेक. सदैव हसत राहणारी चुणचुणीत पोर. असं कसं घडलं असणार ? काय झालं असं की अनुष्का ला आपला जीव द्यावासा वाटला ? अनुष्काचे आई वडील दोघे ही डॉक्टर होते. अनुष्का अभ्यासात हुशारच होती.
पण ती कधी कधी स्ट्रेस मध्ये असायची असे माझी लेक सांगत असे. माझी लेक म्हणाली, ‘आम्ही सगळे तिला समजवायचो. मग ती नॉर्मल व्हायची. दहा दिवसापूर्वीच आम्ही खूप हसलो, व्हिडिओ कॉल वर बोललो, तिचा बर्थडे होता तेंव्हा. तिने मला खूप जोक्स सांगितले मला. त्यानंतर आम्ही बोललो नाही. ती स्कूलला पण आली नाही. आम्हाला वाटलं ती आजारी असणारं. पण ती असं काही करणार वाटलंच नाही”.

माझी लेक आणि इतर मुलांसाठी देखील हा खूप मोठा आघात होता. माझ्या लेकीला यातून बाहेर काढणं गरजेचं होतं. अभ्यास हा आपल्या पुढील जीवनाचा पाया निश्चित करणारी एक प्रक्रिया आहे. पण कुठलाही मानसिक ताण न घेता अभ्यास करत राहणं आणि एक एक पाऊल पुढे जाणं एवढंच करायचं. हेच मी माझ्या लेकीला कायम सांगत आले. लहान लहान गोल सेट करायचे. रोज एक टार्गेट ठेवायचं आणि ते पूर्ण करायचं बस. एवढंच मी माझ्या लेकीला सांगत असे. ती पण कधी कोणता ताण न घेता अभ्यास सोबत क्रिकेट, ड्रॉइंग, आणि कराटे मध्ये तर तिने ब्लॅक बेल्ट मिळवला होता. हे सगळं सहज ती करत असे. अभ्यासाचा अतिशय हट्ट कधी आम्ही धरला नव्हताच.

अनुष्काच्या आत्त्महत्येनंतर आम्ही सगळेच पालक थक्क झालोत. अनुष्काचे पालक देखील हसतमुख होते त्यांनी कधी अभ्यासाचा असा काही अट्टाहास केला असेल असं वाटत नव्हते. कारण अनुष्का खूप प्रामाणिक आणि अभ्यासू होती. ती कधीच कोणत्याच इतर स्पर्धा, खेळ यात भाग घेत नसे. शाळा सुटली की तिला घरी जाण्याची घाई असायची. क्लास मध्ये पण ती एखादं उत्तर चुकलं की खूप स्ट्रेस घ्यायची असं माझी लेक सांगत असे. कोणतीही आवड अनुष्काने जपली नव्हती. त्यामुळे आतल्या आत तिची घुसमट होत असावी. हा ताण मोकळा करण्यासाठी स्वस्थ असा मार्ग अनुष्का कडे नव्हता कदाचित. शाळेतील इतर पालकांशी चर्चा झाली तेंव्हा देखील अनुष्काच्या पालकांनी कधीही तिला अभ्यासाचं ओझं वाटावं अशी वागणूक दिली नसल्याचं कळलं. मग अनुष्का स्वतःच ते ओझं वाहत असावी.

कधी कधी सकारात्मक परिश्रम करणं आवश्यक असतं कारण त्यामुळे आपलं लक्ष गाठण्यास मदत होऊ शकते. पण त्या दबावाखाली राहून मानसिक स्वाथ्य गमावून एक अजाण भीतीच्या सावलीत जगणं धोक्याचे आहे.

एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा आत्महत्येच्या वेगवेगळ्या प्रकारची कल्पना करणं याला मानसोपचारतज्ज्ञ ‘सुसाइड आयडिएशन’ म्हणतात.

मनोविकारतज्ज्ञ डॉ. अंबरीश धर्माधिकारी सांगतात, “आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो. मेंदूतील बायो-न्यूरॉलॉजीकल बदलामुळे लोकांना जीवन व्यर्थ वाटू लागतं. त्यामुळे, आत्महत्येचे विचार येतात. आत्महत्येच्या नव्वद टक्के प्रकरणात मानसिक आजार प्रमुख कारण आहे. डिप्रेशन किंवा नैराश्यात असलेले लोक जगाकडे नेहमीच नकारात्मकतेने बघतात .त्यांना सतत कोणती तरी भीती वाटत असते. या अजाण भीतीमुळे ते अस्वस्थ असतात आणि कोणत्याही कामात आपलं शंभर टक्के योगदान देऊ शकत नाही. त्यांच्या बोलण्यातून अशी भीती किंवा आत्महत्येचे विचार व्यक्त होताना दिसतात. ही धोक्याची घंटा मानायला हवी.

भारतात २०१७ ते २०१९ या कालावधीत १४ ते १८ वर्षे वयोगटातील २४,५६८ मुलांनी आत्महत्या केल्याचे ‘राष्ट्रीय अपराध अहवाल ब्युरो’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. यापैकी १३,३२५ मुली आहेत. याचाच अर्थ, आत्महत्येमध्ये मुलींचे प्रमाण ५४ टक्के, तर मुलग्यांचे प्रमाण ४६ टक्के आहे. २०१७ या वर्षात ८०२९, २०१८मध्ये ८१६२, तर २०१९मध्ये ८३७७ मुलांनी आत्महत्या केल्याचे अहवालात नमूद आहे. २०१७ या वर्षातील एकूण आत्महत्येच्या संख्येत, २०१९ मध्ये ३४८ इतकी वाढ झाल्याचे दिसते. म्हणजेच, दर रोज साधारण २२ मुले आत्महत्या करतात. हा आकडा नक्कीच चिंताजनक आहे. मध्य प्रदेश (३११५), पश्चिम बंगाल (२८०२), महाराष्ट्र (२५५७) आणि तमिळनाडू (२०३५) ही आत्महत्येच्या संख्येत पहिली चार राज्ये आहेत. याचा अर्थ, महाराष्ट्रात दररोज दोन मुले आत्महत्या करतात. परीक्षेत नापास झाल्यामुळे ४०४६, विवाहसंबंधी कारणांमुळे ६३९, प्रेमसंबंधातील कारणांमुळे ३३१५, आजारपणामुळे २५६७, तर शारीरिक अत्याचारांमुळे ८१ मुलांनी आत्महत्या केली आहे.

बालकांनी आत्महत्येस प्रवृत्त होणं ही अत्यंत चिंतेची बाब आहे. बालक सुरक्षित असणं ही सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे.पण आज आधुनिक युगात तंत्रज्ञान जितकं सुलभ होत चाललेय तितकेच ते घातक देखील होत आहे. सायबर गुन्हे आणि त्यातून बालकांचा होणारा छळ यातून त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बाल मन भीतीने जास्त विचलित होते आणि अश्या वेळी योग्य मानसिक आधार आणि सुरक्षेची शाश्वती बालकास मिळाली नाही तर ते बालक, या समस्येतून बाहेर पडण्यास आता कोणताही मार्ग शिल्लक नाही असा विचार करून व्याकूळ होऊन आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते.

बालकामध्ये लहाणपणी एखादी नकारात्मक, वाईट, भीतीदायक, मानसिक, भावनिक स्थितीवर घाव करणारी घटना मोठे झाल्यावर देखील तशीच राहते आणि बालपणी झालेला हा आघात कौमार्य अवस्थेपर्यंत मनात लपवून बालक वर वर आनंदी असल्याचं दाखवत असतं.
पण परत तशी एखादी जरी घटना घडली त्याची तीव्रता ही तेवढी नसली तरीही बालपणीच्या वाईट अनुभवही आत्महत्येचे कारण बनतो.

“बालपणीचा नाजुक घाव
व्यापून असतो मोठा कोपरा
उदास वणवा पेटत राहतो
आवरण ओढून हसरा चेहरा”
म्हणून वेळीच बालकांचा मनाचा कोपरा मोकळा होणं आवश्यक आहे.

बालकांच्या आत्महत्येच्या कारणांचा विचार करता त्यातच त्यावरच्या उपाय योजना शोधण्याची संधी आपल्याला मिळू शकते. अर्थात आत्महत्या करण्याची वेळ बालकावर न येऊ देणं याची काळजी घेणं हा उपाय आपल्या हातात आहेच. बालकांना सुरक्षित वाटणं हे खूप महत्त्वाचं असतं.
आपल्याकडून एखादी चूक झाली, अपयश आलं, कोणी बालकास भीती दाखवली, धमकावले, चुकीचे कृत्य करण्यास भाग पाडले अश्या परिस्थितीत बालकावर विश्वास ठेवणं आणि कायम आम्ही तूझ्या सोबत आहोत, जी समस्या येईल, संकट येईल त्याचा सामना आपण मिळून करू ही शाश्वती बालकास पालक, शिक्षक यांच्या कडून मिळणं आवश्यक आहे. बालक मोकळे पणाने व्यक्त होऊ शकेल असं वातावरण कुटुंबात, शाळेत निर्माण करणं ही संयुक्त जवाबदारी आहे.

काही कुटुंबात बालकांना अती संरक्षण दिलं जातं ज्यामुळे बालकांचे स्वतःचे असे विचार, तत्व आणि विशिष्ट परिस्थितीत मार्ग काढण्याची स्वतःची अशी पद्धत योग्य तो आकार घेण्याची संधी बालकास मिळत नाही. त्यामुळे बालक एका भीतीच्या सावलीत वावरत राहते. तर काही कुटुंबात बालकाची सुरक्षा याचा विचारच नसतो. दोन्ही स्थिती बालकांसाठी घातक आहे.

बालकांना व्यक्त होण्यास संधी उपलब्ध करून देणं हे देखील एक कौशल्य आहे त्यासाठी वेगवेगळ्या थेरपी वापरल्या जाऊ शकतात. कलर थेरपी एक प्रभावी माध्यम होऊ शकतं. बालक हे चित्र आणि रंग यातून व्यक्त होत असतं. बालकांना चित्र काढण्याची, रंग भरण्याची सवय लावावी. रंगाचा अर्थ व भाषा तज्ञा कडून समजून घ्यावी.

बालकांचं शिक्षण नीट होऊ शकेल यासाठी आपण त्यांना प्रवृत्त करावं. ती लहानश्या वयात खूप नकारात्मक परिस्थितीतून गेली असल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्यांना वेगवेगळ्या activities मध्ये सहभागी करून घ्यावे. चित्रकला खूप सुंदर माध्यम आहे व्यक्त होण्यासाठी. मनातील भावना चित्त्राद्वारे वाचल्या जाऊ शकतात आणि त्यावर काम करणं सोपं होतं.

सगळ्याच बालकांना व्यक्त होण्यासाठी चित्रकला हे एक प्रभावी माध्यम आहे. ही संधी सगळ्याच बालकांना उपलब्ध करून द्यावी.
Colour Therapy uses colour to balance the body’s Chakras by using the seven colours of the light spectrum. colour balances life and healing Colour Therapy targets to balance and enhance our body’s energy centres/chakras, which can help to stimulate our body’s own healing process it can helpful for our children.

काही बालकं बोलत नाहीत जास्त. अश्या बालकांना रोज डायरी लिहिण्याची सवय लावावी आणि आज लिहिलेलं उद्या वाचायची सवय लावावी. अर्थात आज ची जी परिस्थिती होती ती उद्या बदललेली असते. आजची उदासीनता काही उपाय केल्यानंतर उद्या कमी झालेली असते. आज वाटणारी नकारात्मकता यावर कोणाशी बोलून काही उत्तर शोधून उद्या सकारात्मकता निर्माण झालेली असते. या गोष्टी बालकांच्या लक्षात आणून देताना अतिशय विश्वासाने त्याचं हे डायरी विश्व आपल्याला हाताळायला हवं. पुढे पुढे जास्तीत जास्ती सकारात्मक गोष्टी लिहिण्यास बालकास प्रवृत्त करावं. प्रश्न, समस्या लिहून सोडून न देता त्यावर मार्ग, उपाय उत्तर शोधताना काय गवसते ते ही लिहिण्याची सवय बालकास लावावी. त्या दिशेने त्याच्या विचारांची वाटचाल जितकी सक्षम होत जाणार तितकाच त्याच्या कृती मध्ये आत्मविश्वास वाढत जाणार.

मैत्री, प्रेम, आकर्षण या बाबत मोकळे पणाने चर्चा करून हार्मोन्स मध्ये होत असलेला बदल याबत समजावणं तसेच Serotonin, dopamine याचे आपल्या शरीरात होणारे स्त्रवन आपल्याला आनंद देतात म्हणून याची संपूर्ण माहिती, कारणे आणि परिणाम याची चर्चा करून आनंदी राहण्यासाठी बाहेरील चुकीच्या आमिषाला बळी न पडता स्वतःच्या गुणांचा शोध घेणं, त्यांना अधिक अधिक चमक देऊन त्यात रमण आणि त्यातून मिळणारा आनंद घेणं त्याची सवय करत जाणं या कला बाल वयापासून बालकांना अवगत करत गेलं तर ते बाहेरील गोष्टीवर फार अवलंबून राहणार नाही आणि, त्याला बळी देखील पडणार नाही. स्वतःचे शारीरिक, मानसिक, भावनिक स्वास्थ्य याची ते काळजी घेतील आणि वास्तवाच्या जवळ पास असणं आणि सकारात्मकतेने ते स्वीकारणं हे बालकांना अवघड जाणार नाही. त्याच बरोबर उच्चांक गाठणाऱ्या भावनिक व शारिरीक गरजा आणि त्या गरजांना धीराच वळण लावण्याचं कौशल्य यावर चर्चा आणि समुपदेशन याची नितांत गरज असते.

असे अनेक प्रभावी उपाय निश्चितच आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बालकाशी आपला संवाद आणि सुसंवाद असणं गरजेचं आहे. बालकांना ऐकून घेणं, समजून घेणं आणि तुम्ही कायम त्याच्या सोबत आहात ही जाणीव त्याच्या मनात निर्माण करून ती जपत राहणं आवश्यक आहे.

“भरून आलेल्या इवल्याश्या आभाळास
देऊ बरसण्याची मोकळीक
बालभावनांचे निरागस
मोती भरून घेऊ ओंजळीत”
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. बालकांना समजून घेणे आणि त्यांना समजून, उमजून घेतल्यावर त्यांना पटेल अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगणे, समुपदेशन करणे, ह्या दोन्ही गोष्टी “पालकत्व …. एक कला ” ह्यामध्ये अंतर्भूत होतात . ह्या विषयातील तज्ञ डाॅ. राणी खेडकर ह्यांचा लेख अतिशय उत्तम, प्रभावी आहे. त्यांचे मार्गदर्शन पालकांनाही उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो. मनःपूर्वक अभिनंदन.

  2. प्रतेक पालकांनी, मुलानी वाचावा..समजून घेऊन संवाद वाढवावा असा लेख 👌👌👌🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः