“गुरूस्पर्श“
प्रा न.मा. जोशी सर तथा जेष्ठ पत्रकार, यांच्या ज्वलंत आणि सकस लेखणीतून “गुरूस्पर्श” काही शिकलो ज्यांच्या पासून” या सामाजिक दायित्वांचे भान ठेवून आपली प्राध्यापकी आणि पत्रकारिता करताना त्यांच्या दैनंदिन जीवनात आलेल्या अनेक मान्यवर संपादक, राजकारणी, सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या तसेच शैक्षणिक संस्थेमधील संचालक मंडळ व सहकारी प्राध्यापक मित्रांकडून जे काही शिकायला मिळाले अशा मान्यवरांना आपले गुरूस्थानी समजून अशा २८ मान्यवरांचे “गुरूस्पर्श” ग्रंथातून अर्थात या २८ नक्षत्रांवर जबरदस्त लिखाण केले आहे.
खरं म्हणजे, भारतीय पंचांग शास्त्रानुसार २७ नक्षत्र आहेत. परंतु २८ वे नक्षत्र म्हणून मनुष्य वा अभिजित हे २८ वे नक्षत्र गृहीत धरले आहे. त्यामुळे माझ्या सारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांला आपल्या गुरूस्थानी समजून वा मानुन आदरणीय प्रा न. मा. जोशी सरांनी “निरहंकारी सोज्वळ – राजाराम गो जाधव, हा लेख “गुरूस्पर्श” मध्ये लिहिला ही माझ्यासाठी लाखमोलाची भेट आहे, असे मी समजतो. त्याबद्दल सरांच्या या कृपाप्रसादाला साष्टांग दंडवत करतो.
सरांच्या जीवनात ज्या “श्री सत्यासाई बाबांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक व मानसिक मनोबल दृढ झाले आणि जगात कुठेतरी ईश्वराचा अंश आहे, ही दृढ भावना सरांच्या मनात निर्माण झाली, त्या “श्री सत्यासाई बाबांच्या कृपाप्रसादाचे एखादे पुस्तक प्रकाशित करण्यात येत नाही, तोपर्यंत माझे कोणतेही पुस्तक प्रकाशित करायचे नाही हा सरांच्या मनातील दृढ संकल्प होता. त्यावरून सरांच्या मनात श्री सत्यसाईबाबा यांच्यावर आध्यात्मिक गुरू म्हणून किती श्रध्दा आहे हेच या गोष्टीचे द्योतक ठरत नाही काय ?
म्हणूनच “गुरूस्पर्श” ग्रंथातील पहिल्या प्रकरणात “श्री सत्यसाईबाबा : माझे आध्यात्मिक गुरू” म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यासंदर्भात हा एक योगायोग. म्हणून श्री सत्यसाईबाबा या दैवी पुरूषासमवेत पुट्टापुर्ती येथील आश्रमात भेट घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरलेले आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ प्रकाश नंदुरकर यांना गुरूस्थानी मानतात. सदर लेखात प्रा न.मा. जोशी सर म्हणतात, “बाबांच्या कृपाछत्राच्या संपर्कात आल्यापासून माझा तर अहंकार गळून पडला. बाबा ईश्वराचे अवतार आहेत की नाहीत ? ही शंका उरली नाही. जितका स्वामींचा अभ्यास करतो तितकी तितकी त्यांच्या ठिकाणच्या दिव्यत्वाची प्रचिती रोज येत आहे. माझ्यासारख्या वैज्ञानिक दृष्टी बाळगणा-या प्राध्यापक आणि पत्रकाराच्या जीवनात स्वामींच्या केवळ एका दर्शनाने परिवर्तन होऊ शकते हा एक मोठाच चमत्कार वाटत नाही काय ?
या ग्रंथातील दुसऱ्या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या महानायक व कृषी क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या राजकीय व सामाजिक जीवनातील काही आठवणी सांगताना “रत्नपारखी : वसंतराव जी नाईक” हा अतिशय मौलिक लेख लिहिला आहे.
याशिवाय, प्रकरण २ ते ८ मध्ये “व्वारे शेर : जांबुवंतराव धोटे,” “अजातशत्रू : टी. जी. देशमुख”, “चिरंतनाचे यात्रेकरू : डॉ पंजाबराव देशमुख”, “लोहाश्मांचा मुर्तीकार. : बाबासाहेब घारफळकर”, “सेल्फ मेड मॅन : शिवाजीराव मोघे”, “युंही नही दिल लुभाता कोई : अण्णासाहेब पारवेकर” या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील चौफेर कामगिरी करणाऱ्या थोर मनाच्या मान्यवर व्यक्तींच्या संदर्भात अत्यंत मौलिक गोष्टींचा उहापोह या सर्व ८ प्रकरणातून विचार करून वास्तववादर्शी लिखाण केले आहे. सरांच्या लिखाणाची ही अतिशय महत्वपूर्ण भूमिका व हातोटी अचंबित करणारी आहे असे मला वाटते.
पुढे प्रकरण ९ ते १७ मध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना ज्यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर अख्खी शिक्षण संस्था व कॉलेज आणि विद्यापीठामध्ये तेथील विविध प्राधिकरणे व विधान परिषदेत आपला प्रभाव पाडला असे प्रा बी. टी. देशमुख सर, तसेच विद्यार्थी जगतात एक वेगळाच दरारा निर्माण केला असे जिंदादिल प्राचार्य डॉ उदय नवलेकर, जेम्स बाँड : प्रा. श्री. गो. काशीकर, स्मृती रत्नाकर : प्राचार्य पद्माकर काणे, ऐसा होणे नाही : बाबाजी दाते, थॅंक्यु बीटी सर, दिलीप कुमार : प्रा पी. एन. भागवत, खडतर पथावरील धीरोदात्त पथिक : डॉ. बाळासाहेब पेशवे, यादे : प्रा. डॉ. टी. डी. मुदलीयार, चालता बोलता एन्साक्लोपिडीया : प्रा. डॉ. गोविंद देशपांडे, या व अशा अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या प्राध्यापक म्हणून ख्यातनाम झालेल्या गुरूवर्यांबद्दल प्रा जोशी सरांनी ज्या पद्धतीने या सर्व मान्यवरांचे लेख लिहिले आहेत. त्याबद्दल हॅट्स ऑफ !!
गुरूस्पर्श ग्रंथातील प्रकरण १८ ते २८ मध्ये श्रमयोगी टी. एम्. जोशी गुरूजी, अन्नदात्याच्या सुखासाठी : डॉ चेतन दरणे, प्रकाशपर्व : डॉ. प्रकाश नंदुरकर, चारित्र्य आणि उच्च कोटीच्या बुद्धीमत्तेचा समन्वय : डॉ. एम्. ए.. वाहूळ, दीपस्तंभ : दीपक आसेगावकर, एका सिंहाची आसमंती झेप : देवीदास भोरे, झंझावात : दिलीप एडतकर, विनम्र संपादक : विलास मराठे, हार्टीफिशीयल : विनायकराव खोलकुटे, निरहंकारी सोज्वळ. : रा. गो. जाधव, आणि एकाकी लढवय्या : डॉ. विवेक देशमुख या सर्व ११ प्रकरणातून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय व पत्रकारिता क्षेत्रातील चौफेर कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या जीवनातील घडणाऱ्या अनेक घटनांचा वेध प्रा. न. मा. जोशी सरांनी अतिशय सुक्ष्मरित्या नोंदी घेऊन त्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. अशा वास्तवदर्शी घटनांचा चित्रण करणारे आदरणीय प्रा जोशी सर एक वेगळेच रसायन वाटतात याबद्दल कोणाचेही दुमत नसावे असे मला वाटते.
एकुणात काय तर चांगल्या व समाजाला आदर्शवत वाटणा-या मान्यवर व्यक्तींच्या संदर्भात जे लिखाण प्रा न मा. जोशी सरांनी “गुरूस्पर्श” शिकलो ज्यांच्या पासून” मधून हे लिखाण आपल्या सकस लेखणीतून केले आहे ते म्हणजे वास्तववादी विचार करून योग्य वाटेल असे लिखाण आहे.
या “गुरूस्पर्श” मधून केलेल्या लिखाणामधील ऐसा होणे नाही : बाबाजी दाते यांच्या सारखे दृढ विचारांचे शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारे संस्था चालक, थॅंक्यु बी. टी सर, चिरंतनाचे यात्रेकरू डॉ पंजाबराव देशमुख, लोहाश्मांचा मुर्तीकार : बाबासाहेब घारफळकर, जिंदादिल प्राचार्य डॉ उदय नावलेकरजी, अन्नदात्याच्या सुखासाठी : डॉ चेतन दरणे, झंझावात दिलीप एडतकर, प्रकाशपर्व : प्रकाश नंदुरकर हे लेख वाचनीय आहेत.
सदर ग्रंथातील विविध प्रकरणातील वैचारीक लिखाणाची भाषा ओघवती असून वाचन करताना मनाला भुरळ घालते. हीच सरांच्या लिखाणाची हातोटी आहे. महत्वाचे म्हणजे, सर अमराठी असूनही मुळ राजस्थानी भाषीक असलेल्या सरांनी अनेक वर्तमानपत्रांत जसे दैनिक विदर्भ मतदार, दैनिक हिंदूस्थान, दैनिक सिंहझेप, दैनिक तरूण भारत, लोकसत्ता, हितवाद आदी वर्तमान पत्रात पत्रकारिता करताना आपला ठसा उमटवला आहे. म्हणूनच या क्षेत्रातील अनेक मान्यवर मालक, संपादक , सामाजिक व राजकिय क्षेत्रातील नामवंत मित्र परिवाराचा गोतावळा सरांच्या अवती – भोवती वाढलेला. त्याचीच परिणती म्हणजे “गुरूस्पर्श – ज्यांच्या पासून शिकलो काही होय.
न. मा. सरांच्या लेखणीला आम्ही शतशः प्रणाम करून त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी आणि लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो.
— लेखन : राजाराम जाधव.
निवृत्त सह सचिव, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800