Saturday, July 27, 2024
Homeलेखपालकत्व : एक कला

पालकत्व : एक कला

झपाट्याने बदलत असलेल्या परिस्थितीमुळे सुजाण पालकत्व हे एक मोठेच आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांना कसे वाढवावे ही मोठीच समस्या बनली आहे. त्यामुळे पालकांना सुयोग्य मार्गदर्शनाची फार गरज आहे. हे ओळखून डॉ राणी खेडिकर या दर शनिवारी “पालकत्व : एक कला” या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत.

अल्प परिचय

डॉ. राणी खेडीकर या महाराष्ट्र शासनाच्या, पुणे बाल कल्याण समिती च्या अध्यक्षा आहेत. त्यांनी “वेश्या व्यवसाय करणाऱ्या मातांच्या अपत्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, मानसिक, आरोग्य संबधी अभ्यास” या विषयावर आचार्य पदवी प्राप्त केली आहे.
या विषयावर आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अभ्यासक आहेत. या विषयावर त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

डॉ खेडिकर बालकांच्या हक्कांविषयी विविध माध्यमातून सतत जनजागृती करीत असतात. आपल्या पोर्टलवर त्यांनी लिहिलेली “लालबत्ती” ही लेखमाला संवेदनशील वाचकांना अंतर्मुख करणारी होती.
डॉ खेडिकर अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. न्युज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे पुनश्च एकदा स्वागत आहे.
– संपादक

घट्ट आवरण….
नाजूक मन

रात्री पार्टीला जाण्यास आईनी परवानगी दिली नाही म्हणून ती नाराज होती. कॉफी चा smiley वाला कप घेऊन पडलेल्या चेहेऱ्याने ती बाल्कनीत आली. कुंड्यांमध्ये लावलेली फुलझाडे शांत झोपली होती. हिरव्या घट्ट आवरणातील बंद कळीला मधमाशी बराच वेळ टोचत होती. पण, तिच्या भोवतीचं आवरण ताकतीनं कळीचा कच्चेपणा जपत होतं. ती आत गेली आई तिच्या सकाळच्या डब्याची तयारी करत होती. तिच्या आवडीच्या सँडविचची. पिवळ्या साडीत आई छान दिसत होती पण हिरव्या घट्ट आवरणा सारखी का भासत होती ? आणि कॉफीच्या कप वरचा smiley आता तिला गोड दिसू लागला होता.

कौमार्य अवस्था, शिस्त आणि गोंधळलेल्या काळाचं व्यवस्थापन हे आजच्या काळातील पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. मुलं एका अवास्तव काल्पनिक विश्वात रमलेली असतात. त्यांच्या या विश्वात प्रवेश घेणं आणि त्यांना कोणतीही मानसिक इजा न होता वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करणं हे कौशल्य अवगत असणं आवश्यक आहे. त्यांच्या आणि आपल्या वयाचं,विचारांचं अंतर कमी करताना दुरावे येणार नाही याचं पण भान राखावं लागतं. हा ताळमेळ बसवताना आपण पालक बऱ्याचदा अधीर होतो आणि त्यामुळे पालक आणि पाल्य यांच्या मध्ये सुसंवाद कमी होत जातो. मग पुढे संवाद देखील कमी होत जाऊन अगदी मोजकं बोललं जातं. या एकूण प्रक्रियेत मुलं त्यांच्या मानसिक, भावनिक गरजपूर्ती साठी बाहेर कोणाचा तरी शोध घेऊ लागतात आणि या प्रवासात त्यांना कोण, कसे व्यक्ती भेटतील आणि ते त्यांचा कसा उपयोग करतील याचा अंदाज लावणं कठीण असतं.

मुलं मित्र मैत्रिणींची निवड कशी करतात, हे त्यांच्या विचारांची बैठक कशी बांधलेली आहे यावर अवलंबून असतं. पालक आणि पाल्य यांच्यात संवाद, सुसंवाद साधला जाणं गरजेचं असतं. या प्रक्रियेतून अनेक प्रश्न सहज सुटतात. मुलांना जास्तीत जास्त व्यक्त होऊ देणं महत्त्वाचं असतं आणि यासाठी कधी कधी मुलं जे काही सांगतात त्याकडे judgmental view न ठेवता त्यांच्या विचारांचा, मनाचा वेध घेत त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळी नेमका आपला धीर संपतो आणि आपण अनेकदा मुलांना गप्प बसवतो. असं वारंवार होत गेलं तर मुलांना त्यांच्या आणि पालकांच्या मध्ये मोठी दरी आहे याची जाणीव होऊ लागते आणि मग ते दुहेरी भूमिका घ्यायला शिकतात अर्थात पालकांना काय आवडेल तेवढंच त्यांच्याशी बोलतात. अनेकदा पालकांच्या समोर आज्ञाधारक असल्याचा भास निर्माण करतात. आणि खूप गोष्टी त्यांच्या मनासारख्या करण्यासाठी मित्र, मैत्रिणीचा आधार घेतात किंव्हा कधी कधी चुकीच्या व्यक्तीची साथ पण घेतात.

“आदित्य सारखं काय बोलतो रे त्या मंदारशी ? आणि क्लास ला जाऊन सरळ घरी ये”. अशी सूचना मिळताच आदित्य ने होकारार्थी मान हलवली. आणि क्लास सुटल्यावर एक तासाने घरी आला. शांत आपल्या खोलीत जाऊन अभ्यास करू लागला. काही वेळाने क्लास मधून मेसेज आला, आदित्य क्लास ला गेलाच नव्हता. आईने त्याचं कारण विचारल्यावर त्याने, मित्र सायकल वरून पडला म्हणून त्याला घरी सोडायला गेल्याचं सांगितलं आणि वेळ मारून नेली. पण आदित्य तेंव्हा मंदार सोबत फिरायला गेला होता. मित्रा सोबत फिरायला जाणं यासाठी खोटं बोलण्याची काहीच गरज नव्हती. पण आदित्यच्या आईला मंदार शी त्याचं जास्त बोलणं आवडत नव्हतं म्हणून त्याने तिला खरं सांगणं टाळलं. पण त्याला जे आवडत होतं, त्याची जी गरज होती ती त्याने पूर्ण केली. पुढे कदाचित हे वाढत जाणार.

एखाद्या दिवशी काही घटना घडल्यास आई वडील आश्चर्य चकित होणार आणि आपला मुलगा असं करू शकत नाही. या चक्रात अडकून पडणार.हे सगळं टाळता यावं यासाठी आपण आम्ही तुमचे मित्र आहोत असं फक्त बोलण्या पेक्षा तसं वागायला हवं. मुलं चुका करणारचं पण त्या आपल्याला कळायला हव्या. त्यांनी मनमोकळे त्या आपल्याला सांगायला हव्या असं वातावरण घरात निर्माण करून देणं गरजेचं असतं.

“मम्मी हे काय आहे ? ही निळी ईंक अशी गायब कशी होते ग ?” पाच वर्षाच्या चिमुकली ने प्रश्न विचारला आणि आई अस्वस्थ झाली. स्यानेट्री नेपकिन ची जाहिरात म्हणजे पालकांना निरुत्तर करणारा प्रसंग. अश्यावेळी कितीही सुशिक्षित आई असू द्या ती अस्वस्थ होणार हे निश्चित आहे.आपल्या कडे उत्तर देण्याचं कौशल्य नाहीय म्हणून तो प्रश्न आपल्याला नकोसा वाटतो, चुकीचा पण वाटतो.पण त्या लशनश्या मुलीच्या प्रश्नांना उत्तर देण्याची जवाबदारी कोणाची आहे ? एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलं सगळ्यात आधी आपलेच दार ठोठवतात. आपण उत्तर देण्यास टाळाटाळ केल्या नंतर ते इतर मार्ग घेतात. त्यांना ते जाणून घ्यायचं नाहीच आहे ज्याचा विचार आपण करतोय. त्यांना फक्त ते लिकविड सॉलिड कसं झालं हे विज्ञान जाणून घ्यायचं असतं. आणि उत्तम संधी आपण गमवून बसतो. त्या एका प्रश्नातून आपण मुलांना किती गोष्टी नीट समजावून सांगू शकतो जे इतर कोणीही सांगू शकत नाही. असे प्रश्न म्हणजे पालक पाल्य यांच्यातील दरी कमी करण्याची उत्तम संधी असते. त्याचा योग्य उपयोग करून आपण त्यांच्या डोक्यात कायम सुरू असलेला कल्लोळ निश्चितच कमी करू शकतो.

मुलांच्या नाजूक मनाला कुठलीही इजा न होऊ देता एक अदृश्य घट्ट आवरण देऊन आपण त्यांची काळजी घेऊ या.
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

— लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
अध्यक्षा, बाल कल्याण समिती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८