Monday, September 9, 2024
Homeसाहित्यपुस्तक परीक्षण

पुस्तक परीक्षण

महाराष्ट्राची तीन लाडकी व्यक्तीमत्त्व

विज्ञान आणि साहित्य यांचा संबंध नक्कीच आहे. हे बऱ्याच वैज्ञानिकांनी सिध्द केलेय. यात आवर्जून उल्लेख करावा लागेल,
मराठी विज्ञान परिषद, मुंबई या ख्यातनाम संस्थेशी गेली जवळजवळ पाचेक दशकं निगडित असलेल्या श्री.अ पां देशपांडे यांचा.

स्नेही आणि परिचितांमध्ये अ.पां. म्हणून ओळखले जाणारे अ.पां. देशपांडे म्हणजे एक अजब रसायन म्हणावं लागेल.
अ.पां.हे मुळचे अभियांत्रिकी पदवीधर. (इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअर) गेली पस्तीसेक वर्षे त्यांनी विविध
कारखान्यात विशेषतः नोसिल या पेट्रोकेमिकल कंपनीत विविध खात्यात आपली सेवा रुजू केली. पोटापाण्यासाठी नोकरी करीत असतांनाच त्यांनी विज्ञानाशी नाते जोडले. त्यासाठी ते मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यात उत्स्फूर्त सहभागी होऊ लागले.नंतर ते या संस्थेशी एवढे एकरुप झाले की लोक म्हणू लागले की, अ.पां. आणि विज्ञान परिषद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकी मानून सतत कार्यरत राहणा-या अ.पां. यांची जाणीव व दखल शासकीय पातळीवर सुध्दा घेतली आहे; शिवाय त्यांना “फाय फॉऊंडेशन पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे. असो.

अ.पां.लिखित “महाराष्ट्राची तीन लाडकी व्यक्तिमत्वे” हे पुस्तक नुकतेच ग्रंथाली ने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मराठी विज्ञान परिषद, मुंबई येथे प्रकाशित केले. या चरित्र रुपी पुस्तकात आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या समग्र जीवनाचा साक्षेपी आढावा घेतला आहे.

खरं तर या ख्यातनाम व्यक्तींवर आजवर भरपूर लिहिलं गेलेलं; तरीही अ.पां. यांनी या व्यक्तिमत्त्वावर एका वेगळ्या शैलीत लिहिले आहे हे विशेष होय.

आचार्य अत्रे : एक अगडबंब व्यक्तिमत्त्व…
आचार्य अत्रे म्हणजे दै. मराठा, अत्रे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र राज्याची चळवळ,अत्रे म्हणजे वक्ता दशसहस्रेशु, अत्रे म्हणजे नाटककार, अत्रे म्हणजे मराठी माणसाचा आवाज, अत्रे म्हणजे राष्ट्रपती पारितोषिक विजयता मराठी सिनेमा श्री.साने गुरुजी यांच्या “श्यामची आई’ या कथेवर निर्माण केलेला चित्रपट “श्यामची आई” चे सबकुछ अत्रे. अशा या वैविध्यपूर्ण त्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्वा वर यथार्थ असा प्रकाशझोत ‘आचार्य अत्रे:एक अगडबंब व्यक्तीमत्व’ या लेखात टाकला आहे. यात अत्रेंच्या हजरजबाबी पणाची तसेच त्यांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविधांगी उत्तुंग कामगिरीवर लिहिलेलं वाचतांना आमच्या पिढीला गत स्मृतींना उजाळा मिळाला आहे.विशेष म्हणजे अत्रे-फडके/ प्रबोधनकार ठाकरे आदी दिग्गजांशी झालेले वाद-विवाद, राजकीय नेते आणि त्यांच्या राजकारणावर केलेली टीका म्हणजे अव्वल पत्रकारिता कशी असावी याचे उदाहरण म्हणजे आचार्य अत्रे यांचे अग्रलेख. चीनने भारतावर केलेले आक्रमण, त्यावर अत्रेंचे जहरी टीका करणारे अग्रलेख; नंतर अचानक नेहरुंचे झालेले निधन आणि त्यांच्या निधनानंतर सलग तेरा दिवस लिहिलेले अग्रलेख आदींना खरोखरच तोड नाही. अत्रेंच्यांच भाषेत वर्णन करायचे झाल्यास भारतीय विशेषतः मराठी जगतात “आचार्य अत्रे सारखी चतुरस्त्र व्यक्ती गेल्या दहा हजार वर्षांत झाली नाही अन् होणारही नाही“ असे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल यात शंका नाही.

“पु.ल.:एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व” या लेखात लेखक अ.पां.यांनी पु.ल. च्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वावर प्रसन्नपणे लिहिले आहे. अत्रेंप्रमाणे पु.ल. हे सुध्दा बहुआयामी असे व्यक्तिमत्व होते. फक्त इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचा काळ वगळता (राजकारण) पु.ल. यांनी अश्वमेध घोड्यावर स्वार होऊन साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, नाटक, सिनेमादी क्षेत्र पादाक्रांत करीत त्यावर आपल्या कर्तृत्वाचा असीम असा अलौकिक ठसा उमटविला होता. पु.ल.च्या सहवासातील राम पुजारी, वसंतराव देशपांडे, पंडित मल्लिकार्जुन, रामू भैय्या दाते,जयंत नारळीकर,बाबा आमटे, बाळासाहेब ठाकरे, विजया जयवंत, माणिक वर्मा, माधव मनोहर, अरुण आठल्ये, ग.दि. माडगुळकर, वसंत सबनीस, भारती मंगेशकर यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला आहे.पु.ल.च्या हजरजबाबीपणानी दिलेली उत्तरे खरोखरच लाजवाब.
पु.ल. यांच्या पत्र व्यवहारातील निवडक पत्रे या लेखात वाचायला मिळतात. सरते शेवटी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेली प्रार्थना. त्यातील काही निवडक :
§ माझी बडबडण्याची सवय कमी कर.
$ दुसऱ्यांना सरळ करण्याची फक्त माझी जबाबदारी व प्रत्येक प्रसंगी मी बोललेच पाहिजे माझी ही अनिवार्य इच्छा कमी कर.
$ इतरांचे दु:ख व वेदना ऐकण्यास मला मदत कर.नेमके अन् मोजके बोलायची संवय मला दे.
$ माझ्या चुकीची जाणीव मला होऊ दे.
$ माझ्यातील लहरीपणा आणि वर्चस्व गाजविण्याची इच्छा मला देऊ नकोस.
$ ज्यांच्याकडे खरा सल्ला मागता येईल
असे मोजके का होईना पण चार मित्र दे.

अशा दुर्मिळ अन् वैविध्यपूर्ण लेखांचा, त्यांच्या अवीट अविस्मरणीय अशा आठवणींचा खास नजराना लेखक अ.पां.नी या लेखात शब्दांकित केला आहे. यातील किस्से म्हणावे तसे दुर्मिळ म्हणायला हरकत नाही..

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी..
शेवटच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावर लिहिलेल्या लेखात प्रकाश महाजन यांनी भीमसेन यांच्या आठवणींना उजाळा देताना प्रकाश महाजन यांच्या वडिलांच्या सहवासातील क्षण मोजक्या शब्दात शब्दांकित केले आहे. भीमसेनजी यांचे महाजन यांच्या घरगुती आठवणींचा खजिना काही निवडक छायाचित्रांसह यात पाहायला मिळेल. ’पानशेत पुरग्रस्तांना मदत’ या भीमसेनजी यांच्या औदर्याची माहिती दिली आहे. प्रदीप देशपांडे यांनी “नाहीतर मी भीमसेनजींचा जावईच झालो असतो”. या छोटेखानी लेखात फक्त गोत्र एक आहे म्हणून…गमतीदार आठवणी वाचताना भीमसेनजींच्या आपलेपणावर केलेली टिप्पणी मनोज्ञ आहे. प्रख्यात पत्रकार अरविंद कुलकर्णी यांनी “भीमसेनजी आणि नातेसंबंध” यावर लिहिले आहे. मिंलिंद देशपांडे यांनी भीमसेन यांच्या खाद्य संस्कृतीवर लिहितांना “त्यांना आणखी पुरणपोळी खायची होती’’ आणि त्याच बरोबर कौटुंबिक स्नेह संबंधावर लिहिलेल्या आठवणी म्हणजे एक अनोखा खजिनाच होय.

”तळपता स्वरभास्कर” यात सुषमा देशपांडे, ”माझ्या आठवणीतील पंडित भीमसेन जोशी’’ लिहिले आहे डॉ प्रभाकर वसंत देशपांडे, पद्मा प्रभाकर देशपांडे यांनी ‘संस्मरणीय-स्वरनारायणाचे, भीमसेन मामांच्या आठवणी सांगितल्या आहेत. माणिक रमेश देशमुख यांनी, प्रभू अग्रहारकर यांनी ‘भीमसेनजीच्या आध्यात्मिक संगीत भरारी’, आठवणीतील भारतरत्न यात लता सतीश चौधरी, त्यांच्या अजून एका आठवणींना उजाळा दिला आहे. सतीश किसन चौधरी यांनी,या शिवाय उपेंद्र भट, प्रफुल्ल फडके, ‘सर्वश्रेष्ठ गायक, गुरू आणि व्यक्ती’यावर मुद्देसूद लेख लिहिला आहे. पांडुरंग मुखडे, राम पुजारी आणि शेवटच्या लेखात आनंद भाटे यांनी आपण ‘पंडितजीचे लाडके शिष्य कसे झालो’ यावर लिहितांना पंडितजीची चोखंदळ, चाणाक्षपणा आणि सर्मपितवृत्तीचे जे दर्शन घडविले आहे त्याला तोड नाही.

पंडित भीमसेन जोशी यांच्या संबंधी आठवणींना अ.पां. यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितल्या आहेत. मुळात पंडितजीवरील लेख लिहिणे (प्रस्तावना), तो नामवंतांकडून लिहून घेणे, ते सर्व लेख संकलित करून पुस्तकरूपाने प्रकाशित करणे हेच मुळी शिवधनुष्य. आणि हे पुस्तकरुपाने छापण्याची जबाबदारी ग्रंथाली ने उचलली. ग्रंथालीने आपल्या प्रकाशनास पन्नास वर्षे झाली हे औचित्य अ.पां. यांची मुलाखत पत्रकार निळू दामले यांनी घेतली. हे औचित्य साधून ग्रंथालीने हे प्रकाशित केले आहे हे कौतुकास्पद आहे.

उत्कृष्ट छपाई, सतीश भावसार यांचे आकर्षक मुखपृष्ठ यामुळे पुस्तकाच्या सौंदर्यात भर पडली आहे हे निश्चित. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्यावरील हा संग्रह प्रकाशित केल्याबद्दल लेखक, प्रकाशक यांचे अभिनंदन व शुभेच्छा.
साहित्य, संगीत यातील नवोदितांना हे पुस्तक निश्चितच खूप प्रोत्साहनात्मक मार्गदर्शक ठरेल..

नंदकुमार रोपळेकर

— परीक्षण : नंदकुमार रोपळेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. रोपळेकरजींना चांगला परिचय करुन दिला आहे. पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली. अ पा देशपांडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला सलाम
    धन्यवाद. 🙏

  2. पंडित भीमसेन जोशी यांच्या विषयी लेख लिहीणारे व दुर्मिळ छायाचित्रे प्राप्त करून देणारे जेष्ठ साहित्यिक मार्गदर्शक प्रा.प्रकाश महाजन माझे साहित्यिक गुरू आहेत.

    अभिनंदन….

    बालकवी गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव महाराष्ट्र .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments