Thursday, December 5, 2024
Homeलेखपालकत्व : एक कला - २३

पालकत्व : एक कला – २३

“हट्ट आणि बालक”

“मला जेवायचं नाहीय. अभ्यास पण करायचा नाहीय. “सात वर्षाची पलाक्षी रुसून बसली होती. ऑनलाईन शाळा झाल्यानंतर सकाळ पासून ती नाराज होती. कोणाशी बोलत नव्हती. आई, बाबा, आजी सगळे तिची समजूत काढत होते. पण पलाक्षी बोलत नव्हती.
अश्या घटना आपल्याला अगदी सहज बघायला, ऐकायका मिळतात. आपण त्या तितक्याच सहजतेने घेतो. मुलांची समजूत पण काढतो. कधी तर त्या मागच्या कारणाची माहिती घेणं किंव्हा त्या बाबत विचार करणं हे देखील टाळलं जातं. थोडक्यात काय तर बाल्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आपण सहज वगळून पुढे निघून जातो.

पण याच लहान लहान प्रसंगातून बाल मन समजून त्याच्या नाजूक धाग्याचा गुंता वेळीच सोडवायला हवा. पुढे पलाक्षी ने खूप दिवस गृहपाठ केला नाही. ऑनलाईन शाळेत देखील तिचं लक्ष नव्हतंच. ती कोणाशी बोलेनाशी झाली. ती खूप छान चित्र काढत असे पण आता ते ही तिने बंद केलं. असं काय घडलं असेल त्या दिवशी ? कुठल्या गोष्टीने पलाक्षीच्या सगळ्या activities वर नकारात्मक ताबा घेतला होता ? याचा शोध घेतला तेव्हा कळलं त्या दिवशी तिच्या वर्ग शिक्षिकेने पलाक्षी ला कमी मार्क्स मिळाले म्हणून क्लास मध्ये नीट लक्ष देण्यास सांगितलं. पलाक्षी ला नेहेमीच खूप छान मार्क्स मिळत. त्यामुळे सगळीकडे सतत तिचं कौतुक होत असे. The child may habitual of getting success every time.
या कारणामुळे ती थोडे कमी मार्क्स मिळाले म्हणून नाराज झाली. हळूहळू हा स्वभाव मुळाशी बसत जातो आणि थोड्याशा अपयशाने मुलं खचू लागतात. राग राग करू लागतात. पुढे स्पर्धेला घाबरु लागतात. नंतर नंतर डिप्रेशन ची लक्षणे दिसू लागतात. मुलांचा आत्मविश्वास कमी होत जातो आणि अगदी लहान वाटणाऱ्या कारणा कडे दुर्लक्ष केल्या मुळे स्वतःला कमी समजणे, आत्मविश्वास गमावणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून जातो.

काल फोनवर एका आईशी बोलणं झालं. आपल्या दहा वर्षाच्या मुलाला कुठल्यातरी स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी मी त्याचं समुपदेशन करावं असं त्यांना वाटत होतं. ते मुलं त्यात भाग घेण्यास तयार नव्हतं ही गोष्ट त्या आईचा मनस्ताप वाढवत होती. तो खूप हुशार आहे आणि तो सहज ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकेल असं त्या सांगत होत्या. पण तरी त्यासाठी तो तयार नाहीय, अशी त्यांची तक्रार होती. मी त्या मुलाशी फोनवर बोलले. सुरुवातीला तो माझ्याशी बोलायला फारसा तयार नव्हता. पण मी त्याच्या आईने सांगितलेला कुठलाच विषय त्याच्याशी बोलले नाही. अशाच गप्पा केल्या. त्याला गणित अजिबात आवडत नव्हतं. बोलता बोलता त्याने गणित या विषया बद्दल नाराजी व्यक्त केली आणि विमान त्याला खूप आवडतात असं म्हणाला. त्याला विमान कसं बनवतात, त्या तांत्रिक गोष्टी बाबत जाणून घ्यायचं होतं आणि आईला त्याला कोणत्यातरी गणिताच्या परीक्षेत बसवण्याची इच्छा होती.
मुलांची आवड आणि ते कशात रमतात ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सतत त्या विरुद्ध आपण आग्रह धरला तर त्यांना त्यांची स्वतःची विचार करण्याची, स्वतःला समजून घेण्याची तसेच स्वतःचे दोष आणि गुण ओळखण्याची प्रक्रिया खुंटु लागते.

आजच्या स्पर्धा युगात आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत सामील आहोत. पालक, पाल्य आणि समाज याची घडी बसवताना स्पर्धा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरतोय.आपली ओळख निर्माण करणं, त्यासाठी धडपड करणं आणि नंतर निर्माण झालेली ओळख टिकवून ठेवण्यासाठी सतत कोणाशी तरी स्पर्धा करत राहणं, या चक्रात आपण सगळेच अडकलोय आणि याचंच बाळकडू आपण आपल्या मुलांना देखील पाजतोय.
स्पर्धा म्हणजे नेमकं काय ? ती कोणाशी असावी आणि कशासाठी असावी ? हे मूळ प्रश्न आधी सोडवायला हवेत. स्पर्धा म्हणजे, “एक अशी सकारात्मक दौड असावी जी एखाद्या व्यक्तीस त्याच्या गुण कौशल्याच्या आधारावर योग्य ठिकाणी त्याची नेमणूक करून त्याचं व्यक्तिमत्त्व आणखी आणखी फुलवत जाईल”. अशी स्पर्धा ही सकारात्मक वेग देणारी असते.
आजची पिढी ही प्रत्येक क्षणाला एक नवीन स्पर्धेचा सामना करत आहेत. प्रत्येक बालक अगदी बाल्यावस्थे पासून अजाणतेपणी कोणत्यातरी स्पर्धेत ढकलल्या जातो. आपण कोणत्या दिशेने आणि कशासाठी धवतोय हेच त्यांना कळलेलं नसतं. त्यासाठी बालमनाला अनेक घडामोडीतून प्रवास करावा लागतो. या प्रवासात बाल मनावर अनेक उथळ खोल रेषा आखल्या जातात. कधी त्याचे व्रण कायमचे त्याच्या व्यक्तिमत्वाला जोडले जातात.

स्पर्धेच्या मंथन प्रक्रियेतून बाहेर पडणार अमृत आणि विषाचे प्रमाण आपण निश्चित करू शकत नाही आणि त्यावर आपलं नियंत्रण देखील नाही. अमृता ची गोडी चाखण याची तालीम कुटुंबातून, समाजातून दिली जातेच पण अपयशाचे विष कसं पचवायचे इथे मात्र सगळेच कमी पडतात आणि असे अनेक अपयशाचे विष प्याले घेऊन हे बालक परत परत स्पर्धेत सामील होत जातात.
अगदी बाल्याव्यवस्थेच्या प्राथमिक अवस्थेपासून आपण पालक म्हणून मुलांना अपयश कसं मॅनेज करायचं याची सवय आणि कौशल्य शिकवत जाणं खूप गरजेचं आहे. सकारात्मक गोष्टी त्यांनी आत्मसात करत जाणं तितकच महत्त्वाचं आहे.पण हे केवळ सांगून होणार नाही. तसं सांगण्याची गरजच नसते. ते आपल्या कृतीतून त्यांच्यापर्यंत पोहचायला हवं.कुटुंबात एखादे संकट किंव्हा समस्या निर्माण झाली तर मुलांना त्यापासून अनभिज्ञ ठेवणं किंव्हा त्याचा दुष्परिणाम मुलांवर होऊ देणं या दोन्ही गोष्टी घातक सिद्ध होतात.त्या समस्येशी त्यांना सकारात्मक रित्या जोडून आपण त्या विशिष्ट परिस्थितीत आपण कसे वागतो, काय निर्णय घेतो याची जाणीव देत मुलांना त्याचा सराव करून देणं त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचं व्यवस्थापन आपल्या कृतीतून शिकवणं खरं जीवन शिक्षण ठरतं.

मुलासाठी कायम आपण एप्रोचेबल असायला हवं. खूपदा त्यांना काहीतरी सांगायचं असतं, बोलायचं असतं पण आपण त्यांना तत्वज्ञानाचे डोस देण्यात व्यस्त असतो. त्यांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी देऊन आधी त्यांच्या मनात सुरू असलेला कल्लोळ समजून घेऊन नंतर प्रत्यक्ष सत्य असणाऱ्या गोष्टी समजावून सांगणं आणि तसे निर्णय घेऊन आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रवृत्त करणं महत्त्वाचं असतं.
बाल्याव्यवस्थेतून कौमार्य अवस्थेत प्रवेश करताना तर मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि आता तर मुलांना इंटरनेट वापरायला देणं याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीय. तरी मुलांच्या नकळत ते इंटरनेटच्या माध्यमातून कुठल्या विश्वात वावरत आहेत याचा अंदाज घेत राहणं आवश्यक आहे. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याशी अगदी सामान्य तसेच जे विषय आपण त्यांच्याशी बोलणं टाळतो ते विषय काढून त्यावर मुलांचे काय विचार आहेत हे जाणून घेऊन त्यावर पुढे चर्चा करत जाणं हे आता शक्य आहे. जे आपल्याला त्यांना सांगायचं आहे ते गोष्टीच्या माध्यमातून आणि आपल्या स्वतच्या लहान लहान अनुभवातून सांगू शकतो.

विविध परिस्थितीत बालकाकडून घडू शकणाऱ्या वर्तनाची तत्त्वे आणि त्यांवर आधारित पूर्वकथन हा बाल मानसशास्त्राचा महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये बालकाकडून कोणत्या परिस्थितीत काय घडू शकते याचा पूर्व अनुमान अभ्यासाच्या आधारावर लावला जातो.
आपण आपल्या मुलांसोबत असणं ही त्यांच्यासाठी आनंदाची बाब ठरायला हवी. आपल्याकडे उत्तर मिळणार याची शाश्वती असण्यापेक्षा आपल्या पालकासमोर आपण आपला प्रश्न मांडू शकतो हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होणं महत्वाचं आहे. त्यांच्या नाजूक वयाला आणि कोवळ्या बोटाला आपल्या सक्षम हाताची साथ हवी असते.
“तळ्यात मळ्यात’ या मनस्थितीत असणारं बालपण सशक्त वातावरणात फुलावं हा त्यांचा हक्क आहे आणि म्हणून पालक, शिक्षक, समाज यांनी मिळून हाताची गुंफण करून अश्या सुंदर सुरक्षित वातावरणाची निर्मिती करणं आजच्या काळाची गरज आहे.
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
अध्यक्षा, बाल कल्याण समिती, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !