Monday, November 11, 2024
Homeलेखपालकत्व : एक कला

पालकत्व : एक कला

भाग – ६ : शिक्षा, शिस्त आणि बालपण

“अभ्यास केला नाही आणि चांगले गुण मिळवले नाही तर तुला चटका देईल बरं.” सारखं असं म्हणणारी आई एक दिवस बालकाला चटका देते आणि त्या बालकाच्या मनात अभ्यासा विषयीची भीती निर्माण करणारं बीज रोवलं जातं. त्या चटक्याच्या वेदना थांबतात जखम पण बरी होते पण जखामेचं व्रण आणि मनावर झालेला आघात ते बालक विसरू शकत नाही. त्या आघाता मुळे बालमनाला अनेक प्रश्न पडू लागतात. पुढे पुढे हे प्रश्न क्लिष्ट होत जातात आण त्याची उत्तर शोधताना बालक भरकटत जातं. माझीच आई माझ्याशी अशी का वागते ? माझ्यावर आई प्रेम करत नाही. अश्या भावना बालकाच्या मनात निर्माण होऊ लागतात आणि बालक स्वतःला असुरक्षित समजू लागतं. या अवस्थेत जर बालकाला कोणी कसले आमिष दाखवले तर ते बालक त्याला बळी पडू शकतं. या सगळ्या गोष्टींचा विचार होणं आवश्यक आहे.

शिस्त आणि शिक्षा हे दोन्ही शब्दांची निर्मिती शिक्षण या शब्दापासून झाली आहे. शिक्षणाद्वारे चांगली वागणूक अमलात आणणे म्हणजेच शिस्त असे म्हणता येईल. यासाठी शिक्षा कशाबद्दल व कोणत्या चुकीबद्दल व गैरवर्तणुकीबद्दल आहे, हे समजून देऊनच अगदी सौम्य बालकास कोणतीही शारीरिक मानसीक भावनिक इजा न होऊ देता केवळ जाणीव होईल एवढीच ती असावी.
एरिकसन यांच्या प्रमाणे ई.एच्. एरिकसन (१९०२-) यांनी फ्रॉइडप्रणीत वरील मानसिक-लैंगिक विकासावस्थेपेक्षा मानसिक–सामाजिक (सायको-सोशल) विकासावस्थांना प्राधान्य दिले. दोघांच्या सिद्धांतातील एकोणीस वर्षांपर्यंतच्या टप्प्यांचा कालखंड व संख्या जवळजवळ सारखी आहे; परंतु एरिकसन यांनी आणखी काही पुढील टप्पे प्रतिपादिले आहेत : प्रथमावस्थेत बालकाच्या गरजा भागविल्या गेल्यामुळे स्वत:वर व पालकांवर श्रद्धा निर्माण होते. दुसऱ्या अवस्थेत स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव आणि संकल्प निर्माण होतात. हळूहळू आत्मविश्वास व संयम वाढतो आणि अस्मिता (सेल्फ-एस्टीम) प्रस्थापित होते. तिसऱ्या अवस्थेत बालक अनुकरणाद्वारे शिकते तसेच सक्रिय बनून आक्रमकताही दाखवते. चौथ्या अवस्थेत म्हणजे सहा ते अकरा वर्षांच्या काळात बालकात कर्तव्याची जाणीव तसेच उद्योगप्रियता निर्माण होते. पाचव्या अवस्थेत म्हणजे अठराव्या वर्षापर्यंत स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची घडण पूर्ण होते आणि बालक स्वावलंबी बनून पालकांपासून अलग व स्वतंत्र होते.

बालकांचे मानशास्त्र आणि अवस्था समजून घेताना आपल्या लक्षात येईल की, टप्या टप्याने बालकात होत जाणारा विकास आणि बदल हे त्याच्या त्या त्या अवस्थेतील गरजा कश्या प्रकारे पूर्ण होतात यावर अवलंबून असते अर्थात त्यानुसार त्यांच्या भावनिक मानसिक जडण घडण होत जाते. म्हणून प्रत्येक अवस्थेत बालकांच्या विविध गरजा खूप महत्त्वाच्या असतात.
बालकांच्या भविष्य बाबत पालक सजग, जागरूक असतात यात काही गैर नाही पण,त्यासाठी अती कडक शिक्षेचा वापर करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्यांच्या आवडी निवडी गुण कौशल्य वेगळे असतात. त्यामुळे पालकांनी केवळ आणि केवळ पुस्तकी अभ्यासाचा अती आग्रह धरणं कितपत योग्य आहे याचा विचार होणं आवश्यक आहे.

मुलामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचे अनेक सकारात्मक मार्ग आहेत. त्यांना अभ्याची परीक्षेची भीती वाटू नये किंबहुना ती निर्माणच होऊ नये. यासाठी त्यांना त्यांच्या आवडत्या विषयाला जास्त वेळ देण्याचं स्वातंत्र्य देणं गरजेचं असतं. पालकांनी या बाबत मोकळं असावं. गोष्टी रुपात अनेक महत्वाचे विषय पालक मुला पर्यंत अगदी सहज पोहचवू शकतात. बालकाच्या आत्मसात करण्याची क्षमता खूप जास्त असते हे आपण जाणतो “थांब संध्याकाळी बाबांना येऊ दे, त्यांना सांगते तू काय केलं ते”. अश्या वाक्याचा प्रयोग दिवसातून अनेक वेळा केला जातो. त्यामुळे बाबा येईपर्यंत बालक आपल्याला कोणती शिक्षा होणार या काळजीत रहातो. मुलाने केलेली चुक त्याच्या लक्षात आणून देऊन त्याची समजूत काढून त्याला पुढे जाण्यास मोकळं करायचं. मुलाशी अबोला धरणे.ही शिक्षा योग्य नाहीय. उलट मुलांशी त्या विषयावर खुली चर्चा करणं आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे त्याचं एकून घेणं. बालकांना बोलण्याची संधी देण खूप गरजेचं आहे.त्यांना मनमोकळ बोलू देणं आणि वेगवेगळ्या विषयावर त्यांचे मत, विचार जाणून घेणं जेणे करून त्यांना आपण समजून घेऊ शकू आणि त्यांच्या वेगवेगळ्या कृतीचा अर्थ समजू शकू.

मोठ्यांच्या कृतींतूनच लहान मुले शिकण्याचा प्रयत्न करतात म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे, बोलणे यावर योग्य ताबा ठेवावा. मोठ्यांच्या विशिष्ट वागणुकीचा विशिष्ट सकारात्मक नकारात्मक परिणाम बालकांवर होत असतो. पालक जी कडक शिक्षा किंवा शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला अनुसरून ज्या कृती करतात त्यातून बालकास तसे तसे संदेश जातात आणि बालक त्याच प्रमाणे आपलं वर्तन निश्चित करत जातं. उदा. एखाद्या गोष्टीसाठी जेव्हां पालक बालकास कडक शिक्षा करतात तेंव्हा बालकास एखादी गोष्ट करून घेण्यासाठी कडक शिक्षा करणं आवश्यक असते असा संदेश जातो.

बालक आणि पालक यांच्यात सुसंवाद असणं खूप आवश्यक आहे. मुलांचा वैचारिक प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे याची जाणीव आणि माहिती वेळोवेळी पालकांना घ्यायला हवी. खूप कडक शिस्त किंवा खूप जास्त मोकळीक दोन्ही गोष्टी बालकांच्या दृष्टीने हानिकारक ठरतात. बाल मन अजाण आणि नाजूक असतं. आपण अमुक गोष्ट केल्याने त्याचे काय परिणाम होतील याची जाणीव त्यांना नसते. त्यामुळे क्षणिक आकर्षण याला बळी पडून ते चुकीचे निर्णय घेण्याची दाट शक्यता असते. पालक आणि घर हे बालकांच्या मानत सुरक्षिततेची भावना निर्माण करणारे महत्वाचे घटक आहेत. पालकांशी सुसंवाद आणि घरात आनंदी वातावरण हे बालकाच्या भविष्याच्या दृष्टीने पोषक ठरते.

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी खेडीकर
अध्यक्ष. बाल कल्याण समिती पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अगदी बरोबर खर तर पालकांशी जास्त बोलायला हवं तू ची कृतीने काय होत ते समजावून सांगायला हवं. बालक सतत असुरशित वातावरणात राहील तर त्याचा आत्मविश्वास वाढणार नाही. दबावाला बळी पडेल. स्वतः सुरक्षित करण्यासाठी चुकीचे मार्ग निवडेल.
    फार सध्या सोप्या भाषेत मॅडम मांडणी केली आहे. मनापासून धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments