‘ऐन विणीच्या हंगामात‘
वाचकांच्या काळजाला भिडणारं काव्य आपल्या लेखणीतून अगदी अविरत जपणारे कवी श्री. पुनीत मातकर यांच्या ‘ऐन विणीच्या हंगामात’ या काव्यसंग्रहाला नुकताच ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार २०२२- प्रथम प्रकाशन सर्वोत्कृष्ट कविता संग्रह बहिणाबाई चौधरी’ हा पुरस्कार जाहीर झाला. या निमित्ताने काव्यसंग्रहावर व्यक्त व्हावं असं वाटत असलं तरीही एक लेखिका किंवा कवयित्री म्हणून माझी लेखणी या संग्रहाबद्दल विवेचन करताना अपूर्णच ठरेल.
काव्यसंग्रहाचे शीर्षक आणि मुखपृष्ठ वाचकाची उत्सुकता वाढविते. कवीने व्यक्त केलेले मनोगत आणि त्यानंतरची अनुक्रमणिका वाचकाला पुढल्या प्रत्येक पानावरची कविता वाचायला भाग पाडते. या काव्यसंग्रहातील अनुक्रमणिका विशेष वेधक ठरते ती कवितांच्या सात भागातील विभागणीमुळे. “हे कोणते ऋतू आलेत?” “गळून पडले झूल” “उत्तराचे कोवळे डोळे” “असे दंश मोरपंखी” “अपूर्ण कवितांच्या वहीतून” “अबोल नोंदवहीवरची धूळ” “हजारो इंगळ्यांच्या दंशातून” हे सात भाग म्हणजे माणसाच्या आयुष्यातील सप्तरंगी अंकच जणू! कवितेचा माणूस म्हणून जगतानाचा आणि या जगरहाटीत टिकतानाचा प्रवास वाचकाला अंतर्मुख करत जातो.
मुक्तछंदात व्यक्त होताना काव्यातली सहजता टिकवून ठेवणं तसं अवघडच असतं. मुक्तछंद दिसतो भासतो तेवढा तो सोपा नसतो. मात्र संग्रहातील हरेक कवितेत तो इतक्या सहजतेने हाताळला गेला आहे की प्रत्येक कविता जेवढी मुक्त आणि सहज तेवढीच ती आर्त होत जाते.
“मी डोळे मिटतो तेव्हा
देहभर विखुरलेले
जखमी चंद्राचे तुकडे
चिरत नेतात
आतल्या आत माझं
माणूसपण”
कवीने मुक्तछंदात शब्दांची गुंफण एवढी नेमकी साधली गेली आहे की ती वाचकाला कवितेवर खिळवून ठेवते… त्याला वारंवार कविता वाचायला आणि कवितेवर मनन चिंतन करायला भाग पाडते.
“मी भिडतो आयुष्याला
मज प्रश्न नव्याने पडतो
उत्तरे दुरूनच हसती
मी संदर्भाशीच अडतो”

कवीने आपल्या या संग्रहात विषयांची विविधता जपलेली आढळते. मात्र ही विविधता जपताना काव्यातली संवेदनशीलता… आशावाद… माया… ममता… करुणा… ही मनोविज्ञान जाणणारी मूल्ये तसूभर कमी झालेली आढळत नाहीत. किंबहुना, वाचक या भावस्पर्शी कविता वाचताना जाणिवेच्या… नेणिवेच्या आणि सहवेदनेच्या डोहात बुडून न गेला तर नवलच! ‘आरास’ ‘चित्र’ ‘पुस्तकं’ ‘सतरंजी’ ‘बालपण’ ‘गणगोत’ ‘निगेटिव्ह स्साला…!’ ‘माती’ ‘जांभळं’ ‘सय’ ‘लिपी’ ‘समुद्र’ ‘पोरी’ ‘ती’ ‘धूळ’ अशा विविधांगी कविता मनुष्याच्या आयुष्याचा आरसा ठरतात. वाचक यातल्या कित्येक कवितांमधून स्वतःला शोधत जातो आणि याचं श्रेय जातं ते काव्यातून मांडल्या गेलेल्या तरल भावभावना आणि अनुभवांना!
‘उफ्’ कवितेतील अम्मी वाचकाला आपल्या आईच्या आयुष्यातील खडतर प्रवासाकडे घेऊन जाते तर ‘सतरंजी’ वाचतांना तिचं काळाच्या ओघात देखील रंग न बदलणं आणि परिस्थिती बदलताना खुर्चीच वाढणारं महत्व कुठेतरी आपल्या आयुष्याशी मिळतं जुळतं वाटतं. कवी कास्तकार कुटुंबातून आलेला आहे आणि मातीशी बांधली गेलेली नाळ त्याच्या काव्यात अधिक घट्ट झालेली दिसते. काळ कितीही पुढे गेला आणि देश कितीही विकसित झाला तरी आजही आमचा कास्तकार आणि त्याच्या कुटुंबाला अनेक समस्या भेडसावतात. कास्तकार आणि त्याचे कुटुंबीय या संकटांचा मोठ्या धीराने सामना करतात. ‘गणगोत’ वाचतांना असाच एक खंबीर बाप अन् त्यानं त्याच्या छत्रछायेखाली ऊभ केलेलं मानी कुटूंब कित्येक कास्तकार मंडळींसाठी एक आदर्श ठरतो. ‘अपूर्ण कविता’ वाचताना एका कास्तकार कुटुंबातील कहाणी डोळ्यासमोर उभी रहाते. बहीण भावाच्या नात्यात भावाच्या शिक्षणासाठी बहिणीने केलेला त्याग वाचकास आपल्याच कुटुंबातील भावंडाचा वाटतो आणि त्या हळव्या मात्र तेवढ्याच खंबीर प्रसंगातून जन्म घेते ‘अपूर्ण कविता’…!
कवी ‘प्रश्न’ या कवितेतून कित्येक कविंच्या मनाचा ठाव घेताना आणि कविंच्या समस्यांवर व्यक्त होताना दिसतो…!
“तो सापडलाय
कविता अन् भाकरीच्या
विचित्र आवर्तनात
त्याच्या सुटकेचा बीजमंत्र
कोणत्या महाकाव्यात
असेल?”
संग्रहाचे कुठलेही पान उघडून वाचायला सुरवात कराल तर एक आशयघन… अर्थपूर्ण… आर्त कविता तुमची वाट बघत असेल. ती तुम्हाला आपल्याच अनुभवातली वाटेल.
“ओरडू लागतात हौशी
पाखरं कानाजवळ
लाईक शेअर कमेंटचा
बेसूर आलाप घेत”
कवीची कविता सर्जनशील ठरते कारण ती जपते वात्सल्य… स्त्रीचं मनोविश्व…! या कारणाने कविता तिच्याबद्दलचे ऋणानुबंध जपणारी ठरते! आपल्या कवितेतून कवी कधी झाडांशी बोलताना दिसतो तर कधी कित्येक भेद खोलताना दिसतो कधी समाजातल्या विदारक वास्तवाशी भांडताना दिसतो तर कधी आतले कोलाहल मांडताना दिसतो!
“हा प्रचंड कोलाहल
मला का ऐकू येत नाही
श्रुतींना हे कसलं शुष्क विलेपन
करून ठेवलंय मी?”
संग्रहातील कविता माणसांची कविता ठरते कारण ती अनुभवातून व्होकल होताना दिसते…! कवी सोबत त्याच्या कवितांनी देखील गावाकडल्या बैलगाडीपासून ते मुंबईच्या लोकल पर्यंत… नदी समुंद्रापासून ते गडचिरोलीच्या दाट जंगलांपर्यंत अगदी आत्मीयतेने प्रवास केलेला दिसतो. गावाकडचं बदलतं रूप… हरवत चाललेली गावरान सहजता… तिथलं बदलतं वातावरण आणि बदलती माणसं यावर व्यक्त होताना कवी म्हणतो,
“हे कसलं रूप धारण केलंय
“अर्धशहरीग्रामेश्वर” ?
ही कोणत्या तांडवाची
चाहूल असेल?”
‘बालपण’ असेल नाहीतर ‘इतकं सोप्प नसतं’ कवीने एका बापाच्या मनातील कोलाहल अचूक वेधलेला आहे. या कविता वाचल्यानंतर वाचक देखील कुठेतरी अंतर्मुख होत जातो.
“बाप आभाळागत गाभुळतो
रात्रीगत व्याकुळतो
आकाशागत विस्तारतो
विजांगत कडाडतो
निखाऱ्यावर फुरफुरतो
पावसात भडभडून येतो
तरीही तो जाणवू देत नाही
उरातला कोलाहल”
कवीच्या कित्येक कविता आयुष्याच्या तत्त्वज्ञानावर बोलताना दिसतात…! कृष्ण, येशू, राहुल, सिद्धार्थ यांचे दाखले कविता अधिक मार्मिक बनवितात. ‘उत्तर’ ही कविता वाचताना एवढी मार्मिक होतं जाते की ती वाचकाला शेवटी निरुत्तर करते…! वेदनेतून प्रसवलेली कविता सच्ची असते. जेवढी मनाची अस्वस्थता शिगेची तेवढीच कविता खोल आणि आर्त होतं जाते. संग्रहातील बहुतांश कविता अगदी आर्त मनाच्या गाभाऱ्यातून प्रसवल्याची प्रचिती येते.
“हजारो इंगळ्यांच्या दंशातून जन्मते
अस्सल कवितेची एक ओळ
एकाच कवितेत भोगतो कवी
हजारदा मरणकळा”
असं म्हणतात, “कविता हा कवीचा श्वास असावा… माणुसकी जागविणे हा कवीचा ध्यास असावा!” हा काव्यसंग्रह देखील माणुसकी जागविणाऱ्या माणसांच्या कवितांचा संग्रह आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही आणि याची अनुभूती देते ती ‘प्रार्थना’ ही कविता
“दाण्यासाठी झुरू नये
चोच कुण्या पाखराची
भुकेसाठी आटू नये
माय कुण्या लेकराची”
कवितेबद्दल आत्मीयता असणाऱ्या प्रत्येकाने एकदातरी माणसातील माणूसपण जागविणाऱ्या कवितांचा बारमाही हंगाम जपणारा ‘ऐन विणीच्या हंगामात’ हा श्री.राजन बावडेकर यांच्या लोकवाङमय गृह प्रकाशित श्री. पुनीत मातकर लिखित काव्यसंग्रह अवश्य वाचावा. कवी आणि काव्यसंग्रहाला पुढील दैदिप्यमान वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा!

— परीक्षण : तृप्ती काळे. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800