Wednesday, October 9, 2024
Homeसाहित्यपुस्तक परिचय

पुस्तक परिचय

ब्लास्फेमी

एखादं पुस्तक आपल्याला अतिशय आवडतं, एखादं पुस्तक आपल्याला भारावून टाकतं, एखादं मनात घर करतं, एखादं सतत रुंजी घालतं पण ब्लास्फेमी ह्या पुस्तकाबद्दल तसं काही न होता हे पुस्तक मनावर ताण देऊन गेलं. हे पुस्तक वाचल्यानंतर मी कितीतरी दिवस हीरच्याच विचारात अडकून होते. हीर ही या कादौबरीची नायिका. मला सतत हीर, पीरसाईं आणि चील हे आपल्या भोवती आहेत असं वाटायचं आणि मी घट्ट डोळे मिटायचे. ही कादंबरी मी पाच वर्षा पूर्वी वाचली होती पण अजूनही अधूनमधून हीर माझ्या मनातल्या अंगणात फेर धरत असते.

हीर जिने हे सगळं सोसलं तिची काय अवस्था झाली असेल. हा विचार अधून मधून चालू असतो. हो आता त्याची तीव्रता खूपच कमी झाली आहे म्हणा.

आज ह्या पुस्तकाची समीक्षा केल्या नंतर तरी बघते ताण संपतोय का ?

ही कादंबरी दक्षिण पाकिस्तानात घडलेल्या सत्य घटनेतून निर्माण झाली. ह्यात दुष्टत्वाचे कठोर दर्शन होते.

अवघ्या पंधरा वर्षांची अलौकिक सुंदरी हीर, एका तरुणाच्या प्रेमात असताना, पीरसाईं नावाच्या धर्मगुरू कडून मागणी येते म्हणून रुसते पण त्याच्याकडून आलेले दागिने, कपडे, फळं, मेवा ह्यात हरखून जाते.लग्न करायचंय की नाही या बाबत तिचं मत गृहीत धरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

लग्नाच्या वेळेस अठरा वर्षाने मोठा, डोळ्यात काजळ फासलेला, गळ्यात ढीगभर माळा घातलेला, हातात गंडे बांधलेला, हिरवा डगला घातलेला अशा आपल्या नवऱ्याला पाहून तिचं अबोध मन बावरतं, घाबरतं आणि हे घाबरणं, ही भीती तिला जन्मभर साथ देते.

पीरसाईं खुदाचा बंदा म्हणून बाहेर पुजला जातो. समाजात त्याचा दरारा पण घरात दुष्ट, कामातुर, अनन्वित अत्याचार करणारा हे त्याच खरं रूप असतं. त्याची एक सेविका किंवा दासी “चील” एक ही शब्द न बोलता सतत हीरकडे नजर ठेवणारी. तिच्यामुळेही हीर भीतीच्या तणावात असते.
घरातल्या चौरस आंगणात राहता राहता, हीर गोल आकाराचे मनातच चित्र रेखाटत असते. त्या अंगणातून दिसणारा आकाशाचा तुकडाच तिची वेगळी दुनिया बनतो.
अनेक कुकृत्ये फक्त धर्माच्या नावावर आणि देवाच्या नावांवर होतं असताना ती बघत असते, हे सर्व बघता बघता हीर तिच्या नवऱ्याने बनवलेल्या ह्या रौरवात ओढली जाते.

हात पलंगाच्या पायाखाली दाबून हीरला रोज पीरसाईंच्या शारिरीक गरजा भागवण्यात प्रश्न पडतो की याने काय साध्य करायचे असते ? बरोबरीने, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तोंडांत डोळे कोंबणे. हे प्रकार हीरला अकल्पनीय असतात.
हे सगळं भोगता, भोगता,अनेकदा इतर बायकांसोबत त्याला बघताना, शारीरिक भूक भागवण्या आधी जबरदस्तीने दारू फिरायला लावणं ह्या सगळ्यात हीर वेगळीच घडू लागते.तिच्या अंगचे सगळे चांगले गुण संपत जातात. इतकेकी तिच्यातील माणुसकीही निघून जाते. मद्य,सिगरेट हे रोजचेच होऊन बसते. पण पीरसाईंच्या कचाट्यातून सुटण्याचे विचार काही पाठलाग सोडत नाही.

एका रात्री पीरसाईं स्वतःसाठी आपल्या मुलीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि हीरच्या आतली आई हादरते. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी घरातील दुसऱ्या मुलीचा बळी देते.

वर्षानुवर्षा नंतर “चील” हीच हीर ला मदत करते आणि पीरसाईंच्या मृत्युला कारणीभूत होते.

ह्यानंतर लेखिकेने जे लिहिले ते मनाला न पटणारे आहे..पीरसाईं वाईट होता, हे सिद्ध करण्यासाठी हीर त्याच मार्गावर चालून सी.डी वगैरे बनवते हा भाग पचनी पडत नाही. कारण तेच कृत्य तिच्या जीवनाला नर्क बनवण्यास कारणीभूत झाले असता कोणीही त्यातून लगेच निघण्याचा प्रयत्न करेल. पण हीर तसं न करता हे कां करते ते समजण्याच्या पलीकडे आहे. ज्या बाईने इतक्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेल्या यातना सहन केल्या ती हाच मार्ग कां बरं निवडते ?

हीर हे सर्व लपून छपून करत असते.आता वारसाहक्काने मुलांचा दरारा सुरू झाला असतो.

शेवटी हीर मरण्याचे नाटक करते. तिचा भाऊ आणि माहेरची लोक तिचा मृत देह घेण्यासाठी येतात. तो घेऊन जात असताना तिचा मुलगा तिच्या कानात बोलतो “सुखाने जा अम्मा” आणि हीरची त्या नरकातून सुटका होते. इतकाच काय तो मुलांचा चांगुलपणा म्हणता येईल.

मूळ कादंबरीच्या लेखिका तेहमीना दुर्रानी ह्यांचे हे दुसरं पुस्तक. १९९१ मधे त्यांची आत्मकथा “माय फ्यूडल लॉर्ड” ही प्रसिध्द होताच वादात सापडली. ह्यांचे दुसरे पुस्तक “ब्लासफेमी” हे ही खळबळ जनक. ह्या कादंबरीचे मुखपृष्ठ ही तेहमीना दुर्रानीचेच आहे. त्यांनी ते स्वत: रेखाटलं आहे. मूळ कादंबरी बद्दल सांगता येत नाही पण भारती पांडे ह्यांनी अनुवाद उत्तम केला आहे हे निश्चित. त्याशिवाय का हे पुस्तक वाचकांच्या मनावर पगडा बसवू शकले असते ? हीरच्या यातना, चीलचे डोळ्यातून बोलणे, एकंदरितच धर्माचे, घराचे, पुरुषी स्वभावाचे, घरातील लोकांच्या एकमेकांच्या संबंधांचे, स्त्री जातीला फक्त भोग्या म्हणून बघण्याचे वर्णन इतकं तपशील वार आणि मनाला छिद्र पाडणारं आहे की वाचक आपण हीर आहोत ह्याच भूमिकेत वाचत सुटतो आणि नंतर जबरदस्त पकडीत अडकतो.

अनुवाद करणाऱ्या भारती पांडे यांचंही असंच काहीसं झालं होतं. हे त्यांनी ही कबूल केलं आहे. त्यांचं म्हणणं ह्या घटना काही प्रमाणात काल्पनिक असू शकतील, पण त्या घटनांनी त्यांच्याही विचारांचा ताबा घेतला होता आणि त्या भरात त्यांनी हा अनुवाद लगबगीने करुन स्वत:ला त्यातून मोकळं केलं.

हे पुस्तक थोडा वेगळा विचार करायला लावतं. समाजात खरं काय असतं आणि काय दिसतं ? एखाद्या धर्माचं विकृत आणि किळसवाणं रुप ह्यातून बघायला मिळतं.

हे पुस्तक जर कोणी वाचलं तर त्याचा अनुभव नक्की सांगावा.

राधा गर्दे

— परीक्षण : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments