‘चांदणे शब्दफुलांचे’
कोजागिरीच्या मनोरम चांदण्या रात्री अर्थात २८ ऑक्टोबर २०२३ ला चाळीसगावचे जेष्ठ आणि प्रथितयश साहित्यिक श्री विश्वास देशपांडे यांचे ‘चांदणे शब्दफुलांचे’ हे नवे पुस्तक प्रकाशित झाले. पुस्तक वाचल्यावर लक्षात आले की यातील काही लेख समाजमाध्यमांवर आलेले होते. मात्र एक सलग पुस्तक वाचतांना तेच लेख नवे रूप लेऊन आल्याचे जाणवले. जणू चांदण्या रात्रीच्या गोड स्वप्नाची अनुपम अशी अनुभूती जागृतावस्थेत परत अनुभवली.
पुस्तकाचे शीर्षक उत्कंठावर्धक आणि देखणे आहेच आणि त्याला साजेशी गर्द निळाईच्या पार्श्वभूमीवर फुललेली कुमुदिनी मुखपृष्ठावर अतिशय आकर्षक दिसते. विश्वास सरांच्या ललित लेखांचा सुरेख कोलाज या आधीच्या पुस्तकांत अनुभवलेला आहे. मात्र या पुस्तकात कोलाज आहे तो विभिन्न व्यक्तिरेखांचा! याला कोलाज म्हणणेच योग्य, कारण प्रत्येक व्यक्तिरेखेची रूपरेषा, मांडणी आणि सजावट वेगवेगळी आहे! मग या सर्वांना जोडणारा एक धागा कोणता तर यातील सर्व मानवी व्यक्तिचित्रे काही सांगतात, बोलतात आणि आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. कांहींचे व्यवसाय उच्चभ्रू तर कांही रोजच्या जीवनातले आपले भागीदार, कांही प्रसिद्धीच्या उंचच उंच शिखरावर विराजित तर कांहींच्या रोजच्या जीवनात अन्न, वस्त्र अन निवारा शोधण्याची धडपड सुरु! असे या पुस्तकातील विविधरंगी अन विविधगंधी व्यक्तिरेषांच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेले कोलाज वेगळेच सौंदर्य दर्शवते.
शीर्षकाच्या नावाच्याच ‘चांदणे शब्दफुलांचे’ या पहिल्या लेखातच वाचकांचे मन एका सुवर्णयुगात पोचते. बालगंधर्व आणि पु ल यांच्यावरचा हा लेख म्हणजे अखिल महाराष्ट्राच्या हृदयसिंहासनावर ज्यांच्या गौरवान्वित अन वलयांकित प्रतिमा कायम कोरल्या गेल्या आहेत, त्या दैदिप्यमान सूर्य चंद्र यांची जणू ‘ज्योतीने तेजाची केलेली आरती’! नारायणराव आणि पुरुषोत्तम या दोन नावातील साम्य साधत लिहिलेला हा अप्रतिम लेख म्हणजे गरम जलेबी अन थंडगार रबडीचे पौष्टिक अन रुचकर कॉम्बो! आता रंगमंचाचा पडदा उघडल्यावर जसे एकाहून एक सरस नटसम्राट रंगमंचावर अवतरतात, तद्वतच हे लेख कागदावर अवतरल्यावर जणू त्या रंगमंचाच्या लखलखीत प्रकाशाला चार चांद लागत आहेत असे वाटते. लावण्याचा गाभा असलेले देखणे महान संतूरवादक दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावरील लेख विश्वास सरांच्या संगीताविषयी असलेल्या गहन जाणीवा आणि ज्ञानाची साक्ष देतात. तसेच ते दिवंगत झाल्यावर हा लेख लिहिलेला असल्याने पुरुषी सौंदर्याची मूर्तिमंत प्रतिभा अन प्रतिमा आणि संतूरला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणाऱ्या या दिग्गज वादकाचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे राहिले! याच संगीत दालनात ज्यांच्या स्वरात आणि संगीतात ईश्वरी साक्षात्कार होतो, असे संगीतकार गायक हेमंतकुमार यांच्यावरील लेख खूपच वाचनीय असा आहे.
हा झाला एक रंग! मात्र सरांचा आवडीचा अन अभ्यासपूर्ण वाचन, लेखन, भाषण आणि चिंतनातून साकार झालेला भक्तिरंग त्यांना अन त्यांच्यासंगे आपल्यालाही सावळ्या रंगाची बाधा प्रदान करतो. विठू माउली, भगवान परशुराम, ज्ञानेश्वर माउली, गोंदवलेकर महाराज, गणेश उत्सव इत्यादी विविध लेखांतून झिरपत गेलेली दिव्य प्रकाशशलाका थेट आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात चैतन्याचे तेजस्वी दीप उजळून टाकते. यासोबतच भेट झालेली नसतांना देखील भेटीची आस धरून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली समर्पित करीत लिहिलेला लेख असाच हृदयंगम आहे. बाबासाहेबांचे विस्तीर्ण जीवन पटल आपल्यासमोर उलगडण्यात लेखकाची कल्पनाशक्ती, शब्दवैभव अन भावनांचे कल्लोळ यांचा सुरेख मिलाप दिसून येतो.
विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वे वेचताना लेखकाच्या सामाजिक जाणीवा अत्यंत प्रखर आणि दूरदर्शी आहेत हेच दिसून येते. वनस्पती शास्त्रज्ञ ल्युथर बरबँक, पोलिओची लस शोधून मानवाला निरामय अक्षत जीवन प्रदान करणारा डॉक्टर जोनास साक, कीटकनाशकांचे दुष्परिणाम शोधत नामधारी अन माजलेल्या मल्टिनॅशनल कंपन्यांशी दोन हात करणारा डॉक्टर टायरॉन हेज, सिंगापूरला नाव, रूप अन वैभव प्रदान करणारा ली क्कान यु, क्रांतिसूर्य हेमंत सोमण, सेरेब्रल पाल्सीग्रस्त, पण जिच्या आकांक्षांचा वेलू गगनाला भिडला आहे अशी स्फूर्तीदायिनी आणि चैतन्यमयी वल्लरी करमरकर आणि इतरही व्यक्ती या ललित लेखांच्या मांदियाळीत आपल्याला भेटतील.
सामाजिक व्यक्तिरेखांसह या पुस्तकात सुखनैव नांदणाऱ्या विश्वास सरांच्या नात्यातील अन आसपास वावरणाऱ्या व्यक्तींना देखील आपण जणू प्रत्यक्ष भेटतोय असा भास होतो. शीर्षस्थानी अर्थातच लेखकाच्या तीर्थरूप ‘आई’ आहेत. आई अन मुलाचे भावनिक प्रेममय नाते उलगडणारा हा लेख देवघरातील शांतपणे तेवणाऱ्या पावन नंदादीपाची स्मृती जागवून भावविभोर करून जातो.
या पुस्तकात लेखकाने चित्रविचित्र व्यवसायातील मंडळी एकाच पंगतीत आरामात ऐसपैस बसवली आहेत. मिस्त्री, गवंडी, नाभिक अन कल्हईवाला यांच्या सोबत ज्ञानवंत गुरुमूर्ती सर, उच्च विद्याविभूषित डॉक्टर गोपाळ देशपांडे अन त्यांच्या स्वयंप्रकाशित सौ. विभा हे देखील या पंगतीत आहेत.
लेखांची नावे अनवट आणि उत्सुकता ताणणारी पण मॅटरमध्ये अन मीटर मध्ये चपखल बसणारी (दोन उदाहरणे देते-वल्लरीवरच्या लेखाचे नाव ‘फिटे अंधाराचे जाळे’ तर नाभिकांवरील लेखाचे शीर्षक-‘सर जो तेरा चकराये’). लेखकाचे गीत-संगीताचे उपजत अन अद्ययावत ज्ञान असे संपूर्ण पुस्तकातून प्रतिबिंबित होत राहते.
मंडळी, सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या व्यक्तिविशेषांकात एकंदरीत ३६ लेख आहेत. अशा रचनेची एक खासियत असते. मैफिलीत जसे प्रत्येक गायक एक स्वतंत्र गाणे म्हणतो, आपण ते गाणे संपल्यावर नवीन गायकाची वाट बघत नव्या कोऱ्या गाण्याची प्रतीक्षा करतो तसेच हे लेख स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि स्वयंपूर्ण आहेत. म्हटले तर एका बैठकीत वाचून संपवा, किंवा चवी-चवीने एक-एक लेख निवांतपणे वाचा. दोहोत तितकाच आनंद अनुभवास येतो. लेख प्रमाणबद्ध शरीर सौष्ठव लाभलेल्या सौंदर्यवती नवयौवनेसारखेच आहेत. कुठेही फाफटपसारा नाही, मात्र मॅटर बघावे तर पूर्णत्वास पोचलेले !
विश्वास सरांच्या लेखनशैलीविषयी त्यांच्या आधीच्या सात पुस्तकातून ओळख झाली, ती या पुस्तकांतून वर्धिष्णू झाली. साधी सोपी सरळ भाषा! गुंत्यात गुंता नाही, मात्र अनुभव ‘गुंतता हृदय हे’ असाच! भ्रमर एकदा का मधुर मधुकणांची आस बाळगून कमलदलात गुंतला की बाहेर येण्याचं विसरून जातो, तद्वतच हे पुस्तक वाचायला सुरुवात केलीत की शेवटचे पान येईस्तोवर आपण थांबत नाही. (आले तरी दोन पर्याय आहेत, एक तर यातील आपल्या आवडत्या प्रांतातील लेखांचा फिरफिरुनि आस्वाद घ्यावा अथवा याच कोजागिरीला लेखकाची प्रकाशित झालेली आणिक दोन पुस्तके आहेतच! मंडळी, त्यांच्याविषयी नंतर कधीतरी!)
वाचकहो, प्रत्येक लेखाचा उहापोह करण्याचा मोह मी जाणीवपूर्वक टाळलाय. आपणही उत्सुक व्हावे आणि आणखी काय काय असेल बरं यात, हा प्रश्न स्वतःला विचारत हे पुस्तक वाचावे, हा माझा एकमेव उद्देश आहे! आता माझा सवाल ऐका मंडळी! सूर्याची धगधगीत उग्र किरणे नाहीत, उन्हाचा रखरखाट नाही, तर मुग्ध, मनोहर, शांत, शीतल, सौम्य, पवित्र आणि धवल चंद्रप्रकाशाची जाळी विखुरलेली आहे. निशिगंधाच्या धुंद सुगंधाने आसमंत अन आपलं मन भारून टाकलंय. या नीरव शांततेत काळ्याभोर रंगाच्या अन चांदण्यांच्या टिकल्यांचे नक्षीकाम असलेल्या चंद्रकळेच्या महावस्त्राने नटलेल्या निशेचे निश्चल मनमोहक सौंदर्य अनुभवायचे आहे कां? मग या पुस्तकातील शब्दफुले कधीही वेचा, चांदण्या रात्रीच्या निखळ सौंदर्याची आपल्याला नक्कीच भुरळ पडेल, हा झाला माझा अनुभव! अन तुमचा ?
— परीक्षण : डॉ. मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
धन्यवाद विश्वास सर. पुस्तक अत्यंत वाचनीय असेच आहे. मग प्रतिक्रिया तशीच येणार
अतिशय अप्रतिम असे परीक्षण धन्यवाद डॉक्टर मीना 🙏🌹