Wednesday, October 9, 2024
Homeलेख"पावसा, पावसा जाग रे ! माणुसकीने वाग रे !"

“पावसा, पावसा जाग रे ! माणुसकीने वाग रे !”

फेब्रुवारी २०२४ च्या महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या महिन्यातही वर्धा, नांदेड, नाशिक, यवतमाळ तसेच कोकणात व मराठवाड्यातील शहरात व अनेक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे, शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले . हिवाळ्यातही असाच प्रचंड पाऊस पडून शेतक-यांचे अतोनात प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत झाली आहे. अशा परिस्थितीत आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सर्वांनी टी.व्ही. वरील बातम्यात पाहिले आहे. तसेच, रोजच्या वर्तमानपत्रातील बातम्यात वाचले आहे.

अशाच  बातम्या अनेक न्यूज चॅनेलवाले फोटो व व्हिडिओ सहीत टीव्हीवर नेहमीच दाखवतात. ही अशीच बातमी एबीपी माझा ने मागे फेब्रुवारीमध्ये टीव्हीवर व्हिडिओसहीत दाखविली होती. त्या फोटोत वाक्य लिहिले होते. “पावसा पावसा जाग रे ! माणुसकीने वाग रे !   पण, याचा नीट अंतर्यमी शुध्द मनाने विचार केला तर असे दिसून येते की, निसर्ग हा अनेक शतकांपासून आणि अनेक दशकांपासून नीटच वागत आलेला आहे. तसेच, त्या त्या शतकांतील आणि दशकांतील माणसेही शुध्द आचरणाने वागत होती. त्यामुळे, त्या काळात पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित होते. फक्त एकविसाव्या शतकातील बहुतांशी माणसंच नीट वागत नाहीत. त्यांनी माणुसकी जवळपास सोडलेलीच आहे. हे आपणांस वर्तमानपत्रातील रोजच्या बातम्यांवरुन दिसून येते. बहुतांशी माणसे स्वतःच्या स्वार्थासाठी जंगले नष्ट करण्याचा उद्योग करीत आहेत. तसेच, काळा काळा धूर सोडणारी असंख्य प्रदूषित वाहने रस्त्यावरुन बेफाम वेगाने धावत आहेत. दरवर्षी त्यात हजारों नवीन वाहनांची भर पडत असते. त्यामुळे, त्यातून बाहेर पडणा-या धूरामुळे अतिप्रचंड प्रमाणात प्रदूषण होत असते. याशिवाय, अनेक शहरांतील रस्त्यांवर ब-याच ठिकाणी कच-यांचे ढीग साठलेले दिसून येतात. त्यात, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, ओला, वाळला कचरा तसाच अस्ताव्यस्तपणे टाकून दिलेला आढळून येतो. महानगरपालिकेचे कर्मचारी ज्या त्या शहरात घरोघर येऊन कचरा घेऊन जात असतात. तरीही, बेशिस्त लोक दूचाकीने येऊन पायानेच गाडीवरून कच-याची पिशवी बेपर्वाईने रस्त्यावर ढकलून देऊन निघून जातात.

अनेक कंपन्या केमिकलयुक्त दूषित पाणी नद्यांमध्ये सोडून देतात. त्यामुळे, नद्यांही दूषीत होतात. तसेच, त्यात वास्तव्य करणारे व नद्या स्वच्छ ठेवणारे मासेही अत्यंत विषारी केमिकल्समुळे मरतात. याला जबाबदार अशी दूष्कृत्ये करणारी माणसेच आहेत. अशा माणसांनीच निसर्गनियमाची आचारसंहिता व निसर्गनियम बदलून टाकले आहेत.

सगळीकडे बेशिस्तीने वागणेच चालू आहे. त्याचाच दूष्परिणाम नियमांनुसार वागणा-या लोकांना भोगावा लागत आहे. अशा दूष्कृत्य करणा-या लोकांमुळेच निसर्गाच्या ऋतूमानातही बदल होत चालला आहे. त्यामुळेच, पर्यावरणाच्या संतुलनातही प्रचंड प्रमाणात बदल झालेला आहे. यात निसर्गाचा काहीच दोष नाही. बहुतांशी माणसेच मग निसर्गाला दोष देतात आणि म्हणतात “निसर्गापूढे काय चालतं कुणाचं ! अरे माणसा ! पण, निसर्गाला प्रदूषित करायचं, आजारी पाडायचं काम कोण करतं ?
तूच करतोस ना ! स्वतः आचारविचार, व्यवहार नीट सांभाळत नाहीस. स्वतः आजारी पडतोस आणि निसर्गालाही आजारी पाडतोस ! मग सांग, जाग कुणाला यायला पाहिजे ?  तसेच, माणुसकी कुणी ठेवली पाहिजे ? याचं स्वतः तूच नीट आत्मपरीक्षण कर माणसा ! झोपेचं सोंग घेतलेल्या माणसा, जागा हो ! मुख्य म्हणजे अत्यंत महत्त्वाची लक्षात घेऊन आचरणात आणण्यासारखी गोष्ट म्हणजे, तुझ्या जीवनात माणुसकीला प्रथम प्राधान्य दे. माणुसकी जपशील तरच, तुझ्या पुढच्या पिढ्या सुखाने आनंदाने जगतील. त्यांचं भविष्य आणि भवितव्य तूझ्याच हातात आहे. माणूस म्हणून जन्माला आलास तर माणूस म्हणूनच वाग. तुझ्या दूष्कर्माची फळं निष्कारण दूस-या निष्पाप लोकांना भोगावी लागू नयेत याचं भान ठेव.

जाग माणसा, जाग. सुयोग्य आचरणाने वाग. पर्यावरणाचं संतुलन बदलविणा-या अशा माणसांमुळेच पावसाचं ऋतूमानही बदलून गेलं आहे. त्याचा सगळ्यात जास्त फटका लाखो शेतक-यांना बसला आहे आणि बसत आहे. त्यामुळे, देशात लाखो शेतकऱ्यांचा संसार आणि त्यांचं जीवन उध्वस्त झालं आहे. अशी ही भस्मासूर राक्षसाप्रमाणे दूष्कृत्य करणा-या  माणसांची संख्या देशात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, अशा पर्यावरणघातक भस्मासूरासारख्या दूष्ट माणसांना नष्ट केलंच पाहिजे. या कामी शासनाकडून व शासकीय यंत्रणांकडून ठोस कार्यवाही झालीच पाहिजे.

देशात पावसाळा असो, हिवाळा असो की उन्हाळा असो, प्रत्येक ऋतूत पाऊस पडत आहे. त्यामुळे, पिके कोणत्या ऋतूत घ्यावीत आणि कोणती पिके घ्यावीत असा प्रश्न देशातील सर्व शेतक-यांना पडला आहे. कारण, पेरणीच्या वेळेसही पाऊस पडत आहे आणि पिके कापणीच्या वेळेसही पाऊस पडत आहे. तसं पाहिलं तर हे एका ठिकाणी घडत आहे असंही नाही. अनेक राज्यांत अनेक ठिकाणी शहरात व खेड्यात कूठे धो धो पाऊस पडत आहे तर कुठे प्रचंड प्रमाणात गारपीट होते आहे. तर कुठे कोरडा दूष्काळ पडतो आहे. काही काही ठिकाणी तर भूस्खलनही होते आहे. तर काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसत आहेत. अशी विषम परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. यावर ठोस उपाय किंवा ठोस उपाययोजना केली गेलीच पाहिजे. हे सगळं कशामुळे घडतं आहे, याचा सर्वंकष पध्दतीने आणि सखोल अभ्यास झाला पाहिजे. तरच, त्यावर योग्य तो उपाय करता येईल. भारत देशातील व सर्व देशांतील सर्व शास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या दहा वर्षांत अनेकदा या विषयावर परिषदा झालेल्या आहेत. परंतु, त्यात झालेल्या निर्णयानुसार एकाही देशाने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केलेली नाही असे जागतिक स्तरावर झालेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्याची अनेक कारणे आहेत, परंतु, त्यावर नियंत्रण मात्र कोणीही ठेवत नाही किंवा ठेवू शकत नाही.

याच कारणांमुळे ही सध्याची परिस्थिती उद्भवते आहे. ‌‌प्रामुख्याने काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे निदर्शनास आली आहेत..

१. देशादेशांतील वनसंपदेचे, जंगलकटाईचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे.अशी विघातक दूष्कृत्ये करणा-या लोकांचे प्रमाणही देशात खूप वाढले आहे. कारण, खूप मौल्यवान चंदन तसेच, इतरही मौल्यवान किंमतीच्या वृक्षांच्या, झाडांच्या लाकडांची विक्री करुन अशी दूष्कृत्ये करणारी माणसं करोडो रुपये मिळवितात. तसेच, वनराईतील झाडे तोडून, टेकड्या फोडून अनेक घरे, मोठमोठाल्या टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. काही ठिकाणी तर अशी नियमबाह्य दूष्कृत्ये करणारी माणसं नाले, कॅनाल बुजवून त्याठिकाणी मोठमोठी अपार्टमेंट्स उभी करीत आहेत. तसेच, गरीबांनाही पूरग्रस्त भागात छोटी छोटी घरे बांधण्यास परवानगी दिली जाते. हे अपार्टमेंट्स व घरे ही पूररेषेजवळ बांधली गेली असल्यामुळे नद्यांना खूप अतिवृष्टीमुळे धरण साखळीतील धरणाचे पाणी मर्यादा पातळीपेक्षा जास्त झाल्यास धरणातून ताशी तीस हजार चाळीस हजार क्यूसेस वेगाने पाणी धरणातून सोडले जाते. त्यामुळे, पूरग्रस्त भागातील हजारो गरीब, मध्यमवर्गीय लोकांचे संसार सामुग्री वाहून जाते. त्यांचे संसार उघड्यावर पडतात. याची जबाबदारी कोणीही घेत नाही. अशा लोकांना तुटपुंजी मदत दिली जाते. तसेच, मुसळधार अतिवृष्टीमुळे देशात लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे अतीनुकसान होते. दोन वर्षांपासून साधारणपणे दर महिन्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे, हजारो शेतक-यांचे मोसमी फळांचे व पिकांचे नुकसान होत आहे. ह्याला कारण पर्यावरण संतुलन बदलल्याने तिन्ही मुख्य ऋतूंचे ही प्रमाणात खूपच बदल झालेला आहे. त्यामुळे, उपऋतूही बदलत आहेत. अशा लोकांच्या ह्या वृक्षतोडीमुळे  सुर्याच्या उष्णतेमुळे जमिनी कोरड्या होत आहेत. त्या कारणास्तव जमिनीचे तापमान वाढत आहे. त्याची काही प्रमुख कारणे आहेत….

१. जमिनीचे  म्हणजेच, पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. जमिन शुष्क झाली की, जमिनीत पाणी नसते. जिथे झाडे असतात तिथे जमिनीत पाणी असते. त्यामुळे, जमिनीची धूप ही होत नाही.  त्यामुळे, तेथील वातावरण चांगले असते. पण, जिथे शुष्क जमिन असते, तिथे पिकेही येऊ शकत नाहीत. परिणामी, सर्वच  शेतक-यांचं खूपंच नुकसान होतं. पर्यायाने सर्वच जनतेचं नुकसान होतं. नुकसान म्हणण्यापेक्षा शेतक-यांच्या आणि देशातील समस्त जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होतो. पाण्याविना पिके येऊ शकत नाहीत. तसेच, पाण्याविना व पिकांविना माणूस आणि पक्षी व वन्यप्राणीही जिवंत राहू शकत नाहीत.

२. जगात रस्त्यांवर जेवढी वाहनं धावत असतात. त्यातील बहुतांशी वाहनं ही प्रदूषित असतात. त्यातल्यात्यात भारतात प्रदूषित वाहनांचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे, वाहनातून निघणाऱ्या काळ्याभोर धूराच्या कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाणही अतिप्रचंड प्रमाणात वाढले आहे. जागतिक सर्वेक्षणात ते प्रमाण साठ ते सत्तर टक्यापर्यंत वाढले गेले आहे. म्हणजेच,तीस टक्के प्रमाण फक्त ऑक्सिजनचे उरले आहे. महाराष्ट्रात तर वाहनांचे प्रदूषणाचे हे प्रमाण कायम असेच वाढते राहिले आहे. तसेच, अजूनही वाढत आहे. त्यात भर म्हणजे अनेक वाहन कंपन्या दरवर्षी हजारो वाहनांची निर्मिती करीत आहेत. वाहतूक खाते व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे याकडे बहुतांशी पुर्णपणे दूर्लक्ष होत असल्याचे प्रदूषणाच्या झालेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरुन लक्षात येते. त्यामुळेच, वातावरणाची अस्थिरता सारखी कमी जास्त होत आहे. याचा परिणाम लहान मुलेमुली, तरुण पिढी व वृध्द पिढी इत्यादींवर वातावरणीय प्रदूषिता (Viral infection) या यामुळे शरीरावर घातक परिणाम होवून ते आजारी पडत आहेत. याचा अत्यंत घातक परिणाम पिकांवरही होत आहे.

३. विविध केमिकल्सच्या कंपन्यांचे दूषित केमिकलयुक्त पाणी अनेक शहरांमध्ये नद्यांमध्ये सोडले जाते. असेही सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. काही मोठ्या शहरांमध्ये तर काही महानगर पालिकांनी तर दूषितपाणी पाइपलाइनद्वरे तलावात, नद्यांमध्ये सोडल्याचे पर्यावरण संतुलन व संवर्धन करणा-या संस्थांनी न्यायालयातच्या निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने अशा महानगरपालिकांना दंडही ठोठावला आहे. बहूतेक महानगरपालिकांमध्ये घरोघर जाऊन महानगरपालिकांचे कर्मचारी कचरा गोळा करीत असतात. तरीसुद्धा बरेचसे लोक दूचाकीवर येऊन रस्त्यावरच कचरा फेकून निघून जातात. त्यात, प्लास्टिक बाटल्या, निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिक पिशव्या टाकून दिलेल्या असतात. मुख्य रस्त्यावर किंवा गल्लीच्या छोट्या रस्त्यावर गाडीचे टायर व प्लास्टिक वस्तू काही लोक जाळतात. त्यातील केमिकल्सच्या वासामुळे लगत राहणा-या रहिवासी लोकांना त्याच्या खराब वासामुळे खूप त्रास होतो. कित्येकांना त्याची ॲलर्जी असते. त्यामुळे त्यांना चक्कर येते. कित्येकांना मळमळ होते. उलट्या होतात. उपरोक्त दर्शविलेल्या सर्व कारणांमुळे पर्यावरणाचे संतुलन बदलत आहे.

त्यामुळे, निसर्गातील ऋतूंचेही संतुलन बदलून गेले आहे. त्यामुळेच, पावसाचेही आगमन व निर्गमन बेभरवशाचे झाले आहे.  माणसांसारखी पाऊसही आपली रुपं बदलत आहे. कधी कुठे ढगफुटी होवून बेधुंद, धुवांधार कोसळत राहतो. तर कुठे बर्फ होवून, गारा बनून गारपीटीद्वारे बेफामपणे कितीही वेळ कोसळत राहतो, तर कुठे कुठे थेंबभर सुध्दा पडत नाही. कुठे ओला दूष्काळ पडतो तर कुठे कोरडा दूष्काळ पडतो.

हे सर्व बहुतांशी स्वार्थी माणसांच्या पैशांच्या अतिहव्यासाचे दूष्परिणाम सर्वसामान्य लोकांना आणि निसर्गालाही भोगावे लागत आहेत. निसर्ग माणसाला अनेकवेळा नव्हे ९९ वेळा सांभाळतो. पण, १०० चूका झाल्या की अशा माणसांना तो असा काही दणका देतो की, होत्याचं नव्हतं करून टाकतो. मग, त्याचा परिणाम असा होतो की, खड्यासोबत किडेही रगडले जातात. म्हणजेच वाळल्यासोबत ओलेही जळले जाते. शतकानुशतके असा अनुभव घेवून सुध्दा व ऐकून, वाचून सुध्दा प्रत्येक शतकातील, प्रत्येक दशकातील माणसं असं का वागतात ! हे त्या ईश्वरालाच ठाऊक !

पण, आत्तापर्यंत अशा माणसांच्या अशा घातक, विध्वंसक दूष्कृत्यांचा परिणाम आत्तापर्यंत मानव जीवनावर व निसर्गावर एवढा होत नव्हता. त्यामुळे, विश्वाच्या अस्तित्वावर, पृथ्वीच्या अस्तित्वावर विशेष परिणाम होत नव्हता, तितका जास्त परिणाम सध्याच्या एकविसाव्या शतकातील माणसांच्या जीवनावर व निसर्ग जीवनावर होत आहे. त्यामुळे, पर्यावरणाचे संतुलन कमालीचे बदलले गेले आहे. त्यामुळे, एकाच दिवसात तीन ऋतूंचा अनुभव सध्याच्या माणसांना अनुभवायला मिळत आहे. एकाच दिवसात पाऊसही पडतो, गारपीटही होते. कडक ऊनही पडते, ढगाळ हवामान होते. थंडीही पडते. अशी विघातक कृत्ये करणा-या दूष्ट माणसांमुळेच पर्यावरण संतुलन बदलल्यामुळेच निसर्ग ऋतूत असे बदल झाले आहेत. जोपर्यंत निसर्गात अशी घातक कृत्ये करणारी माणसे निसर्गात ढवळाढवळ करण्याचे थांबवत नाहीत तोपर्यंत पर्यावरणाचे संतुलन स्थिर राहणार नाही. हे आत्तापर्यंतच्या प्रत्येक दशकातील केलेल्या सर्वेक्षणानुसार सिध्द झालेले आहे. तरी,अनेक कोट्यावधी रुपये कमविण्याचा अतिहव्यास धरणा-या माणसांनी त्यांच्याच पुढील येणा-या पिढ्यांच्या भवितव्याचा आणि मुख्य म्हणजे त्यांच्या जीविताचा आणि इतर सर्व लोकांच्या पिढ्यांच्या भवितव्याचा आणि त्यांच्या जीविताचा विचार करणे आणि तसे आचरण करणे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. तरच, पृथ्वीचे संतुलन स्थिर राहील.

त्यामुळे, पृथ्वीचे आयुष्यमान म्हणजेच सकल सृष्टीचे आणि मनुष्यमात्राचे आयुष्यमान वाढेल आणि सर्वांचे अस्तित्व कायम सुरक्षित राहील, यात शंका नाही. यासाठी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजप्रबोधन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी, शिस्तबद्ध नियमावली तयार करुन त्याची अत्यंत काटेकोरपणे कोणत्याही भ्रष्टाचाराविना कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. विकासाच्या नावाखाली टेकड्या फोडून कृषी असलेल्या हिरव्यागार मोठमोठे वृक्ष असलेल्या जमिनी अकृषी करुन टोलेजंग इमारती व बांधल्या जात आहेत. सुंदर शहर सुशोभित शहर यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. याच्या बातम्या रोजच्या वर्तमानपत्रातून सर्वांना वाचायला मिळतातच. सर्वसामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न मात्र तसेच राहतात.

सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट दर्जाचे रस्ते, शुध्द सुयोग्य पाणीपुरवठा, चोवीस तास उत्तम विद्युत पुरवठा दिला गेला पाहिजे. पण, तसे होत नाही. याबाबतीतील जाहिराती मात्र भरपूर केल्या जातात. सर्वसामान्य जनता आपली आयुष्यभराची पुंजी त्यांच्या लेकरा, बाळांसाठी खर्च करुन दोन तीन खोल्यांचं घर खरेदी करीत असते. परन्तु, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यास धरणाच्या सुरक्षिततेसाठी लाखों लिटर पाणी अत्यंत वेगाने धरणातून सोडावे लागते. त्याचा फार मोठा फटका पूरग्रस्त भागातील लोकांना बसतो. त्यांच्या संसाराची वाताहत होवून अत्यंत मुल्यवान वस्तूंची, महत्वाच्या दस्तावेजांची, कागदपत्रांची खूप हानी होते. याबाबतीत संबंधित पूरग्रस्तांना नंतर मदत दिली जाते. पण, तशी घटना पूढे घडूच नये, यासाठी शासनस्तरावर अशा पूरग्रस्त भागात घरे बांधण्यास‌ महानगरपालिकेने परवानगीच देवू नये. जेणेकरून गोरगरीब जनतेचे होणारे अपरिमित नुकसान होणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे मात्र आवश्यक आहे. पण तसे होत नसल्याचे जागतिक स्तरावरील केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.

हवामानातील बदलांमुळेच जगातील पावसाचे प्रमाण खूपच अस्थिर झालेले आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार पृथ्वीच्या ७५ टक्के भागात अतिवृष्टी झालेली आहे. गेल्या शतकात आणि या शतकातही निसर्गात माणसाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि विकासा साठीच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जगाच्या विविध देशांत पावसाची अस्थिरता खूपच वाढली आहे. याचा जास्त प्रभाव ऑस्ट्रेलिया, युरोप व ईशान्य अमेरिका या देशांवर पडला आहे. हवामान बदलाच्या या अशा अनिश्चित वातावरणामुळे अचानक मुसळधार, अतिमुसळधार पाऊस कुठेही, आणि कितीही प्रमाणात कमी वेळात पडत आहे. तर, दूसरीकडे वारे अतिवेगाने वाहून, वादळ निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी कोरडा दूष्काळ पडत आहे. चिनी संशोधक व ब्रिटिश हवामान विभागाने केलेले या संदर्भातील निष्कर्ष विज्ञान नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

हवामान बदल पावसाला अस्थिर करीत आहे. म्हणून ही विषम परिस्थिती निर्माण झाली आहे. हा बदल अजून असाच वाढत जाणार आहे असा या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. शास्त्रज्ञानुसार गेल्या शंभर वर्षांत विशेषतः ऑस्ट्रेलियात हवामानाची अस्थिरता अधिक वाढली आहे आणि चिंतेची बाब म्हणजे ही हवामान बदलाची परिस्थिती जर अशीच वाढत राहिली तर जगातील सर्व देशांची ही समस्या अधिक बिकट होत जाणार आहे. त्यामुळे, जगात पूर, महापूर व कोरडा दूष्काळ अशी परिस्थिती उद्भवणार आहे. दैनंदिन पर्जन्यमानातील बदल जगभरात सर्वत्र वृत्तसंस्थेनुसार व शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार दिसून आले आहे. संशोधनाच्या अभ्यासात असेही दिसून आले आहे की, एकोणिसाव्या शतकाच्या दशकांपासून पावसाच्या अस्थिरतेत पध्दतशीर वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर पर्जन्यमानातील परिवर्तनशिलता दर प्रत्येक दशकात १.२ टक्क्याने वाढला आहे. अस्थिरता वाढणे म्हणजे पावसाचे अधिक असमान होत जाते. ज्यामुळे, कमी वेळात एकतर अतिवृष्टी होते किंवा अत्यंत कमी पाऊस पडतो. याचा अर्थ असा की, दिलेल्या ठिकाणी वर्षभराचा पाऊस अत्यंत कमी दिवसात पडतो.

ग्लोबल वाॅर्मिंगचा पावसावर कसा परिणाम होतो ?
१) संशोधकांचे निष्कर्ष समजून घेण्यासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे की, कोणते घटक वादळ किती प्रचंड प्रमाणात पाऊस निर्माण करतात आणि जागतिक हवामान बदलांमुळे (ग्लोबल वाॅर्मिंग) या घटकावर कसा परिणाम होतो.
२) पहिला घटक म्हणजे हवेत पाण्याची वाफ किती आहे. उष्ण हवेत जास्त ओलावा असू शकतो. ग्लोबल वाॅर्मिंगमुळे ठराविक क्षेत्रातील पाण्याच्या बाप्पाचे प्रमाण सरासरी सात टक्क्यांनी वाढते.
३) शास्रज्ञांना या समस्येबद्दल कित्येक वर्षांपासून कल्पना आहे. औद्योगिक क्रांतीपासून पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. त्यामुळे, पाण्याची वाफ होण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले आहे. त्यातून वादळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. इत्यादी कारणांमुळे निसर्गाचे व ऋतूंचे संतुलन व कालावधी बदललेला आहे. त्याचा परिणाम सृष्टीचक्रावर, मनुष्यजीवनावर आणि पशु, पक्षी व प्राणी यांच्या जीवनावर होत आहे.

म्हणून जगातील सर्वच माणसांनी यांचा अत्यंत गांभीर्याने विचार करुन त्यांच्या पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या आणि पृथ्वीच्या सुरक्षेसाठी आणि स्थिराते साठी आणि स्थिर पर्यावरण संतुलनासाठी अंत:करणपुर्वक कटीबद्ध होऊन  निसर्गसृष्टीचा व पृथ्वीचा एक टक्कासुध्दा विनाश होणार नाही यादृष्टीने सदैव जागरुक राहिले पाहिजे. तसेच, ही कार्यवाही प्रत्येक देशाच्या केंद्र व राज्य स्तरावरील शासनाने त्यांच्या शासकीय यंत्रणांकडून अत्यंत कार्यक्षम पध्दतीने भ्रष्ट लोकांना पाठीशी न घालता विना भ्रष्टाचार, निस्पृहपणे, अत्यंत कडक नियमावलीद्वारे उत्कृष्टपणे ही कार्यवाही केली तरच, पर्यावरणाचा, निसर्गाचा व पृथ्वीचा होत असलेला व पुढे होणारा विनाश थांबेल.

याबाबतीत निसर्गातील पक्षांनी आणि निसर्गाने माणसांना केलेला उपदेश खूप मोलाचा आणि आचरणात आणण्यासारखा आहे.  पक्षांना, निसर्गाला हे कळते पण, माणसाला कळत नाही. माणसांना बुध्दी असूनही बुध्दीचा सुयोग्य वापर  करता येत नाही. बहूतेक माणसे त्यांच्या बुद्धीचा वापर विध्वंसक कामासाठी व स्वार्थी वृत्तीने अगणित धन, वित्त, सोने इत्यादी मिळविण्यासाठी जंगले, जमिन निर्वृक्ष, निर्जल करीत आहेत. त्याचा परिणाम निसर्गजीवनावर व समस्त मानवजीवनावर होत आहे. याचेच मनोगत पक्षी व निसर्ग व्यक्त करीत आहेत. हेच सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या कवितेत केला आहे. ती कविता खालीलप्रमाणे सादर आहे.

    “निसर्ग, जीवन नि मोक्ष”

जीव माझा गं गुंतला, गुंतला
झाडाच्या गं त्या खोप्यामंदी
स्नेहाने म्हणे माऊली पक्षिणी
जिव्हाळ्याने पिल्लांना सांभाळीते
तान्हूल्यांची मायमाऊली पक्षिणी

जगाचा नियंता सदैव रक्षितो
जीवनी जागोजागी आम्हांसी
माणसांचा भरवसा नाही आम्हांस
लावूनी आस लावितो आम्हा फास
कसा ठेवावा माणसांवर विश्वास

शतकानुशतके चालतो जगी आम्ही
निसर्गनियमे रम्य जीवनाची वाट
सदैव फुलली आमची जीवन पहाट
माणसांना नाही कळली निसर्गभाषा
म्हणून, पाऊस लावी काढण्या उठाबशा

पाऊस म्हणे माणसांना नका बोल लावू मला
देवाने दिलेला काळ माझा तुम्हींच बदलला
हा कोणता नीती धर्म आहे तुम्ही अवलंबिला
अन् दोष मात्र देतात माणसे सदैव पावसाला
काय म्हणावे माणसांच्या वर्तनाला व कर्मांला

निसर्गजीवन शिस्तीनेच जगावे लागते
परि, माणसांना मात्र, ते कधी न कळते
कधी साधणार ते स्वजीवनाचा ताळमेळ
सन्मार्गी जगायला नाही हो ! त्यांना वेळ
जेव्हा कळेल ! तेव्हाच, त्यांना मोक्ष मिळेल !

— लेखन व काव्यरचना : मधुकर निलेगावकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments