“जिना व दिना”: “एक संघर्षमय कहाणी”
“जिना व दिना” ही सतीश चौधरी यांनी लिहिलेली कादंबरी क्रिएटिव्ह पब्लिकेशन्स, नांदेड यांनी नुकतीच प्रकाशित केली आहे. सदरहू कादंबरीचे लेखक हे निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत.
मुळात कायदे आझम महंमद अली जिना यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय नेत्याच्या आयुष्यावर कादंबरी लिहिणे हे एका भारतीय लेखकासाठी, ते ही न्यायाधीश राहिलेल्या, हे आव्हानात्मक काम आहे. पण न्या.सतीश चौधरी यांनी हे आव्हान स्विकारुन त्याला योग्य न्याय दिला आहे.
सदरहू कादंबरी पाकीस्तानचे शिल्पकार कायदे आझम महंमद अली जिना यांच्या व्यावसायिक, राजकीय व कौटुंबिक आयुष्यावर बेतलेली आहे. विशेषत:जिना आणि त्यांची मुलगी दिना व जिनांची पत्नी रट्टू उर्फ रतन यांच्या दरम्यान असलेल्या वैचारिक व कौटुंबिक ताणतणावाची आणि कुचंबणेची ही कहाणी आहे. तिला स्वातंत्र्य लढ्याचा व फाळणीचा संदर्भ आहे. या कादंबरीला हिंदू मुस्लीम संघर्षाची पार्श्वभूमी आहे. जिना जरी पाकिस्तानचे जनक असले तरी त्यांचा प्रेमविवाह पारशी समाजातील रतन पेटीट या सुंदर तरुणीशी झाला. पण हा विवाह अल्पायुषी ठरला. या विवाहापासून त्यांना दिना नावाचे कन्यारत्न झाले. पण दिनाचा जन्मच मुळी रतनच्या इच्छेविरुद्ध झाल्यामुळे आईचे प्रेम दिनाला कधीच प्राप्त झाले नाही. तर जिना वकीली आणि राजकारण यात आकंठ बुडालेले असल्यामुळे त्यांच्यात आणि दिना मध्ये कोणतेही अनुबंध आणि भावबंध निर्माण होवू शकले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर दिनाने नेविल वाडिया या पारसी उद्योगपतीशी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेवून अंमलातही आणला. पण ही बाब जिनांच्या मनाविरुद्ध असल्यामुळे दिना वडिलापासून कायमची दूरावली गेली.
मात्र कायदेआझम जिनांची कष्ट घेण्याची तयारी आणि अभ्यासू वृत्तीबद्दल लेखकाने खूप छान आणि विस्ताराने लिहिले आहे. जिनांची पुर्वपिठीका विलक्षण आहे. रतनविषयी जिनांना वाटणारे आकर्षण हे केवळ शारीरिक पातळीवरील आहे हे सतत जाणवत रहाते. ज्या काळात जिना कार्यरत होते त्या काळात जातीय सलोखा संपुष्टात आला होता हे जाणवत रहाते. जिना तसे आधुनिक रहाणीमान व विचारसरणी असलेले मुसलमान होते पण त्यांचा प्रखर मुस्लिम राष्ट्रवाद हा सामान्य माणसांच्या पचनी पडणे अवघड होते. लोकमान्य टिळकांशी असलेले त्यांचे सख्य आणि महात्मा गांधींच्या सोबत असलेली प्रतिकुलता या दोन घटकांमुळे ते केवळ स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र मागण्याच्या टोकाच्या आग्रहापर्यंत पोहचले होते. जिनांचा शैक्षणिक आणि राजकीय प्रवास लेखकाने अत्यंत बारकाईने चितारला आहे.पण कौटुंबिक स्तरावरील संघर्ष मांडताना जिनांच्या स्वभावाची रुक्ष आणि कोरडी बाजू प्रकर्षाने जाणवत रहाते.
एकंदरीत जिनांनी आपले अवघें आयुष्य केवळ वैचारिक स्तरावर व्यतित केले आणि याची खंत त्यांना आयुष्यभर सतावत राहिली. पहिली पत्नी अल्पायुषी ठरली. रतन बरोबरच्या प्रेमाची परिणती त्यांच्या विवाहात झाली असली तरी हा विवाहही अल्पायुषी ठरला. रतन आणि जिना यांना दिना या कन्येविषयी अजिबात ममत्व नव्हते ही बाब त्यांच्या विलासी स्वभावावर झगझगीत प्रकाश टाकते. जिना हे एक अतृप्त आत्मा म्हणून जगले आणि संपले.
लेखकाने जिनांच्या आयुष्याचा समग्र आढावा घेण्याचा कसून प्रयत्न केला आहे पण मुळातच जिना हे दुराग्रही, हेकट आणि उथळ असल्यामुळे खऱ्या अर्थाने ते समरसून जीवन जगले नाहीत. हीच मानसिक फरफट दिना आणि रतनच्या वाट्याला आली. एक शापित आयुष्य जिनांच्या वाट्याला आलं. त्यांचा आणि रतनचा मृत्यूही करुणास्पद असा झाला. एका वादग्रस्त व्यक्तीमत्वाच्या इतिहासाला कवेत घेण्याचा लेखकाने प्रामाणिक प्रयत्न केला आहे.हे मोठेच साहस आहे.त्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन.
— परीक्षण : जीवन आनंदगावकर. निवृत जिल्हा व सत्र न्यायाधीश.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800