“तंदुरुस्त राहा आणि अवयव दान करा ” हा संदेश देण्यासाठी पुण्यातील बाणेर येथील गणराज चौकापासून सुरु झालेल्या अवयव दान चालसत्र (OD Walkathon ) २०२४ ला सर्व लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
अडीच आणि पाच किलोमीटर चाल सत्रामध्ये सुमारे पाचशे पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. अवयवदान’ वॉकेथॉनचे आयोजन द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन म्हणजेच अवयवदान आणि देहदान महासंघ आणि ‘रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ’ व ज्युपिटर हॉस्पिटल यांनी केले होते.
प्रारंभी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले, “पुण्यामध्ये अवयवदान’ वॉकेथॉन २०२४ चे प्रथम वर्ष आहे. देशामध्ये ५ लाखाहून अधिक लोक अवयव खराब झाल्याने व प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने मरण पावतात. हे मृत्यू वाचविण्यासाठी अवयव दान हा समर्थ पर्याय वैद्यकीय शास्त्राने आपल्याला दिला आहे, आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या ०.१% एवढ्या लोकांनी जरी अवयव दान केले तरी आपली गरज भागवून सुध्दा आपण कितीतरी अधिक लोकांचे प्राण वाचवू शकतो. त्या साठी लोकांना अवयव दानाचे प्रबोधन होण्याचे गरजेचे आहे.. या साठी द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ही संस्था महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेरील १५ शाखाच्या माध्यमातून कार्य करत आहे.”
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना भूतपूर्व सेना उपप्रमुख ले. जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस यांनी असे आवाहन केले की, “आपली स्वत;ची प्रकृती चांगली असेल तरच आपण अवयव दान करू शकू व दुसऱ्याचे प्राण वाचवू शकू. त्यासाठी आता तंदुरुस्त रहा आणि अवयव दान करा. आपले व इतरांचे आयुष्य आनंददायी आणि सुखी रहाण्यासाठी आजूबाजूच्या लोकांना अवयवदानासाठी प्रवृत्त करा व त्याचा प्रचार करा ”.
यावेळी विशेष पाहुणे म्हणून बोलताना, डी आर डी ओ (आर्मामेंट, दिल्ली ) चे निवृत्त संचालक डॉ एस.एन.अस्थाना
“भारताची लोकसंख्या खूप असली तरी अवयव दानाच्या बाबतीत आपण अजून प्राथमिक अवस्थेतच आहोत. अवयव दाते आणि गरजवंत यांच्या मध्ये फार तफावत आहे. इतरांना सुखी आणि कार्यरत ठेवण्यासाठी आपल्या अवयव व देहदान करा. तज्ञ डॉक्टर्स व आधुनिक दवाखाने यांच्या मदतीने तालुका, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अवयव दान कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.”
या चालसत्राच्या अवयव दान चालसत्र (OD Walkathon ) २०२४ मधे अवयव दाते, अवयव भोक्ते, अठरा वर्षावरील सर्व स्पर्धकांसाठी खुलागट, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स आणि रुग्णालय कर्मचारी अशा गटामधील सहभागींना लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे देण्यात आली.
सेक्रेटरी श्रीकांत कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. इरावती जोशी, कल्याणी कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी ज्युपिटर हॉस्पिटलचे कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र पाटणकर, प्रशांत पागनीस, नागराज अय्यर, संगीता नायक, प्रीती मस्के, क्षमा गंगुली (रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ), सामाजिक कार्यकर्त्या सौ. कल्याणी टोकेकर, सिने कलावंत पुष्कराज चिरपुटकर डॉ. संजीवकुमार पाटील, रुपाली पठारे, अमृता देवळे, निर्मल व समाजातील सर्व गटातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800