भाग 3
बाल आरोग्य
बालके ही फुलासारखी नाजूक असतात. शारीरिक, मानसिक व भावनिक अपरिपक्वतेमुळे या फुलांची अधिक काळजी व संगोपन करणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे त्यांना कायद्यान्वये संरक्षणही द्यावं लागतं.
त्यांचे बालपण फुलवण्यासाठी त्यांना योग्य काळजी व सुविधा उपलब्ध होणं महत्वाचं आहे. चांगले आरोग्य, सुरक्षितता, सुरक्षित पाणी, पोषक अन्न, शिक्षण, सुरक्षितता इ.प्रदान करण्याची आवश्यकता असते. परंतु असमानता तसेच अनेक कारणांमुळे या सुविधा समाजातील सर्व बालकांना सारख्या प्रमाणात मिळत नाहीत असं चित्र दिसून येतं. बालकांना त्यांचे बालहक्क प्राप्त न होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे.
जगातील प्रत्येक बालकाला सर्वांगिण विकासाचा हक्क असून त्याला सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे या हेतूने संयुक्त राष्ट्रसंघाने 20 नोव्हेंबर 1959 रोजी बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा प्रस्तुत केला आणि तेव्हापासून 20 नोव्हेंबर हा दिवस जागतिक बालहक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
लहान मुले ही कोवळी व निरागस असतात. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होणं तितकं सहज शक्य नसतं व त्यांचे उल्लंघन झालं आहे हे देखील समजणं कठीण असतं.
संयुक्त राष्ट्राच्या बाल हक्क संहितेत एकूण 54 कलमे आणि 4 मुख्य अधिकार आहेत. त्यात उल्लेख केल्या प्रमाणे शारीरिक, मानसिक किंवा सामाजिकदृष्ट्या अपंग असलेल्या बालकांना विशेष प्रकारची वागणूक, शिक्षण देण्यात येऊन त्याची विशेष प्रकारची काळजी घेण्यात यावी.असे नमूद आहे. बालक शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या स्वस्थ असेल तर त्याची बाल्यावस्थेतील जडण घडण योग्य रित्या होते. म्हणून बालकांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य उत्तम असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी बालकांना आरोग्यासंबंधित उत्तम सोयी सुविधा उपलब्ध होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
आपल्या समाजामध्ये काही सामाजिक समस्या भयानक स्वरूपाच्या आहेत. त्यात झोपडपट्टी, वेश्यावस्ती या ठिकाणी आपलं बालपण व्यतीत करणारे बालक त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यास घातक अश्या वातावरणात राहत आहेत.
मी, डॉ राणी दुष्यंत खेडीकर या बालकांच्या उत्तम आरोग्याच्या सोयीसाठी शासन, सामाजिक संस्था, सामान्य नागरिक यांच्या कडे मागणी करत आहे आणि ही मागणी निश्चित पूर्ण व्हावी यासाठी आई अंबे चरणी प्रार्थना करत आहे.
या बालकांच्या तसेच जे बालक उत्तम शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्या पासून वंचित आहेत आणि प्रत्येकच बालकांसाठी ही मागणी करत आहे.
ही मागणी करण्याचे प्रमुख कारण म्हणजे, मी वेश्या व्यवसाय करणाऱ्या मातांच्या अपत्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, मानसिक, आरोग्य संबधी अभ्यास या विषयावर आचार्य पदवी प्राप्त केली आहे. या विषयावर आचार्य पदवी प्राप्त करणारी मी महाराष्ट्रातील पहिली महिला अभ्यासक आहे. या अभ्यासातून प्रामुख्याने असे निकष आले की ही बालके ज्या वस्तीत, ज्या वातावरणात वास्तव्य करतात ते अत्यंत घातक स्वरूपाचे आहे.ही बालके आपल्या उघड्या डोळ्यांनी या वस्तीतील भडक, विदारक सत्य बघत असतात. उघडी गटारे, अंधारलेल्या खोल्या, अश्लिल गाण्याच्या आवाजाने दनानलेल्या गल्ल्या, सिगारेटचा धूर, दारूचा वास, सट्ट्यासाठी गल्लीत बिथरलेलं पत्ते आणि नोटांचे खेळ, भिंतीवर चिकवलेली अश्लील चित्र, गुटक्याची अर्धवट रिकामी पाकिटं. जन्मघुटी म्हणून ही निष्पाप बालकं हे सगळं गिळत जातात. अफू, गांज्याचे व्यसन सहज उपलब्ध होते, जेवणाची कुठलीही व्यवस्था त्यांच्या खोलीवर नसते. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यास हे वातावरण घातक आहेच. असे संशोधनात्मक सत्य मी आपल्या प्रबंधात नमूद केले आहे.
कसे घडावे हे बालपण ?
केवळ झोपडपट्टी आणि वेश्यावस्तीच नव्हे तर बालकांचे मानसिक आणि भावनिक आरोग्य उत्तम असावं यासाठी योग्य पोषक वातावरण बालकांना उपलब्ध होत नाहीय.आज बालकांचा screen time खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातोय. त्यातून बालक त्यांच्या साठी घातक असणाऱ्या गोष्टी बघत आहेत आणि आपलं मानसीक, भावनिक स्वास्थ्य गमावत आहेत. कामकाजा निमित्त जास्तीत जास्त वेळ घरातून बाहेर राहणारे पालक, विभक्त झालेली कुटुंब, दोन्ही पालकांचे स्वतंत्र विचार त्यामुळे broken families ची वाढणारी संख्या यामुळे बालकांच्या वाट्याला येणारा एकटेपणा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक, भावनिक समस्या आणि समस्यांची उत्तरं शोधण्याचे अयोग्य मार्ग ज्यातून दिवसेंदिवस बालकांचे मानसिक, भावनिक स्वास्थ्य ढासळत जातेय ही संपूर्ण देशासाठी अत्यंत गंभीर बाब आहे आणि यावर योग्य त्या उपाय योजना शोधणं निश्चितच गरजेचं आहे.
बालकांच्या शारिरीक, मानसिक, भावनिक आरोग्याचे उत्तम व्यवस्थापन होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून बाल आरोग्या बाबत माझी ही मागणी अत्यंत महत्त्वाची असून ती पूर्ण होण्यासाठी पालक, शासन, समाज या संपूर्ण यंत्रणांनी महत्त्वपूर्ण आणि आग्रही भूमिका घेणं आवश्यक आहे.
क्रमशः
— लेखन : डॉ राणी खेडीकर.
अध्यक्षा, बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800