“सत्तरीची सेल्फी”
लेखक, दिग्दर्शक, आकाशवाणी, दूरदर्शन निर्माते, निवेदक, सूत्रसंचालक अशी चंद्रकांत बर्वे यांची ओळख आहे. आकाशवाणी, दूरदर्शनमध्ये अनेक पदं भूषवीत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नोकरीच्या निमित्ताने पालथा घातलेला आहे. मुंबई दूरदर्शनवर उपसंचालक तर ते गोवा दूरदर्शनवर संचालक म्हणून त्यांनी आपली सेवा रुजू केली आहे. शोधक वृत्ती, प्रयत्नशील, नव्या कार्यक्रमाचा ध्यास घेतलेले व्यक्तिमत्व असल्यामुळे फक्त सल्ले देऊन त्यांनी आपली पदे भूषवली नाही तर प्रत्यक्ष कृती करायला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.
मुंबई दूरदर्शनमध्ये असताना प्रेक्षकांनी दखल घ्यावी किंवा आवर्जून मांडी घालून बसावे अशा अनेक कार्यक्रमाची निर्मिती बर्वे साहेबांनी केली. चंदेरी सोनेरी, टॉप शो, आमने-सामने असे कितीतरी कार्यक्रम सांगता येतील की जे त्यांच्या कल्पनेतून पुढे आलेले होते. त्याची नोद त्यांनीच लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकात घेतलेली आहे.

आकाशवाणी, दूरदर्शनच्या प्रवासात अनेक नामवंत म्हणावेत असे व्यक्ती बर्वे साहेबांच्या सानिध्यात आले. मग ते साहित्यिक असतील , कलावंत असतील किंवा अन्य क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले व्यक्तिमत्व असेल. कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या व्यक्ती सानिध्यात आल्या असल्या तरी नंतर ते त्यांचे मित्र आणि परिवाराचा भाग बनले. त्यामुळे त्यांच्या जीवनाविषयी अधिक माहिती असणारे म्हणून बर्वे यांच्याकडे पाहिले जाते.
बर्वे यांनी निवृत्तीचे जीवन जगत असताना नव्या, माध्यमाला स्वीकारले आणि थेट समाज माध्यमातून संवाद साधणे सुरू केले. ‘सप्तरीची सेल्फी’ हा त्यांच्या संवादाचा विषय होता. त्यात सानिध्यात आलेल्या व्यक्तींविषयी ते भरभरून बोलत होते. हा पसारा इतका वाढला की त्यांचा स्वतःचा अस्स चाहता वर्ग निर्माण झाला. प्रेक्षक वर्गाला, वाचकाना आवश्यक अश्या पुस्तकाची निर्मिती करणे त्यांना गरजेचे वाटले. ‘सत्तरीची सेल्फी’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागातून संचालक पदावरून निवृत्त झालेल्या देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या ‘न्यूज स्टोरी टुडे’ प्रकाशनाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

स्मृती आड गेलेल्या आणि प्रत्यक्ष जीवन जगणाऱ्या अशा महनीय व्यक्तींचा या पुस्तकात मागोवा घेतलेला आहे. सदाशिव अमरापूरकर, विजय तेंडुलकर, भक्ती बर्वे, प्रभाकर पणशीकर, प्रदीप भिडे, राज कपूर, भीमसेन जोशी, श्रीकांत मोघे, प्रा लक्ष्मण देशपांडे, दाजी भाटवडेकर, पु. ल. देशपांडे, आत्माराम भेंडे, जयवंत दळवी, शांताराम नांदगावकर, डॉ काशिनाथ घाणेकर अशा पन्नासहुन अधिक व्यक्तींची नोंद या पुस्तकात घेतली आहे.

जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. संग्रहित ठेवावे असे हे पुस्तक आहे.
(पूर्व प्रसिद्धी : दैनिक नवराष्ट्र)
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नमस्कार देवेंद्र भुजबळ सर,
‘सत्तरीची सेल्फी’ या नाविन्यपूर्ण नावाच्या चंद्रकांत बर्वे
यांच्या आठवणींच्या कलादालनात रंगून जायला आवडेल.
किंमत कळवा. पत्ता आपल्याकडे आहे.