Saturday, July 20, 2024
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

“चंद्रकला”

“चंद्रकला”चे लेखक श्री राजाराम गो. जाधव हे २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव या उच्च पदावरून निवृत्त झाले आहेत. सेवेत असतांना आपले काम अतिशय निष्ठेने ,प्रामाणिकपणे करतांना आपली साहित्याची आवडही त्यांनी जोपासली . त्यांच्या अफाट लेखनापैकी चंद्रकला हे एक नव्यानेच प्रकाशित झालेले पुस्तक.मुंबई येथील न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने हे पुस्तक सुबकरित्या प्रकाशित केले आहे.ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा यवतमाळला अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला! विशेष म्हणजे “चंद्रकला”ची नायिका खुद्द चंद्रकला ताई या सोहळ्याला सहपरिवार हजर होत्या. हे कळल्यावर चंद्रकला वाचण्याची माझी उत्सुकता मी टाळू शकले नाही.

“जहाँ चाह वहाँ राह” ह्या म्हणीप्रमाणे खुद्द लेखक महोदयांनी हे पुस्तक मला उपहार स्वरूप पाठविले. वैयक्तिकरित्या त्यांचा माझा विशेष परिचय नसतांनाही ही भेट पाहून श्री राजारामजींच्या सहृदयतेची पावतीच मिळाली.
चंद्रकला वाचून त्यावर लिहायचेच असं मनाशी ठरवले तो योग् आज आला.

चंद्रकला हीं क्षुद्र समजल्या जाणाऱ्या उपेक्षित समाजातील, शिक्षणाची ओढ असणाऱ्या एका गरीब मुलीची कथा आहे.
या पुस्तकात एकंदर तेरा प्रकरणे आहेत.पहिल्या काही प्रकरणात वडिलांचे छत्र हरवलेली लहानगी चंद्रकला आई मनकरणा सोबत आजंतीला आपल्या अर्जुन मामाकडे येते . बहिणीचे दुःख भावाला पाहिल्या जात नाही . भाऊ शेजारच्या महादेव सुतार व गावाचे रामराव पाटील यांच्या मदतीने बहिणीचे लग्न आजंतीच्या रेल्वे स्टेशन वर काम करणाऱ्या आत्माराम मुकादम शी ठरवतात . त्याचीही पत्नी नुकतीच स्वर्गवासी झालेली असते .घरात तो व त्याची म्हातारी आई असते. सगळ्यांच्या सल्ल्याने व सहकार्याने हा गांधर्व विवाह आनंदाने पार पडतो. ही सर्व माहिती सविस्तरपणे पहिल्या पाच प्रकरणात आहे.

सहाव्या प्रकरणात चंद्रकलेच्या आईच्या नवीन घरात गृहप्रवेशाच्या प्रसंगाचे सुंदर वर्णन आहे. चंद्रकलेला शिक्षणासाठी मामाकडेच राहावे लागणार म्हणून आई चे मन अस्वस्थ असते. चंद्रकला हुशार, शिक्षणाची खूप आवड, अर्जुन मामामुळे शिक्षण घेताना प्रेमळ मामीच्या सहवासात घरकामातही तरबेज होते. चौथीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली चंद्रकला टायफाईड ने आजारी होते. योग्य उपचार व मामीच्या देखभालीमुळे पुन्हा नव्या हुरूपाने अभ्यास करून चौथीच्या परीक्षेत जिल्ह्यातून पहिली येते. सातवीची परीक्षा बोर्डाची! त्यातच मामांची बदली दुसऱ्या गावात झालेली! ही परीक्षा तालुक्यात होणार असते. पाटलांच्या उदार वृत्तीमुळे सगळ्या मुलांची परीक्षेदरम्यान त्यांच्या वाड्यात तालुक्याच्या राहण्याची चांगली सोय होते व चंद्रकला ७ वीची ही परीक्षा चांगल्या गुणांनी पास होते.

८ ते १० प्रकरणात गावात सखाराम महाराजांच्या कीर्तनाविषयी माहिती आहे. तसेच अर्जुन मामाचा विद्यार्थी निंबाजी भगत शी चंद्रकलेचा विवाह ठरणे ह्याविषयी सविस्तर वर्णन आहे .निंबाजी हा अतिशय हुशार विद्यार्थी, पण प्री युनिव्हर्सिटीच्या परिक्षेच्यावेळी सुपरवायझरचा गैरसमज होऊन त्याचा निकाल रोखल्या जातो व त्याचे शिक्षण थांबले असते. अर्जुन गुरुजी च्या प्रयत्नाने त्याला पुसदच्या श्री भाऊसाहेब खडसे शाळेत लिपिक म्हणून नोकरी लागते. गुरुजींचे उपकार फेडले पाहिजेत ह्या भावनेने निंभाचे वडील चंद्रकलेचे लग्न निंभाशी करायचे ठरवितात. ह्या साऱ्या घटना १२ व्या प्रकरणापर्यंत आल्या आहेत.

तेराव्या प्रकरणात चंद्रकलेचे स्वतःचे मनोगत आहे .लग्नानंतर वाढत्या संसारातही तिची शिक्षणाची आवड तिला स्वस्थ बसू देत नाही. ह्याच काळात तिला राजाराम जाधवसारखा भाऊ मिळतो. त्याच्या प्रोत्साहनाने अनेक अडचणी पार करीत नायिका एम ए एम एड पर्यंत मोठा पल्ला गाठून राज्य सरकारच्या अध्यापक कॉलेज मध्ये नोकरी मिळवते. तीन मुली असून मूलगा नसल्याची खंत असलेल्या ह्या कष्टाळू जोडप्याला पुत्र चैतन्याच्या रुपात नवचैतन्य मिळते.
अशी ही धडपडणाऱ्या चंद्रकलेची खरीखुरी कहाणी; लेखकाने अगदी बारीक बारीक तपशिलासह या पुस्तकात सांगितली आहे.

काही वेळा माहिती थोडी लांबली ही आहे. काही प्रकरणात कुणी आपल्याशी बोलत आहे, असेही वाटते. तरीही लेखकाचा चंद्रकला लिहिण्यामागचा उद्देश सफल झाला आहे यात संशय नाही.

लेखक राजाराम जाधव

पुस्तकाला दलितमित्र श्री श्रावणजी सोनोने, यवतमाळ ह्यांची वास्तववादी प्रस्तावना व लेखकाचे मनोगत आहे.
एकंदर १२२ पाने असलेल्या ह्या पुस्तकातील लेखकाचा परिचय वाचून लेखकाचे सामाजिक, शासकीय कार्य किती मोठे आहे ह्याची कल्पना येते.
वाचतांना मला स्वतःला काही त्रुटी वाटल्या तरी त्यात लेखकाचा शुद्ध भाव स्पष्ट होतो.
जीवनात काही तरी मिळवायचे आहे व ते कितीही अडचणी असल्या तरी आपण स्वप्रयत्नाने व आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर मिळवू शकतो हा प्रेरणादायी संदेश या सत्य कहाणीवरून निश्चित च वाचकांना मिळेल ह्याची मला खात्री आहे.

प्रतिभा पिटके.

— परीक्षण : प्रतिभा पिटके. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments