‘जागरण’ हे लेखक भारत सातपुते ह्यांचे आत्मचरित्र नुकतेच वाचले.
‘जागरण’ म्हणजे गोंधळ. लग्नापुर्वी रात्री खंडोबा, देवी, ज्योतिबा ह्यांच्या नावाने पुजाअर्चा करुन रात्रभर जो कार्यक्रम करतात. त्यालाच गोंधळ-जागरण संबोधले जाते. लेखकाच्या आई-वडिलांचे हलाखीचे जीवन, कोरड शेतीबाडीवर उपजिविका असलेल्या ग्रामीण भागात गेलेले त्यांचे जीवन, तसेच भीषण दुष्काळाला तोंड देण्याची वेळ अशा विविध प्रसंगांची मांदियाळी, लेखकाला सतत प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जावे लागले हेच दर्शविते. दुष्काळात शाळेत मास्तरांनी दिलेली सुकडीची खीर दोन वेळ कशी खावी लागली. हे प्रसंग १९७२ च्या दुष्काळाची दाहकता दर्शवितात.
लेखकाला जीवनाशी सततच संघर्ष करावा लागला. हे आपणांस जागरण या आत्मचरित्रात दिसून येते.लेखक आणि त्यांची बहीण भावंड त्यांनी शिकाव यासाठी भाऊ आणि आई यांचा चाललेला आटापिटा, स्वत: भाऊ यंनी अर्धवट शिक्षण सोडले. आईचेही शिक्षण थोडेच झाले. तरी मात्र आपल्या मुलांनी संपूर्ण शिक्षण घेऊन पुढे जाव, चांगली जीवन जगाव अशी त्यांची इच्छा वाखाणण्या जोगीच दिसून येते.
शिक्षण घेण्यासाठी बालवयातही शाळा सुटल्यावर वेगवेगळी करावी लागलेली कामे, अठराविश्व दारिद्र्य, उपासमार हे बघून अंगावर काटा उभा राहतो. गल्लीत मुलींच्या अंगावरील दागिने बघून लेखकाच्या बहिणीलाही असे दागिने आपल्यालाही पाहिजे असे वाटणे साहजिकच होते. मग ती शेताकडे आल्यास खेळताना बाभळीची फुलं कानात घालायची. अन त्याच बाभळीच्या वाळलेल्या शेंगा एका दोऱ्यात ओवून त्याचं पैंजण करायची. त्या शेंगांचा आवाज तिला आनंद द्यायचा. राखी पौर्णिमेला दुकानातली राखी घेण शक्य नव्हत. मग कापसाला दोरा बांधून ओल्या हळद कुंकूवात बुडवून त्याची राखी तयार करुन ती तिच्या गुरुजींच्या घरी जावून त्यांना बांधायची. त्यांनी ओवाळणीत टाकलेल्या एक-दोन पैशांत नवी पाटी आणायची.
उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने गुन्हा रद्द केला. तेव्हा खूप जण म्हणाले, ‘सर त्या मॅडमवर अब्रु नुकसानीचा दावा ठोका. जे जे चुकांना, अकार्यक्षमतेला, स्वार्थाला, ढोंगीपणाने जातीची धर्माची ढाल वापरतात. ब्लॅकमेल करतात त्यांना अद्दल घडली पाहिजे. नाही तर असंच सत्याला रोज मरत मरत व हारत हारत जगण्याची सवय लागेल. खोटारडे पाप करुनही पतिव्रतेसारखे उजळ माथ्याने फिरतील. या खोट्या गुन्ह्याचा कट रचणारे, या खोट्याला चालना देणारे, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या कुप्रवृत्तीची पाेळी भाजून घेणाऱ्या दारुड्या, पार्टीबाज प्रवृत्तीच्या नानाला वैयक्तिक फौजदारी दाखल करुन गुन्हा नोंद करावा’. असा सल्लाही मला काही मित्रांनी दिला. या सर्व बाबींवर थांबलो नाही. वकीलांशी सल्ला मसलत सुरु केली. त्याची फी परवडणारी नाही असे वाटल्याने स्वत: केस लढवता येईल का ? असा मनात विचार सुरु झाला. त्या दिशेने पाऊलही उचलाया लागलो. यातच वेळ, शक्ती किती वाया घालवावी असाही विचार येत होता. चिखलावर दगड फेकला तर आपल्याच अंगावर चिखल येणार हे खरे असले तरी या चिखलातून सुंदर कमळ उमलते हेही खरे. म्हणून सुराज्यासाठी या युध्दाचा प्रवास चालूच ठेवला व चालूच राहणार. हेच या जागरणाचे वास्तविक स्वरुप आहे.

लेखक भारत सातपुते ह्यांनी याच रुपाने समाजाला जागे होऊन संघर्ष करुन न्याय मिळवण्याचा लढा देण्याचा संदेश दिलेला आहे. यामुळे समाजात किमान जागरण व्हायला सुुरवात होईल. समाज एकदा जागा झाला की जागरण होण्यास वेळ लागणार नाही. आणि तेव्हाच सत्याची, न्यायाची लढाई खऱ्या अर्थाने आपण जिंकलेली असेल. तेच खरे जागरण असेल.

— परीक्षण : संजय निकम. मालेगांव, जि. नाशिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800