भाग – 11 : भग्न कुटुंब आणि बालक
तथाकथित व्यक्ति स्वातंत्र्यामुळे व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी विविध प्रकारचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. आपल्या आवडीचे मार्ग निवडण्याचे त्या अनुषंगाने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. एखादी परिस्थिती त्रासदायक वाटत असल्यास त्यातून स्वतः ला मुक्त करण्याचं पूर्ण स्वातत्र्य व्यक्तीला आहेच.
असे स्वातंत्र्य आजच्या स्वतंत्र व सुसंस्कृत लोकशाही समाजाचे अधिष्ठान आहे हे खरे आहे.प्रत्येकाला स्वातंत्र्य असतंच. ते कशापासून तरी आणि कशासाठी तरी असतं.
तरी एक खुली चर्चा म्हणून असा प्रश्न आज आपल्या समोर अनेक प्रसंग, घटना बघता निर्माण करतो तो म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार का ? हा प्रश्न थोडा वेळ इथेच ठेऊन आपण कुटुंब संस्थेकडे वळु या.कुटुंब संस्था म्हणजे व्यक्ती घडवण्याची एक सक्षम यंत्रणा आहे.व्यक्तीच्या भावनिक, मानसीक, शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंब संस्था महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. व्यक्तीची ओळख त्याच्या कुटुंब संस्थेतून समाजापर्यंत पोहोचते. प्रेम, आधार, विश्वास आणि जिव्हाळ्याचा भक्कम पाया घेऊन एक ‘कुटूंब’ निर्माण होतं आणि त्या कुटुंबात सामील प्रत्येक व्यक्तीला हे कुटूंब संपूर्ण करत असतं. बाल्यावस्था स्वस्थ, सुदृढ, संस्कारांनी समृध्द होण्यास कुटुंबव्यवस्था आपला महत्त्वाचा वाटा उचलत असतं.
आज समाजाचं एकूण चित्र बघता व्यक्ती स्वातंत्र्य आणि कुटुंब व्यवस्था यांचं सर्व स्तरावर द्वंद सुरू असल्याचं प्रकर्षाने जाणवतं. भग्न कुटुंबाचं प्रमाण वाढत जाणं ही अत्यंत गंभीर बाब आहे यात दुमत नसावं. ज्या कुटुंबात बालकांना भावनिक, मानसीक गरजेसाठी शुद्ध आरोग्यदायी परिपूर्ण खाद्य मिळत नाही अश्या बालकाकडून ज्या गंभीर चुका होताना दिसत आहेत त्याचे अतिशय विकृत पडसाद बाल्यावस्थेवर पडत आहेत.
बाल कल्याण समिती म्हणून आमच्या समोर अजाणतेपणी बालकाकडून झालेल्या चुकांचा जो आविष्कार येतो तो बघून थक्क व्हायला होतं.
बालक जेव्हां आपल्या कुटुंबात स्वतः ला असुरक्षित समजू लागतं त्यावेळी अनेक प्रकारच्या विघातक प्रवृत्तीची मोठया सराईत टोळया या बालकांच्या मागावर असतात.आणि त्यांच्या अस्थिर भावनिक स्थितीचा गैरफायदा घेतात. कुटुंबात कधी एकच पालक असतं कधी आई किंवा वडील यांचे विवाह बाह्य संबंध असतात, कधी आई वडील आणि कुटुंबातील इतर व्यक्तीचे वाद, भांडण, मारहाण हे प्रकार घडत असतात. अश्या भग्न, विखुरलेल्या कुटुंबातून बालकांना नैतिक मूल्यांची ओळखच होत नाही. अश्या परिस्थितीत ते समोर येईल तो मार्ग स्वीकारत जातात. काही कुटुंबात बालक परिस्थिती, व्यक्ती यांच्या वाईट कृत्याला बळी पडतात.
काही दिवसांपूर्वी सात महिने गर्भावस्थेत असलेली एक बारा वर्षाची बालिका आमच्या समिती पुढे आली. इतकी निरागस, घाबरलेली, आपल्या सोबत काय घडलंय, घडतंय या पेचात अडकलेली ही बालिका समोर असताना मी तिच्या वयाचा अंदाज घेत होते. कधी ती बाल्यावस्थेतून कौमार्य अवस्थेत गेली असेल आणि हे सगळं घडलं असेल. गेल्या एक वर्षात तिच्या सोबत तिच्या आईच्या मित्राने हे किळसवाणे कृत्य अनेकदा केलं. बालिकेला त्या माणसाने तिच्या आईला मारून टाकण्याची धमकी देऊन, तिच्या वडिलांना तिच्या आईबाबत सांगण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केले. ते लेकरू घाबरून हे सगळं सहन करत होतं याची काहीच कल्पना तिच्या आईला नसावी ? असा प्रश्न मुळाशी होताच. घरी आई वडिलांची होणारी भांडणं बघून आणि आपले आई वडील वेगळे होतील या भीतीने ती काहीच बोलली नाही. आपलं पोट असं मोठं का होत आहे हे देखील बालिकेला कळलं नाही असं तिने सांगितलं तेव्हां डोकं सुन्न झालं. काय भयानक, किळसवाण्या प्रसंगाना सामोरे जावं लागलं असेल त्या लेकराला. भातुकली, बाहुली ,पळापळीचे खेळ खेळण्याच्या वयात बाल्यावस्था संपल्याची की न संपल्याची चाहूल तिला लागली ती अशी ? तिच्या छोट्या छोट्या पायावर सूज होती. ती एक सारखी रडत होती. आई वडिला कडे बघत होती. तिला अजिबात घाबरायचं नाही आणि सगळं ठीक होईल असं सांगताना जीव हळहळला होता.
सुरुवातीच्या चर्चेत एक प्रश्न आपण तिथेच सोडला होता तो म्हणजे, व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार आहे का ? या बालिकेच्या आईला स्वत:च्या ज्या काही गरजा असतील त्या पूर्ण करण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य होतं पण हे जे काही घडलं ते म्हणजे, आई आणि लेक दोघींची वेगवेगळ्या पातळीवर झालेली फसवणूक आहे. यासाठी मुळाशी कोणतं कारण असू शकेल ? हा विषय खूप महत्त्वाचा आहे. पती पत्नी या भूमिकेतून, नात्यातून बाहेर पडणं पती पत्नी च्या अधिकारात असू शकेल. परंतु आई वडील या भूमिकेतून, जबाबदारीतून बाहेर पडताना आपल्या निरागस लेकरांसाठी विचार करणं आपल्या कुटुंब संस्थेसाठी विचार करणं ही बाब महत्त्वाची नाहीय का ?
या प्रश्नाच्या मुळाशी अनेक समस्यांचे बीज आहे.कौटुंबिक कलह विकोपाला जाऊ न देणं ही कला पती पत्नी म्हणून नाही तर आई वडील म्हणून अवगत असणं अत्यावश्यक आहे. विखुरलेलं भग्न कुटुंब बालकांना नैतिक मूल्यापासून लांब नेत असते.त्यांचं नाजूक भावविश्व होरपळून टाकत असते. त्या बालिकेचं बालपण कटू आठवणींच्या ओझ्याखाली मृत झालं असावं आणि कौमार्य अवस्थेची सुरुवात अशी किळसवाणी, ओंगळ झाली. ती हे सगळं विसरून पुढे जाईल तिच्या पुढील आयुष्यात सगळं छान घडेलच. पण मन, शरीरावरील हे अदृश्य घाव कसे भरतील ?
व्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार ? याचा भयावह, विकृत परिणाम म्हणजे भग्न विखुरलेलं कुटुंब आणि या तप्त अग्नित होरपळणारं निष्पाप निरागस बालपण. यावर परिणामकारक उपाययोजना आणि अंतर्मुख होऊन एक व्यक्ती म्हणून आपण ज्या नाते संबधाशी जोडलेले आहोत त्याचा सकारात्मक विचार आणि तशी कृती होणं गरजेचं आहे. एक स्वस्थ, सुदृढ, आनंदी कुटुंब संस्था सक्षम नवीन पिढीला जन्म देऊ शकते, हे आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.
क्रमशः

— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्ष, बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800