“ऑपरेशन एक्स“
प्रज्ञा जांभेकर चव्हाण यांनी लिहिलेले ‘ऑपरेशन एक्स-तुरुंग ते फाशीगेट: कसाबचा प्रवास” हे पुस्तक अत्यंत चित्तवेधक आणि वाचनीय आहे. एकदा वाचायला सुरुवात केल्यानंतर पुस्तक खाली ठेववत नाही. सलगपणे वाचावेसे वाटते. कसाबला फाशी देताना घेतलेली काळजी, पूर्ण केलेली प्रक्रिया, पाळलेली गुप्तता, सरकारी पातळीवर झालेल्या बैठका, संभाषणे इत्यादी अनेक गोष्टी एखाद्या कादंबरीप्रमाणे नाट्यमय स्वरूपात पेश करण्यात आल्या आहेत. मात्र कुठेही अतिरंजितपणा नाही, की वस्तुस्थितीला सोडून वर्णने नाहीत. शब्दबंबाळपणा, डायलॉगबाजी, भावनांचे अवडंबर या गोष्टींना पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे.
कसाबला फाशी देण्याच्या तारखेपूर्वी, अचानकपणे बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बिघडली आणि नंतर 17 नोव्हेंबरला त्यांचा झालेला मृत्यू आणि त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोटलेला जनसागर हे सर्व सुरू असताना, दुसरीकडे कसाबच्या फाशीची तयारी कशी सुरू होती, याचे वर्णन अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने करण्यात आले आहे.
कसाबवरील खटला 15 एप्रिल 2009 रोजी आर्थर रोड कारागृहात सुरू झाला होता. तर 21 नोव्हेंबर 2012 रोजी त्याला फाशी देण्यात आली .भारतीय दंडसंहितेची कोणकोणती कलमे कसाबविरुद्ध लावण्यात आली याचा महत्त्वाचा तपशीलही वाचायला मिळतो. खटल्यादरम्यान तो करत असलेले तमाशे, माकडचेष्टा, रडणे, भेकणे या सगळ्याचे वर्णन प्रज्ञाताई करतात… ‘मैंने कुछ नहीं किया, जो किया है वो सब अबू इस्माईल ने…’ असेही तो कोर्टात म्हणाला, याचा उल्लेख आहे.
एकदा तर कसाब कानात कापसाचे बोळे घालूनच न्यायालयात आला होता. न्यायाधीशांनी त्याबद्दल त्याला विचारल्यावर तो म्हणाला, ‘उज्वल निकम यांचं बोलणं मला ऐकवत नाही…’
मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा अनेकांप्रमाणे मी देखील मुंबईतच होतो. हे सर्व नाट्य टीव्हीवरून रात्रभर बघत होतो. अनेक लोकांशी त्या संबंधात बोलत होतो. दुसऱ्या दिवशी त्या सर्व परिसरात जाऊन परिस्थिती बघूनही आलो होतो. त्यामुळे त्यातील अनेक तपशील मला माहिती होते. परंतु प्रत्यक्ष हल्ला कशाप्रकारे झाला, याचे आणखी बारकाईचे वर्णन पुस्तकात वाचायला मिळते. मला ठाऊक नसलेल्या अनेक गोष्टी त्यामुळे कळाल्या.
अशोक कामटे यांच्या पत्नी तसेच राकेश मारिया यांच्या पुस्तकातही मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचे वर्णन आहे. परंतु प्रज्ञाताई या एक कसबी पत्रकार असल्यामुळे, त्यांच्या लिखाणात विविध स्वरूपी तपशील आणि अचूकता आढळते. कोणतीही शेरेबाजी न करता, खूप संशोधन करून, प्रत्यक्ष पाहणी करून, लोकांशी भेटून आणि बोलून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रत्यक्ष हल्ल्याचा, कोर्टातला, तुरुंगातील घटनांचा तपशील अत्यंत चित्रदर्शी शैलीत त्यांनी लिहिला आहे.
भारतातला दहशतवाद, मुंबईच्या हल्ल्यातील संबंधित व्यक्तींची माहिती, गुप्तचर संघटनांची तसेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी, येरवडा कारागृह, मृत्युदंड याबद्दलची परिशिष्टे अत्यंत माहितीपूर्ण आहेत. पत्रकार, अभ्यासक आणि या विषयाचे विद्यार्थी यांना हे पुस्तक खूपच उपयुक्त वाटेल. परंतु एरवीही हे पुस्तक कमालीचे वाचनीय आणि थरारक आहे. या पुस्तकाच्या आधारे उत्तम सिनेमा व नाटक होऊ शकते. प्रज्ञाताईंनीच याबाबत पुढाकार घ्यावा. ‘ऑपरेशन एक्स’ या पुस्तकासाठी लेखिका प्रज्ञा जांभेकर – चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन ! अशाच विषयांवर त्यांनी आणखी पुस्तके लिहावीत, असे आग्रही आवाहन.
— परीक्षण : हेमंत देसाई. ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जेष्ठ पत्रकार श्री हेमंतराव देसाई यांनी लेखिका प्रज्ञा जांभेकर-चव्हाण यांच्या ‘ऑपरेशन x’ पुस्तकाचा अतिशय छान परिचय करून दिला आहे.हे पुस्तक मी मिळवून समग्रपणे वाचन करण्याची या प्ररिक्षणामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.श्री हेमंतराव आणि प्रज्ञाजींचे मनापासून अभिनंदन.. सुधाकर तोरणे .