Wednesday, June 19, 2024
Homeलेखपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे झाला. मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपल्या कर्तुत्वाने पराक्रमाने आणि बुद्धिमत्तेने उत्तर भारतामध्ये ठसा उमटविणारे आणि आजही स्वतःच्या कार्याचा वारसा चालू ठेवणारे होळकर हे घराणे इतिहास प्रसिद्ध आहे.

या घराण्याने उत्तरेकडे राज्य विस्तार करून मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान निर्माण केले. होळकर घराण्याचा मूळ पुरुष खंडूजी हे धनगर समाजातील असून ते शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला हे वतन होते.
प्रथम हे घराणे खेड तालुका म्हणजे विद्यमान राजगुरुनगर या तालुक्यातील वाफगाव या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या घराण्यातील होळ मुरूम या ठिकाणचे मालीबा नावाचे कर्तबगार पुरुष होऊन गेले. त्यांच्या अकराव्या पिढीमध्ये खंडोजी तथा खंडोजी यांचा मुलगा मल्हाराव होळकर 1693 ते 1766 ही त्यांची कारकीर्द. याच काळात खऱ्या अर्थाने होळकर घराणे उदयास आले.

पेशवा पहिला बाजीराव याने मल्हारराव यांना माळव्यामधील चौथाई व सरदेशमुखी वसुलीचे अधिकार दिले आणि इसवी सन 1730 मध्ये माळव्याचा सुभेदार नेमले. 1730 ते 1766 या कालावधीत मराठी राजकारणाचा मल्हारावांनी उत्तरेमध्ये विस्तार केला. स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांचे पुत्र खंडेराव 1723 ते 1754 ही त्यांची कारकीर्द. त्यांना 1740 मध्ये पेशवाईत शिलेदारीची वस्त्र मिळाली. दिनांक 17 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांचे निधन झाले.

अहिल्याबाई होळकर यांनी 27 मार्च 1767 पासून 1795 पर्यंत होळकर घराण्याची जबाबदारी सांभाळली. मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे.

राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान प्रशासन व्यवस्थेमध्ये केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा की कोणा महाराजाची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. या जगात अपवाद असणारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही.

होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो, “सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असुनही अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ठ प्रशासन केले त्याला जगात तोड सापडणार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी मानते. याचे कारण म्हणजे अहिल्याबाइंची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची अविरत धडपड होय !”

प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे की एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा.
मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडणातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हणजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला.

अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला. मध्ययुगामध्ये सती जाण्याची प्रथा होती. अहिल्याबाई यांनी तो विचार रद्द करून एका अर्थाने सती प्रथेच्या विरुद्ध क्रांतिकारी विचार मांडला. त्यांची ही कृती तत्कालीन समाजातील इतर महिलांसाठी आदर्श घालून देणारी आहे.

अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासुनच सुरु झाली. खंडेरावाची जागा अहिल्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांत व्यस्त असत. सासरा-सुनेतील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारकतेचा उत्कृष्ठ नमुना होय. अहिल्यादेवींना मल्हारराव तोफा-दारुगोळ्याची मागणी ते ज्या मार्गाने ते मोहिम चालवणार आहेत त्याच्या रक्षणाच्या सुचना अहिल्यादेवींना जसे देतांना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सास-याला सल्ले देतांनाही दिसतात. सासरा सुनेचे ऐकेल हा तो काळ नव्हता. आताही फारसा नाही. परंतू मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचे सल्ले अंमलात आणत होता यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते. १७६६ साली मल्हाररावांचा वृद्धापकाळाने मृत्यु झाला.

१७६६ पासून त्यांनी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली. त्यांचा मुलगा मालेगाव हे जरी सुभेदार होते तरी लवकरच त्यांचे निधन झाल्याने अहिल्याबाईंवर पती आणि पुत्राच्या निधनामुळे तसेच सासरे यांच्या निधनामुळे दुःखांची मालिका कोसळली. मात्र त्या या गोष्टीने घाबरल्या नाहीत अथवा डगमगल्या नाहीत. कर्तुत्व संपन्न आणि धीरोदत्त स्वभावाची माणसे अशा घटनांना घाबरत नाहीत. ती शांतचित्ताने विचार करून दूरदृष्टीचा सूक्ष्म विचार करून राज्यकारभार सांभाळतात. आजही आपण महेश्वर येथे आणि इंदोर येथे गेले असता त्याची प्रचिती आपणास येते. आपल्या 28 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये अतिशय कुशलपणे त्यांनी राज्यकारभार करून प्रजाहितदक्ष असा नावलौकिक मिळवला.

दरम्यानच्या काळात अहिल्यादेवींनी स्त्रीयांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू केले. घोडेस्वारी ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण या विद्यालयात दिले जात असे. तत्कालीन स्थितीत ही एक जागतीक क्रांतिकारी घटना होती. घराबाहेर पडायला जेथे बंदी तेथे महिला शस्त्रचालक बनणार ही कल्पनाही त्या काळात कोणी करु शकत नव्हते. स्वत: अहिल्यादेवी उत्कृष्ठ योद्ध्या होत्या. महिला अबला नाहीत हे त्यांनी स्वकर्तुत्वातून सिद्ध केले असले तरी सर्व महिला शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांची स्वत:ची ५०० महिला सैन्याची पलटन उभी होती. अहिल्यादेवींचे प्रशासन हे ब्रिटिशांनाही आदर्शभुत ठरले. सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होते.
सर जदुनाथ सरकार म्हणतात, “सर्व मुळ कागदपत्रे व पत्रव्यवहार पाहिल्यानंतर माझी अशी खात्री बनली आहे कि अहिल्यादेवींखेरीज महादजी शिंदे उत्तरेत कसलेही स्थान निर्माण करु शकले नसते, एवढ्या उच्च दर्जाची राजकीय धोरण असलेली ही महिला होती.”

अहिल्यादेवींनी शेतसारा असो की शेतीसाठीचे पाणी वाटप…यासाठी नुसते बंधारे घालुन दिले नाही तर एक उत्कृष्ठ प्रशासकीय व्यवस्था घालुन दिली.

मध्य प्रदेशातील भोपाळ येथील इतिहास तज्ञ कैलासवासी सुरेश मिश्र यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जल व्यवस्थापनाविषयी खूप छान लेखन करून ठेवले आहे. त्यांचा व्यक्तिगत ग्रंथ संग्रह मोठा होता. अहिल्यादेवी विषयीची माळव्याची कागदपत्र महेश्वर दरबाराची कागदपत्र आणि अहिल्याबाईंच्या काळातील जल व्यवस्थापन ही ग्रंथसंपदा मी त्यांच्या ग्रंथ संग्रहालयातच वाचली आहे.
राज्यात तीर्थयात्री येत. भिल्लादि समुदाय उपजिविकेसाठी नाईलाजाने वाटमा-या करत. अहिल्यादेवींनी त्यांना शिक्षा देण्यापेक्षा विधायक मार्ग निवडला. त्यांच्या गुन्ह्यांमागील कारण शोधले आणि “भिल्लाडी” ही अभिनव पद्धत सुरु केली. या पद्धतीत यात्रेकरुंना संरक्षण देण्याचे काम भिल्लांवरच सोपवले आणि यात्रेकरुंकडुन त्यासाठीचा कर घ्यायची अनुमती दिली. यामुळे यात्रेकरुही निर्धास्त झाले व भिल्लांनाही उपजिविकेचे साधन मिळाले. हा क्रांतीकारी निर्णय फक्त प्रजाहितदक्ष व्यक्तीच घेवू शकत होती. आणि तो अहिल्यादेवींनी घेतला.

अहिल्यादेवी एवढ्या पराक्रमी होत्या की समोर शत्रू कोण आहे त्याचा पुरेपूर अभ्यास करून मग त्या मोहिमेवर उतरत. एकदा खुद्द राघोबा दादा समोर उभा होते. त्या राघोबा दादांना घाबरल्या नाहीत. शेवटी राघोबास माघार घ्यावी लागली आणि गोडी गुलाबी ने समिट करावा लागला.

मध्ययुगात जन्माला येऊनहीं आधुनिक कालखंडामध्ये आपण विचार करू शकणार नाही अशा अनेक कृती अहिल्याबाईंनी केल्या आहेत. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात केलेले जल व्यवस्थापन हा खरा संशोधनाचा विषय आहे. त्यांनी बांधलेले नदीवरील घाट धरणे बारवा खोदलेल्या विहिरी बांधलेले वाडे हा संशोधनाचा विषय आहे. हैदराबादचा निजाम म्हणतो… “Definitely no woman and no ruler is like Ahilyabai Holkar.”

अहिल्यादेवींबद्दल लिहावे तेवढे कमीच असते. अहिल्यादेवींना आम्ही “एक धार्मिक महिला” असे त्यांचे रुप रंगवले आहे. त्या नक्कीच धार्मिक होत्या. महान शिवभक्त होत्या. पण धर्माच्या पलीकडेही मानवी जग असते याचे भान त्यांना होते. उत्तम प्रशासक आणि माणूस म्हणून त्यांच्या कर्तुत्वाचा ठसा आजही मध्य प्रदेशातील प्रशासनावर आहे.
मोरोपंत (केकावलीप्रसिद्ध) ते अनंत फंदी यासारख्यांच्या जीवनात एका शब्दाने बदल घडवून आणण्याचे नैतीक सामर्थ्य त्यांच्यात होते. स्त्रीयांना शक्ती द्यायची तर त्यांना शस्त्रही चालवता आले पाहिजे असा क्रांतिकारी विचार करणा-या त्या पहिल्या पुरोगामी महिला होत्या. स्वत: त्या लिहा-वाचायला शिकलेल्या होत्याच, सर्व स्त्रीयांनाही लिहा-वाचायला यायला हवे हा त्यांचा हट्ट होता.

पुढे क्रांतिज्योति सावित्रीबाइंनी त्यांची परंपरा चालविली. उत्कृष्ठ नागरी व लश्करी प्रशासक, नैतीकतेची आदर्श बिंदू, देशव्यापक विचार करत प्रत्यक्ष कृती करनारी, तुलनेने अल्प भुभाग स्वत:चा असुनही, एकमेव शासिका, विस्कळीत झालेल्या, अवमानित झालेल्या हिंदू धर्मात पुन्हा प्राण ओतणारी दुर्गा म्हणुन अहिल्यादेवींचे भारतीय इतिहासातील स्थान एकमेवद्वितीय महिला म्हणुन कायमच राहील.
अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासामध्ये अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदार वरती कारणीभूत ठरली.
पेशवाई मधील गंगोबा तात्या याने राघोबाचे कान भरून इंदोर संस्थान बळकावून घ्याव्या यासाठी प्रयत्न केले. मात्र गंगोबा तात्या आणि राघोबा दोघांनाही त्या पुरून उरल्या. सामोपचाराने अहिल्यादेवींचा पाहुणचार स्वीकारत त्यांनी माघार घेतली.

अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना म्हणजे त्यांचा लौकिक वाढवणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाईचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर लुटारू दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल. त्यावेळी जात-पात बघितली जाणार नाही. पेशवाईमध्ये असा विचार मांडणारी अहिल्याबाई ही क्रांतीदेवी होय. त्यांनी तशी कृती केली. यशवंतराव फणसे यांना आपला जावई निवडले.

अहिल्यादेवी चाणाक्ष सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये परिस्थितीनुसार त्यांनी सुधारणा केल्या. जनते वरील कर कमी केले शेतकऱ्यांकडून शेत सारा घेतला पण योग्य त्या पद्धतीने. होळकर घराण्याची राजधानी इंदोर वरून त्यांनी 1772 मध्ये नर्मदा नदीच्या किनारी महेश्वर येथे हलवली.
ऐतिहासिक पर्यटनाच्या क्षेत्रात महेश्वर या ठिकाणास खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. आजही तेथे त्यांचा महाल आणि स्वतंत्र वस्तू संग्रहालय आहे. तेथील शिव मंदिरात पूजा करण्याचे भाग्य मला लाभले आहे.
आजही त्या ठिकाणचे साडीच्या क्षेत्रातील सर्वोत्तम साडी असलेले महेश्वर सिल्क प्रसिद्ध आहे. उत्तम हातमागावर तयार केलेली ही साडी जगप्रसिद्ध आहे. त्यांनी जी नाणी पाडली होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्रांनी शिवलिंग यांचे छाप असत. अनेक ठिकाणी अन्नदान जलदान धर्मशाळा पानपोया, जनावरांसाठी आश्रय शाळा अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या.

आजही आपण कल्पना करू शकत नाही अशी एक गोष्ट त्यांनी केली. ती म्हणजे सर्पदंश झाल्यावर तातडीने उपचार मिळावे म्हणून योग्य त्या ठिकाणी आणि आवश्यक त्या ठिकाणी त्या विषयीचे वैद्य नेमले.

आजही अनेक ठिकाणी स्त्रियांसाठी शौचालय नाहीत. अहिल्यादेवींच्या राज्यात स्त्रियांना सुरक्षित स्थानासाठी आणि योग्य त्या ठिकाणी शौचालयांची उभारणी केली. अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, ऋषिकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदयपूर, चोंडी या ठिकाणी त्यांनी मंदिर संस्कृती उदयास आणली. त्याचप्रमाणे सोरटी सोमनाथ, ओमकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढा नागनाथ, काशी विश्वेश्वर, विष्णू पाद महाकालेश्वर या मंदिरांचा जीर्णोद्धार करून भारताच्या मंदिर संस्कृतीच्या इतिहासात स्वतःच्या स्थापत्यशैलीचा एक ठसा उमटवला.

वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चोंडी, नाशिक, इंदूर जवळ जांब त्रंबकेश्वर या ठिकाणी नद्यांवर विस्तीर्ण असे घाट बांधले.
गोकर्ण, महाबळेश्वर, उज्जैनी, भीमाशंकर, रामेश्वर या ठिकाणी अन्नसत्र उभारली.

त्याचप्रमाणे जेजुरी येथील श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री इंदोरला मालेगाव व गौतमीबाई यांची छत्री महेश वरला मुक्ताबाई च्या स्पर्धा नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले.

अहिल्याबाईंचा मोठा ग्रंथ संग्रह होता. निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा, महात्मा मुहूर्त, चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावण मास महात्म्य इत्यादी ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती त्यांच्या संग्रहात आहेत. महेश्वर येथील वस्तुसंग्रहालयात यापैकी काही आपणास पहावयास मिळतील.

अहिल्याबाई होळकर यांचे १३ ऑगस्ट १७९५ रोजी मध्य प्रदेशातील महेश्वर येथे त्यांचे निधन झाले. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व, महिला सुधारक, जल व्यवस्थापनाच्या तज्ञ अशा कितीतरी उपाध्यांनी त्यांना गौरविण्यात येईल.
विशेष म्हणजे अजून अहिल्याबाई यांचे जल व्यवस्थापन आणि बारावी स्थापत्य या विषयावर उत्तम प्रकारचे सखोल आणि सूक्ष्म संशोधन होणे गरजेचे आहे.

— लेखन : प्रा डॉ लहू गायकवाड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अहिल्यादेवी यांच्या वरचा लेख, छान 👌👍 ही त्यांच्या आठवणीनिम्मित एक आदरांजलीच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments