‘मनातलं’
मोहिनी हेडाऊ यांनी लिहिलेलं ‘मनातल’ हे पुस्तक नुकतंच वाचलं ! नुसते वाचून बाजूला सारण्यासारखे हे पुस्तक नाही हे पहिला लेख वाचल्यावरच माझ्या लक्षात आले. मोहिनी यांचा जनसंपर्क खूप अफाट आणि अनुभवाचा आवाका त्याहून अवाढव्य. हे या पुस्तकातील विविधरंगी, विविधविषयी लेख वाचल्यावर लगेच कळते. इतके लेख लिहूनही या चिरंतन शाश्वत विश्वाची, अनोख्या अंतराळाची, असंख्य पुस्तकांची अन अमोप आत्मचिंतनाची त्यांची तृष्णा वाढता वाढता वाढे असे वाटते.
या पुस्तकातील लेखांची संख्या ६५. एखादा बहुरूपदर्शक फिरवतांना उमटणारे बहुरंगी भूमितीय आकार बघून जसे डोळे दिपतात आणि निवतात तसे हे पुस्तक वाचल्यावर झाले. डिझाइनर साडीसारखे एक डिझाईन एकदाच दिसते, एक आकार एक रंग आणि एक गंध परत येत नाही, तसेच त्यांच्या लेखांचे कुठलेही विषय रिपीट होत नाहीत. त्यांना इंद्रधनुषी रंग म्हणता येणार नाहीत कारण त्याच्या सप्तरंगाला सीमा असते ! मात्र या पुस्तकाचे लेखनरंग अनवट मिश्रण घेऊन येतात.
पुस्तकाचा बाह्यरंगी प्रारंभच मनाला सुखद अन शीतल आनंद देणाऱ्या मुखपृष्ठापासून होतो. लेखिकेच्या ‘मनोगतामध्ये’ मध्ये तिचे प्रसन्न मनमोहिनी रूपच नव्हे तर तिचे स्वतंत्र विचार ल्यायलेले मन उलगडायला सुरुवात होते. आल्या आल्या सिक्सर मारून आपले नैपुण्य सिद्ध करणाऱ्या फलंदाजासम पहिल्या चार लेखांतच लेखिकेची लेखणीवरची मजबूत पकड जाणवते. एका जगप्रसिद्ध बहुमुखी व्यक्तित्वाची ओळख होते, ‘लिओनार्दो द विंची’ आणि त्याच्या तितक्याच जगन्मान्य चित्रनायिकेची, ‘मोनालिसा’ हिची! यातूनच चित्रनायिका आणि चित्रकार यांची एकमेकांना पत्रे. ही कल्पनाच भन्नाट ! बहुदा विचार रवंथ चालू असतो या चित्राच्या निर्मितीवर वा या चित्राच्या ‘चोरीवर’ !
मोहिनी यांचे, मळलेल्या वाटा सोडून केलेले हे ‘लॅटरल थिंकिंग पॅटर्न’ चे प्रयोग लय भारी ! ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ असा या पुस्तकाचा टवटवीतपणा पहिल्या ते शेवटच्या पानापर्यंत अनुभवास येतो. प्रत्येक लेखागणिक लेखिकेच्या मनातले विचारतरंग एकामागून एक जिवंत होतात. पारदर्शक तरंगांचे रंग, गंध आणि स्पर्श लगेच जवळून जाणवतात! शब्दांचा अन अर्थाचा कुठलाही फापटपसारा नाही, धारदार बुद्धिमत्ता असूनही तिचे अवास्तव प्रदर्शन नाही, लेखांची लांबी (कधी अर्धेमुर्धे पान तर कधी ३-४ पाने, यापेक्षा जास्त नाही) अशी की विषय आत्मसात तर होईल, पण वाचकाला अंतर्मुख करेल आणि त्याला विचारमंथन करायला भाग पाडेल. एक लेख वाचला की तो विषय आटोपला, म्हणजे तुम्ही आरामात बुक मार्कर ठेवा अन नंतरचा लेख थोड्या वेळाने वाचा अशी ही सुबक लेखमालिका आहे. एक एक फूल तोडा, त्याचे सौंदर्य न्याहाळा, नंतरचे फूल तोडायचं तेव्हा तोडा! पण मंडळी अशी वेळ बहुदा यायची नाही, कारण एकदा का पहिल्या चॅप्टरमधल्या मोनालिसाच्या ‘त्या’ गूढ स्मितात तुम्ही हरवलात की पुस्तकातच हरवून जाल याची फुल ग्यारंटी! हे लेख वाचून एका जगन्मोहिनीची आठवण आल्याशिवाय राहात नाही! देवांना ऑन प्रायॉरीटी अमृतकलशातून रसपान प्राप्त करून देणारी मोहिनी अर्थात श्री विष्णूंचे मोहिनी रूप ! प्रत्यक्ष शंकराला तिचा मोह पडतो ! इथे तर आम्ही पडलो सामान्य वाचक !
मोहिनी यांच्या या लेखांतून मला जे तात्काळ सदुपयोगी पडले ते पुस्तक परीक्षण. या व्यतिरिक्त एक रसिक म्हणून कलेचा आस्वाद कसा घ्यायचा हे त्यांनी त्यांना आवडलेली नाटके, सिनेमे, पुस्तके, मान्यवरांची भाषणे, निसर्गाची रूपे, गाणी, संत साहित्य, रामायण, महाभारत अन पुराणकाळातली व्यक्तिचित्रे आणि बरंच कांही….. यांच्या सर्वंकष अनुभवातून वाचकांशी शेअर केले आहे. गंमत म्हणजे त्यांना कुठल्याही विषयाचे वावडे नाही. आपण असे प्रसंग अनुभवतो, पण त्यांचे लिखाणात परिवर्तन करण्याची कल्पनातीत किमया मोहिनी यांचीच असू शकते ! एकच उदाहरण देते. आता बघा ना ‘माझे आवडते विद्यापीठ’ या चिंतनीय विषयावर संपूर्ण लेख अगदी उत्कंठा ताणणारा, अन शेवटी ते विद्यापीठ कोणते तर ‘व्हॅट्सऍप’ निघते. ‘ह्यॅ! त्यात काय मोठेसे?’ असा प्रश्न देखील मनात येऊ देऊ नका मंडळी, कारण दिवसरात्र व्हाट्स ऍप वरच मुशाफिरी करणारे आपण, पण त्याला ‘विद्यापीठाचा’ दर्जा देणारी ही लेखिका म्हंजी मोहिनीच असू शकतात बरं कां ! धन्य त्या लेखणी कळा म्हणा अन पुढचा लेख घ्या वाचायला! यात ‘खरेदीची खुमारी’ सारखा गुटगुटीत लेख एका बाजूला अन ‘मनाचं उत्खनन’ सारखा भारदस्त मानसशास्त्रीय लेख दुसऱ्या बाजूला! या मालिकेत ‘बिग इज ब्युटीफुल’ मध्ये लठ्ठपणाकडे पाहण्याची ‘सकारात्मक दृष्टी’ आहे तसेच ‘काळरेषा’ मधील शहारून टाकणारा गूढरम्य अनुभव देखील आहे.
मंडळी, या पुस्तकाद्वारे तुम्ही मनसोक्त ‘आहार विहार’ करू शकता. गोवर्धन पर्वत सात दिवस एका करंगळीवर धारण करणाऱ्या कृष्णाला नंतर सपाटून भूक लागली. गावकऱ्यांनी शिधा काय, अन्न काय, फळफळावळ काय, लोणची काय, त्याच्यासाठी सगळे गोळा केले! त्या गावजेवणाची आठवण म्हणून आज आपण ज्या गोपालकाल्याचा प्रसाद ग्रहण करतो ना, त्याची चव अमृताहून गोड! तसेच मोहिनी यांचे हे लेख आहेत. मी तर झपाटून गेल्यासारखे ते वाचले अन ‘chewed and digested them’. (याच पुस्तकातील ‘बुक शेल्फ’ नामक एका अप्रतिम लेखातून हे शब्द उधार घेतलेत.) वाचकांनी नाटक, सिनेमे, पुस्तके इत्यादींची ‘बकेट लिस्ट’ बनवायला या पुस्तकाची मदत घ्यावी, भाषणाची तयारी करायला यातील असंख्य उदाहरणे, उतारे, सुभाषिते इत्यादी उधार घ्यावीत. हे कांहीच करायचे नसेल तर स्वतःच्या मनात डोकावायला अन आत्मचिंतन करायला हे पुस्तक अवश्य वाचावे. कोरोना काळातील दारुण अनुभवांचे स्फूर्तिदायी सार हे या पुस्तकाचे सुंदर गमक !
मोहिनी, तुमचे लेखन एखाद्या अनाघ्रात कमोदिनीसारखे वाटते. तुमच्या व्यक्तिमत्वातील कित्येक कंगोरे या लेखनात दिसतात. रत्नांची खाण, सर्जनशील अशा बहुप्रसवी वसुंधरेसारखे तुमच्या मनाच्या तळ्यात असंख्य विषयांच्या विचारांचे मोहोळ दाटले आहे. तुमच्यातील वात्सल्य आणि प्रेम दर्शवणाऱ्या स्त्रीसुलभ भावना, कलासक्त आणि संवेदनशील हृदय, मिळेल त्या वाटेतील सौंदर्यसुमनांचे रसपान करणारी भ्रमर वृत्ती, प्रशासकीय अनुभवातून आलेली कर्तव्य कठोरता आणि सर्वात मुख्य म्हणजे ‘नवनवोन्मेषशालिनी’ सर्जनशीलता या पुस्तकात प्रतिबिंबित होते. आपण आपल्या नोकरीत लोकसेवेच्या व्रताचा वास घेतला आहेच, त्याला अनुरूप असे आपले ‘जनमंगल’ साधणारे दर्जेदार लेख समाजमाध्यमातून आणि ई वृत्तपत्रातून प्रसिद्ध होतात आणि लोकप्रिय होतात याचे अजिबात अप्रूप वाटत नाही ! अशाच नितांत सुंदर साहित्याची आपल्याकडून अपेक्षा आणि आशा आहे ! आपण ती पूर्ण कराल याचा दृढ विश्वास आहेच !
या पुस्तकाचे प्रकाशन केलंय लोकव्रत प्रकाशनने. १६६ पानांच्या या पुस्तकाची किंमत आहे २०० रुपये ! मी तर निःशंक मनाने म्हणेन, आपण हे पुस्तक ‘वाचू अति आनंदे’! शिवाय इतरांना भेटू देऊ, तेही प्रत्येक दृष्टीने सौंदर्यशाली असलेले हे पुस्तक वाचून ‘आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदे’ अशी अलौकिक आनंदी अवस्था झाल्यावर !
मोहिनी, आपण भविष्यात देखील सरस्वतीमातेची अशीच सेवा रुजू करा! त्याकरता माझ्या अंतर्यामी हृदयाच्या गाभाऱ्यातून मनःपूर्वक शुभेच्छा !
— परीक्षण : डॉ.मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800