भाग – 10 : बालकांचे आरोग्य
बालकांच्या वयाची पहिली आठ वर्षे त्यांच्या शारिरीक, मानसिक आणि भावनिक वाढीसाठीअतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली तीन वर्षे. भावी काळातील बालकांचे आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये बालकांचा शिकण्याचा आणि गोष्टी आत्मसात करण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात व विभिन्न क्षेत्रात उत्तम प्रगती करतात.
बालकांच्या जन्माची कायदेशीररीत्या नोंदणी होणे, आरोग्य संगोपन, पोषक आहार, शिक्षण मिळणं आणि छळ आणि भेदभावापासून त्याचं संरक्षण होणं हे सर्व बालकांचे अधिकार आहेत. ह्या अधिकारांचे आदरपूर्वक पालन, संरक्षण केले जात आहे हे पाहणे पालक आणि शासनाचे प्रथम कर्तव्य आहे.
बालकांच्या भावनिक, मानसिक गरजा कोणत्या आहेत ते समजून घेऊन त्याची पूर्तता कोणत्या प्रकारे होत आहे याची जाणीव असणं हे पालक,शिक्षक आणि बालकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जवाबदारी आहे.
स्पर्श ही प्रत्येक बालकाची पहिली भावनिक गरज आहे कारण त्यातून मिळणारी ऊब ही बालकाच्या सुदृढ वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे.स्पर्श ही भावनिक गरज आहे आणि ती शारीरिक स्पर्शाने पूर्ण होते.हा विषय जितका सहज वाटतो तितकाच तो किचकट आणि गंभीर आहे.स्पर्शासाठी बालक आसुसलेले असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं हे सुरेख माध्यम असतं.वयाच्या आठ वर्षापर्यंत बालक काही विशिष्ट स्पर्षाशी समरस होतात. उदा.आई,वडील,शिक्षक,नातेवाईक आणि वारंवार त्यांच्या संपर्कात येणारे व्यक्ती.
हे विशेष स्पर्श बालकाची भावनिक गरज पूर्ण करत असतात. आईच्या उबदार,प्रेमळ आणि सुरक्षित स्पर्शाने बाळ भावनिक दृष्ट्या स्वस्थ असतं.भावनिक, मानसिक खाद्य व्यवस्थित मिळालं की बालकांच्या वाढीस वेग मिळतो.
बालकाच्या मनात सुरक्षेची भावना असणं खूप महत्त्वाचं असतं. एकदा का त्यांना असुरक्षित वाटू लागलं तर ते अजाणपणे भरकटत जातात. त्यावेळी बालकांच्या संपर्कात ज्या प्रकारच्या व्यक्ती येतात बालक त्यांच्यावर विश्वास ठेऊ लागते आणि जर ही व्यक्ती गुन्हेगारी, फसवणूक या प्रवृत्ती ची असेल तर बालक विघटित कृत्यात गुंतत जाते.
आपल्या बालकांना मायेचा स्पर्श देणं, ते सुरक्षित आहेत ही भावना वारंवार त्यांच्यात रुजवत राहणं आणि या गोष्टी सातत्याने करत जाणं खूप आवश्यक आहे.स्पर्शाची गरज ही भावनिक आहे त्यातून होणारा उबेचा संचार बालकांच्या मनात त्या व्यक्ती विषयी ओढ निर्माण करत जाते.
आई वडिलांनी सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याची ओळख बालकांना देत जावी. एकदा सांगून हे होत नाही. त्यांना वारंवार हे सांगावं लागतं.बालकांना मानसिक दृष्ट्या सक्षम करावं लागतं जेणे करून ते त्यांच्या भावनिक गरजांच्या आहारी न जाता या गरजेला योग्य वळण लावू शकतील.
भावनिक गरज कुटुंबात पूर्ण झाली नाही तर बालक त्या गरजेची भरपाई करण्यासाठी बाहेर पर्याय शोधू लागतात आणि याच काळात बालकांची सुरक्षा धोक्यात येते आणि बालक मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होते. या काळात जी व्यक्ती त्याच्या संपर्कात येईल त्याच्या द्वारे शारीरिक स्पर्शातून ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.आमच्या परिचयातील एका कुटुंबातील एक नऊ, दहा वर्षाची बालिका आम्ही कोणीही मैत्रिणी तिला भेटलो की ती प्रेमाने मिठीत यायची. मग पूर्ण वेळ ती आमचा स्पर्श शोधायची, हात धरून ठेवायची .नंतर माझ्या लक्षात आलं की,तिची आई फार शिस्तप्रिय होती. तिला सारखं जवळ जवळ केलेलं आवडायचं नाही. आणि मी तिला कधी फारसं मुलीला जवळ घेताना बघितलं नाही. घरी फक्त आई वडील आणि ती बालिका असे तिघेच असायचे. तसेच कामासाठी आई वडील पूर्ण वेळ बाहेर असायचे. मग ती ही गरज कशी पूर्ण करणार? अश्यावेळी तिचा कोणीही गैरफायदा घेऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही बाब पालकांना तितकीशी गंभीर वाटत नाही.आपल्या पाल्यांना दिवसभरातून तुम्ही किती वेळा जवळ घेता ?असा प्रश्न विचारल्यास त्यांच्या लक्षात येतं की व्यस्त असल्या कारणाने या गोष्टीकडे त्यांचं फारसं लक्षच गेलं नाही.आणि मग हळूहळू त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतात.
आई ही व्यक्ती अशी असते की, बालकांना सुरक्षित आणि मायेच्या स्पर्शाची ओळख देते. पण मुलं जशजशी मोठी होऊ लागतात, शारीरिकरित्या ती थोडी दुरावत जातात.पण आईने, वडिलांनी कुटुंबातील विश्वासाच्या व्यक्तींनी जाणीवपूर्वक बालकांच्या या गरजेला योग्य ते वळण लावत जाणं , त्याचे पैलू उलगडून सांगत जाणं महत्त्वाचं आहे. बालक जे प्रश्न विचारते त्या प्रश्नांना कधीही दुर्लक्षित करता कामा नये .त्या प्रश्नातून ते व्यक्त होत असतात आणि त्यांच्या पर्यंत आपण योग्य ती माहिती पोहोचवावी अशी संधी ते आपल्याला देत असतात याची जाणीव असावी.
दररोज बालकांना ते कोणाच्या संपर्कात आले आणि त्यांच्या विषयी बालकांच्या मनात काय भावना निर्माण झाल्या या बाबत त्यांच्या कलेने माहिती घ्यायला हवी. बालकांनी आपल्या कडे त्यांच्या मनात येईल ते बोलू शकण्याची मुभा आणि तशी वातावरण निर्मिती सतत आपल्याला करावी लागते.सगळ्यात महत्त्वाचं बालकांवर आपला पूर्ण विश्वास आहे या जाणिवेचे बीज त्यांच्यात प्रामुख्याने रुजवावे लागते आणि ते बीज कुजणार नाही, तसेच कालांतराने ते बहरत जाईल याची काळजी घ्यावी लागते. असं करत असतानाच बालकांच्या हालचालीवर बारीक लक्ष असणं ही कला देखील जोपासावी लागतेच.
पालक आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक, जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतात यात शंकाच नाही. पण त्यांचं भावनिक आणि मानसिक आरोग्य तितकच महत्त्वाचं आहे याकडे दुर्लक्ष झालं तर त्याचे फार गंभीर परिणाम होत असताना आपल्याला दिसतात.
बालकांचे मानसिक आणि भावनिक आरोग्याचे पोषक तत्व म्हणजे प्रेमाचा स्पर्श, मायेची ऊब, सुरक्षिततेची भावना आणि परस्पर विश्वासाची जाणीव यात सामावलेलं आहे. बालकांना हे खाद्य कमी पडता कामा नये. त्यांच्यात एकाकीपणाची भावना निर्माण होता कामा नये. मग पालकत्व : एक कला बघा कशी रंग, सुगंध लेवून बहरतील ही नाजूक फुले.
बाल मनाचा खाऊ निराळा त्याला हवा स्पर्श, जिव्हाळा सुगंधा परी तो दरवळावा सुरक्षित श्वास त्यास मिळावा.
क्रमशः
— लेखन : डॉ राणी खेडीकर
अध्यक्षा बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800