“एक मनोहर कथा“
गोव्याचे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा उद्या, १७ मार्च २०२४ रोजी ५ वा स्मृतिदिन आहे़. त्यानिमित्ताने त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचा हा परिचय.
मनोहर पर्रिकर यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
मंगला खाडिलकर या निवेदन क्षेत्रातील महान व्यक्ती. त्या मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी निवेदन, निरूपण, सूत्रसंचालन, मुलाखती व एकपात्री कार्यक्रम देशांत व परदेशांत केले आहे़त. त्या क्षेत्रातील त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्या निवेदन, सूत्रसंचालन विषयक शिबिरांत मार्गदर्शन करतात. वृतपत्र , दिवाळी अंक , गौरव ग्रंथ यासाठी सातत्यपूर्ण लेखन करतात. त्यांची आपलीच माणसं , सुमनसुगंध , स्वरभास्कर ही पुस्तकं वाचकप्रिय झाली आहेत. या पुस्तकांना मिळालेला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चरित्र लिहिण्याचे ठरवले.
मंगला खाडिलकर यांनी पर्रीकर यांचे चरित्र आगळ्या वेगळ्या पध्दतीने लिहिले आहे़. त्यांनी पर्रीकर यांचे आप्तस्वकीय , सहकारी , मित्र , सहयोगी व निरीक्षकांनी मांडलेल्या संवादातून चरित्र निर्माण केले. हे बघितल्यानंतर कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेतील खालील ओळी आठवल्या ,
” कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी l
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी ” l
मंगला खाडिलकर आपल्या मनोगतात म्हणतात ” पर्रीकर हजारो , लाखोंच्या जीवनात व स्मरणातही अंशाअंशाने वाटले गेले होते.त्यांनी उच्चारलेले शब्द , केलेलं कार्य , जपलेलं मैत्र , दुरावे , सोबतीने घालविलेले क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे त्यांच्या मनाच्या भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत.” अशा व्यक्तींना शोधून त्यांच्याशी केलेल्या संवादातून मंगला खाडिलकर यांनी शब्दांकन केले .
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याच शब्दांत सांगायचे तर ” मनोहर पर्रीकर यांचं जीवन म्हणजे भारतीय राजकारणातील एक समर्पित , ध्येयनिष्ठ प्रवास होता.संपूर्ण भारताच्या राजकीय क्षितिजावर तळपलेलं ते स्वयंभू व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वातून चैतन्यशील कार्यसंस्कृती निर्माण केली.”
समाजाचा व पर्यायाने देशाचा उत्कर्ष हेच जीवनाचं प्रेय व श्रेय मानणाऱ्या या लोकनेत्या सभोवती कायम माणसांची गर्दी असायची. अशा माणसांच्या गर्दीतून योग्य व्यक्ती शोधणे व त्यांच्याकडून योग्य माहिती घेणे हे खरं म्हणजे सामान्य लेखकाला कठीण काम वाटले असते.परंतु कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेतल्या ओळी आपल्या कार्यातून प्रत्यक्षात उतरवणाऱ्या आणि काल्पनिक आभासी दुनियेत न रमता वास्तवातल्या विविध मुखवटे घालून वावरणाऱ्या माणसांच्या जगण्याची ओळख पटवून देण्याची कला अवगत असलेल्या मंगला खाडिलकर यांनी ते काम सहजपणे केलं.
अवघ्या काही शब्दांत मनोहर पर्रीकर या महान व्यक्तीचे उत्तुंग कार्य अधोरेखित करण्यासाठी चौफेर वाचन , शब्दप्रभुत्व व भाषेचे चोख ज्ञान असावे लागते. मौखिक आणि लिखित अशा दोन्ही स्वरूपात उत्तम साहित्यसेवा करणाऱ्या मंगला खाडिलकर समाजाकडून मिळालेल्या अनुभवांचं ज्ञानदानात रूपांतर करून समाजाप्रती असलेला आपला ऋणानुबंध जिव्हाळ्याने जपत आहेत. वाचकांनी मंगला खाडिलकर यांनी लोकनेते मनोहर पर्रीकर यांचे लिहिलेले “संवादात्मक चरित्र ” पुस्तकाचे वाचकांनी स्वागत केले आहे़ त्यामुळेच अल्पावधीत या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे़.नवचैतन्य प्रकाशन ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.अष्टपैलू मंगला खाडिलकर यांना त्यांच्या भावी कार्यात खुप खुप शुभेच्छा. त्यांच्या हातून अशीच साहित्य सेवा व्हावी ही अपेक्षा.
— परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800