आज, २३ फेब्रुवारी. संत गाडगेबाबा यांची जयंती. त्यानिमित्ताने वसंत गोविंद पोतदार लिखित आणि सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित “गाडगेबाबा” या पुस्तकाचा परिचय करून घेणे उचित ठरेल.
गाडगेबाबांना विनम्र अभिवादन.
– संपादक
” गाडगेबाबा” या पुस्तकाची चौथी आवृती माझ्या नुकतीच वाचनात आली. वसंत गोविंद पोतदार हे लेखक सी.रामचंद्र या संगीतकारांचे चिटणीस म्हणून इंदोरहून मुंबईत आले. सुरुवातीला ते शिवाजी महाराज, पु.ल.देशपांडे, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगेमहाराज, विवेकानंद यांच्या सारख्या व्यक्तींच्या चरित्रावर आधारीत हिंदी, बंगाली, मराठी भाषेत एकपात्री नाट्यप्रयोग करत. जवळ जवळ चाळीस वर्ष यानिमित्ताने देशांत व परदेशांत फिरले. त्यांनी मराठी, हिंदी, आणि बंगाली वर्तमानपत्रांतून भरपूर स्फुट लेखन केले. त्यांची वीस पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र लिहिले नसले तरी विजय बहादुरसिंग यांनी हिंदी भाषेत ‘वसंत पोतदार एक असाधारण गद्य शिल्पी’ हे पुस्तक लिहिले आहे़.
गाडगेबाबा यांच्यावर प्राचार्य रा.तु.भगत, प्रबोधनकार ठाकरे, मनोज तायडे, गो.नी.दांडेकर, केशव वसेकर, गिरिजा कीर, वसंत शिरवाडकर, मधुकर केचे, सुबोध मुजुमदार इत्यादी अनेक नामवंतांनी जवळ जवळ ८० चरित्र लिहिली आहेत. वसंत पोतदार यांनी “गाडगेबाबा” या नावाने जे चरित्र लिहिले आहे़, त्यात गाडगे बाबांच्या सर्व पैलूंवर प्रकाशझोत तर टाकला आहे़च, परंतु काही नामवंत साहित्यिकांनी गाडगेबाबा यांच्या सहवासात अनेक वर्ष राहून त्यांच्या निधनानंतर वीस वर्षांनी मोठे चरित्र लिहिले आहे़ त्यात त्यांनी स्वतः बद्दल व गाडगेबाबा यांच्याबद्दल काही मजकूर चुकीचा छापला आहे़. ते चरित्र लेखक मराठीतील महान साहित्यिक असल्याने त्यांच्यावर अनेक मान्यवर वाचकांचा विश्वास असल्याने गाडगेबाबा यांच्याबद्दल अनेकांचे गैरसमज झाले आहेत. ते गैरसमज दूर करण्यासाठी वसंत पोतदार यांनी अनेक ग्रंथ वाचले, गाडगेबाबा यांच्या सहवासात अनेक वर्ष राहून कार्य केलेल्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडून खरी माहिती मिळवली व ती पुराव्यानिशी दिली आहे़.

वाचकांनी वसंत पोतदार यांचे पुस्तक वाचल्यानंतर लेखकांनी कोणाचे चरित्र लिहिताना त्या व्यक्तीची पूर्ण माहिती गोळा केली पाहिजे इतरांनी लिहिलेली चरित्र वाचली पाहिजेत, त्यात काही तृटी असतील तर त्या पुराव्यानिशी दूर केल्या पाहिजेत हे लक्षात येते.
दोन वर्षांनी म्हणजे २३ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गाडगेबाबा यांची १५० वि जयंती आहे़. त्यानिमित्त वर्षभर अनेक उपक्रम राबवले पाहिजेत तसेच त्यांना मरणोत्तर “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार जाहीर करावा ही अपेक्षा.

— परीक्षण : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800