कोजागिरी पौर्णिमेचे आनंदपर्व आटीव दूध, शर्करा, केशर अन पौष्टिक मेव्याने सजलेले असते. तद्वतच २८ ऑक्टोबर २०२३ च्या कोजागिरीच्या दिवशी चाळीसगावचे जेष्ठ साहित्यिक श्री विश्वास देशपांडे यांचे प्रकाशित झालेले ‘आनंदनिधान‘ हे नवे पुस्तक ‘आनंद-सुधा’ च आहे असे प्रतीत होते.
पुस्तकाचे नाव सार्थ ठरवणाऱ्या मुखपृष्ठावरील प्रसन्न सूर्यफुले, निळाईच्या पार्श्वभूमीवर खुलून दिसतात. एकंदरीत लेख ३३, एखाद-दोन अपवाद वगळल्यास ४-५ पानात आटोपशीर रित्या, मुद्देसूद अन गुटगुटीत शब्दकळात बांधलेले, हे विश्वास सरांचे बलस्थान आहे, आधीच्या आणि या साहित्य निर्मितीचे देखील! वाचकांना त्यांच्या ललित लेखनाच्या लालित्याचा लळा लागलेला आहेच. त्यांच्या दृष्टीने अखिल सृष्टीच आनंदनिधान अर्थात आनंदाचा झरा आहे. हे जे आनंदामृत पाझरणारे स्रोत आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनाचाच भाग आहेत. मात्र त्यांत आनंददायी रंग शोधण्यासाठी रसिक वृत्ती हवी विश्वास सरांसारखी !
पुस्तकातील कांही बोलकी उदाहरणे देते. आपला दिवस घड्याळाच्या काट्याबरहुकूम चालतो. मात्र ‘निसर्गरुपे’ या प्रदीर्घ लेखात दिनदर्शिका एखाद्या लावण्यलतिकेच्या बदलत्या रूपाला न्याहाळणाऱ्या दर्पणासारखी आहे. इथे प्रभात, दुपार, संध्याकाळ अन रात्र यांची अप्रतिम निसर्गचित्रे, शब्दांचे आकर्षक रंग लेऊन आनंदाचे इंद्रधनुष्य वाचकांसमोर उभे करतात. त्याचप्रमाणे आपले आयुष्य आनंदविभोर करणारे सण, त्यांची सांस्कृतिक परंपरा अन त्यांचे आजचे रूप, इत्यादींचा उहापोह गुढीपाडवा, दीपावली अन संक्रांत यांवरील लेखात उत्तम तऱ्हेने सादर झाला आहे.
‘आँखों से जो उतरी है दिल में’ या लेखाचे शीर्षकच संगीतमय. विश्वास सरांच्या संगीताच्या आवडीचे प्रतिबिंबच. संत ज्ञानेश्वर असोत की ग दि मा, त्यांची ‘ऐसी अक्षरे मेळवीन’ असे ब्रीद असले की हे अक्षर माहात्म्य ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण करणारच. हाच अनुभव या लेखातून येतो. वाचन संस्कृतीशी संबंधी ‘सरीवर सरी आल्या ग’ चे फील देत बरेच लेख पुस्तकात विखुरलेले आहेत. यातून जाणवते की आधी हाती पुस्तक धरून सुविद्य व्हावे, अन मग त्याच हाती अलगद लेखणी धरावी, मग बघा सरस्वती त्या लेखणीत अवतरते की नाही! याच विषयाचे धागे दोरे गवसले, ते पुढील लेखात, ‘देणाऱ्याचे हात हजारो’. वाचनालय म्हणजे अभ्यासू व्यक्तींचे अक्षरशः दुसरे घरच. विश्वास सरांच्या चाळीगावातील एक दर्शनीय आणि श्रद्धेचे स्थान म्हणजे ना बं वाचनालय! याची ग्रंथसंपदा नेत्रदीपक आहेच, पण येथील लक्षणीय कर्तृत्व म्हणजे ८४ वर्षांची अभूतपूर्व परंपरा जपत प्रज्वलित असणारी ज्ञानज्योती, अर्थात ‘सरस्वती व्याख्यानमाला’! वाचन, श्रवण, चिंतन आणि मनन या आयुष्य समृद्ध करणाऱ्या पायऱ्यांचे गुणगान करणारा हा लेख अतिशय भावला !
तसाच एक अन्य लेख ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या विषयावर असून लगेच ध्यानात येते की, आजच्या क्षणी कालच्या थोर वक्त्यांची भाषणे आपल्याला का स्मरतात. साहित्य, इतिहास, राजकारण, पुरातन संस्कृती अशा विविध प्रांतातील अजरामर वक्त्यांची नामावली या लेखात आहे. जनतेसमोर आपले वैचारिक दारिद्रय प्रकट करण्याचे आजच्या नेत्यांचे हक्काचे स्थान म्हणजे राजकारणी व्यासपीठ. हा विरोधाभास उद्विग्न करणारा, म्हणूनच हा लेख प्रासंगिक आहे. याच वाचन परंपरेत ‘साहित्य अभिवाचनाची पंढरी- चाळीसगाव’ या लेखात २००० सालापासून ‘इवलेसे रोप लावियले दारी’ अन त्यातून आता दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या अभिवाचन स्पर्धेचा डेरेदार वृक्ष कसा फोफावलाय याचे विश्वास सरांनी साद्यन्त अभिमानपूर्वक केलेलं वर्णन नक्की वाचावे. चाळीसगावाच्या सकस मातीत सारस्वतांची सुमने कशी उमलतात हे त्यातून कळून येते. लेखकाची चतुरस्त्र लेखणी आणि भाषणे याच समृद्ध मातीची देणगी असावी असे वाटते.
लेखकाचं संतवाङ्मयावर विशेष प्रभुत्व आहेच. भक्तिरसात न्ह्यालेला स्वामी समर्थांची अगाध लीला प्रकट करणारा स्वामीकृपा नावाचा अद्भुत लेख अंतर्मुख करून गेला. या विज्ञान युगात असे कांही चमत्कार घडतात, ज्यामुळे ईश्वराच्या अस्तित्वाची अन सानिध्याची प्रकर्षाने खात्री पटते. ही कहाणी केवळ स्वामीभक्तांसाठीच नव्हे तर, त्या प्रत्येकासाठी असावी, ज्यांची कुठली ना कुठली श्रद्धास्थाने आहेत.
एक खास लेख भावनावश करून गेला. ‘कृतज्ञता’! २ डिसेंबर २०२२ रोजी कार अपघातातून बचावल्यावर लेखक आणि त्यांच्या पत्नीवर त्यांच्या शुभचिंतकांनी केलेला सदिच्छांच्या आणि प्रेमाच्या वर्षावाने भारावून जाऊन लेखकाने लिहिलेला हा लेख अति हृदयस्पर्शी आहे. विश्वास सरांचे भावनाशील मन यात प्रकट होतेच, पण ऋजू व्यक्तिमत्वामुळे आणि सरस साहित्य निर्मितीमुळे वर्धिष्णू झालेला त्यांचा लोकसंग्रह किती विशाल आहे याची जाणीव नक्कीच होते.
एक लेख मनापासून भावला! मराठी संगीत नाटक म्हणजे जणू आपल्या जिवाचा जणू जिवाभावाचा मैतरच! ‘संगीत देवबाभळी’ या गाजलेल्या संगीत नाटकाचा जिवंत अनुभव लेखकाने नाटकाच्याच नावाच्या लेखात विशद केलाय. उत्कट भावानुभूती साकार करतांना एक तरी ओवी अनुभवावी, तसेच या नाटकाचा एक तरी प्रयोग अनुभवावा! नाटकाचे हे रंगमंचीय समीक्षण अगदी ‘इंद्रानीच्या डोहासारखेच’ गहिरे अन मनाचा ठाव घेणारे आहे !
वाचकांना एक लेख वाचून जाणवेल की विश्वास सर कलेचे भोक्ते आहेतच, पण ते जेथे जातील तेथील वैशिष्ठे टीप कागदापेक्षाही अधिक चाणाक्ष नजरेने टिपून घेतात. पुरातन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे, इत्यादींवर त्यांचे लेख वाचनीय आहेतच. मात्र हा विशेष लेख आहे, ‘अजिंठ्याच्या लेण्यांतून घडणारे बुद्ध दर्शन’. बोधिसत्व पद्मपाणी या जगप्रसिद्ध चित्राचे मूर्तिमंत वर्णन असो वा बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे चित्रण करणारी दृश्ये असोत, विश्वास सरांनी या दीर्घ लेखात हे सर्व त्यांच्या ओघवत्या भाषेत वर्णन केले आहे. अजिंठा लेण्यांना भेट देण्याआधी हा लेख वाचला तर या लेण्यांच्या अभिजात सौंदर्याचा आपण अधिक बारकाव्यांनिशी अनुभव घेऊ शकतो.
या पुस्तकात हास्यरसाची हलकी फुलकी कारंजी निर्माण करणारे मोजके लेख आहेत. ‘अग्ग बाई, अरेच्या!’ विश्वास सर असे विनोदी लिखाण देखील करतात बरं का, ही खात्री पटते. वानगीदाखल एक लेख! ‘इकडची स्वारी’! विषय मजेशीर, नवऱ्याला बायको काय काय म्हणून संबोधते हा! याची सुरुवात ‘इकडची स्वारी’ पासून उत्क्रांती पावत आजच्या पिढीतील नवऱ्याला सर्रास नावाने (कधी नावे ठेवत) नवी अन जुनी नवरी कसली हाक मारते हे दर्शवले आहे. आपल्या लेखनकौशल्याने खुसखुशीत खुमारी भरत लेखकाने या नावरसाचा गोडवा सुंदर रित्या वाचकांना उपलब्ध करून दिलाय. कशीही हाक मारा, पण प्रेम अबाधित असू द्या, हा लेखातील सुरेख संदेश हृदयात घर करून गेला. आणिक एका विनोदी लेखाचा उल्लेखच करते मंडळी ! ‘खाणाऱ्याने खात जावे’ हा खाद्य संस्कृतीवर आधारित लेख मूळ पुस्तकातूनच अस्सल भोजनभाऊ (अथवा बहीण) बनून अधाशासारखा आकंठ ओरपावा ही नम्र विनंती. वाचकहो, ही झाली काही लेखांची ओझरती झलक !
विश्वास सरांच्या पुस्तकांची लेटेस्ट संख्या १०, पण त्यांची साहित्यिक गुणवत्ता मात्र १०० टक्क्याहून अधिक, बावनकशी सोन्यासारखी! आधीच्या लोकप्रिय (त्यातील दोन पुरस्कृत) पुस्तकांच्या सोबतच हे पुस्तक देखील प्रसिद्धी पावेल यात शंका नाही. मंडळी, आपल्याला जीवनात हव्यास असतो आनंदाच्या क्षणाचा. ‘हवास मज तू, हवास तू’ सारखे बेफाम गाणे गात आपण त्याच्या शोधात असतो! मात्र आपल्याच सभोवती नजर पोचेस्तोवर आनंदाची असंख्य बेटे आहेत हे जाणवायला अन त्यांच्यापर्यंत पोचण्यास जास्त कांही करण्याची गरज नाही, कागदाची कोमल नौका पुरे. अट एकच! ही नौका बनवण्याकरता कागद मात्र ‘आनंदनिधान’ या पुस्तकाचा हवा. यासाठी हे पुस्तक घेणे आणि इतरांना देणे आलेच! कसे अन कुठे ते सांगते, पण हे आनंदपर्व केव्हा साजरे करायचे ते तुम्हीच ठरवायचे !
— परीक्षण : डॉ. मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800